Old/New Testament
यहूदाचा राजा आहाज
28 आहाज राजा झाला तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दावीद वागला तसे आहाजचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वराला मान्य होणारे नव्हते. 2 इस्राएलच्या राजांच्या दुर्वर्तनाचा त्याने कित्ता गिरवला. त्याने बआल देवतेच्या ओतीव मूर्ती पूजेसाठी केल्या. 3 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या मुलांना त्याने अग्नीमध्ये आहूती करुन बळी दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना तिथून घालवले होते. 4 आहाजने उंच स्थानी, डोंगरावर तसेच प्रत्येक हिरव्यागार वृक्षाखाली यज्ञ केले आणि धूप जाळला.
5-6 आहाजच्या या पापांमुळे परमेश्वर देवाने अरामच्या राजाच्या हातून आहाजचा पराभव करविला. अरामच्या राजाने व त्याच्या सैन्याने आहाजचा पाडाव करुन यहूदाच्या लोकांना कैद केले व दिमिष्काला नेले. इस्राएलचा राजा पेकह याच्याकडूनही परमेश्वराने आहाजचा पराभव करवला. पेकहच्या वडलांचे नाव रमाल्या. पेकहच्या सैन्याने एका दिवसात यहूदाचे 1,20,000 शूर सैनिक ठार केले. आपले पूर्वज ज्या परमेश्वर देवाला शरण गेले त्या परमेश्वराची साथ सोडल्यामुळे यहूदी लोकांचा असा पराभव झाला. 7 जिख्री हा एफ्राइममधला एक शूर योध्दा. त्याने राजा आहाजचा मुलगा मासेया, राजमहालाचा प्रमुख कारभारी अज्रीकाम आणि राजाच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी एलकाना यांना ठार मारले.
8 इस्राएलच्या सैन्याने यहूदात राहणाऱ्या 2,00,000 जणांना पकडून नेले. हे सर्व त्यांचे नातलगच होते. या कैद्यांमध्ये बायका मुलेही होती. तसेच यहूदातील किंमती वस्तूही लुटून नेल्या. ही लूट आणि बंदिवान यांना ताब्यात घेऊन ते शोमरोन या नगरात आले. 9 तिथे ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा होता. शोमरोनला आलेल्या इस्राएली सैन्याला तो भेटला. ओदेद त्यांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्यामुळे तुम्ही यहूदी लोकांचा पराभव करु शकलात कारण परमेश्वराचा यहूद्यांवर कोप झाला होता. पण तुम्ही अतिशय नीच पध्दतीने यहूद्यांना मारलेत, त्यांना शासन केलेत. त्यामुळे आता परमेश्वराच्या क्रोधाचा रोख तुमच्यावर आहे. 10 यहूदाच्या व यरुशलेमच्या लोकांना गुलाम करण्याचा तुमचा मानस आहे. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे पाप केले आहे. 11 आता माझे ऐका. पकडून आणलेल्या या आपल्या भावाबहिणींना परत पाठवून द्या. परमेश्वराला तुमचा अनावर संताप आला आहे.”
12 एफ्राइमच्या काही प्रमुख मंडळींनी इस्राएलच्या सैनिकांना लढाईवरुन परतताना पाहिले. तेव्हा या प्रमुखांनी सैनिकांना भेटून चांगली समज दिली. योहानानचा मुलगा अजऱ्या, मशिल्लेमोथचा मुलगा बरेख्या, शल्लूमचा मुलगा यहिज्कीया, आणि हदलाईचा मुलगा अमासा ही ती नेते मंडळी होत. 13 ती इस्राएली सैन्याला म्हणाली, “यहूदाच्या कैद्यांना इकडे आणू नका. तसे केलेत तर तो परमेश्वराचा आपण केलेला मोठा अपराध ठरेल. आपल्या पापांमध्ये त्यामुळे आणखी भर पडेल. इस्राएलवर परमेश्वराचा कोप होईल.”
14 तेव्हा त्या सैनिकांनी कैदी आणि लुटलेली चीजवस्तू हे इस्राएल लोकांच्या आणि त्या प्रमुखांच्या हवाली केले. 15 तेव्हा अजऱ्या, बरेख्या, यहिज्कीया आणि अमासा यांनी पुढे होऊन कैद्यांना जवळ केले. त्यांतील उघड्या नागड्या लोकांना त्यांनी लुटीतले कपडेलत्ते दिले. जे अनवाणी होते त्यांना पादत्राणे दिली. त्या सर्वांना त्यांनी खाऊ पिऊ घातले. मर्दनासाठी तेल दिले. एवढे झाल्यावर या प्रमुखांनी चालायचे त्राण नसलेल्या कैद्यांना गाढवावर बसवले आणि या सर्वांना त्यांनी यरीहो या त्यांच्या गावी घरी नेऊन सोडले. यरीहोला खजुरीच्या झाडांचे नगर असेही म्हणतात. मग ही चार वडिलधारी मंडळी शोमरोनला परतली.
