Old/New Testament
पाप्यांनी आपले जीवन बदलावे
59 हे पाहा, परमेश्वराचे सामर्थ्य तुम्हाला वाचवायला पुरेसे आहे. तुम्ही त्याची मदत मागता. ते तो ऐकू शकतो. 2 तुमच्या पापांनी देवाचे तोंड लपवले आहे. त्यामुळे तो तुमचे बोलणे ऐकत नाही. 3 तुमचे हात घाणेरडे आहेत. ते रक्ताने माखले आहेत. तुमची बोटे अपराधांमुळे झाकली गेली आहेत. तुमची तोंडे खोटे बोलतात. तुमची जीभ वाईट गोष्टी बोलते. 4 कोणीही दुसऱ्याबद्दल खरे सांगत नाही. लोक न्यायालयात एकमेकांविरूध्द् फिर्याद गुदरतात आणि ते दावा जिंकण्यासाठी खोट्या वादांवर विसंबतात. ते एकमेकांबद्दल खोटे सांगतात. ते संकटांनी घेरलेले आहेत. ते पापाला जन्म देतात. 5 विषारी सर्पाच्या अंड्यातून विषारी सर्पच निघतो. तसेच ते पापाला जन्म देतात. विषारी सर्पाचे अंडे तुम्ही खाल्ले तर तुम्ही मराल आणि ते तुम्ही फोडले तर त्यातून सर्पच निघेल.
लोक खोट्या गोष्टी सांगतात-ह्या खोट्या गोष्टी कोळंयाच्या जाळ्याप्रमाणे असतात. 6 त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही. तुम्ही तुमचे अंग त्याने झाकू शकत नाही.
काही लोक दुष्कृत्ये करतात आणि दुसऱ्यांना इजा करण्यासाठीच आपल्या हाताचा उपयोग करतात. 7 आपल्या पायांचा उपयोग ते पापांकडे पळण्यासाठी करतात. निष्पाप लोकांना मारण्याची त्यांना घाई असते. ते दुष्ट विचार करतात. मारामारी आणि चोरी हेच त्यांच्या जगण्याचे मार्ग असतात. 8 त्यांना शांतीचा मार्ग माहीत नसतो. त्यांच्या जीवनात अजिबात चांगुलपणा नसतो. त्यांचे मार्ग प्रामाणिक नसतात त्यांच्याप्रमाणे जीवन जगणाऱ्या कोणालाही कधीही जीवनात शांतता लाभणार नाही.
इस्राएलचे पाप संकट आणते
9 सगळा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा गेला आहे.
आमच्याभोवती फक्त अंधार आहे.
म्हणून आम्ही उजेडासाठी थांबले पाहिजे.
आम्ही तेजस्वी प्रकाशाची आशा करतो.
पण आम्हाला फक्त अंधारच मिळाला आहे.
10 आम्ही डोळे नसलेल्याप्रमाणे आहोत.
आंधळ्यांप्रमाणे आम्ही भिंतीपाशी धडपडतो.
रात्री अडखळून पडावे तसे आम्ही पडतो.
दिवसासुध्दा् आम्ही पाहू शकत नाही.
दुपारी आम्ही मेलेल्या माणसांप्रमाणे पडतो.
11 आम्ही सर्व, फार दु:खी आहोत.
आम्ही दु:खाने पारवे व अस्वले यांच्याप्रमाणे कण्हतो.
लोक प्रामाणिक होण्याची आम्ही वाचविले जाण्याची वाट पाहत आहोत.
पण अजून तरी कोठे प्रामाणिकपणा नाही.
आम्ही वाचविले जाण्याची वाट पहात आहोत.
पण तारण अजून खूप दूर आहे.
12 का? कारण आम्ही देवाविरूध्द् वागून खूप खूप पापे केली.
आपली पापे आम्ही चुकलो ते दाखवितात.
ह्या गोष्टी करून आम्ही अपराध केला हे आम्हाला माहीत आहे.
13 आम्ही पाप केले
आणि परमेश्वराविरूध्द् गेलो.
आम्ही त्याच्यापासून दूर गेलो आम्ही त्याला सोडले.
आम्ही देवाच्याविरूध्द् दुष्ट बेत केले.
आम्ही वाईट गोष्टींचा विचार केला
व मनात दुष्ट बेत केले.
14 न्याय आमच्यापासून दूर गेला आहे.
प्रामाणिकपणा दूर उभा आहे.
सत्य रस्त्यात पडले आहे
चांगुलपणाला शहरात प्रवेश नाही.
15 सत्य गेले
आणि सत्कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे लुबाडले गेले.
परमेश्वराने पाहिले पण त्याला कोठेच चांगुलपणा सापडला नाही.
परमेश्वराला हे आवडले नाही.
