Old/New Testament
लोकांनी पापे केल्यामुळे इस्राएलला शिक्षा केली गेली
50 परमेश्वर म्हणतो,
“इस्राएलच्या लोकांनो, मी, तुमची आई यरूशलेमला, घटस्फोट दिला असे तुम्ही म्हणता.
पण मी तिला घटस्फोट दिला हे सिध्द करणारे कायदेशीर कागदपत्रे आहेत का?
माझ्या मुलांनो, मी कोणाचे पैसे देणे लागतो का?
कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हांला विकले का? नाही.
तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हाला देऊन टाकले.
तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले.
2 मी घरी आलो तर घरी कोणीच नव्हते.
मी खूप हाका मारल्या पण कोणीच उत्तर दिले नाही.
मी तुमचे रक्षण करू शकणार नाही असे तुम्हाला वाटते का?
तुमच्या सर्व संकटातून वाचविण्याचे सामर्थ्य माझ्यापाशी आहे.
बघा! जर मी समुद्राला वाळून जाण्याची आज्ञा दिली,
तर तो वाळून जाईल.
मग पाणी नसल्याने मासे मरतील
आणि त्यांना दुर्गंधी सुटेल.
3 मी आकाश काळे करू शकतो.
मी काळोखाने आकाश शोकप्रदर्शक कपड्याइतके काळे करू शकतो.”
देवाचा सेवक खरोखरच देवावर अवलंबून आहे
4 परमेश्वर, माझ्या प्रभूने, मला शिकविण्याची क्षमता दिली. तेव्हा आता या दु:खी लोकांना मी शिकवितो. रोज सकाळी तो मला उठवितो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवितो. 5 परमेश्वर, माझा प्रभू, मला शिकायला मदत करतो आणि मीही त्याच्याविरूध्द् कधी गेलो नाही. मी त्याला अनुसरण्याचे सोडणार नाही. 6 मी त्या लोकांना मला मारू देईन. मी माझ्या दाढीचे केस त्यांना ओढू देईन. ते जेव्हा माझी निंदा करतील आणि माझ्या तोंडावर थुकंतील तेव्हा मी माझे तोंड लपविणार नाही. 7 परमेश्वर माझा प्रभु मला मदत करील. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन. माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे.
8 परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी निष्पाप आहे हे तो जाणतो, म्हणून मी अपराधी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी चुकत आहे असे कोणाला सिध्द् करावेसे वाटत असेल तर त्याने माझ्याकडे यावे. आपण परीक्षा पाहू. 9 पण लक्षात ठेवा, माझा प्रभु मला मदत करतो. म्हणून कोणीही मला पापी ठरवू शकणार नाही. ते सर्व लोक जीर्ण जुन्या वस्त्राप्रमाणे होतील. कसर त्यांना खाईल.
10 परमेश्वराला मानणारे लोक परमेश्वराच्या सेवकाचे ऐकतात. तो सेवक, काय घडणार आहे हे माहीत नसताना, पूर्णपणे देवावर विश्वास ठेवून जगतो. त्याला देवाच्या नावाबद्दल खात्री वाटते आणि तो त्यावर अवलंबून राहातो.
11 “पाहा! तुम्ही लोक स्वतःच्या इच्छेप्रमाणे राहू इच्छिता. तुम्ही स्वतःचा अग्नी पेटविता आणि मशाली पाजळता. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे राहा. पण तुम्हाला शिक्षा होईल. स्वतःच पेटविलेल्या आगीत तुम्ही पडाल आणि जळाल. मी हे घडवून आणीन.”
इस्राएलने अब्राहामसारखे व्हावे
51 “तुम्ही काही लोक चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करता. तुम्ही मदतीसाठी परमेश्वराकडे धाव घेता. माझे ऐका. तुम्ही तुमचे वडील अब्राहाम यांच्याकडे पाहावे तुम्हाला ज्यापासून कापून काढले तो तो खडक आहे. 2 अब्राहाम तुमचा पिता आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहावे. जिने तुम्हाला जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहावे. मी बोलाविले तेव्हा अब्राहाम एकटा होता. मी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याने मोठ्या वंशाचा आरंभ केला. त्याचा वंश खूप वाढला.”
3 त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनाचे आणि तिच्या उध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील.
4 “माझ्या लोकांनो, माझे ऐका.
नियम माझ्यापासूनच पुढे सुरू होतील.
मी लोकांना प्रकाश ठरेल असा न्याय ठरवीन.
5 मी न्यायी आहे हे मी लवकरच दाखवीन.
मी लवकरच तुम्हाला वाचवीन.
मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करीन.
दूरदूरची ठिकाणे माझी वाट पाहत आहेत.
