Old/New Testament
27 भविष्यात काय घडेल याबद्दलच्या फुशारक्या मारु नका. उद्या काय घडेल ते तुम्हाला माहीत नसते.
2 स्वतःचीच स्तुती कधीही करु नका. ती दुसऱ्यांना करु द्या.
3 दगड खूप वजनदार असतो आणि वाळू वाहून न्यायला कठीण असते. पण मूर्खांनी आणलेली संकटे सहन करणे या दोन्ही पेक्षा कठीण असते.
4 राग क्रूर आणि नीच असतो त्यामुळे सर्वनाश होतो. पण मत्सर त्याहीपेक्षा वाईट असतो.
5 उघड टीका ही गुप्त प्रेमापेक्षा चांगली असते.
6 मित्र तुम्हाला कधीतरी दु:ख देईल पण त्याची तसे करायची इच्छा नसते. शत्रू वेगळा असतो. शत्रू जरी तुमच्याशी कधी दयाबुध्दीने वागला तरी त्याला तुम्हाला दु:ख द्यायचीच इच्छा असते.
7 तुम्हाला जर भूक नसेल तर तुम्ही मधदेखील खाणार नाही. पण जर तुम्ही भुकेले असाल तर तुम्ही काहीही खाल. ते चवीला वाईट असले तरीही.
8 घरापासून दूर असलेला माणूस म्हणजे घरट्यापासून दूर असलेला पक्षी.
9 अत्तर आणि गोड वास असलेल्या वस्तू तुम्हाला आनंद देतात. पण संकटे तुमच्या मनाची शांती घालवतात.
10 तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या मित्रांना विसरु नका. आणि तुम्ही संकटात असाल तर मदतीसाठी दूरच्या तुमच्या भावाच्या घरी जाऊ नका. जवळच्या शेजाऱ्याला विचारणे हे दूरवरच्या तुमच्या भावाकडे जाण्यापेक्षा चांगले असते.
11 मुला शहाणा हो. त्यामुळे मला आनंद वाटेल. नंतर जो कुणी माझ्यावर टीका करेल त्याला मी उत्तर देऊ शकेन.
12 शहाण्या लोकांना संकटांचा सुगावा लागला आणि ते त्यांच्या मार्गांतून बाजूला होतात. पण मूर्ख सरळ संकटात जातात आणि त्यामुळे दु:खी होतात.
13 जर तुम्ही दुसऱ्याच्या कर्जाबद्दल स्वतः जामीन राहिलात तर तुम्हाला तुमचे कपडेदेखील गमवावे लागतील.
14 “सुप्रभात” च्या आरोळीने तुमच्या शेजाऱ्याला भल्या पहाटे उठवू नका. तो त्याला आशीर्वादाऐवजी शाप समजेल.
15 सतत वाद घालण्याची इच्छी धरणारी बायको पावसाळ्याच्या दिवसात सतत गळणाऱ्या दिवसात सतत गळणाऱ्या पाण्यासारखी असते. 16 त्या बाईला थांबवणे हे वाऱ्याला थांबवण्यासारखे आहे. हाताने तेल पकडण्यासारखे असते.
17 लोखंडाच्या सुरीला धार करण्यासाठी लोखंडाचेच तुकडे वापरतात. त्याचप्रमाणे लोक एकमेकांना धारदार बनविणे एकमेकापासूनच शिकतात.
18 जो माणूस अंजिराच्या झाडाची निगा राखतो तो त्याची फळे खाऊ शकतो. तसेच जो माणूस त्याच्या धन्याची काळजी घेतो त्याला बक्षीस मिळते. त्याचा मालक त्याची काळजी घेईल.
19 माणसाने पाण्यात पाहिले तर त्याला स्वतःचा चेहरा दिसेल. त्याचप्रमाणे माणसाचे हृदय तो माणूस खरा कसा आहे ते दाखविते.
20 मृतलोक आणि नाश ह्यांची कधीही तृप्ती होत नाही. त्याचप्रमाणे माणसाच्या डोळ्यांतील वासना कधी शमत नाही.
21 सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते.
22 मूर्खाला दळून तुम्ही त्याचे पीठ केले तरी त्याचा मूर्खपणा तुम्ही घालवू शकणार नाही.
23 तुमच्या मेंढ्यांची आणि पशुधनाची काळजी घ्या. त्यांची तुम्ही उत्तम प्रकारे निगा राखत आहात याची खात्री करा. 24 संपत्ती कायम टिकत नाही. राष्ट्रेसुध्दा् कायम राहात नसतात. 25 गवत कापल्यानंतर पुन्हा नवीन उगवते. टेकडीवर उगवणारे गवत कापा. 26 तुमच्या मेंढ्यांवरची लोकर कापा आणि तुमचे कपडे करा. तुमच्या काही बकऱ्या विका आणि जमीन विकत घ्या. 27 तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी शेळीचे बरेच दूध असेल. त्यामुळे तुमच्या सेवकमुली निरोगी राहतील.
