Old/New Testament
बिल्दद ईयोबशी बोलतो:
8 नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले,
2 “तू किती वेळपर्यंत असा बोलत राहणार आहेस?
तुझे शब्द सोसाट्याच्या वाऱ्यासारखे उडत आहेत.
3 देव नेहमीच न्यायी असतो.
तो सर्वशक्तिमान देव बरोबर असलेल्या गोष्टी कधीच बदलत नाही.
4 तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले
असेल म्हणून त्यांना देवाने शिक्षा केली.
5 परंतु ईयोब, आता तू त्याच्या कडे लक्ष दे
आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
6 तू जर चांगला आणि पवित्र असलास
तर तुला मदत करण्यासाठी तो त्वरित येईल.
तुझे कुटुंब तुला परत देईल.
7 नंतर तुझ्याकडे सुरुवातीला होते
त्यापेक्षा किती तरी अधिक असेल.
8 “वृध्दांना त्यांचे पूर्वज
काय काय शिकले ते विचार.
9 आपण अगदी कालच जन्माला आलो आहोत असे आपल्याला वाटते.
सर्व जाणून घेण्याच्या दृष्टीने आपण खूप लहान आहोत.
छायेप्रमाणे आपले पृथ्वीतलावरचे दिवस खूप कमी आहेत.
10 तुला कदाचित् वृध्द् शिकवू शकतील.
ते जे शिकले तेच तुलाही शिकवतील.”
11 बिल्दद म्हणाला: “लव्हाळी वाळवटांत उंच वाढू शकतात का?
गवत (बोरु) पाण्याशिवाय उगवू शकेल का?
12 नाही, पाणी जेव्हा आटून जाते, तेव्हा तेही सुकून जातात.
आणि कापून त्यांचा उपयोग ही करुन घेता येत नाही कारण ते खूपच लहान असतात.
13 जे लोक देवाला विसरतात ते या गवतासारखे असतात.
जो देवाला विसरतो त्याला आशा नसते.
14 माथा टेकवण्यासाठी त्याच्या जवळ कुठेही जागा नसते.
त्याची सुरक्षितता कोळ्याच्या जाळ्यासारखी असते.
15 तो जर कोळ्याच्या जाळ्यावर
टेकला तर ते मोडेल.
त्याने त्याचा आधार घेतला तरी ते
त्याला आधार देऊ शकणार नाही.
16 मनुष्य खूप पाणी व सूर्यप्रकाश मिळालेल्या वनस्पतीसारखा आहे.
तिच्या फांद्या सर्व बागेत पसरतात.
17 तिची मुळे खडकांभोवती आवळली जातात
आणि खडकांवरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
18 परंतु ती वनस्पती तिच्या जागेवरुन हलवली तर मरते
आणि कुणालाही तिथे ती कधी होती हे कळत नाही.
19 परंतु ती वनस्पती आनंदी असते
कारण तिच्याच जागी दुसरी वनस्पतीवाढत असते.
20 देव निरागस लोकांना सोडून देत नाही.
तो वाईट माणसांना मदतही करत नाही.
21 देव तुझे तोंड हास्याने भरुन टाकेल
आणि तुझे ओठ आनंदी चित्कारांनी!
22 पण तुझे शत्रू मात्र लज्जेची वस्त्रे घालतील
आणि दुष्ट माणसांची घरे नष्ट होतील.”
ईयोब बिल्ददला उत्तर देतो:
9 मग ईयोब उत्तरा दाखल म्हणाला:
2 “तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे,
परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल?
3 मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही.
देव हजार प्रश्न विचारु शकतो आणि माणसाला त्याच्या एकाही प्रश्र्नाचे उत्तर देता येत नाही.
4 देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे.
देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील?
5 देव क्रोधित झाला की पर्वत हलवतो आणि लोकांना ते कळत देखील नाही.
6 पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो.
देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.
7 देव सूर्याशी बोलू शकतो आणि त्याला उगवू देत नाही.
ताऱ्यांनी चमकू नये म्हणून देव त्यांना लपवू शकतो.
8 देवाने एकट्याने आकाश निर्माण केले.
तो सागराच्या लाटांवर चालतो.
9 “देवाने सप्तर्षि, मृगशील व कृत्तिका यांना निर्माण केले.
दक्षिणेकडचे आकाश [a] ओलांडणारे ग्रहही त्यानेच निर्माण केले.
10 लोकांना न कळणाऱ्या आश्र्चर्यकारक गोष्टीही देवानेच निर्मिल्या.
देवाच्या अद्भुत कृत्यांची सीमा नाही.
11 देव जेव्हा माझ्या जवळून जातो तेव्हा मी त्याला बघू शकत नाही.
तो जातो तरी त्याची महानता माझ्या लक्षात येत नाही.