16 परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा
राहून लोकांना मदत करताना दिसला नाही.
म्हणून परमेश्वराने स्वतःचे सामर्थ्य
आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
17 परमेश्वराने युध्दा्ची तयारी केली.
त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले,
तारणाचे शिरस्त्राण घातले, शिक्षेचे कपडे घातले.
दृढ प्रेमाचा अंगरखा घातला.
18 परमेश्वर त्याच्या शत्रूवर रागावला आहे.
म्हणून परमेश्वर त्यांना त्यांच्या लायकीप्रमाणे शिक्षा करील.
परमेश्वर त्याच्या शत्रूंवर रागावला असल्यामुळे सर्व देशांतील लोकांना तो शिक्षा करील.
त्यांच्या पात्रतेप्रमाणे तो त्यांना शिक्षा देईल.
19 नंतर पक्ष्चिमेकडील लोक घाबरतील आणि परमेश्वराला मान देतील.
पूर्वेकडचे लोक घाबरतील आणि देवाच्या गौरवांचा आदर करतील.
देवाने सोडलेल्या झंझावातामुळे,
वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे, देव जलद गतीने येईल.
20 मग तारणारा सियोनला येईल आधी पाप केलेल्या
पण नंतर देवाला शरण आलेल्या याकोबाच्या लोकांकडे तो येईल.
21 परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांबरोबर एक करार करीन. मी तुमच्यात घातलेला माझा आत्मा आणि तुमच्या तोंडात घातलेले माझे शब्द कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत, असे मी तुम्हाला वचन देतो. ते पिढ्यान् पिढ्या तुमच्याबरोबर राहतील ते आताही तुमच्याबरोबर असतील आणि चिरकाल तुमच्याबरोबर राहतील.”
देव येत आहे
60 “यरूशलेम, माझ्या ज्योती, ऊठ.
तुझा प्रकाश (देव) येत आहे.
परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल.
2 आता अंधाराने जग व्यापले आहे
आणि लोक अंधारात आहेत.
पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल,
त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल.
3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे (देवाकडे) येतील.
राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
4 तुझ्या सभोवती पाहा! बघ,
लोक तुझ्या भोवती जमून तुझ्याकडे येत आहेत.
ती तुझी दूरवरून येणारी मुले आहेत
आणि त्याच्याबरोबर, तुझ्या मुलीही येत आहेत.
5 “हे भविष्यात घडून येईल.
त्यावेळी तू तुझ्या लोकांना पाहशील.
तुझा चेहरा मग आनंदाने उजळेल.
प्रथम तू घाबरशील.
पण नंतर तुझ्या भावना अनावर होतील.
समुद्रापलीकडील सर्व संपत्ती तुझ्यापुढे ठेवली जाईल.
राष्ट्रांचे सर्व धन तुला मिळेल.
6 मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप
तुझी भूमी ओलांडतील.
शेबातून उंटांची रीघ लागेल.
ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील.
लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
7 लोक केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुला देतील.
नबायोथचे मेंढे ते तुझ्याकडे आणतील.
तू ती जनावरे माझ्या वेदीवर अर्पण करशील
आणि मी त्यांचा स्वीकार करीन.
मी माझे सुंदर मंदिर आणखी सुंदर करीन.
8 लोकांकडे पाहा! आकाशात वेगाने ढग सरकावेत
त्याप्रमाणे ते घाईने तुझ्याकडे येत आहेत
ते जणू घरट्याकडे उडत येणारे पारवे आहेत.
9 दूरचे देश माझी वाट पाहत आहेत मोठी मालवाहू जहाजे प्रवासास सज्ज आहेत.
दूरच्या देशातून तुझ्या मुलांना आणण्याकरिता ती जहाजे तयार आहेत.
परमेश्वराचा तुझ्या देवाचा,
इस्राएलच्या पवित्र देवाचा, सन्मान करण्यासाठी
ती मुले आपल्याबरोबर चांदी-सोने आणतील.
परमेश्वर तुझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतो.
10 दुसऱ्या देशातील मुले तुझी तटबंदी पुन्हा बांधतील,
राजे तुझी सेवा करतील
“मी जेव्हा रागावलो तेव्हा मी तुला फटकावले.
पण आता तुझ्यावर दया करण्याची माझी इच्छा आहे.
म्हणून मी तुझे दु:ख हलके करीन.
11 तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील.
दिवस असो वा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत.
राष्ट्रे आणि राजे,
त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील.
12 जे राष्ट्र अथवा जे राज्य तुझी सेवा करीत नाही
त्याचा नाश होईल.
13 लबानोनमधील मौल्यवान चिजा तुला दिल्या जातील.
लोक सुरू देवदारू आणि भद्रदारू तुला आणून देतील.
