Old/New Testament
सुक्या हाडांचा दृष्टान्त
37 परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. परमेश्वराच्या आत्म्याने मला गावातून उचलून दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती दरी मृतांच्या हाडांनी भरलेली होती. 2 दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होत. त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले.
3 मग, परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होऊ शकतील का?”
मी उत्तरलो, “परमेश्वर देवा, ह्याचे उत्तर फक्त तुलाच माहीत आहे.”
4 परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने त्या हाडांशी बोल. त्यांना सांग ‘सुक्या हाडांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. 5 परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो: मी तुमच्यात प्राण निर्माण करीन मग तुम्ही जिवंत व्हाल. 6 मी तुमच्यावर स्नायू आणि मांस चढवीन आणि त्यावर कातडे ओढीन. मग तुमच्यात प्राण ओतीन. म्हणजे तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजून चुकेल की मीच परमेश्वर व प्रभू आहे.’”
7 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावतीने हाडांशी बोललो. माझे बोलणे सुरु असतानाच, मला मोठा आवाज ऐकू आला. हाडांचा खुळखुळाट झाला. ती एकमेकांना जोडली गेली. 8 माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस व कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता.
9 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने वाऱ्याशी बोल. त्याला पुढील गोष्टी माझ्यावतीने सांग: ‘सर्व बाजूंनी येऊन तू ह्या शरीरात स्पंदन निर्माण कर त्यांच्यात प्राण घाल, म्हणजे ती पुन्हा जिवंत होतील.’”
10 मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वाऱ्याशी बोललो. मग मृत शरीरांत जीव आला. ती जिवंत होऊन उभी राहिली ते पुष्कळ लोक होते. ते मोठे सैन्यच होते.
11 मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत. [a] आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’ 12 म्हणून त्यांच्याशी माझ्यावतीने बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन. मग मी तुम्हाला इस्राएलच्या भूमीत आणीन. 13 माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे. 14 मी तुमच्यात माझा आत्मा [b] ओतीन. म्हणजे मग तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग मी परमेश्वर असल्याचे कळेल. मी सांगितलेल्या गोष्टी मी घडवून आणल्या, हे ही तुमच्या लक्षात येईल.’” परमेश्वरच हे सर्व बोलला.
यहुदा व इस्राएल यांचे एकीकरण
15 मला परमेश्वराचे शब्द पुन्हा ऐकू आले. तो म्हणाला, 16 “मानवपुत्रा, एक काठी घे आणि तिच्यावर पुढील संदेश लिही. ‘ही काठी यहूदा आणि त्याचे मित्र [c] इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ मग दुसरी काठी घेऊन तिच्यावर लिही ‘ही एफ्राईमची काठी योसेफ व त्याचे मित्र इस्राएलचे लोक यांच्या मालकीची आहे.’ 17 मग त्या दोन काठ्या एकत्र जोड. तुझ्या हातांत ती एकच काठी असेल.
18 “तुझे लोक तुला ह्याचा अर्थ विचारतील. 19 त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘मी एफ्राईमच्या आणि त्याच्या मित्रांच्या म्हणजेच इस्राएलच्या लोकांच्या हातांत असलेली योसेफाची काठी घेईल. मग ती मी यहुदाच्या काठीबरोबर ठेवीन. माझ्या हातांत त्या दोन काठ्यांची एकच काठी होईल.’
20 “त्या काठ्या हातांत तुझ्या पुढे धर. त्यांच्यावर तू नांवे लिहिली आहेस. 21 लोकांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएल लोक वेगवेगळ्या राष्टांत गेले आहेत. तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सगळीकडून आणून, एकत्र गोळा करीन आणि त्यांना त्यांच्या देशात परत आणीन. 22 इस्राएलच्या पर्वतीय क्षेत्रात मी त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांचा मिळून एकच राजा असेल. यापुढे ती वेगवेगळी दोन राष्ट्रे असणार नाहीत, त्याचे दोन राज्यात विभाजन होणार नाही. 23 ते यापुढे स्वतःला त्या मूर्ती मुळे वा पुतळ्यांमुळे अमंगळ होणार नाहीत. त्यांनी पापे केलेल्या सर्व ठिकाणापासून मी त्यांना सुरक्षित ठेवीन. त्यांना धुवून शुद्ध करीन. मग ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन.