ते त्यांच्या मदतीसाठी माझ्या सामर्थ्याची वाट पाहत आहेत.
6 वर स्वर्गाकडे पाहा,
खाली पृथ्वीवर तुमच्या सभोवती पाहा.
धुक्याच्या ढगाप्रमाणे आकाश नाहीसे होईल.
पृथ्वी वृध्द् होईल.
पृथ्वीवरची माणसे मरतील,
पण माझे तारण अनंत कालापर्यंत चालू राहील.
माझ्या चांगुलपणाला अंत नाही.
7 ज्यांना चांगुलपणा म्हणजे काय ते कळते त्यांनी माझे ऐकावे.
माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागणाऱ्यांनी मी काय सांगतो ते ऐकावे.
दुष्टांना घाबरू नका.
त्यांनी तुमची निंदा केली तरी भिऊ नका.
8 का? त्यांची अवस्था जुन्या वस्त्राप्रमाणे होईल.
कसर त्याना खाईल.
ते लाकडाप्रमाणे होतील.
वाळवी त्यांना खाईल.
पण माझा चांगुलपणा चिरंतन राहील.
माझे तारण अखंड चालू राहील.”
देवाचे स्वतःचे सामर्थ्य लोकांना वाचवील
9 परमेश्वराच्या बाहूंनो जागे
व्हा (सामर्थ्या) जागा हो ऊठ आणि बलवान हो.
प्राचीन काळी वापरली होतीस तशी
तुझी शक्ती वापर.
राहाबचा पराभव करणारी शक्ती तूच आहेस.
तू आक्राळ-विक्राळ मगरीचा पराभव केलास.
10 समुद्र आटवायला तू कारणीभूत झालास.
मोठ्या डोहातील पाणी तू आटविलेस.
समुद्रातील अती सखोल भागाचा तू रस्ता केलास.
तुझे लोक त्या रस्त्यावरून पार झाले
आणि वाचविले गेले.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील.
ते आनंदाने सियोनला परततील.
ते खूप खूप सुखी होतील.
त्यांचे सुख त्यांच्या डोक्यांवरील मुकुटांप्रमाणे निरंतर राहील.
ते आनंदाने गात राहतील.
सर्व दु:ख कायमचे नाहीसे होईल.
12 परमेश्वर म्हणतो, “मीच तो एकमेव ज्याने तुमचे दु:ख हलके केले.
मग तुम्ही लोकांना का भ्यावे?
ती जन्म मृत्यु पावणारी माणसेच आहेत.
ते फक्त मनुष्यप्राणी आहेत.
ते गवताप्रमाणे मरतात.”
13 परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले.
त्याच्या सामर्थ्याने त्याने पृथ्वी निर्माण केली.
आपल्या सामर्थ्याच्या जोरावरच त्याने पृथ्वीवर आकाश पसरविले.
पण तुम्ही तुमचा निर्माता,
देव आणि त्याच्या सामर्थ्याला विसरता म्हणूनच
तुम्हाला दुखविणाऱ्या आणि रागावलेल्या माणसाला तुम्ही नेहमी घाबरता.
त्या लोकांनी तुमच्या नाशाचा कट केला,
पण आता ते कोठे आहेत? ते सर्व गेले.
14 तुरूंगातील कैद्यांना लवकरच सोडून देण्यात येईल.
ते तुरूंगात कुजून मरणार नाहीत.
त्यांना पोटभर अन्न मिळेल.
15 “मी, परमेश्वर, तुमचा देव आहे,
मी समुद्र घुसळतो आणि लाटा निर्माण करतो.”
(सर्वशक्तिमान परमेश्वर हेच त्याचे नाव आहे.)
16 “माझ्या सेवका, मी माझे शब्द तुझ्या तोंडी घालीन. मी तुला माझ्या हाताने झाकून तुझे रक्षण करीन. नवीन स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करण्यासाठी मी तुझा उपयोग करीन. इस्राएलला ‘तुम्ही माझे लोक आहात.’ हे सांगण्यास मी तुला सांगीन.”
देवाने इस्राएलला शिक्षा केली
17 ऊठ, ऊठ,
यरूशलेम, जागी हो.
परमेश्वर तुझ्यावर फार रागावला होता.
म्हणून तुला शिक्षा झाली.
विषाचा प्याला प्यायला लागावा तशी ही शिक्षा होती.
तू तो विषाचा प्याला प्यायलीस.
18 यरूशलेममध्ये खूप लोक होते. पण त्यातील कोणीही तिचे नेते झाले नाहीत. तिने वाढविलेली कोणीही मुले, तिला पुढे नेण्यास, मार्गदर्शक झाली नाहीत. 19 दोन-दोनच्या गटाने यरूशलेमवर संकटे आली चोरी आणि नुकसान, भूक आणि युध्द्.