माझे पवित्र स्थान सुंदर करण्यासाठी
या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जाईल.
ही जागा म्हणजे जणू काही माझ्या सिंहासनासमोरील चौरंग आहे
आणि मी त्याला फार महत्व देईन.
14 पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तुला दुखावले,
तेच आता तुझ्यापुढे नमतील. पूर्वी ज्यांनी
तुझा तिरस्कार केला तेच आता
तुझ्या पायाशी वाकतील.
तेच लोक तुला ‘परमेश्वराची नगरी,’
‘इस्राएलच्या पवित्र देवाचे सियोन म्हणून संबोधतील.’”
नवे इस्राएल शांतीची भूमी
15 “तुला पुन्हा कधीही एकटे सोडले जाणार नाही.
पुन्हा कधीही तुझा तिरस्कार केला जाणार नाही.
तुला पुन्हा कधीही ओस पाडले जाणार नाही.
मी तुला चिरकालासाठी मोठी करीन.
तू चिरंतन सुखी होशील.
16 राष्ट्रे तुला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देतील.
हे म्हणजे मुलाने आईचे स्तनपान करावे तसे असेल.
पण तू राजांच्या संपत्तीचे ‘पान’ करशील.
मग तुला समजेल की तो मी आहे,
जो तुला वाचवितो, तो परमेश्वर मी आहे.
तुला कळेल की याकोबाचा महान देव तुझे रक्षण करतो.
17 “आता तुझ्याजवळ तांबे आहे,
मी तुला सोने आणीन.
आता तुझ्याजवळ लोखंड आहे,
मी तुला चांदी आणून देईन.
मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन.
तुझ्या खडकांचे लोखंड करीन.
मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन.
आता लोक तुला दुखावतात,
पण तेच तुझ्यासाठी
चांगल्या गोष्टी करतील.
18 तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही.
लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत.
आणि तुला लुटणार नाहीत.
तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
19 “या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे
तर परमेश्वर प्रकाश देईल.
परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल.
तुझा देवच तुझे वैभव असेल.
20 तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही
आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही.
कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल.
तुझा दु:खाचा काळ संपेल.
21 “तुझे सर्व लोक सज्जन असतील.
त्यांना कायमची भूमी मिळेल.
मी त्या लोकांना निर्माण केले.
मी माझ्या स्वतःच्या हातांनी
तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
22 सर्वात लहान कुटुंबाचा मोठा समूह होईल.
सर्वांत लहान कुटुंबाचे मोठे बलवान राष्ट्र होईल.
योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन.
मी ह्या गोष्टी घडवून आणीन.”
परमेश्वराचा मुक्तीचा संदेश
61 परमेश्वराचा सेवक म्हणतो, परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले. 2 परमेश्वराच्या कृपासमयाची घोषणा करण्यासाठी देवाने मला पाठविले. देव पापी लोकांना कधी शिक्षा करणार आहे हे त्यांना सांगण्यासाठी देवाने मला धाडले. दु:खी लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी देवाने मला पाठविले. 3 सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्यांचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना “चांगले वृक्ष” आणि “परमेश्वराची सुंदर रोपटी” अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.
4 त्या वेळेला नाश केली गेलेली जुनी शहरे पुन्हा वसविली जातील. ती आरंभी होती तशी नव्याने केली जातील. फार फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी केली जातील.
5 नंतर तुमचे शत्रू तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मेंढ्यांची काळजी घेतील. तुमच्या शत्रूंची मुले तुमच्या शेतांतून आणि मळ्यांतून कामे करतील. 6 तुम्हाला “परमेश्वराचे याजक”, “आमच्या देवाचे सेवक” असे म्हटले जाईल. जगातील सर्व राष्ट्रांची संपत्ती तुम्हाला मिळेल आणि ती मिळाल्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.
7 पूर्वीच्या काळी लोकांनी तुमची अप्रतिष्ठा केली, तुमची निंदा केली. इतर लोकांपेक्षा तुमची अप्रतिष्ठा जास्त झाली. म्हणून तुमच्या जमिनीतून तुम्हाला इतरांपेक्षा दुप्पट पीक मिळेल. तुम्हाला अखंड आनंद मिळेल. 8 असे का घडेल? कारण मी परमेश्वर आहे आणि मला प्रामाणिकपणा आवडतो. मला चोरी व प्रत्येक चुकीच्या गोष्टीचा तिरस्कार वाटतो. म्हणून मी लोकांना योग्य तेच फळ देईन. मी माझ्या लोकांबरोबर कायमचा, करार केला आहे. 9 सर्व राष्ट्रांतील एकूण एक लोक माझ्या लोकांना ओळखतील. माझ्या राष्ट्रातील मुलांना प्रत्येकजण ओळखेल. त्यांना पाहताच कोणालाही कळून येईल की ह्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला आहे.
