Old/New Testament
51 परमेश्वर म्हणतो,
“मी जोरदार वादळ निर्माण करीन.
त्या वादळाचा तडाखा बाबेलला व तिच्या लोकांना देईन.
2 मी बाबेलची उफाणणी करण्यासाठी परदेशी लोक पाठवीन.
ते बाबेलला पाखडून काढतील.
ते बाबेलमधून सर्व काही नेतील सैन्य बाबेलला वेढा देईल.
बाबेलमध्ये भयंकर संहार होईल.
3 बाबेलच्या सैन्याला त्यांच्या धनुष्यबाणांचा उपयोग करता येणार नाही.
त्यांना चिलखते चढवायलाही वेळ मिळणार नाही.
बाबेलच्या तरुण पिढीबद्दल खेद करु नका.
बाबेलच्या सैन्याचा नाश करा.
4 बाबेलचे सैनिक खास्द्यांच्या भूमीत गारद केले जातील.
बाबेलच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जखमी केले जातील.”
5 सर्वशक्तिमान परमेश्वराने इस्राएलला
व यहूदास, विधवेप्रमाणे टाकून दिलेले नाही.
देवाने त्या लोकांचा त्याग केलेला नाही.
उलटपक्षी, त्याच लोकांनी इस्राएलच्या एकमेव पवित्र परमेश्वराला सोडण्याचा गुन्हा केला आहे.
लोकांनी परमेश्वराला सोडले.
पण देवाने काही त्या लोकांना दूर लोटले नाही.
6 स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बाबेलमधून दूर पळून जा.
बाबेलच्या पापांबद्दल, मागे राहून,
स्वतःवर मरण ओढवून घेऊ नका.
त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना परमेश्वराने सजा देण्याची वेळ आता आली आहे.
बाबेलला योग्य अशीच सजा मिळेल.
7 बाबेल म्हणजे जणू काही परमेश्वराच्या हातातील सोन्याचा प्याला होता.
बाबेलने सर्व जगाला मद्य पाजले.
राष्ट्रांनी बाबेलचे मद्य प्यायले
आणि ते खुळे झाले.
8 पण बाबेलचे अकस्मात पतन होईल आणि त्याची शकले पडतील.
तिच्यासाठी शोक करा.
तिच्या दु:खावर इलाज करा.
कदाचित् तिच्या जखमा भरुन येतील.
9 आम्ही बाबेलला सुधारण्याचा प्रयत्न केला,
पण ती पूर्वपदावर येणे शक्य नाही,
तेव्हा आपण तिला सोडून आपापल्या देशात जाऊ या.
स्वर्गातील देव बाबेलच्या शिक्षेबद्दल
आणि भवितव्याबद्दल निर्णय घेईल.
10 परमेश्वराने आपल्याला न्याय दिला.
आपण त्याबद्दल सियोनमध्ये सांगू या.
आपल्या परमेश्वर देवाने घडवून आणलेल्या गोष्टींबद्दल आपण बोलू या.
11 बाण धारदार करा!
ढाली घ्या.
परमेश्वराला मेद्यांच्या राजाकडून बाबेल नष्ट करायचे होते,
म्हणून त्याने त्यांना स्फूर्ती दिली.
बाबेलच्या लोकांना योग्य अशी शिक्षा परमेश्वर करील.
बाबेलच्या सैन्याने यरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर उध्वस्त केले.
त्याबद्दल परमेश्वर त्यांना यथायोग्य शिक्षा करील.
12 बाबेलच्या तटासमोर झेंडा उभारा.
जास्ती रक्षक आणा.
पहारेकऱ्यांना त्यांच्या जागी उभे करा.
छुपा हल्ला करण्याची तयारी करा.
परमेश्वर, त्याने ठरविल्याप्रमाणे करील.
बाबेलच्या लोकांविरुद्ध, त्याने सांगितल्याप्रमाणे, तो कारवाई करील.
13 बाबेल, तू भरपूर पाण्याच्या ठिकाणी वसली आहेस.
तुझ्याकडे भरपूर संपत्ती आहे.
पण राष्ट्र म्हणून तुझा शेवट जवळ आला आहे.
तुझा नाश करण्याची हीच वेळ आहे.