28 वाईट लोकांना सगळ्याचीच भीती वाटते. कोणी त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते दूर पळतात. पण चांगला माणूस सिंहासाखा शूर असतो.
2 जर देशाने आज्ञा पाळायला नकार दिला तर तिथले बरेचसे वाईट नेते केवळ थोड्या काळापुरतेच राज्य करु शकतील. पण जर देशाला एकच शहाणा नेता असला तर देश खूप काळापर्यंत राहील.
3 राजाने जर गरीब लोकांवर संकटे आणली तर तो पीक उद्ध्वस्त करणाऱ्या जोरदार पावसासारखा असतो.
4 तुम्ही जर कायदा पाळायला नकार दिलात तर तुम्ही वाईट लोकांच्या बाजूचे होत. पण तुम्ही कायदा पाळलात तर तुम्ही त्यांच्या विरुध्द असता.
5 वाईट लोकांना न्याय कळत नाही. पण जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना सर्वकाही कळते.
6 गरीब असून प्रामाणिक असणे हे श्रीमंत असून वाईट असण्यापेक्षा चांगले असते.
7 जो माणूस कायद्याचे पालन करतो तो हुशार असतो. पण जो माणूस क्षुल्लक माणसांशी मैत्री करतो तो त्याच्या वडिलांना लाज आणतो.
8 जर तुम्ही गरीबांना फसवून श्रीमंत झालात तर तुम्ही लवकरच संपत्ती गमवाल. जो माणूस त्यांच्याशी दयाळू असतो त्याच्याकडे ती जाईल.
9 जर एखाद्याने देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्यायला नकार दिला तर देव त्याची प्रार्थना ऐकायला नकार देईल.
10 वाईट माणूस चांगल्या माणसांना दु:ख देण्याच्या योजना आखतो. परंतु वाईट माणूस त्याच्याच जाळ्यात अडकेल आणि चांगल्या माणसाच्या बाबतीत चांगल्या घटना घडतील.
11 श्रीमंत लोकांना नेहमी आपण खूप शहाणे आहोत असे वाटत असते. पण शहाणा असलेला गरीब माणूस खरे काय ते पाहू शकतो.
12 चांगले लोक नेते बनले की सर्वजण आनंदी असतात. पण वाईट माणूस निवडून आला की सर्व लपून बसतात.
13 माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही यशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील.
14 जर एखाद्याने नेहमी परमेश्वराचा आदर केला तर त्याला आशीर्वाद मिळेल. पण जर तो हट्टी असला आणि त्याने परमेश्वराचा आदर करायला नकार दिला तर त्याच्यावर संकटे येतील.
15 दुष्ट माणूस जेव्हा दुबळ्या लोकांवर राज्य करतो तेव्हा तो रागावलेल्या सिंहासारखा किंवा अस्वलासारखा लढाईला तयार असतो.
16 जर राज्यकर्ता शहाणा नसला तर तो त्याच्या हाताखालच्या लोकांना दु:ख देतो. पण जर राज्यकर्ता प्रामाणिक असला आणि त्याला फसवणे आवडत नसले तर तो खूप काळपर्यंत राज्य करेल.
17 जर एखाद्याने कुणाला ठार मारण्याचा अपराध केला असेल. तर त्याला कधीही मनःशांती लाभणार नाही. त्या माणसाला कधीही आधार देऊ नका.
18 माणूस जर योग्य जीवन जगत असला तर तो सुरक्षित असेल. पण जर तो दुष्ट असेल तर तो त्याची शक्ती घालवून बसेल.
19 जो माणूस खूप काम करतो त्याला भरपूर खायला मिळेल. पण जो स्वप्ने बघण्यात वेळ घालवतो तो गरीबच राहील.
20 जो देवाची भक्ती करतो त्याला देव आशीर्वाद देईल. पण जो माणूस फक्त श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्याला शिक्षा होईल.
21 न्यायाधीशाने नेहमी न्यायी असले पाहिजे. एखाद्याला तो चांगला ओळखतो म्हणून त्याला मदत करता कामा नये. पण काही न्यायाधीश थोड्याशा पैशांसाठी त्यांचे निर्णय बदलतात.
22 स्वार्थी माणसाला फक्त श्रीमंत व्हायचे असते. त्याला हे कळत नाही की तो गरीब होण्याच्या मार्गाला लागला आहे.
23 जर तुम्ही एखाद्याला तो चुकतो आहे असे सांगून मदत केलीत तर तो नंतर तुमच्याबद्दल आनंदी होईल. लोकांबरोबर नेहमी गोडगोड बोलण्यापेक्षा हे खूप चांगले.
