Old/New Testament
ज्ञान, एक चांगली स्त्री
8 ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला
तू ऐकावेस म्हणून तुला बोलावत आहेत.
2 ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात,
तिथे उभे आहेत.
3 ते शहराच्या दरवाजाशी आहेत.
ते उघड्या दरवाजातून बोलावत आहेत.
4 ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते, “लोक हो! मी तुम्हाला बोलावत आहे.
मी सगळ्या लोकांना बोलावत आहे.
5 तुम्ही जर मूर्ख असाल, तर शहाणे व्हायला शिका.
मूर्ख माणसांनो समजून घ्यायला शिका.
6 लक्ष द्या! ज्या गोष्टी शिकवतो त्या महत्वाच्या आहेत.
मी तुम्हाला फक्त योग्य असलेल्या गोष्टीच सांगतो.
7 माझे शब्द खरे आहेत.
मला वाईटाचा, खोट्याचा तिरस्कार वाटतो.
8 मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत.
माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही.
9 जो माणूस समजूतदार आहे त्याला या गोष्टी स्पष्ट दिसतात.
ज्ञानी माणूस या गोष्टी समजू शकतो.
10 माझ्या शिस्तीचा स्वीकार करा.
ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे.
ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे.
11 ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे.
ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.
ज्ञानरुपी स्त्री काय करते
12 “मी ज्ञान आहे.
मी चांगल्या न्यायाने जगते.
तुम्ही मला ज्ञानाबरोबर आणि चांगल्या योजनांबरोबर पाहू शकता.
13 जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल.
मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वतःला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते.
मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
14 परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते.
मी समजूतदारपणा आणि शक्ती देते.
15 राजे राज्य करताना माझा उपयोग करतात.
राज्यकर्ते चांगले कायदे करण्यासाठी माझा उपयोग करतात.
16 प्रत्येक चांगला राज्यकर्ता त्याच्या अंमलाखाली असलेल्या
लोकांवर राज्य करण्यासाठी माझा उपयोग करुन घेतो.
17 मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते.
आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
18 माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमरातब आहेत.
मी खरी संपत्ती आणि यश देते.
19 मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात.
आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात.
20 मी लोकांना योग्य मार्गावर आणते.
मी त्यांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते.
21 जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते.
होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरुन टाकीन.
22 “खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने
प्रथम माझीच निर्मिती केली.
23 आरंभीला मला निर्माण केले गेले.
जगाची सुरुवात होण्यापूर्वी मी निर्माण झाले.
24 महासागराच्या आधी माझा जन्म झाला.
पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते.
25 पर्वतांच्या आधी माझा (ज्ञानाचा) जन्म झाला.
डोंगरांच्या आधी माझा जन्म झाला.
26 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले.
शेतांच्या आधी माझा जन्म झाला.
देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता.
27 परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते.
परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते.
त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
28 परमेश्वराने आकाशात ढग ठेवण्याआधी माझा जन्म झाला.
आणि परमेश्वराने समुद्रात पाणी ठेवले तेव्हाही मी तिथे होते.
29 परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते.
पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही.
परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते.
30 एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते.
माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे.
मी त्याचा आनंद होते.
31 त्याने निर्माण केलेल्या जगाविषयी परमेश्वर उत्सुक होता.
तो तिथे निर्माण केलेल्या लोकांबद्दल आनंदी होता.
32 “मुलांनो, आता माझे ऐका, जर तुम्ही माझा मार्ग अनुसरला
तर तुम्हीही आनंदी व्हाल.
33 माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा.
ऐकायला नकार देऊ नका.
34 जो माझे ऐकतो तो सुखी होतो.
तो रोज माझ्या दारावर पहारा देतो.
तो माझ्या दाराजवळ थांबतो.
35 ज्या माणसाला मी सापडते.
त्याला जीवन सापडते.
त्याला परमेश्वराकडून चांगल्या गोष्टी मिळतील.
36 पण जो माझ्याविरुध्द् पाप करतो तो स्वतःलाच इजा करुन घेतो.
जे लोक माझा तिरस्कार करतात ते मरणाला कवटाळतात.”
ज्ञानरुपी स्त्री आणि मूर्खता
9 ज्ञानरुपी स्त्रीने आपले घर बांधले, त्यात तिने सात खांब [a] ठेवले. 2 तिने (ज्ञानरुपी स्त्रीने) मांस शिजवले आणि द्राक्षारस तयार केला. तिने अन्न तिच्या टेबलावर ठेवले. 3 नंतर तिने आपल्या नोकरांकरवी शहरातील लोकांना तिच्याबरोबर टेकडीवर भोजन करण्यासाठी येण्याचे आमंत्रण पाठविले. ती म्हणाली, 4 “ज्या लोकांना शिकण्याची आवश्यकता वाटते त्यांनी यावे.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले. ती म्हणाली, 5 “या माझ्या ज्ञानाचे अन्न खा. आणि मी तयार केलेला द्राक्षारस प्या. 6 तुमचे जुने, मूर्खपणाचे मार्ग सोडून द्या. मग तुम्हाला आयुष्य मिळेल. समजूतदारपणाचा मार्ग अनुसरा.”