12 देवाने जरी काही घेतले तरी
त्याला कोणीही अडवू शकत नाही.
‘तू काय करीत आहेस?’
असे त्याला कुणी विचारु शकत नाही.
13 देव त्याचा क्रोध काबूत ठेवणार नाही.
राहाबाचे मदतनीससुध्दा देवाला घाबरतात.
14 म्हणून मी देवाशी वाद घालू शकत नाही.
त्याच्याशी काय बोलावे ते मला सुचणार नाही.
15 मी निष्पाप आहे, पण मी त्याला उत्तर देऊ शकणार नाही.
मी केवळ माझ्या देवाची कृपादृष्टी मिळावी म्हणून याचना करु शकतो.
16 मी हाक मारल्यानंतर त्याने ओ दिली तरी
तो माझे ऐकतो यावर मी विश्वास ठेवणार नाही.
17 देव मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील.
काहीही कारण नसताना तो मला जखमा देईल.
18 देव मला माझा श्वास परत घेऊ देणार नाही.
तो मला अधिक कष्ट देईल.
19 मी देवाचा पराभव करु शकत नाही.
तो सर्वशक्तिमान आहे.
मी त्याला न्यायालयात खेचू शकत नाही आणि त्याला माझ्या बाबतीत न्यायी बनवू शकत नाही.
देवाला न्यायालयात नेण्यासाठी बळांचा वापर कोण करेल?
20 मी निष्पाप असलो तरी, माझे बोलणेच मला अपराधी बनवते.
मी निष्पाप आहे, पण मी बोलल्यावर माझे तोंडच मला अपराधी शाबीत करते.
21 मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही.
मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
22 मी स्वतःशीच म्हणतो: ‘सगळ्याच्याच बाबतीत हे घडते.
पापी लोकांसारखेच निष्पाप लोकही मरतात.
देवच सगळ्यांचे जीवन संपवतो.’
23 काही तरी भयानक घडते आणि निष्पाप माणूस मरतो तेव्हा देव त्याला फक्त हसतो का?
24 एखादा वाईट माणूस सत्ता बळकावतो तेव्हा देव पुढाऱ्यांना जे घडते आहे ते बघण्यापासून दूर ठेवतो का?
हे जर खरे असेल तर देव म्हणजे आहे तरी कोण?
25 “माझे दिवस एखाद्या धावपटू पेक्षाही वेगाने धावतात.
माझे दिवस उडून जातात आणि त्यात सुखाचा लवलेशही नसतो.
26 भूर्जपत्रापासून बनवलेली जहाज जशी वेगात जाते तसे माझे दिवस वेगात सरतात.
गरुडाने आपल्या भक्ष्यावर झडप घालावी त्या प्रमाणे माझे दिवस अतिशय वेगात जातात.
27 “मी जरी म्हणालो, ‘की मी तक्रार करणार नाही,
माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन.’
28 तरी त्यामुळे काहीही बदल होणार नाही.
दु:खाचे मला अजूनही भय वाटते.
29 मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे.
मग प्रयत्न तरी कशाला करायचे?
मी म्हणतो, ‘विसरुन जा सारे!’
30 मी माझे अंग बर्फाने धुतले
आणि हात साबणाने स्वच्छ केले.
31 तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल.
नंतर माझे स्वतःचे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
32 देव माझ्यासारखा माणूस नाही.
म्हणूनच मी त्याला उत्तर देऊ शकत नाही.
आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
33 दोन्ही बाजू [b] ऐकून घेणारा कुणी मध्यस्थ असावा असे मला वाटते.
मध्यस्थ आम्हा दोघांना सारख्याच न्यायाने तोलणारा असावा.
34 देवाच्या शिक्षेची छडी दूर करणारा कुणी असावा असे मला वाटते.
त्यामुळे देव मला भीती घालू शकणार नाही.
35 नंतर देवाला न घाबरता मला जे काही म्हणायचे आहे ते मी म्हणू शकेन.
परंतु आता मात्र मी तसे करु शकत नाही.
10 “मी माझ्या स्वतःच्या आयुष्याचा तिरस्कार करतो म्हणून मी मुक्तपणे तक्रार करीन.
माझा आत्मा कडू जहर झालेला आहे म्हणून मी आता बोलेन.
2 मी देवाला म्हणेन, ‘मला दोष देऊ नकोस.
मी काय चूक केली आहे ते मला सांग.
माझ्याविरुध्द तुझ्या मनात काय आहे?
3 देवा, मला कष्ट देण्यात मुला सुख वाटते का?
तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस?
4 देवा, तुला मानवी डोळे आहेत का?
लोकांना दिसते ते तुला दिसते का?
5 तुझे आयुष्य आमच्या आयुष्याइतकेच लहान आहे का?
ते माणसाच्या आयुष्याइतकेच थोडे आहे का?
नाही तर मग त्या विषयी तू कसे जाणून घेतोस?