देवाचा सेवक तारण व चांगुलपणा आणतो
10 परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो.
देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे.
परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो.
हे कपडे स्वतःच्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत.
परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो.
वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.
11 जमीनीमुळे रोपे वाढतात.
लोक शेतांत बी पेरतात.
ते बी जमिनीत रूजून वाढते.
त्याचप्रमाणे परमेश्वर चांगुलपणा वाढवील,
सर्व राष्ट्रांत त्याची प्रशंसा अधिकच वाढवील.
आमच्यासाठी प्रार्थना करा
3 आम्हाला आणखी काही गोष्टी तुम्हाला सांगावयाच्या आहेतः बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठी प्रार्थना करा, यासाठी की जसा तुमच्यामध्ये झाला तसा प्रभूच्या संदेशाचा प्रसार लवकर व्हावा आणि ते गौरविले जावे. 2 आणि प्रार्थना करा की, हेकट व दुष्ट माणसांपासून आमची सुटका व्हावी कारण सर्वच लोकांचा प्रभूवर विश्वास नाही.
3 पण प्रभु विश्वासू आहे. तो तुम्हांला बळकट करील व दुष्टांपासून तुमचे रक्षण करील. 4 प्रभूमध्ये आम्हांला तुमच्याविषयी विश्वास आहे आणि खात्री आहे की, जे आम्ही तुम्हाला करण्यासाठी सांगत आहोत ते तुम्ही करीत आहात व ते पुढे करीतच राहाल. 5 प्रभु तुमची अंतःकरणे देवाच्या प्रीतीत आणि ख्रिस्ताच्या सोशिक सहनशीलतेकडे नेवो.
कार्य करण्यासाठी अटी
6 आता, बंधूंनो, आम्ही तुम्हांला आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करतो की, जो कोणी बंधु, ज्या परंपरा त्यांना आमच्याकडून मिळाल्या त्या परंपरांप्रमाणे चालत नाही, तर आळशी जीवन जगत आहे तर त्याच्यापासून दूर राहा. 7 मी तुम्हांला हे सांगतो कारण तुम्ही स्वतः जाणता की तुम्ही आमचे अनुकरण कसे करायचे, कारण आम्ही तुमच्यामध्ये आळशी नव्हतो. 8 किंवा कोणाकडूनही आम्ही फुकटची भाकर खाल्ली नाही, उलट, रात्रंदिवस आम्ही काबाडकष्ट केले यासाठी की तुमच्यावर आम्ही ओझे होऊ नये. 9 याचा अर्थ असा नाही की, आम्हांला तुमच्याकडून मदत मागण्याचा अधिकार नाही, पण आम्ही आमच्या गरजा भागविण्यासाठी काम केले ते यासाठी की, आम्ही तुमच्यासमोर उदाहरण ठेवावे व तुम्ही आमचे अनुकरण करावे. 10 कारण आम्ही जेव्हा तुमच्याबरोबर होतो, तेव्हा आम्ही तुम्हांला हा नियम दिला: “जर एखाद्याला काम करायचे नसेल, तर त्याने खाऊ नये.”
11 आम्ही हे सांगतो कारण आम्ही ऐकतो की तुमच्यापैकी काही जण आळशीपणाचे जीवन जगत आहेत. ते काहीच काम करीत नाहीत. उलट कोणत्याही दिशाहीन असल्यासारखे इकडे तिकडे फिरत असतात. (इतरांच्या कामात दखल देतात) 12 आम्ही अशा लोकांना आज्ञा करतो व प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बोध करतो की, त्यांनी शांतीने काम करावे आणि स्वतःची भाकर स्वतःच मिळवून खावी. 13 पण बंधूंनो, तुम्ही तुमच्यासाठी चांगले करीत असता थकू नका.
14 जर कोणी या पत्राद्वारे आमच्या सूचनांचे पालन करीत नाही, तर तो कोण आहे हे लक्षात ठेवा व त्याच्याबरोबर राहू नका, यासाठी की त्याला लाज वाटावी. 15 पण त्याला शत्रू समजू नका, परंतु धाक द्या, जसे त्याला तुमचा भाऊ समजा.
शेवटचे शब्द
16 आता प्रभु स्वतः जो शांतीचा उगम आहे, तो तुम्हाला सर्वकाळ आणि सर्व प्रकारे शांति देवो, प्रभु तुम्हा सर्वांबरोबर असो.
17 मी पौल माझ्या स्वतःच्या हातांनी हा सलाम लिहितो. माझ्या प्रत्येक पत्राची ही खूण आहे. ह्या प्रकारे मी प्रत्येक पत्र लिहितो व अशा प्रकारे लिहितो.
18 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center