Old/New Testament
तो तिच्याशी बोलतो
4 प्रिये, तू किती सुंदर आहेस!
सखे, तू खूप सुंदर आहेस.
तुझ्या बुरख्याआड तुझे डोळे कपोतासारखे दिसतात.
तुझे केस लांब
आणि गिलाद पर्वताच्या उतारावरुन धावत
जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
2 तुझे दात नुकतीच आंघोळ करुन
आलेल्या बकऱ्या सारखे आहेत.
त्या सर्व जुळ्यांना जन्म देतात
आणि त्यांच्या पैकी कुणीही आपले बाळ गमावलेले नाही.
3 तुझे ओठ लाल रंगाच्या रेशमाच्या धाग्याप्रमाणे आहेत.
तुझे मुख सुंदर आहे.
घुंगटाखाली तुझ्या कपाळाच्या दोन बाजू
डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
4 तुझी मान दाविदाच्या मनोऱ्याप्रमाणे बारीक
आणि लांब आहे.
त्या मनोऱ्यांच्या भिंती बलशाली
सैनिकांच्या एक हजार ढालींनी
शोभिंवंत केल्या होत्या. [a]
5 तुझी वक्षस्थळे कमलपुष्पांत चरत
असलेल्या जुळ्या हरिणश्रावकासारखी आहेत,
मृगीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत.
6 दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत
आणि सावल्या दूर पळत आहेत.
तेवढ्या वेळात मी
त्या गंधरसाच्या उदाच्या पर्वतावर जाईन.
7 प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस.
तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
8 लबोनान मधून माझ्या वधू,
तू माझ्याबरोबर ये.
लबानोनमधून माझ्याबरोबर ये.
अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये,
सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये.
सिंहाच्या गुहेतून, चित्यांच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
9 माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू मला उद्दीपित बनवतेस.
फक्त तुझ्या एका डोळ्याने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने
तू माझे हृदय चोरले आहेस.
10 माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे,
प्रेम फार सुंदर आहे.
तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे.
तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
11 माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो.
तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे.
तुझ्या कपड्यांना अत्तरासारखा गोड सुवास आहे.
12 माझ्या प्रिये, माझ्या वधू,
तू कुलुपबंद केलेल्या बागेसारखी शुध्द आहेस.
तू बंदिस्त तळ्यासारखी,
कारंज्यासारखी आहेस.
13 तुझे अवयव डाळिंबाने
आणि इतर फळांनी सर्व
प्रकारच्या सुगंधी पदार्थांनी,
मेंदी,
14 जटामासी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
तुझे अवयव उदाची झाडे,
गंधरस व अगरु व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
15 तू बागेतल्या कारंज्यासाखी,
ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी,
लबानोनच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
ती म्हणते
16 उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ!
दक्षिणवाऱ्या ये,
माझ्या बागेवरुन वाहा.
तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव.
माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे
आणि तिथली गोड फळे चाखू दे.
तो म्हणतो
5 माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो.
मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली.
मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले.
मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो.
स्त्री प्रेमिकांशी बोलते
प्रिय मित्रांनो, खा, प्या.
प्रेमाने धुंद व्हा.
ती म्हणते
2 मी झोपलेली आहे.
पण माझे हृदय जागे आहे.
माझा प्रियकर दार वाजवतो ते मी ऐकते.
“प्रिये माझ्यासाठी दार उघड माझ्या प्रेमा,
माझ्या कबुतरा, माझ्या सर्वोत्कृष्टा!
माझे डोके दवाने ओले झाले आहे.
माझे केस रात्रीच्या धुक्याने ओले झाले आहेत.”
3 “मी माझा पोषाख काढून टाकला आहे.
मला तो पुन्हा घालायचा नाही.
मी माझे पाय धुतले आहेत.
मला ते पुन्हा घाण करायचे नाहीत.”
4 पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातला [b]
आणि माझे हृदय त्याच्यासाठी हेलावले. [c]
5 माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले.
माझ्या हातातून गंधरस गळत होता.
इतर सुवासिक द्रव्ये माझ्या बोटांतून
कुलुपाच्या कडीवर गळत होती.
6 मी माझ्या प्रियकरासाठी दार उघडले.
पण माझा प्रियकर तोंड फिरवून निघून गेला होता.
तो गेला तेव्हा
मी जवळ जवळ गतप्राण झाले. [d]
मी त्याला शोधले
पण तो मला सापडू शकला नाही.
मी त्याला हाक मारली
पण त्याने मला ओ दिली नाही.
7 शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले.
त्यांनी मला मारले,
इजा केली.
भिंतीवरच्या पहारेकऱ्यांनी
माझा अंगरखा घेतला.
8 यरुशलेमच्या स्त्रियांनो! मी तुम्हाला सांगते,
जर तुम्हाला माझा प्रियकर दिसला, तर त्याला सांगा की मी प्रेमविव्हळ झाले आहे. [e]
यरुशलेमच्या स्त्रिया तिला उत्तर देतात
9 सुंदर स्त्रिये!
तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून वेगळा कसा?
तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे का?
म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस का?
ती यरुशलेमच्या स्त्रियांना उत्तर देते
10 माझा प्रियकर उन्हाने काळवंडला आहे व तेजस्वी दिसतो.
तो दहा हजार माणसात उठून दिसेल.
11 त्याचे मस्तक शुध्द् सोन्याप्रमाणे आहे.
त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंबकावळ्यासारखे काळे आहेत.
12 त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत,
दुधाच्या थारोळ्यातील कबुतरासारखे आहेत कोदंणातल्या हिऱ्यासारखे आहेत.
13 त्याचे गाल मसाल्याच्या पदार्थांच्या बागेप्रमाणे आहेत,
अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत.