7 जर तुम्ही गर्विष्ठ माणसाला तो चुकत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यावर केवळ टीका करेल. तो माणूस देवाच्या शहाणपणाची चेष्टा करतो. जर तुम्ही दुष्ट माणसाला तो चुकत आहे असे सांगितले तर तो तुमची चेष्टा करेल. 8 म्हणून जर एखादा माणूस तो इतरांपेक्षा चांगला आहे असे म्हणत असेल तर त्याला तो चुकतो आहे असे सांगू नका. तो त्या बद्दल तुमचा तिरस्कार करेल. पण जर तुम्ही शहाण्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा आदर करेल. 9 जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शहाणा होईल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शिकेल.
10 परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवण्याची पहिली पायरी आहे. 11 जर तुम्ही शहाणे असाल तर तुमचे आयुष्य अधिक वाढेल. 12 जर तुम्ही शहाणे होत असाल तर तुमच्या भल्यासाठीच शहाणे होत असता. पण जर तुम्ही गर्विष्ठ झालात आणि दुसऱ्या लोकांची चेष्टा करु लागलात तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांबद्दल तुम्हीच जबाबदार ठरता.
13 मूर्ख माणूस हा कर्कश बोलणाऱ्या वाईट स्त्रीसारखा असतो. तिच्याजवळ ज्ञान नसते. 14 ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते. ती शहारातल्या टेकडीवर तिच्या खुर्चीवर बसते. 15 आणि जेव्हा लोक तिथून जातात तेव्हा ती त्यांना बोलावते. त्या लोकांना तिच्यात काही रस नसतो. तरीही ती म्हणते, 16 “या ज्या लोकांना शिकणे आवश्यक आहे त्यांनी या.” तिने मूर्ख लोकांनाही बोलावले. 17 पण ती (मूर्खता) म्हणते, “जर तुम्ही पाणी चोरले तर ते पाणी तुमच्या पाण्यापेक्षा अधिक चवदार लागते. जर तुम्ही भाकर चोरली तर ती तुम्ही केलेल्या भाकरीपेक्षा अधिक चवदार लागते.” 18 आणि त्या मूर्ख गरीब लोकांना हे माहीत नव्हते की तिचे घर फक्त भूतांनी भरलेले आहे. तिने (मूर्खता) त्यांना मृत्युलोकातल्या अगदी खोल भागात बोलावले होते.
देवाच्या नव्या कराराचे सेवक
3 पुन्हा, आम्ही आमची प्रशंसा करायला लागलो काय? किंवा आम्हांला काही लोकांसारखी तुमच्याकडे येण्यास किंवा तुमच्याकडून येण्यास शिफारसपत्रांची आवश्यकता आहे काय? 2 तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात. आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले. 3 तुम्ही दाखवून देता की, तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आणि ते आमच्या सेवेचा परिणाम शाईने लिहिलेले पत्र नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मानवी हृदयाच्या पाट्यांवर लिहिलेले आहात.
4 देवासमोर ख्रिस्ताद्धारे अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे. 5 असे नाही की आम्ही स्वतःहून आमच्यासाठी सर्वकाही करण्यास समर्य आहोत, तर आमचे सामर्थ्य देवापासून येते. 6 त्याने आम्हांला नव्या कराराचे सेवक म्हणून समर्थ बनविले आहे- पत्राने नव्हे तर आत्म्याने, कारण पत्र मारुन टाकते, पण आत्मा जीवन देतो.
नवा करार महान गौरव आणतो
7 आता जर सेवेमुळे मरण येते, जी दगडावर अक्षरांनी कोरलेली होती आणि जर ती सेवा गौरवाने आली, यासाठी की, इस्राएल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चालले होते. 8 तर आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही काय? 9 कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते! 10 त्यात गौरव होते, पण जेव्हा त्यापेक्षा महान गौरवासमोर तुलना केली जाते, तेव्हा ते कमी होते. 11 आणि जर ते निस्तेज होत जाणारे गौरवाने आले तर जे टिकते त्याचे गौरव किती महान असेल!
12 म्हणून आम्हांला अशी आशा असल्यामुळे, आम्ही फार धीट आहोत. 13 आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे (इस्राएली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत) त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते. 14 पण त्यांची मने मंद करण्यात आली होती. कारण आजपर्यंत तोच पडदा (आवरण) राहतो, जेव्हा जुना करार वाचला जातो. तो हटवण्यात आलेला नाही. कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल. 15 तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते. 16 पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते. 17 प्रभु आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. 18 तर आपण सर्वजण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभुचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभु जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरुपात रुपांतरीत होत जातो.
2006 by World Bible Translation Center