14 सर्वशक्तिमान परमेश्वराने स्वतःच्या नावाने पुढील वचन दिले,
“बाबेल, मी तुझ्यात मोठ्या प्रमाणात शत्रू सैन्य पेरीन.
एखाद्या टोळ धाडीप्रमाणे असणारे हे सैन्य तुझ्याविरुध्दची लढाई जिंकेल.
आणि तुझ्या भूमीवर उभे राहून ते जयघोष करील.”
15 परमेश्वराने आपली महान शक्ती वापरुन ही पृथ्वी निर्माण केली.
त्याने आपले ज्ञान वापरुन जगाची उभारणी केली.
आपल्या आकलन शक्तीने त्यावर आकाश पांघरले.
16 जेव्हा परमेश्वर गरजतो, तेव्हा आकाशात
ढगांचा गडगडाट होतो तो पृथ्वीवर सर्वत्र ढग
पाठवितो पावसाबरोबर वीज पाठवितो
तो आपल्या कोठारातून वारा आणतो.
17 पण लोक इतके मूर्ख असतात
की देवाने काय केले ते जाणत नाहीत.
कुशल कारागीर खोट्या दैवतांच्या मूर्ती करतात.
त्या मूर्ती खोट्याच असतात.
त्या म्हणजे कारागिराच्या मूर्खपणाचे प्रतीक होय.
त्या मूर्ती काही जिवंत नसतात.
18 त्या मूर्ती कवडीमोलाच्या आहेत.
लोकांनी घडविलेल्या त्या मूर्ती म्हणजे भ्रम आहे.
त्यांच्या न्यायनिवाड्याचा दिवस उजाडेल
आणि त्यांचा नाश केला जाईल.
19 पण याकोबाचा अंश (देव) त्या टाकाऊ पुतळ्यांसारखा नाही.
लोकांनी देवाला निर्माण केले नसून,
देवाने त्या लोकांना निर्माण केले.
प्रत्येक गोष्टीचा निर्माता तोच एकमेव आहे.
त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
20 परमेश्वर म्हणतो, “बाबेल, तू माझा दंडुका आहेस.
तुझा उपयोग मी राष्ट्रांची शकले
व राज्यांचा नाश करण्यासाठी केला.
21 तुझा उपयोग मी घोडे आणि स्वार, रथ
आणि सारथी ह्यांचा नाश करण्यासाठी केला.
22 पुरुष आणि स्त्रिया वृद्ध आणि तरुण,
तरुणी यांचा नाश करण्यासाठी मी तुझा उपयोग केला.
23 मेंढपाळ व कळप, शेतकरी आणि गाई,
राज्यकर्ते व महत्वाचे अधिकारी यांचा नाश करण्यासाठी मी तुझा उपयोग केला.
24 पण मी बाबेलचे व तेथील लोकांचे उट्टे काढीन.
त्यांनी सियोनमध्ये जी दुष्कृत्ये केली, त्याचे परिणाम मी त्यांना भोगायला लावीन.
यहूदा, तुझ्या लक्षात येईल, असे शासन मी त्यांना करीन.”
असे परमेश्वर म्हणाला,
25 परमेश्वर म्हणतो,
“बाबेल तू एखाद्या विनाशकारी पर्वताप्रमाणे आहेस,
आणि मी तुझ्याविरुद्ध आहे.
तू सर्व देशाचा नाश केलास, आणि मला ते आवडले नाही.
मी माझ्या हाताच्या बळाने तुला कड्यांवरुन लोटून देईन.
आणि बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुझी स्थिती करीन.
26 इमारतींच्या पायासाठी लोक बाबेलमधून एकही दगड घेणार नाहीत.
कोनाशिलेला लागणारा मोठा चिरा लोकांना मिळणार नाही.
का? कारण तुमची नगरी म्हणजे पडीक दगडधोंड्यांचा कायमचा खच असेल.”
परमेश्वराने हे सांगितले.
27 “देशात युद्धाचे निशाण उभारा!
सर्व राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका.
बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांना सज्ज करा.
अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना बाबेलवर
चढाई करण्यासाठी बोलवा.
तिच्याविरुद्ध लढणाऱ्या सैन्याच्या सेनापतीची निवड करा.
टोळधाडीप्रमाणे घोडे पाठवा.
28 बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांची सिद्धता करा.
