Old/New Testament
यिर्मया आणि पशहूर
20 पशहूर नावाचा एक याजक होता. परमेश्वराच्या मंदिरातील तो मुख्य अधिकारी होता. तो इम्मेरचा मुलगा होता. यिर्मयाने मंदिराच्या प्रांगणात केलेल्या भविष्यकथनात, ज्या सर्व गोष्टी सांगितल्या, त्या पशहूरने ऐकल्या. 2 म्हणून त्यांने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व लाकडाच्या मोठ्या ठोकळ्यात त्याचे हातपाय अडकविले. मंदिराच्या वरच्या प्रवेशद्वाराजवळ बन्यामीनच्या प्रवेशद्वाराजवळ हे घडले. 3 दुसऱ्या दिवशी पशहूरने यिर्मयाला खोड्यातून मोकळे केले, तेव्हा यिर्मया पशहूरला म्हणाला, “तुझे परमेश्वराने ठेवलेले नाव पशहूर नाही, तर ‘प्रत्येक बाजूला भय’ असे आहे. 4 हेच तुझे नाव कारण परमेश्वर म्हणतो, ‘मी तुलाच तुझे भय करीन तुझ्या सर्व मित्रांना तू भीतिदायक होशील. तुझ्या मित्रांना शत्रू तलवारीने मारताना पाहशील. मी यहूदातील सर्व माणसांना बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करीन. तो त्यांना बाबेल देशात घेऊन जाईल आणि त्याचे सैन्य त्यांना तलवारीने कापून काढील. 5 यरुशलेमच्या लोकांनी खूप कष्ट करुन वस्तू गोळा केल्या आणि ते श्रीमंत झाले. पण मी त्यांच्या सर्व गोष्टी शत्रूला देईन. यरुशलेमच्या राजाकडे पुष्कळ संपत्ती आहे. पण ती सर्व संपत्ती मी शत्रूला देईन. शत्रू ती सर्व संपत्ती बाबेल देशात नेईल. 6 पशहूर, तुला आणि तुझ्या घरातील सर्व लोकांना घरातून नेले जाईल. तुम्हाला जबरदस्तीने नेले जाईल. तुम्हाला बाबेल देशात राहावे लागेल. तू तेथेच मरशील आणि त्या परक्या देशातच तुला पुरतील. तू तुझ्या प्रवचनात खोट्या गोष्टी सांगितल्यास. ह्या गोष्टी घडणार नाहीत. असे खोटे सांगितलेस. तुझे सर्व मित्रही बाबेलमध्येच मरतील आणि त्यांना तिथेच पुरले जाईल.’”
यिर्मयाचे पाचवे गाऱ्हाणे
7 परमेश्वरा, तू मला मोहित केलेस आणि मी पण मोहित झालो [a]
तू माझ्यापेक्षा समर्थ असल्याने तू जिंकलास
मी हास्यास्पद ठरलो.
लोक माझ्याकडे पाहून हसतात आणि माझी चेष्टा करतात.
8 प्रत्येक वेळी मी बोलतो, ओरडतो मी हिंसा
आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो.
मी मला परमेश्वराकडून आलेला संदेश लोकांना सांगतो.
पण लोक माझा फक्त अपमान करतात
आणि माझी चेष्टा करतात.
9 कधी कधी मी स्वतःशीच म्हणतो,
“मी परमेश्वराला विसरुन जाईन.
मी परमेश्वराच्या वतीने ह्यापुढे बोलणार नाही.”
पण मी असे म्हणताच परमेश्वराचा संदेश माझ्या मनात अग्नीप्रमाणे दाह निर्माण करतो.
त्या वेळी, माझ्या हाडांच्या आत आत काही जळत आहे, असे मला वाटते.
मी परमेश्वराचा संदेश माझ्या मनात फार वेळ दाबून ठेवू शकत नाही
आणि शेवटी तो मनात ठेवणे मला अशक्य होते.
10 लोक माझ्याबद्दल कुजबुजताना मी ऐकतो.
सगळीकडून ज्या गोष्टी मी ऐकतो, त्याने मी घाबरतो इतकेच नाही,
तर माझे मित्रही माझ्याविरुद्ध बोलतात.
मी काहीतरी चूक करावी म्हणून लोक वाट पाहात आहेत.
ते म्हणत आहेत,
“आपण खोटे बोलू या आणि त्याने वाईट कृत्य केल्याचे सांगू या.
यिर्मयाला फसविणे कदाचित् शक्य आहे.
मग तो आपल्या हातात सापडेल
व आपली त्याच्यापासून सुटका होईल.
मग आपण त्याला पकडू आणि सूड घेऊ.”
11 पण परमेश्वर माझ्या पाठीशी आहे.
परमेश्वर बलवान सैनिकाप्रमाणे आहे.
म्हणून माझा पाठलाग करणारे पडतील.