24 “‘माझा सेवक, दावीद, हा त्यांचा राजा होईल. त्या सर्वांना मिळून एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमाप्रमाणे वागतील आणि माझ्या कायद्यांचे पालन करतील. मी त्यांना करायला सांगितलेल्या गोष्टी ते करतील. 25 माझा सेवक, याकोब, याला मी दिलेल्या भूमीवर ते राहतील. तुमचे पूर्वज तेथेच राहात होते. आता माझी माणसे तेथे राहतील. ते, त्यांची मुले, नातवंडे कायमची तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा कायमचा नेता असेल. 26 मी त्यांच्याबरोबर शांतता करार करीन. तो करार कायमस्वरुपी असेल. मी त्यांना त्यांची जमीन देण्यास, त्यांची संख्या वाढवून देण्यास, त्यांच्या तेथेच कायमचे माझे पवित्र स्थान ठेवण्यास कबूल आहे. 27 त्यांच्यामध्येच माझा पवित्र तंबू असेल. हो! मी त्यांचा देव असेल व ते माझे लोक असतील. 28 मग इतर राष्ट्रांना कळून येईल की मी परमेश्वर आहे आणि इस्राएलमध्ये चिरंतन असे माझे पवित्र स्थान करुन त्या लोकांना मी माझी कायमची खास माणसे बनविली आहेत.’”
गोगबद्दल संदेश
38 परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, मागोगमधील गोगकडे बघ मेशेखचा व तुबालचा तो अती महत्वाचा नेता आहे. माझ्यावतीने गोगविरुद्ध बोल. 3 त्याला सांग की परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, ‘गोग तू मेशेख व तुबाल यांचा अती महत्वाचा नेता आहेस. पण मी तुझ्याविरुद्ध आहे. 4 मी तुला पकडीन आणि परत आणीन. तुझ्या सैन्यातील सर्व माणसांना मी परत आणीन. घोडे व सर्व घोडेस्वार यांनाही मी परत आणीन. मी तुम्हाला सर्वांना वेसण घालून परत आणीन. सर्व सैनिकांनी गणवेश घातलेले असतील आणि ढाली व तलवारी घेतलेल्या असतील. 5 पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. पारस, कूश व पुट ह्यांचे सैनिकही त्यांच्याबरोबर असतील. त्यांच्याजवळ ढाली असतील आणि त्यांनी शिरस्त्राणे घातलेली असतील. 6 त्याचप्रमाणे गोमर आणि अती उत्तरेचा देश तोगार्मा हेही आपापल्या सैनिकांबरोबर असतील. त्या कैद्यांच्या संचलनात प्रचंड संख्येने लोक असतील.
7 “‘सज्ज व्हा! हो! तुम्ही स्वतः आणि तुम्हाला येऊन मिळालेली सैन्य ह्यांनी तयार राहा. तुम्ही लक्ष ठेवा आणि हुशार राहा. 8 पुष्कळ काळानंतर तुम्हाला कामाकरिता बोलविण्यात येईल. पुढील काळात युद्धातून तरलेल्या प्रदेशात, तुम्ही याल. ह्या प्रदेशातील लोकांना पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतून गोळा केले जाईल आणि इस्राएलच्या पर्वताकडे परत आणले जाईल. पूर्वी इस्राएलच्या पर्वतांचा पुन्हा पुन्हा नाश केला गेला. पण हे लोक इतर राष्ट्रांतून परत येतील. ते सर्वच्या सर्व सुरक्षित राहतील. 9 पण तू त्यांच्यावर चढाई करण्यासाठी येशील. तू वादळासारखा येशील. सर्व देशाला व्यापणाऱ्या, गडगडाट करणाऱ्या ढगासारखा तू येशील, तू आणि तुझ्याबरोबरचे इतर राष्ट्रांचे सैन्य ह्या लोकांवर हल्ला करण्यासाठी याल.’”