मेद्यांच्या राजांना सज्ज करा.
त्यांच्या अधिपतींना आणि अधिकाऱ्यांना लढण्यासाठी तयार करा.
बाबेलच्या अंमलाखालच्या सर्व देशांना बाबेलच्या विरुद्ध लढण्यास सिद्ध करा.
29 वेदना होत असल्याप्रमाणे भूमी कापते व हालते.
बाबेलबद्दल परमेश्वराने ठरविलेला बेत परमेश्वराने सिद्धीस नेताच भूमी कंप पावेल.
बाबेलचे निर्जन वाळवंटात रुपांतर करण्याचा देवाचा बेत आहे.
तेथे कोणीही राहणार नाही.
30 बाबेलच्या सैनिकांनी लढाई थांबवली आहे.
ते त्यांच्या किल्ल्यांतच राहिले आहेत.
त्यांची शक्ती संपली आहे
ते बायकांप्रमाणे घाबरुन गेले आहेत.
बाबेलमधील घरे जळत आहेत.
तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.
31 एका दूतामागून दुसरा दूत येतो.
दूतामागून दूत येतात.
ते बाबेलच्या राजाला संपूर्ण शहर
काबीज केले गेल्याचे सांगतात.
32 नदीचे उतार शत्रूच्या ताब्यात गेले आहेत.
पाणथळ प्रदेश जळत आहेत.
बाबेलचे सर्व सैनिक घाबरले आहेत.”
33 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो,
“बाबेल म्हणजे जणू काही खळे आहे.
सुगीच्या वेळी लोक फोलकटापासून दाणे वेगळे करण्यासाठी धान्य झोडपतात
आणि बाबेलला झोडपण्याची वेळ लवकरच येत आहे.”
34 सियोनचे लोक म्हणतील, “बाबेलच्या राजा नबुखद्नेस्सरने पूर्वी आमचा नाश केला.
पूर्वी त्याने आम्हाला दुखावले.
त्याने आमचे लोक नेले,
व त्यामुळे आमची स्थिती रिकाम्या रांजणासारखी झाली.
आमच्याजवळचे जेवढे चांगले, तेवढे त्याने नेले,
आणि आम्हाला दूर फेकून दिले.
तो पोट भरेपर्यंत आम्हाला खाणाऱ्या
एखाद्या प्रचंड राक्षसासारखा होता.
35 आम्हाला दुखविण्यासाठी बाबेलने भंयकर गोष्टी केल्या.
आता त्याची परतफेड करण्याची आमची इच्छा आहे.”
सियोनमध्ये राहणारे लोक असे म्हणाले.
“आमच्या लोकांना मारण्याचा अपराध बाबेलच्या लोकांनी केला आहे.
त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना आता सजा मिळत आहे.”
यरुशलेम नगरी अशी म्हणाली.
36 म्हणून परमेश्वर म्हणतो,
“यहूदा, मी तुझे रक्षण करीन.
बाबेलला शिक्षा होईल ह्याची मी दक्षता घेईन.
मी बाबेलचा समुद्र आटवीन
आणि तिचे जलस्रोत सुकवून टाकीन.
37 बाबेल म्हणजे पडक्या इमारतींची रास होईल.
जंगली कुत्रेच तेथे राहतील.
लोक ती दगडधोंड्यांची रास पाहून चकित होतील.
बाबेलचा विचार त्यांच्या मनात येताच ते हळहळतील.
बाबेल अगदी निर्जन होईल.
38 “बाबेलचे लोक गुरगुरणाऱ्या सिंहाच्या छाव्यासारखे आहेत.
ते छाव्याप्रमाणे गुरगुरतात.
39 ते शक्तिवान सिंहासारखे वागत आहेत.
मी त्यांना मेजवानी देईन.
मी त्यांना मद्य प्यायला लावीन.
ते हसतील व मजा करतील.
मग मात्र ते कायमचे झोपी जातील.
ते पुन्हा कधीच उठणार नाहीत.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
40 “बाबेल, मरणाची वाट पाहणाऱ्या शेळ्या, मेंढ्या, एडके ह्यांच्याप्रमाणे, असेल.
मी त्यांना त्यांची कत्तल करण्यासाठी घेऊन जाईन.
41 “शेशखचा” पराभव होईल.