ते माझा पराभव करु शकणार नाहीत.
ते पडतील,
त्यांची निराश होईल.
त्यांची नामुष्की होईल
आणि ही त्यांची नामुष्की इतर लोक कधीही विसरणार नाहीत.
12 सर्व शक्तिमान परमेश्वरा तू चांगल्या लोकांची परीक्षा घेतोस.
तू माणसाच्या मनात खोलवर पाहतोस.
मी त्या लोकांविरुद्धचे माझे मुद्दे तुला सांगितले.
मग आता तू त्यांना योग्य शिक्षा करताना मला पाहायला मिळू देत.
13 परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर गरिबांचे रक्षण करतो.
तो दुष्टापासून त्यांना वाचवितो.
यिर्मयाचे सहावे गाऱ्हाणे
14 माझ्या जन्मदिवसाला शाप द्या.
ज्या दिवशी मी आईच्या पोटी जन्माला आलो, त्या दिवसाला शुभ मानू नका.
15 माझ्या जन्माची बातमी माझ्या वडिलाना देणाऱ्या माणसाला शाप द्या.
“तुम्हाला मुलगा झाला”
असे त्याने सांगताच माझ्या वडिलांना खूप आनंद झाला.
16 परमेश्वराने नगरांचा जसा नाश केला, [b] तसाच त्या माणसांचाही होवो.
परमेश्वराला त्या नगरांबद्दल अजिबात दया नाही.
त्या माणसाला सकाळ दुपार युद्धाचा गदारोळ ऐकू येऊ देत.
17 का? कारण त्या माणसाने,
मी आईच्या पोटात असतानाच, मला मारले नाही.
त्याने मला मारले असते,
तर आईच माझी कबर झाली असती
व माझा जन्मच झाला नसता.
18 मी कशाला जन्मलो?
मी फक्त क्लेश व दु:ख पाहिले
आणि माझे जीवन नामुष्कीत संपणार.
देव सिद्कीया राजाची विनंती नाकरतो
21 यहूदाचा राजा सिद्कीया याने पशूहरला आणि सफन्या नावाच्या याजकाला यिर्मयाकडे पाठविले. त्याच वेळी यिर्मयाला परमेश्वराचा संदेश आला. पशहूर हा मल्कीयाचा मुलगा होता, तर सफन्या मासेचा मुलगा होता. पशहूर व सफन्या ह्यांनी यिर्मयासाठी निरोप आणला. 2 पशहूर आणि सफन्या यिर्मयाला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर. काय घडणार आहेत ते परमेश्वराला विचार. कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्यावर स्वारी करीत आहे, म्हणून आम्हाला भविष्यात काय घडणार हे जाणून घ्यायचे आहे. कदाचित् परमेश्वर पूर्वीप्रमाणे काही विस्मयकारक घटना घडवून आणील. कदाचित् परमेश्वर नबुखद्नेस्सरला स्वारी करण्यापासून परावृत्त करील व परतवून लावेल.”
3 नंतर पशूहर व सफन्या यांना यिर्मया म्हणाला, “सिद्कीया राजाला सांगा, 4 ‘परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो तुमच्याजवळ युद्धोपयोगी शस्त्रे आहेत. तुम्ही त्याचा उपयोग बाबेलचा राजा व खास्दी यांच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी करीत आहात. मी ती शस्त्रे निरुपयोगी करीन.
“‘बाबेलचे सैन्य नगरीच्या तटबंदीबाहेर सगळीकडे पसरले आहे. लवकरच त्या सैन्याला मी यरुशलेममध्ये आणीन. 5 मी स्वतः यहूदाच्या लोकांविरुद्ध म्हणजे तुमच्याविरुद्ध लढेन. मी माझ्या सामर्थ्यवान हाताने तुमच्याशी युद्ध करीन. कारण मी तुमच्यावर फार रागावलो आहे. मी तुमच्याविरुद्ध जोरदार युद्ध करुन माझ्या तुमच्यावरील रागाची तीव्रता सिद्ध करीन. 6 यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांना मी ठार मारीन. सर्व शहरात रोगराई पसरवून मी माणसांना व प्राण्यांना मारीन. 7 असे घडल्यावर,’” हा परमेश्वराचा संदेश आहे, “‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन करीन. मी सिद्कीयाच्या अधिकाऱ्यानासुद्धा नबुखदनेस्सरच्या हवाली करीन. यरुशलेममधील काही लोक भयंकर रोगराई अथवा लढाई वा उपासमार याने मरणार नाहीत. पण त्या सर्वांना मी नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन. मी यहूदाच्या शत्रूला विजयी करीन. नबुखद्नेस्सरच्या सैन्याला यहूदातील लोकांना ठार मारायचे आहे म्हणून यहूदातील व यरुशलेममधील लोक तलवारीच्या घावाने मारले जातील. नबुखद्नेस्सर त्या लोकांना अजिबात दया दाखविणार नाही व त्यांच्याबद्दल त्याला दु:खही वाटणार नाही.’