24 काही लोक त्यांच्या आई वडिलांची चोरी करतात. “ह्यात काही चूक नाही” असे ते म्हणतात. पण तो माणूस घरात येऊन सगळ्याचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच दोषी आहे.
25 स्वार्थी. माणूस संकटे निर्माण करतो. पण जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याला बक्षीस मिळते.
26 जर एखादा माणूस स्वतःवरच विश्वास ठेवेल तर तो मूर्ख आहे. पण जर तो शहाणा असेल तर तो संकटातून सुटेल.
27 जर एखाद्याने गरीब लोकांना दिले तर त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. पण जर एखाद्याने गरीबांना मदत करायला नकार दिला तर त्याच्यावर खूप संकटे येतील.
28 दुष्ट माणूस जर राज्य करण्यासाठी निवडून आला तर लोक लपून बसतील. पण त्या दुष्टाचा जर पराभव झाला तर चांगले लोक पुन्हा राज्य करतील.
29 जर एखादा माणूस हट्टी असेल आणि प्रत्येक वेळी त्याला तू चुकतो आहेस असे कुणी सांगितल्यावर खूप राग येत असेल, तर त्या माणसाचा नाश होईल. तिथे आशेला जागा नाही.
2 राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.
3 जर एखाद्या माणसाला शहाणपण आवडत असेल तर त्याच्या वडिलांना आनंद वाटतो. पण जर एखादा माणूस वेश्येवर पैसा खर्च करत असेल तर तो त्याची संपत्ती गमावून बसेल.
4 राजा जर न्यायी असला तर राष्ट्र बलशाली होते. पण राजा स्वार्थी असला आणि लोकांना त्यांच्या गोष्टी करुन घेण्यासाठी त्याला पैसे द्यावे लागत असले तर ते राष्ट्र कमजोर होईल.
5 जर एखादा माणूस गोड बोलून आपले काम करुन घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो स्वतःसाठीच सापळा तयार करीत असतो.
6 वाईट लोकांचा त्यांच्याच पापामुळे पराभव होतो पण चांगला माणूस गाणे गाऊन आनंदी राहातो.
7 चांगल्या माणसांना गरीबांसाठी योग्य गोष्टी करायची इच्छा असते पण दुष्ट लोक मात्र पर्वा करीत नाहीत. 8 जे लोक स्वतःला इतर लोकांपेक्षा चांगले समजतात ते संकटे आणू शकतात. ते सगळ्या शहरांना गोंधळात टाकू शकतात. पण जे शहाणे असतात ते शांती राखतात.
9 शहाणा माणूस जर मूर्खाबरोबर त्याच्या समस्या सोडवायला लागला तर तो मूर्ख वाद घालेल व मूर्खासारख्या गोष्टी करेल आणि त्या दोघांचे कधीही एकमत होणार नाही.
10 खुनी लोक नेहमी प्रामाणिक माणसांचा तिरस्कार करतात. त्या दुष्टांना प्रामाणिक आणि चांगल्या लोकांना [a] ठार मारायचे असते.
11 मूर्खाला चटकन् राग येतो पण शहाणा माणूस धीर धरतो आणि स्वतःला काबूत ठेवतो.
12 राजाने जर खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर त्याचे सगळे अधिकारी वाईट ठरतील.
13 गरीब माणूस आणि जो गरीबांची चोरी करतो तो माणूस एका दृष्टीने सारखेच आहेत. त्या दोघांना परमेश्वरानेच केले.
14 राजा जर गरीबांच्या बाबातीत न्यायी असला तर तो खूप काळ राज्य करेल.
15 मार आणि शिकवण मुलासाठी चांगली असते. जर आईवडिलांनी मुलांना त्यांना हवे ते करु दिले तर तो त्याच्या आईला लाज आणेल.
16 जर देशावर वाईट लोक राज्य करीत असतील, तर सगळीकडे पाप नांदेल पण शेवटी चांगल्या माणसांचा जय होईल.
17 तुमचा मुलगा जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करा नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटेल. तो तुम्हाला कधीही लाज आणणार नाही.
18 जर देवाने देशाला मार्ग दाखवला नाही तर त्या देशात शांतता नांदणार नाही. पण जर देशाने देवाचे कायदे पाळले तर तो सुखी होईल.
19 जर तुम्ही फक्त सेवकाशी बोललात तर तो त्याचा धडा शिकणार नाही. तो सेवक तुमचे शब्द समजू शकेल पण तो ते पाळणार नाही.
20 जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर त्याच्या बाबतीत आशेला जागा नाही. जो विचार न करता बोलतो त्याच्यापेक्षा मूर्खाच्या बाबतीत आशेला अधिक जागा आहे.