सर्व जगातील अत्युत्तम
व गर्विष्ठ देशाला कैदी बनवले जाईल.
दुसऱ्या राष्ट्रांतील लोक बाबेलकडे पाहून भयभीत होतील.
कारण बाबेलला उध्वस्त होताना त्यांनी पाहिले होते.
42 समुद्र बाबेलवर पसरेल.
त्याच्या गरजणाऱ्या लाटा बाबेलला झाकून टाकतील.
43 बाबेलमधील गावांचा नाश होईल आणि ती ओसाड बनतील.
बाबेल एक रुक्ष वाळवंट होईल.
तो निर्जन होईल.
लोक ह्या भूमीतून नुसता प्रवाससुध्दा करणार नाहीत.
44 बाबेलमधील बेल या दैवताला मी शिक्षा करीन.
मी, त्याने गिळलेल्यांना, त्याला ओकायला लावीन.
बाबेलची तटबंदी पडेल,
आणि इतर राष्ट्रे बाबेलकडे येणार नाहीत.
45 माझ्या लोकांनो, बाबेलच्या शहरातून बाहेर या.
जीव वाचविण्यासाठी पळा.
परमेश्वराच्या कोपापासून दूर पळा.
46 “माझ्या माणसांनो, भिऊ नका.
अफवा पसरतील, पण घाबरु नका.
एक अफवा ह्या वर्षी
तर दुसरी पुढल्या वर्षी येईल.
देशातील भयानक युध्दाबद्दल अफवा पसरतील.
राजांच्या एकमेकांविरुद्ध चाललेल्या लढाईबद्दल वावड्या उठतील.
47 बाबेलच्या दैवतांना शिक्षा करण्याची
व संपूर्ण बाबेल देशाला लज्जित होण्याची, वेळ नक्कीच येईल.
त्या शहराच्या रस्त्यांवर खूप
प्रेते पडलेली असतील.
48 मग आकाश व पृथ्वी जयघोष करील.
कारण उत्तरेकडून बाबेलविरुद्ध लढण्यासाठी सैन्य येईल.”
परमेश्वरच असे म्हणाला,
49 “बाबेलने इस्राएलच्या लोकांना ठार केले.
पृथ्वीवरच्या प्रत्येक प्रदेशातील लोकांना बाबेल देशाने ठार मारले.
म्हणून बाबेलचे पतन झालेच पाहिजे.
50 तुम्ही लोकांनी तलवारीला चुकविले.
तुम्ही घाई करुन बाबेल सोडला पाहिजे.
वाट पाहू नका.
तुम्ही दूरदेशी आहात.
पण तुम्ही जेथे आहात, तेथून परमेश्वराचे स्मरण करा, आणि यरुशलेमची आठवण ठेवा.
51 “आम्ही, यहूदाचे लोक लज्जित झालो आहोत.
आमचा अपमान झाला आहे.
का? कारण परके परमेश्वराच्या मंदिरातील
पवित्र ठिकाणी गेले आहेत.”
52 परमेश्वर म्हणतो, “बाबेलमधील मूर्तींना
शिक्षा करण्याची वेळ येत आहे.
त्या वेळी, देशात सर्व ठिकाणी
जखमी लोक यातनेने तळमळतील.
53 कदाचित् बाबेल आकाशाला टेकेपर्यंत वाढली असती.
बाबेलने आपले किल्ले मजबूत केले असते.
पण मी तिच्याविरुद्ध लढण्यास माणसे पाठवीन,
आणि ते तिचा नाश करतील.”
परमेश्वर असे म्हणाला,
54 “बाबेलमध्ये लोक रडताना आपण ऐकू शकतो.
लोक तेथील वस्तूंचा नाश करीत असल्याचे आपण ऐकतो.
55 लवकरच परमेश्वर बाबेलचा नाश करील.
त्या शहरातील कोलाहल तो शांत करील.
लाटांच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करीत शत्रू येतील.
आजूबाजूचे लोक त्या गर्जना ऐकतील.
56 सैन्य येईल व बाबेलचा नाश करील.
बाबेलचे सैनिक पकडले जातील.
त्यांची धनुष्ये मोडली जातील.
का? कारण लोकांनी केलेल्या
दुष्कृत्यांबद्दल परमेश्वर त्यांना शिक्षा करतो.