10 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी तुझ्या मनात एक कल्पना येईल, तू एक दुष्ट बेत आखू लागशील. 11 तू म्हणशील, ‘तटबंदी नसलेल्या शहरांच्या देशावर (इस्राएलवर) मी हल्ला करीन. ते लोक शांतीने राहतात. त्यांना ते सुरक्षित आहेत असे वाटते. त्यांचे रक्षण करण्यास गावांभोवती तट नाही. त्यांच्या वेशींना अडसर नाहीत. खरे म्हणजे त्यांना वेसच नाही. 12 मी त्या लोकांचा पराभव करुन, त्यांची मौल्यावान संपत्ती लुटीन. पूर्वी नाश झालेल्या, पण आता लोक राहात असलेल्या स्थानांशी मी लढेन. इतर राष्ट्रांतून गोळा झालेल्या लोकांशी (इस्राएलशी) मी लढेन. आता त्यांच्याजवळ गुरेढोरे व मालमत्ता आहे. ते जगाच्या चौकात रहातात. शक्तिशाली देशांना इतर शक्तिशाली देशांकडे जाण्यासाठी त्या प्रदेशातून प्रवास करावाच लागतो.’
13 “शबा, ददान, दार्शीशचे व्यापारी आणि त्यांच्याबरोबर व्यापार करणारी सर्व गावे तुला विचारतील ‘तू मौल्यवान वस्तू हस्तगत करण्यास आलास का? चांगल्या गोष्टी बळकावण्यासाठी व सोने, चांदी, गुरेढोरे आणि मालमत्ता लुटून नेण्यासाठी तू आपल्या सैन्याच्या जथ्याला घेऊन आला आहेस का? सर्व अमूल्य वस्तू घेण्यासाठी तू आला आहेस का?’”
14 देव म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने गोगशी बोल. त्याला सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘माझे लोक शांतीने व सुरक्षीत राहात असतील, तेव्हा तू त्यांच्यावर चढाई करण्यासाठी येशील. 15 तू तुझ्या अगदी उत्तरेकडच्या प्रदेशातून येशील. तू तुझ्याबरोबर खूप लोक आणशील. ते सर्व घोड्यांवर स्वार होऊन येतील. तुझे सैन्य मोठे व शक्तिशाली असेल. 16 तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसांत माझ्या देशाशी लढण्यासाठी मी तुला आणीन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे. मी तुला काय करील ते ते पाहातील.’”
17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी, मी पूर्वी जे तुझ्याजवळ बोललो होतो, ते लोकांना आठवेल. मी माझ्या सेवकांचा, इस्राएलच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला हेही त्यांना आठवेल मी तुला त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन असे इस्राएलच्या संदेष्ट्यांनी, माझ्यावतीने, पूर्वीच सांगितल्याचे त्यांना स्मरेल.”
18 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “त्या वेळी गोग इस्राएलच्या विरुद्ध लढण्यास येईल आणि मी माझा क्रोध प्रकट करीन. 19 माझ्या रागाच्या भरात आवेशाने मी पुढील वचन देत आहे. इस्राएलमध्ये मोठे भूकंप होतील. 20 त्या वेळी सर्व सजीव भीतीने कापतील. समुद्रातील मासे, हवेत भराऱ्या मारणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे सर्व छोटे जीव आणि सर्व माणसे ह्यांच्या भीतीने थरकाप उडेल. पर्वत व कडे कोसळतील. प्रत्येक भिंत जमीनदोस्त होईल.”
21 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “इस्राएलच्या पर्वतावर, गोरविरुद्ध मी सर्व प्रकारचे भय आणीन. [d] त्याचे सैनिक भीतीने एवढे गर्भगळीत होतील की ते एकमेकांवरच तलवारीने हल्ले करुन एकमेकांना मारतील. 22 मी रोगराई व मृत्यू ह्याद्वारे गोगला शिक्षा करीन. गोग व पुष्कळ राष्ट्रांतून गोळा झालेल्या त्याच्या सैन्यावर गारा, आग व गंधक ह्यांचा वर्षाव करीन. 23 मग मी किती थोर आहे ते दाखवीन. मी पवित्र आहे हे सिद्ध करीन. पुष्कळ राष्ट्रे माझी कृत्ये पाहतील व मग त्यांना ‘मी कोण आहे’ हे कळू येईल. मग त्यांना पटेल की मीच देव आहे.”