तू संकटात असताना तुला कोणीही मदत केली नाही. कोणी तुझ्यावर दया केली नाही. 20 तुझे लोक दुबळे होऊन जमिनीवर पडले आणि तिथेच पडून राहिले. प्रत्येक चौकात ते पडून राहिले. ते जणू जाळ्यात पकडलेले प्राणी होते. त्यांना आणखी शिक्षा सहन न होईपर्यंत परमेश्वराने रागाने त्यांना शिक्षा केली. जेव्हा देव त्यांना म्हणाला की मी तुम्हाला आणखी शिक्षा करीन, तेव्हा ते अगदीच लोळागोळा झाले.
21 ऐक, बिचाऱ्या यरूशलेम, ऐक, मद्यप्याप्रमाणे तू दुबळी झाली आहेस. पण तू मद्य घेतले नाहीस. “त्या विषाच्या प्याल्याने” तुला दुर्बल केले आहे.
22 तुझा देव, प्रभू परमेश्वर, त्याच्या लोकांसाठी लढेल. तो तुला म्हणतो, “मी हा ‘विषाचा प्याला’ (शिक्षा) तुझ्यापासून दूर करीत आहे. मी आता तुझ्यावर रागावणार नाही. ह्यापुढे माझ्या रागामुळे तुला शिक्षा होणार नाही. 23 आता तुला ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर मी माझा राग काढीन व त्यांना शिक्षा करीन. त्या लोकांनी तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते तुला म्हणाले, ‘आमच्यापुढे वाक. आम्ही तुला तुडवून जाऊ.’ त्यांनी बळजबरीने तुला वाकविले आणि माती तुडवल्याप्रमाणे ते तुझ्या पाठीवरून चालले. तू जणू काही त्यांचा रस्ता होतीस.”
इस्राएलला वाचविले जाईल
52 ऊठ, सियोना ऊठ.
कपडे घालून तयार हो.
बलशाली हो.
पवित्र यरुशलेम, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर.
ज्यांनी देवाला अनुसरायचे नाकारले आहे [a]
असे लोक पुन्हा कधीही तुझ्यात प्रवेश करणार नाहीत.
ते लोक शुध्द आणि निर्मळ नाहीत.
2 तुझ्या अंगावरची धूळ झटक, चांगली वस्त्रे परिधान कर.
यरूशलेम, सियोनकन्ये, तू उठून बस, तू कैदी होतीस.
पण आता तुझ्या गळ्याभोवती आवळल्या गेलेल्या पाशापासून स्वतःची मुक्तता कर.
3 परमेश्वर म्हणतो,
“तुला पैशासाठी विकले नव्हते.
म्हणून, तुझी मुक्तता करण्यासाठी, मी पैशाचा उपयोग करणार नाही.”
4 परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “माझ्या माणसांनी प्रथम मिसरमध्ये वस्ती केली आणि मग ते गुलाम झाले, नंतर अश्शूरने त्यांना गुलाम केले. 5 काय घडले आहे ते आता पाहा दुसऱ्या एका राष्ट्राने माझ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. माझ्या लोकांना गुलामाप्रमाणे ताब्यात घेणारे हे राष्ट्र कोणते? माझ्या लोकांना गुलाम म्हणून घेताना त्यांनी काहीही किंमत मोजली नाही. हे राष्ट्र माझ्या लोकांवर सत्ता गाजविते. त्यांची थट्टा करते. ते लोक नेहमीच माझी निंदा करतात.”
6 परमेश्वर म्हणतो, “असे घडले आहे. पण त्यामुळेच माझ्या लोकांना माझी ओळख पटेल. मी कोण आहे हे त्यांना कळेल. लोकांना माझा लौकिक कळेल आणि त्यांच्याशी बोलणारा मी म्हणजेच तो [b] आहे हे समजेल.”
7 “शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोना, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.
8 टेहळणी करणारे [c] आरडाओरडा करतात.
ते सर्व मिळून आनंद व्यक्त करीत आहेत.
का? कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वराला सियोनाला परत येताना पाहिले आहे.
9 यरूशलेमा, तुझ्या नाश झालेल्या इमारती पुन्हा आनंदित होतील.
तुम्ही सर्व मिळून आनंद साजरा कराल.
का? कारण परमेश्वराने त्याच्या लोकांना सुखी केले आहे. त्याने यरूशलेमला मुक्त केले आहे.
10 परमेश्वर त्याची पवित्र शक्ती सर्व राष्ट्रांना दाखवील.