त्यांच्या पात्रतेनुसार परमेश्वर
त्यांना पूर्ण शिक्षा करतो.
57 बाबेलमधील ज्ञानी,
महत्वाचे अधिकारी,
राज्यपाल, इतर अधिकारी
आणि सैनिक यांना मी मद्य पाजून झिंगायला भाग पाडीन.
मग ते कायमचे झोपी जातील.
परत कधीही उठणार नाहीत.”
राजा असे म्हणाला.
त्या राजाचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर.
58 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“बाबेलची जाड मजबूत तटबंदी जमीनदोस्त केली जाईल.
तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील.
बाबेलचे लोक खूप मेहनत करतील.
पण त्याचा काही उपयोग होणार नाही.
शहर वाचविण्याच्या प्रयत्नात
ते पार दमून जातील.
ते सरपणाप्रमाणे होतील.”
यिर्मया बाबेलला संदेश पाठवितो
59 सारया ह्या अधिकाऱ्याला यिर्मयाने पुढील संदेश दिला. सारया नेरीयाचा मुलगा होय व नेरीया हा मासेयाचा मुलगा होय. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर सारया, सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलला गेला. त्याच वेळी, सारयाला यिर्मयाने संदेश दिला. 60 यिर्मयाने बाबेलमध्ये घडून येणाऱ्या सर्व भयानक गोष्टी एका पटावर लिहिल्या होत्या.
61 यिर्मया सारयाला म्हणाला, “सारया, बाबेलला जा. सर्व लोक हा संदेश ऐकतील अशी खात्री करुन घेऊन तो वाच. 62 मग म्हण, ‘हे देवा, बाबेलचा नाश करीन असे तू म्हणालास, तू तिचा नाश करशील. मग तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू राहणार नाही. ती जागा सदाकरिता ओसाड भग्नावशेष होईल.’ 63 हा संदेश वाचून संपताच पटाला एक दगड बांध. नंतर हा पट फरात नदीत फेकून दे. 64 मग असे म्हण ‘बाबेल बुडेल पुन्हा ती कधीही वर येणार नाही. कारण मी तिच्यावर भयंकर संकटे आणीन.’ आणि बाबेलचे लोक थकून जातील.”
येथे यिर्मयाचे बोलणे संपले.
यरुशलेमचे पतन
52 सिद्कीया त्याच्या वयाच्या 21 व्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने 11 वर्षे यरुशलेमवर राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल. ती यिर्मयाची मुलगी होती. तिचे घराणे लिब्ना येथील होते. 2 यहोयाकिम राजाप्रमाणेच सिद्कीयाने दुष्कृत्ये केली. हे परमेश्वराला आवडले नाही. 3 परमेश्वराचा कोप ओढवून घेतल्याने यरुशलेम व यहूदामध्ये भयंकर गोष्टी घडल्या. शेवटी परमेश्वराने यरुशलेम व यहूदा येथील लोकांना आपल्या दृष्टीसमोरुन दूर केले.
सिद्कीया बाबेलच्या राजाच्या विरोधात गेला. 4 म्हणून सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमवर चाल केली. त्याने आपले सर्वच्या सर्व सैन्य बरोबर घेतले. त्या सैन्याने यरुशलेमच्या बाहेर तळ ठोकला. मग यरुशलेमचा तट ओलांडून जाण्यासाठी त्यांनी तटाभोवती उतरंडी तयार केल्या. 5 सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत बाबेलच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला. 6 सहाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी उपासमारीचा कहर झाला. नगरीतल्या लोकांसाठी अन्नाचा कण नव्हता. 7 सातव्या दिवशी, बाबेलचे सैन्य यरुशलेममध्ये घुसले. यरुशलेमचे सैनिक पळून गेले. त्यांनी रात्रीच्या वेळी नगर सोडले. दोन भिंतींच्या मधल्या दारातून ते पळून गेले. ते दार राजाच्या बागेजवळ होते. बाबेलच्या सैन्याने वेढा घातला असतानासुद्धा ते सैनिक वाळवंटाकडे पळाले.