गोगचा आणि त्याच्या सैन्याचा मृत्यू
39 “मानवपुत्रा, माझ्यावतीने गोगच्याविरुद्ध बोल. त्याला, परमेश्वर, प्रभू, पुढील गोष्टी सांगतो म्हणून सांग: ‘गोग, मेशेख आणि तुबाल यांचा तू सर्वांत महत्वाचा नेता आहेस पण मी तुझ्याविरुद्ध आहे. 2 मी तुला पकडून परत आणीन. अती उत्तरेकडून मी तुला परत आणीन. इस्राएलच्या पर्वंतांशी लढण्यासाठी मी तुला परत आणीन. 3 पण मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य व उजव्या हातातील बाण खाली पाडीन. 4 तू इस्राएलच्या पर्वतांत मारला जाशील. लढाईत तू, तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे यांना ठार मारले जाईल. मी तुला मांसभक्षक पक्ष्यांचे व हिंस्र प्राण्याचे भक्ष्य करीन. 5 तू गावात प्रवेश करणार नाहीस. मी सांगतो, बाहेरच्या मोकळ्या रानात तुला ठार मारले जाईल.’” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
6 देव म्हणाला, “मागोगमध्ये व किनाऱ्यावर सुरक्षिपणे राहणाऱ्या लोकांमध्ये मी आग लावीन. मग त्यांना ‘मी परमेश्वर आहे’ हे समजेल. 7 इस्राएलच्या माझ्या लोकांना मी माझे पवित्र नाव माहीत करुन देईन. यापुढे मी लोकांना माझ्या पवित्र नावाला बट्टा लावू देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर आहे, मीच इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे. 8 ती वेळ येत आहे! ते घडेलच!” परमेश्वर असे म्हणाला, “त्याच दिवसाबद्दल मी बोलत आहे.”
9 “तेव्हा इस्राएलच्या गावांत राहणारे लोक त्या रानांत जातील. ते शत्रूची शस्त्रे गोळा करुन जाळतील. ते सर्व ढाली, धनुष्य बाण, दंड व भाले जाळतील. ते ह्या शस्त्रांचा उपयोग सरपण म्हणून सात वर्षे करतील. 10 त्यामुळे त्यांना सरपण गोळा करावे लागणार नाही वा जंगलांत लाकडे तोडावी लागणार नाहीत. कारण ते शस्त्रांचा उपयोग सरपणाप्रमाणे करतील. त्यांना लुटू पाहणाऱ्या सैनिकांकडूनच ते मौल्यवान वस्तू काढून घेतील. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी बळकावू पाहणाऱ्या सैनिकांकडूनच ते अशा गोष्टी घेतील.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
11 देव म्हणाला, “तेव्हा मी गोगला पुरण्यासाठी इस्राएलमधील एक जागा निवडीन. मृत समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगला पुरले जाईल. मग प्रवाशांचा रस्ता अडेल. का? कारण त्या ठिकाणी गोग व त्याच्या सैन्याला पुरले जाईल. लोक त्या जागेला ‘गोगच्या सैन्याची दरी’ असे म्हणतील. 12 भूमी शुद्ध करण्यासाठी, इस्राएलच्या लोकांना, सात महिने त्यांना पुरावे लागेल. 13 सामान्य लोक त्या शत्रू सैनिकांना पुरतील. मी ज्या दिवशी गौरविला जाईन, त्या दिवशी इस्राएलच्या लोकांची कीर्ती होईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
14 देव म्हणाला, “त्या मेलेल्या सैनिकांना पुरण्यासाठी, कामगारांना, पूर्ण वेळचे काम द्यावे लागेल. अशा रीतीने, ते देशाला शुद्ध करतील. त्या कामगारांना सात महिने काम करावे लागेल. ते भोवताली प्रेतांचा शोध घेतील. 15 ते सभोवती पाहात जातील. त्यांच्यातील एखाद्याला एखादे हाड दिसताच, तो तेथे खूण करुन ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या हाडाला गोगच्या सैन्याच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील. 16 मृतांच्या त्या गावाला हमोना [e] असे नाव दिले जाईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मानवपुत्रा माझ्यावतीने सर्व पक्ष्यांशी व हिंस्र प्राण्याशी बोल. त्यांना सांग ‘इकडे या! भोवताली गोळा व्हा. मी तुमच्यासाठी देत असलेला बळी खा. इस्राएलच्या पर्वतांवर फार मोठा बळी दिला जाईल. या मांस खा व रक्त प्या. 