8 “यरुशलेममधील लोकांना असेही सांग, ‘असे म्हणून परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, मी तुम्हाला जीवन मरण ह्यात निवड करण्याचे स्वातंत्र्य देईन. मी काय म्हणतो ते समजावून घ्या. 9 जो यरुशलेममध्ये राहील तो लढाईत, उपासमारीने वा भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी यरुशलेमच्या बाहेर जाऊन बाबेलच्या सैन्याला शरण जाईल, तो जगेल. त्या सैन्याने नगरीला वेढा घातला आहे म्हणून नगरीला रसद मिळू शकत नाही. पण जो कोणी नगर सोडून जाईल, त्याचा जीव वाचेल. 10 यरुशलेम नगरीवर संकट आणण्याचे मी ठरविले आहे. मी तिला मदत करणार नाही.’” हा परमेश्वराचा संदेश आहे, मी बाबेलच्या राजाला यरुशलेम देऊन टाकीन. तो ती आगीत भस्मसात करील.
11 “यहूदाच्या राजघराण्याला हे सांगा:
‘परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका.
12 दावीदाच्या घराण्यातील लोकानो, परमेश्वर असे म्हणतो,
तुम्ही दररोज न्याय्यपणे लोकांचा निवाडा केला पाहिजे.
गुन्हेगारांपासून बळींचे रक्षण करा.
तुम्ही असे केले नाही,
तर मी खूप रागावेन.
माझा राग, कोणीही विझवू न शकणाऱ्या अग्नीप्रमाणे असेल.
तुम्ही दुष्कृत्ये केली म्हणून असे होईल.’
13 “यरुशलेम, मी तुझ्याविरुद्ध आहे.
तू डोंगराच्या शिखरावर बसतेस.
तू ह्या दरीच्यावर राणीप्रमाणे बसतेस.
तुम्ही, यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणता,
‘कोणीही आमच्यावर हल्ला करु शकणार नाही.
कोणीही आमच्या भक्कम नगरीत येणार नाही.’”
पण परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका:
14 “तुम्हाला योग्य अशी शिक्षा मिळेल.
तुमच्या रानास मी आग लावेन
ती आग तुमच्याभोवतीचे सर्व काही जाळून टाकील.”
4 देवासमोर आणि ख्रिस्त येशूसमोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर. मी तुला देवासमोर व ख्रिस्तसमोर ही आज्ञा करतो. 2 वचन गाजवीत राहा. सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा. लोकांना जे करायचे आहे, त्याविषयी त्यांची खात्री पटव. जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर; लोकांना उत्तेजन दे. आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर.
3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छी धरणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, त्यांची कानउघडणी कर. 4 सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते भाकड कथांकडे लावतील. 5 पण तुझ्याबाबतीत स्वतः सावधानतेने वाग, दु:ख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
6 माझ्याबाबतीत म्हणायचे तर, मी अगोदरच पेयार्पणा सारख ओतला जात आहे. व माझी या जीवनातून जाण्याची वेळ आली आहे. 7 मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे. 8 आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्त्व, तो वाट पाहत आहे. आणि प्रभु जो नीतिमान न्यायाधीश, तो मला त्या दिवशी मुकुट देईल आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत, अशा सर्वांना देईल.
व्यक्तिगत संदेश
9 तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर. 10 कारण देमास मला सोडून थेस्सलनीकास गेला आहे. कारण त्याला आजचे हे जग प्रिय आहे. क्रेस्केस गलतीयास गेला आहे. व तीत दालमतीयास गेला आहे. 11 लूक एकटा असा आहे की, जो अजूनदेखील माझ्याजवळ आहे. जेव्हा तू येशील तेव्हा मार्कलाही तुझ्याबरोबर घेऊन ये. कारण सेवेकरिता तो मला उपयोगी आहे. 12 तुखिकाला मी इफिसास पाठविले आहे.
13 त्रोवसात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये.
14 आलेवसांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील. 15 त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर. कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता.
16 पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये. 17 प्रभु माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेश्यांनी ती ऐकावी. सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले. 18 प्रभु मला सर्व दुष्कृत्यांपासून सोडवील व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणिल. त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो.
शेवटचा सलाम
19 प्रिस्कीला अविवल्ला आणि अनेसिफरच्या घरातील लोकांना सलाम सांग. 20 एरास्त करिंथात राहिला. त्रफिमाला मी मिलेता येथे सोडले कारण तो आजारी होता. 21 तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर.
युबुल, पुदेश, लीन, वलौदिया व इतर सर्व बंधु तुला सलाम सांगतात.
22 प्रभु तुझ्या आत्म्याबरोबर असो. देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center