8 पण बाबेलच्या सैन्याने सिद्कीया राजाचा पाठलाग केला. त्यांनी सिद्कीयास यरीहोच्या मैदानात गाठले. सिद्कीयाचे सर्व सैनिक पळून गेले. 9 बाबेलच्या सैन्याने सिद्कीयाला पकडले मग त्यांनी त्यास रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. रिब्ला शहर हमाथ देशात आहे. बाबेलच्या राजाने, रिब्ला येथे, सिद्कीया राजाला शिक्षा ठोठावली. 10 रिब्लामध्येच बाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या मुलांना मारले आणि सिद्कीयाला मुद्दाम ते पाहायला लावले. यहूदाच्या सर्व अधिकाऱ्यांनाही त्याने ठार केले. 11 मग बाबेलच्या राजाने सिद्कीयाचे डोळे काढले. मग त्याला बेड्या घालून बाबेलला नेले. तेथे त्याने सिद्कीयाला तुरुंगात टाकले. सिद्कीया मरेपर्यंत तुरुंगातच होता.
12 बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख नबूजरदान हा, नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 19 व्या वर्षीच्या पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, यरुशलेमला आला. नबूजरदान बाबेलमधील एक महत्वाचा अधिकारी होता. 13 नबूजरदानने परमेश्वराचे मंदिर जाळले. त्याने राजवाडा व यरुशलेममधील इतर घरेही जाळली. त्याने तेथील सर्व महत्वाच्या इमारती बेचिराख केल्या. 14 बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. त्या सैन्याचा सेनापती राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. 15 सेनापती नबूजरदानने यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्या [a] सर्व लोकांना कैदी म्हणून नेले. बाबेलच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरुशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले. 16 पण नबूजरदानने काही अगदी गरीब लोकांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.
17-18 बाबेलच्या सैन्याने मंदिरातील पितळी खांब, घंगाळ व बैठकी [b] मोडल्या. त्यांनी ते सर्व पितळ बाबेलला नेले. त्याचबरोबर पात्रे, फावडी, वात सारखी करण्याच्या कात्र्या, वाडगे, तसराळी आणि मंदिरातील पूजेची उपकरणेही नेली. 19 राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने कुंडे, विस्तव ठेवण्याची पात्रे, वाडगे, पात्रे, दीपदाने. तसराळी आणि अर्पण केलेली पेयार्पणे ठेवण्याचे प्याले अशा सर्व वस्तू नेल्या. थोडक्यात त्याने चांदी सोन्याच्या सर्व वस्तू नेल्या. 20 दोन खांब, घंगाळ, त्याखालील बारा बैल व सरकत्या बैठकी अतिशय जड होत्या. शलमोन राजाने त्या परमेश्वराच्या मंदिरासाठी बनविल्या होत्या. ह्या वस्तूंसाठी वापरलेल्या पितळाचे वजन करणे अशक्य होते.
21 प्रत्येक खांब 31 फूट उंच होता. त्याचा घेर 21 फूट होता-हे खांब पोकळ होते. खांबाचा पत्रा 4 इंच जाडीचा होता. 22 पहिल्या खांबाचा पितळेचा कळस 8 फूट उंच होता. जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे कोरुन तो सुशोभित केलेला होता. दुसऱ्या खांबावरही डाळिंबे कोरलेली होती. तो पहिल्या खांबासारखाच होता. 23 खांबांच्या बाजूंवर 96 डाळिंबे कोरलेली होती. खांबाच्या भोवती असलेल्या जाळीकामावर सर्व मिळून 100 डाळिंबे होती.
24 राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सराया व सफन्या यांना कैद करुन नेले. सराया महायाजक होता, तर सफन्या दुय्यम महायाजक होता. तीन द्वारपालांनाही कैदी म्हणून नेले 25 राजाच्या खास रक्षकांच्या प्रमुखाने सैनिकांवर नेमलेला अधिकारी, तोपर्यंत नगरात असलेले राजाचे सात सल्लागार, सैन्यात भरती होणाऱ्यांची नोंद ठेवणारा लेखनिक, आणि नगरात असलेले साठ सामान्य लोक यांना कैद केले. 26-27 सेनापती नबूजरदानने ह्या सर्व अधिकाऱ्यांना बाबेलच्या राजाकडे आणले बाबेलचा राजा तेव्हा रिब्ला शहरात होता. रिब्ला हमाथ देशात आहे. रिब्लामध्ये राजाने त्या सर्वांना ठार करण्याचा हुकूम दिला.