18 शक्तिशाली सैनिकांचे मांस तुम्ही खाल. जागातिक नेत्यांचे रक्त तुम्ही प्याल. ते एडके, मेंढ्या, बोकड व बाशानमधील पुष्ट बैलांसारखे आहेत. 19 तुम्हाला हवी तेवढी चरबी तुम्ही खाऊ शकाल. पोट भरेपर्यंत रक्त तुम्ही प्याल. तुम्ही मी मारलेल्या बळीला खाल व त्याचे रक्त प्याल. 20 माझ्या टेबलावर तुम्हाला खाण्यासाठी भरपूर मांस असेल. तेथे घोडे, सारथी, शक्तिशाली सैनिक आणि इतर लढवय्ये असतील.’” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
21 देव म्हणाला, “मी जे केले, ते इतर राष्ट्रांना पाहू देईन. मग ती राष्ट्रे मला मान द्यायला लागतील. त्या शत्रूविरुद्ध वापरलेले माझे सामर्थ्य ते पाहतील. 22 मग त्या दिवसापासून, इस्राएलच्या लोकांना मीच त्यांचा परमेश्वर देव असल्याचे समजून येईल. 23 आणि इस्राएलच्या लोकांना कैदी म्हणून इतर देशांत का नेले गेले, हेही इतर राष्ट्रांना कळेल. त्यांना समजेल की माझी माणसेच माझ्याविरुद्ध गेली म्हणून मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला म्हणून माझे लोक लढाईत मारले गेले. 24 त्यांनी पाप केले व स्वतःला अमंगळ करुन घेतले म्हणून त्यांनी केलेल्या कर्माबद्दल मी त्यांना शिक्षा केली. मी त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना मदत करण्याचे नाकारले.”
25 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “याकोबच्या लोकांना कैदेतून परत आणीन. इस्राएलच्या सर्व लोकांवर मी दया करीन. माझ्या पवित्र नावाबद्दल आवेशाने भावना प्रकट करीन. 26 पूर्वी माझ्या विरुद्ध केलेल्या दुष्टाव्याची लोकांना लाज वाटेल. ते माझ्याविरुद्ध गेले ते सर्व विसरतील. ते त्यांच्या देशात सुरक्षितपणे राहतील. त्यांना कोणीही घाबरविणार नाही. 27 इतर देशांतून मी माझ्या माणसांना परत आणीन. त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना गोळा करीन. मग मी किती पवित्र आहे ते इतर पुष्कळ राष्ट्रांना कळेल. 28 त्यांना कळेल की मीच त्यांचा परमेश्वर आहे. का? कारण मीच त्यांना कैदी म्हणून दुसऱ्या देशांत जायला भाग पाडले आणि मीच त्याना एकत्र गोळा करुन त्यांच्या देशात परत आणले. 29 इस्राएलच्या लोकांमध्ये मी माझा आत्मा ओतीन आणि त्या नंतर मी कधीच माझ्या लोकांपासून दूर जाणार नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
खोटे शिक्षक
2 तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे होऊन गेले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार. ते लोकांमध्ये विध्वंसक विचार पसरवतील. आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत. असे करण्याने ते स्वतःवर ताबडतोब नाश ओढवून घेतील. 2 तसेच पुष्कळ लोक प्रखर लैंगिक वासनांच्या आहारी जाऊन अनैसर्गिक शरीर व्यवहारात गुरफटतील. त्यांच्यामुळे खऱ्या मार्गाची निंदा होईल. 3 त्यांच्या अधाशीपणामुळे त्यांनी तयार केलेल्या शिकवणुकीने पैशांसाठी तुमची पिळवणूक करतील. फार पूर्वी देवाने त्यांना दिलेली शिक्षा ही पोकळ धमकी नाही तर त्यांचा नाश त्यांची वाट पाहत आहे.