21 जर तुम्ही तुमच्या सेवकाला तो जे जे मागेल ते ते सर्व दिले तर शेवटी तो चांगला सेवक होणार नाही.
22 रागावलेला माणूस संकटे आणतो आणि जो माणूस पटकन् रागावतो तो अनेक पापांचा अपराधी असतो.
23 माणसाचा गर्व त्याला खाली आणतो. जर एखाद्याला तो इतरांपेक्षा चांगला आहे असे वाटत असेल तर त्यामुळे त्याचा नाश होईल. पण जर एखादा माणूस विनम्र असेल तर इतर लोक त्याचा आदर करतील.
24 बरोबर काम करणारे दोन चोर एकमेकांचे शत्रू असतात. एक चोर दुसऱ्याला धमकी देईल त्यामुळे जर त्याला जबरदस्तीने कोर्टात खरे बोलावे लागले तर तो बोलायला खूपच घाबरेल.
25 भीती ही सापळ्यासारखी असते. पण जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर तुम्ही सुरक्षित असाल.
26 खूप लोकांना राज्यकर्त्यांशी मैत्री करायची असते. पण फक्त परमेश्वरच लोकांचा योग्य न्याय करतो.
27 चांगले लोक प्रामाणिक नसलेल्यांचा तिरस्कार करतात. आणि दुष्ट लोक प्रामाणिक असलेल्यांचा तिरस्कार करतात.
पौल त्याच्या सेवेचे समर्थन करतो
10 ख्रिस्ताच्या नम्रतेने व सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा “भित्रा” असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो! 2 मी आशा करतो की, जेव्हा मी येतो तेव्हा, काही लोक ज्यांना असे वाटते की आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे जगतो त्यांच्याबाबतीत लोक जितकी अपेक्षा करतात, तितका मी धीट असणार नाही, जितकी मी अपेक्षा करतो. 3 कारण जरी आम्ही जगामध्ये राहत असलो, तरी जगाप्रमाणे लढाई करीत नाही. 4 ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात. 5 आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो. 6 आणि तुमचा आज्ञाधारकपणा पूर्ण झाल्यावर आम्ही प्रत्येक आज्ञाभंगाच्या कृतीला शिक्षा करण्यास तयार असू.
7 तुम्ही वरवर बघता, जर कोणी तो ख्रिस्ताचा आहे याविषयी खात्री बाळगतो तर त्याने हे लक्षात घ्यावे की जितका तो ख्रिस्ताचा आहे तितके आम्हीसुद्धा आहोत. 8 आणि जो आमचा अधिकार प्रभुने आम्हांस खाली पाडण्यास नव्हे, तर तुमच्या वाढीसाठी दिला आहे त्याविषयी जरी काही विशेष अभिमान बाळगला, तरी मी लज्जित होणार नाही. 9 हे मी यासाठी बोलतो की, मी माझ्या पत्राद्वारे तुम्हांला भीति घालणारा असा वाटू नये. 10 कोणी म्हणतो की, त्याची पत्रे वजनदार आणि जोरदार आहेत पण व्यक्तिश: तो प्रभावहीन आणि बोलण्यात कमकुवत असा आहे. 11 अशा लोकांना हे समजावे की, जेव्हा आम्ही नसतो तेव्हा आम्ही आमच्या पत्रात जे असतो तसे जेव्हा आम्ही प्रत्याक्षात हजर राहू आमच्या कृतीमध्ये सुद्धा असू.
12 जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडून मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करीत असता बुध्दिहीन असे आहेत.
13 परंतु आम्ही आमच्या आम्हांला आखून दिलेल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी प्रशंसा करणार नाही. तर जी मर्यादा देवाने आम्हांस घालून दिली आहे, तिच्याप्रमाणे आम्ही प्रशंसा करुन घेतो. ती मर्यादा तर तुम्हापर्यंतही पोहोंचणारी आहे. 14 आमच्या अभिमान बाळगण्यामध्ये आम्ही फार दूर जात आहोत असे नाही. तसे असते तर आम्ही तुमच्याप्रत आलो नसतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो. 15 आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी, दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. किंवा आम्हांला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही, तर आम्हांस अशी आशा आहे की, तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हांकडून अगदी विस्तर पावलेले असे होऊ. 16 यासाठी की, शुभवर्तमानाचा तुमच्या पलीकडील प्रदेशात प्रसार करु. कारण दुसऱ्या माणसाच्या प्रदेशात अगोदरच झालेल्या कामाविषयी अभिमान बाळगण्याचे आम्हाला काही कारण नाही. 17 पण “जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूमध्ये बाळगावा.” [a] 18 कारण जो स्वतःची प्रशंसा करतो तो योग्य नाही, पण ज्याची देव प्रशंसा करतो तो मान्य असतो.
2006 by World Bible Translation Center