अशा तऱ्हेने यहूदी लोकांना त्यांच्या देशातून नेले गेले. 28 आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केले
नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3,023 यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले.
29 नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 18 व्या वर्षी 832 लोकांना यरुशलेममधून नेले.
30 नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 23 व्या वर्षी नबूजरदानने 745 लोकांना कैद केले. तो राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता.
एकूण 4,600 लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले.
यहोयाकीनची मुक्तता
31 यहूदाचा राजा यहोयाकीन हा 37 वर्षे बाबेलच्या तुरुंगात होता. त्याच्या तुरुंगवासाच्या 37 व्या वर्षी बाबेलचा राजा अवीलमरदोख ह्यास त्याची दया आली व त्याने त्याची मुक्तता केली. त्याच वर्षी अवील-मरदोख गादीवर बसला होता. त्याने 12व्या महिन्याच्या 25व्या दिवशी यहोयाकीमची सुटका केली. 32 अवील-मरदोख यहोयाकीमशी गोड बोलला. त्याच्याबरोबर बाबेलमध्ये असलेल्या इतर राजांहून त्याने यहोयाकीमला सन्मानाची जागा दिली. 33 म्हणून यहोयाकीनने कैद्याचा पोशाख उतरविला उरलेल्या आयुष्यात त्याने नेमाने राजाबरोबर भोजन केले. 34 यहोयाकीनच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक दिवशी बाबेलचा राजा त्याला भत्ता देत असे.
जुन्या कराराप्रमाणे उपासना
9 पहिल्या करारात उपासनेसंबंधी काही नियम होते आणि मनुष्यांनी बनविलेले एक पवित्रस्थान होते. 2 कारण दीपस्तंभ व अर्पणाच्या विशेष भाकरी ठेवण्यासाठी पहिल्या मंडपामध्ये एक मेज ठेवण्यात आला होता. हा जो पहिला मंडप होता त्याला पवित्र स्थान असे म्हणतात. 3 दुसऱ्या पडद्यामागे एक खोली (मंडप) होती, त्याला परमपवित्रस्थान म्हणत [a] 4 त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष). [b] ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या. 5 या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावर [c] सावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.
6 या व्यवस्थेनुसार याजकगण आपल्या कर्तव्यकर्मासाठी पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत. 7 पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या खोलीत (मंडपात) जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वतःसाठी (स्वतःच्या पापांसाठी) व लोकांच्या अज्ञानाच्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.
8 याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही. 9 हे सर्व आजच्या काळात प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्याला वाहिलेली अर्पणे यामुळे उपासकाची सदसदविवेकबुद्धि परिपूर्ण होऊ शकत नाही. 10 हे विधी केवळ बाह्य बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत.
नव्या करारामप्रमणे उपासना
11 पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला आहे. तो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये, या निर्मितीमधील, 12 बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वतःच एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.
13 कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख त्यांच्यावर शिंपडले तर त्याची अपवित्र शरीरे शुद्ध होतात, 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सदाजीवी आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धि शुद्ध करील. आशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
15 पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आपल्या वचनानुसार अनंतकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावितो, त्यांच्याकरिता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे.
16 जेथे मृत्यूपत्र केलेले आहे तेथे ते करून ठेवणाराचा मृत्यू झाला आहे, हे सिद्ध होणे जरुरीचे असते. 17 कारण मृत्युपत्र करणारा जिवंत आहे तोपर्यंत मृत्युपत्र अंमलात येऊ शकत नाही. 18 म्हणून रक्त सांडल्याशिवाय पहिला करारदेखील अंमलात आला नव्हता. 19 कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमीजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले. 20 तो म्हणाला, “जो करार पाळण्याची देवाने तुम्हाला आज्ञा केली होती त्या कराराचे हे रक्त आहे.” 21 त्याचप्रमाणे त्याने मंडपावर व उपासनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंवर ते रक्त शिंपडले. 22 खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही.
ख्रिस्ताचे अर्पण पाप नाहीसे करते
23 म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात. 24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
25 जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही. 26 तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे.
27 आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यायासनासमोर येणे नेमून ठेवलेले असते, 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
2006 by World Bible Translation Center