4 कारण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडद अंधारात टाकले.
5 देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीने राहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावर पाण्याचा महापूर आणाला.
6 देवाने सदोम व गमोरा या शहरांना जाळून बेचिराख करण्याची शिक्षा दिली व भविष्यकाळात अनैतिक लोकांचे काय होईल हे या उदाहरणाने दाखवून दिले. 7 आपल्या अनीतिच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनी लोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले, त्याची देवाने सुटका केली. 8 दिवसेंदिवस त्या लोकांमध्ये राहत असताना, त्या नियमविरहीत लोकांमुळे जे तो पाहत व ऐकत होता त्यामुळे त्या चांगल्या मनुष्याला आपले धार्मिक ह्रदय, फाटून जाते की काय असे त्याला वाटत होते.
9 अशा प्रकारे, प्रभुला, धार्मिक लोकांची त्यांच्या दु:खापासून सुटका कशी करायची हे माहीत आहे आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे. 10 विशेषतः
जे पापमय वासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोक गौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत. 11 याउलट देवदूत जे या लोकांपेक्षा सामर्थ्याने व बळाने महान आहेत, ते देवासमोर या लोकांविरुद्ध अपमानास्पद गैर काही बोलत नाहीत. 12 परंतु हे लोक ज्यांना पकडून मारुन टाकावे अशा देहस्वभावानुसार चालणाऱ्या बुद्धीहीन पशूंसारखे आहेत. ज्या गोष्टींबद्दल ते अज्ञानी आहेत, त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो, त्याचप्रमाणे (खोट्या शिक्षकांचाही) नाश केला जाईल. 13 आणि त्यांनी इतरांना दुखावल्याचे आणि अन्यायाचे फळ म्हणून त्यांनाही दुखाविण्यात येईल.
भर दिवसा वाईट गोष्ट करण्यात आनंद आहे असे ते लोक मानतात. ते डाग आणि कलंक असे आहेत. ते तुमच्याबरोबर मेजवानीत सामील होताना आपल्या कपटाच्या आनंदात बेभान होतात. 14 त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडे कामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापात ओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.
15 सरळ वाट सोडून ते भलतीकडे भरकटत गेले आहेत. बौराचा पुत्र बलाम याच्यासारखी वाट त्यांनी धरली आहे. बलामाला अयोग गोष्टी करण्याकरिता लाच घेणे आवडत असे. 16 परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कानउघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शकणाऱ्या गाढवाने माणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला.
17 हे खोटे शिक्षक पाणी नसलेले कोरडे झरे व वादळाने पांगविलेले ढग आहेत. खोल अंधारात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली आहे. 18 ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या संगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागले आहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात. 19 हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांना मोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वतःच नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.
20 म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांची ज्या लोकांना ओळख होते, त्यांची जगाच्या दूषित वातावरणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपला पगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते. 21 त्यांना जर चांगला मार्ग माहीत झाला नसता तर चांगले झाले असते कारण चांगला मार्ग माहीत होणे आणि त्या लोकांना दिलेल्या पवित्र शिक्षणापासून त्यांनी वळणे, यापेक्षा (अगोदरची स्थिती चांगली होती.) 22 त्यांच्या बाबतीत जे घडले ते या खऱ्या म्हणीत सांगितले आहे: “आपल्याच ओकीकडे परतणारा कुत्रा” आणि दुसऱ्या म्हणीतः “स्वच्छ केले तरी चिखलात लोळणारे डुक्कर.”
2006 by World Bible Translation Center