त्याचे ओठ सुंगध गळणाऱ्या
कमलपुष्पाप्रमाणे आहेत.
14 त्याचे बाहू रत्नांनी जडवलेल्या
सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत.
त्याचे शरीर नीलमणी जडवलेल्या
मऊ हस्तिदंतासारखे आहे.
15 त्याचे पाय सोन्याचा पाया
असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत.
तो लबानोनमधल्या गंधसरुच्या
झाडासारखा उंच उभा राहतो.
16 होय, यरुशलेमच्या स्त्रियांनो, माझा प्रियकर खूप हवाहवासा वाटणारा आहे.
त्याचे तोंड सर्वांत गोड आहे.
तोच माझा प्रियकर,
तोच माझा सखा आहे.
विश्वासाद्वारे देवाचा आशीर्वाद येतो
3 अहो मूर्ख गलतीकरांनो! ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलेले जाहीर रितीने तुम्हांला वर्णन करुन सांगितले होते त्या तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे? 2 मला तुमच्याकडून ही एक गोष्ट शिकायची आहे? आत्म्याची दाने तुम्हाला नियमशास्त्राचे पालन करण्याने मिळाली आहेत की सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवल्याने मिळाली आहेत? 3 तुम्ही इतके मूर्ख आहात का की, जे जीवन तुम्ही आत्म्यात सुरु केले ते आता देहाने पूर्ण करीत आहात? 4 तुम्ही व्यर्थच इतकी दु:खे अनुभवली का? माझी आशा आहे की ती व्यर्थ नव्हती. 5 देव जो तुम्हांला आत्मा पुरवितो आणि तुम्हामध्ये चमत्कार करतो, तो तुम्ही नियमशास्त्राचे पालन करता म्हणून का सुवार्ता ऐकून तीवर विश्वास ठेवला म्हणून तो हे करतो.
6 ते, अब्राहामाविषयी पवित्र शास्त्र सांगते तसे आहे: “त्याने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याच्यासाठी देवाकडून नीतिमत्त्व असे गणण्यात आले.” 7 मग तुम्हाला समजले पाहिजे की जे विश्वास ठेवतात, तेच अब्राहामाचे खरे वंशज आहेत. 8 पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामाला पूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.” 9 म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांना विश्वासणाऱ्या अब्राहामासह आशीर्वाद मिळेल.
10 परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापित असो.” 11 नियमशास्त्रामुळे कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे. कारण शास्त्र सांगते की, “विश्वासामुळे नीतिमान मनुष्य जगेल.”
12 नियमशास्त्र विश्वासाचे नाही. त्याऐवजी पवित्र शास्त्र असे सांगते की, “जो कोणी ते पाळतो तो त्यामुळे जगेल.” 13 ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. आपणासाठी शाप होऊन त्याने हे केले. असे लिहिले आहे: “प्रत्येकजण जो कोणी झाडावर टांगला आहे तो शापित असो.” 14 ख्रिस्ताने आम्हाला मुक्त केले यासाठी की, अब्राहामाला मिळालेला आशीर्वाद ख्रिस्ताद्वारे विदेश्यांना मिळावा. यासाठी की विश्वासाद्वारे आम्हांला आत्म्याचे अभिवचन मिळावे.
नियमशास्त्र आणि अभिवचन
15 बंधूंनो, मी तुम्हांला रोजच्या जीवनातील उदाहरण देतो. ज्याप्रमाणे मनुष्यांनी केलेला करार कोणीही रद्द करत नाही किंवा त्यात भर घलीत नाही. याबाबतीतसुद्धा तसेच आहे. 16 अब्राहामाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती. लक्षात घ्या की, ते “आणि त्याच्या वंशजांना” असे अनेकजणांसांबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते, “आणि तुझ्या संतानाला” (आणि तो वंशज) ख्रिस्त आहे. 17 माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, देवाने अगोदर निश्चित केलेला करार चारशे तीस वर्षे उशिरा आलेल्या नियमशास्त्राने अभिवचन रद्द करण्यास केला नव्हता.
18 कारण वतन जर नियमशास्त्रावर अवलंबून होते, तर येथून पुढे ते अभिवचनावर अवलंबून असणार नाही. परंतु देवाने अभिवचनामुळे अब्राहामाला मुक्तपणे हे वतन दिले.
19 तर मग, नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनाला जोडण्यात आले होते. नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशे या मध्यस्थाच्या होती देण्यात आले. 20 आता मध्यस्थ हा फक्तएकाच पक्षाचा नसतो. पण देव एकच आहे आणि त्याची अभिवचने दुसऱ्या पक्षावर अवलंबून नाहीत.
मोशेच्या नियमशास्त्राचा हेतु
21 नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल. 22 पण पवित्र शास्त्राने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जग ह पापाच्या सामर्थ्याने जखडून टाकले होते, यासाठी की, जे अभिवचन देण्यात आले होते ते जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, त्यांना देण्यात यावे.
23 हा विश्वास येण्याअगोदर नियमशास्त्राने आपणांस कैद्याप्रमाणे पहाऱ्यात ठेवले होते. आणि हा येणारा विश्वास आम्हांला प्रगट होईपर्यंत आम्हांला कैदी म्हणून ठेवण्यात आले होते. 24 त्यामुळे आपल्या विश्वासाच्या आधारे आपण नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र जे आपणांला ख्रिस्ताकडे घेऊन येणारे होते, ते आपले पालक होते. 25 पण आता हा विश्वास आलाच आहे, तर यापुढे आम्ही या कडक पालकाच्या अधीन नाही.
26-27 कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुम्ही जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. 28 तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. 29 आणि जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्राहामाचे संतान आणि देवाने अब्राहामाला दिलेल्या वचनानुसार वारस आहात.
2006 by World Bible Translation Center