6 तू माझ्या चुका शोधत असतोस,
माझी पापं धुंडाळीत असतोस.
7 मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे.
परंतु तुझ्या हातातून मला कुणीही वाचवू शकणार नाही.
8 देवा, तुझ्या हातांनी माझी निर्मिती केली,
माझ्या शरीराला आकार दिला.
परंतु आता तेच हात माझ्याभोवती आवळले जात आहेत
आणि माझा नाश करीत आहेत.
9 देवा, जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस.
आता तूच परत माझी माती करणार आहेस का?
10 तू मला दुधासारखे ओतलेस
आता दही घुसळणाऱ्याप्रमाणे तू मला घुसळून बदलणार आहेस का?
11 हाडे आणि स्नायू यांनी तू मला एकत्र बांधलेस.
नंतर तू मला कातडीचे आणि मांसाचे कपडे चढविलेस.
12 तू माझ्यात प्राण ओतलेस आणि माझ्याशी अंत्यत दयाळू राहिलास.
तू माझी काळजी वाहिलीस आणि माझ्या जीवाचे रक्षण केलेस.
13 परंतु तू हे तुझ्या हृदयात लपवून ठेवलेस तू तुझ्या हृदयात याची गुप्तपणे आखणी केलीस हे मला माहित आहे.
तुझ्या मनात हेच होते याची जाणीव मला आहे.
14 मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस
कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
15 पाप केल्यावर मी अपराधी असेन
आणि माझ्या दृष्टीने ते फारच वाईट असेल.
परंतु मी निष्पाप असूनही माथा उंच करु शकत नाही.
मला खूप लाज वाटते आणि मी गोंधळून जातो.
16 मी जेव्हा यशस्वी होतो आणि मला गर्व चढू लागतो
तेव्हा शिकाऱ्याने सिंहाची शिकार करावी तशी तू माझी शिकार करतोस.
तू तुझे सामर्थ्य पुन्हा माझ्याविरुध्द दाखवितोस.
17 माझी चूक सिध्द करण्यासाठी तुझ्याकडे नेहमीच कुणीतरी असते.
माझ्यावरचा तुझा राग अधिकच भडकेल.
तू माझ्याविरुध्द सैन्याची आणखी
कुमक पुनः पुन्हा आणशील.
18 म्हणून देवा, तू मला जन्माला तरी का घातलेस?
मी कुणाच्या दृष्टीस पडण्याआधीच मेलो असतो तर बरे झाले असते.
19 मी जगलोच नसतो तर बरे झाले असते.
माझ्या मातेच्या उदरातून मला सरळ थडग्यातच नेले असते तर किती चांगले झाले असते.
20 माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे,
म्हणून तू मला एकटे सोड.
21 जिथून कुणीही परत येत नाही तिथे म्हणजे अंधार
आणि मृत्यूच्या जागी जाण्यापूर्वी जो काही थोडा वेळ माझ्यासाठी उरला आहे
त्याचा मला उपभोग घेऊ दे.
22 काळोखाच्या गर्भात, मृत्यूलोकात जाण्यासाठी जो थोडा वेळ अजून आहे तो मला सुखाने घालवू दे, जिथून कुणीही परत येत नाही अशा काळोखाने दाट छायेने
आणि गोंधळाने भरलेल्या, ज्या जागी प्रकाशसुध्दा अंधकारमय आहे अशा जागी जाण्यापूर्वी मला सुखाने जगू दे.’”
इथिओपियाच्या मनुष्याला फिलिप्पा शिक्षण देतो
26 देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा-तो रस्ता वाळवंटातून जातो.”
27 मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. 28 आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टयाचे पुस्तक वाचत होता.
29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!” 30 मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ तुम्हांला कळतो का?”
31 तो अधिकारी म्हणाला, “मला हे कसे समजेल? कोणीतरी याचा उलगडा करुन मला सांगायला हवे.” आणि त्याने फिलिप्पाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. 32 पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होता:
“वधायला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता.
लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत राहिला.
त्याने आपले तोंड उघडले नाही.
33 त्याला लज्जित केले गेले, त्याचे हक्क काढून घेतले गेले.
त्याच्या पिढीविषयी कोणतीही गोष्ट पुढे वर्णीली जाणार नाही.
कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.” (A)
34 तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “क्रुपा करुन मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसन्या कोणाविषयी बोलत आहे?” 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करुन येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.
36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ) आले. अधिकारी म्हणाला, “पहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” 37 [a] 38 आणि षंढाने रथ थांबविण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप्प व षंढ हे दोघे उतरुन पाण्यात गेले आणि फिलिप्पाने त्याचा बाप्तिस्मा केला. 39 जेव्हा ते पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. 40 आपण अजोत नगरात आहोत असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरीयाला गेला.
2006 by World Bible Translation Center