देव त्याच्या लोकांना कसे वाचवितो हे अती दूरच्या सर्व देशांना दिसेल.
11 तुम्ही लोकांनी बाबेल सोडावे.
ते ठिकाण सोडा,
याजकांनो, पुजेचे साहित्य नेण्यासाठी
स्वतःला शुध्द् करा.
अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका.
12 तुम्ही बाबेल सोडाल.
पण ते तुम्हाला घाईने बाबेल सोडण्याची सक्ती करणार नाहीत.
ते लोक तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडणार नाहीत.
तुम्ही निघून याल.
आणि परमेश्वर तुमच्याबरोबर असेल.
परमेश्वर तुमच्या पुढे असेल.
आणि इस्राएलचा देव तुमच्या पाठीशी असेल. [d]
यातना भोगणारा देवाचा सेवक
13 “माझ्या सेवकाकडे पाहा. तो नक्कीच यशस्वी होईल. [e] त्याला अतिशय महत्व येईल. भविष्यात लोक त्याचा आदर करतील. त्याला मान देतील. 14 माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांना धक्का बसला. त्याला इतकी दुखापत झाली होती की मनुष्य म्हणून त्याला ओळखणे त्यांना शक्य नव्हते. 15 पण त्यांना अधिकच आश्चर्य वाटेल. राजे त्यांच्याकडे आश्चर्याने पाहातील पण ते एकही शब्द बोलणार नाहीत. माझ्या सेवकाची गोष्ट ह्या लोकांनी ऐकलेली नाही. काय झाले ते त्यांनी पाहिले. त्यांनी जरी ती गोष्ट ऐकली नसली तरी त्यांना ती सर्व समजलेली आहे.”
प्रभूच्या येण्यासाठी तयार राहा
5 बंधूंनो, वेळ आणि तारीखवार मी तुम्हांला लिहिण्याची गरज नाही. 2 कारण तुम्ही स्वतःचे हे चांगल्या प्रकारे जाणता की, प्रभूच्या परत येण्याचा दिवस येईल. तो जणू काय रात्रीचा चोर जसा येतो तसा येईल. 3 जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!
4 परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही. 5 कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात व दिवसाचे पुत्र आहा, आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही. 6 म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये. उलट आपण सावध राहू व आमच्या स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु. 7 कारण जे झोपतात ते रात्री झोपतात व जे दारु पितात ते रात्री दारु पितात, 8 परंतु आपण दिवसाचे असल्याने स्वःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु या. आपण विश्वास आणि प्रीतिचे छातीला उरस्त्राण घालू या. आणि आमचे शिरस्त्राण म्हणून तारणाची आशा ठेवू या.
9 कारण देवाने आम्हाला त्याचा क्रोध सहन करण्यासाठी निवडले नाही, तर आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळावे म्हणून निवडले आहे. 10 तो आमच्यासाठी मरण पावला यासाठी की, आम्ही मेलेले असू किंवा जिवंत असू, जेव्हा येशू येईल तेव्हा आम्हाला त्याबरोबर एकत्र राहता यावे. 11 म्हणून एकमेकांना उत्तेजन द्या. आणि जसे आता तुम्ही करीत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा.
शेवटच्या सूचना आणि सलाम
12 परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, की जे तुम्हामध्ये श्रम व प्रभुमध्ये मार्गदर्शन करतात आणि शिक्षण देतात, त्यांना तुम्ही मान द्या. 13 आम्ही तुम्हाला अशी विनंति करतो की, त्यांनी तुमच्याबरोबर केलेल्या कामामुळे त्यांना प्रेमाने मोठा मान द्या.
एकमेकांबरोबर शांतीने राहा. 14 बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की, “आळशी लोकांना ताकीद द्या.” भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक्तांना मदत करा. व सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा. 15 कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.
16 सर्वदा आनंद करा. 17 नेहमी प्रार्यना करीत राहा. 18 प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
19 आत्म्याला विझविण्याचा प्रयत्न करु नका. 20 संदेष्ट्यांच्या संदेशाचा उपहास करु नका. 21 पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करुन खात्री करुन घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरुन ठेवा. 22 दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.
23 देव स्वतः जो शांतीचा उगम आहे. तो तुम्हांला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्यत्व म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो. 24 देव जो तुम्हाला बोलावितो तो विश्वासू आहे आणि खरोखरच तो तसे करील.
25 बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा. 26 पवित्र चुंबनाने सर्व बंधूंना सलाम करा. 27 मी तुम्हांला प्रभुची शपथ घ्यावयाला सांगतो की, हे पत्र सर्व बंधूना वाचून दाखविण्यात यावे. 28 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
2006 by World Bible Translation Center