16-17 याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करुन त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांना कैद करुन नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली. 18 पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली. 19 परमेश्वराने यहूदाला संकटांनी जेरीला आणले कारण यहूदाचा राजा आहाज याने यहूद्यांना दुर्वर्तनाला प्रवृत्त केले होते. आहाजने परमेश्वराचे उल्लंघन केले होते. 20 तिल्गथ-पिल्नेसर हा अश्शूरचा राजा. यानेही आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला. 21 आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.
22 या संकटकाळात आहाजच्या दुर्वर्तनात आणखी भरच पडली. तो परमेश्वरापासून दुरावला. 23 दिमिष्काच्या लोकांच्या दैवतांसाठी त्याने यज्ञ केले. या दिमिष्कांनी त्याला हरवले होते. तेव्हा त्याने विचार केला, “अरामचे लोक ज्या देवाची पूजा करतात ते देव त्यांना साहाय्य करतात. तेव्हा मी ही त्यांच्यासाठी यज्ञ केले तर ते मला सोडवतील.” म्हणून आहाज त्या दैवतांना शरण गेला. त्याच्या या कृत्यांमुळेच त्याचा आणि इस्राएल लोकांचा नाश होत गेला.
24 आहाजने देवाच्या मंदिरातली सगळी उपकरणी गोळा करुन त्यांची मोडतोड करुन विल्हेवाट लावली. परमेश्वराच्या मंदिराची दारे त्याने बंद करुन घेतली. वेद्या केल्या आणि त्या यरुशलेममध्ये चौका चौकात बसवल्या. 25 यहूदातील सर्व गावांमध्ये इतर देवतांच्या पूजेला धूप जाळण्यासाठी म्हणून उंच स्थाने केली. अशाप्रकारे वागून आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाचा त्याने क्रोध ओढवून घेतला.
26 आहाजच्या बाकीच्या गोष्टी आणि त्याचे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे आचरण यहूदा व इस्राएल राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहे. 27 आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरुशलेम नगरात लोकांनी त्याला पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजचा मुलगा हिज्कीया हा पुढे राजा झाला.
यहूदाचा राजा हिज्कीया
29 हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची मुलगी. 2 हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.
3 हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करुन ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले. 4-5 सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी शुचिर्भूत व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांनी मानलेला देव आहे. ज्या वस्तूं इथल्या नाहीत त्या इथून काढून टाका. त्या वस्तू म्हणजे घाण असून त्या हे पवित्र मंदिर भ्रष्ट करतात. 6 आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली. 7 त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले. 8 म्हणून यहूदा यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांना शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हांला माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात. 9 म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपली बायका पोरे कैदी झाली. 10 म्हणून मी, हा हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही. 11 तेव्हा मुलांनो, आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हाला त्याने निवडले आहे.”
12-14 तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे:
कहाथ घराण्यातले अमासयचा मुलगा महथ आणि अजऱ्याचा मुलगा योएल.
मरारी कुळातला अब्दीचा मुलगा कीश आणि यहल्लेलेलाचा मुलगा अजऱ्या.
गर्षोनी कुळातला जिम्माचा मुलगा यवाह आणि यवाहचा मुलगा एदेन,
अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल
आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या.
हेमानच्या कुळातील यहीएल आणि शिमी,
येदुथूनच्या कुळातील शमया आणि उज्जियेल.
15 मग या लेवींनी आपल्या भाऊबंदांसह एकत्र येऊन मंदिराच्या शुध्दतेसाठी सर्व तयारी केली. परमेश्वराने राजामार्फत केलेली आज्ञा त्यांनी पाळली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ते आत शिरले. 16 परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुध्द आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करुन त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तिथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या. 17 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुध्दता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले.
18 त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि ती वरील सर्व भांडी आम्ही शुध्द केल्या आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुध्द केली आहेत. 19 राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुध्दी करुन आम्ही ती मांडली आहेत. ती आता देवाच्या वेदीसमोरच आहेत.”
20 दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला. 21 त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्र स्थान आणि यहूदीलोक यांच्या शुध्दीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली. 22 त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. 23-24 यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले. बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याजकांनी पापार्पण केले. परमेश्वराने इस्राएल लोकांना क्षमा करावी म्हणून हे विधी याजकांनी केले. समस्त इस्राएल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती.
25 दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेबरहुकूम राजा हिज्कीयाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवींची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्ट्यांमार्फत तशी आज्ञा केली होती. 26 त्या प्रमाणे दावीदाची वाद्ये घेऊन लेवी आणि कर्णे घेऊन याजक उभे राहिले 27 मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञाकेली. त्याला सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरु झाले. कर्णे आणि इस्राएलचा राजा दावीद याची वाद्ये यांचा गजर सुरु झाला. 28 होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते.
29 होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासकट सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली. 30 हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यानी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदित झाले. सर्वांनी लवून नमस्कार करुन देवाची आराधना केली. 31 हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वतःला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी होमार्पणेही आणली. 32 मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढीलप्रमाणे: सत्तर बैल, शंभर मेंढे, दोनशे कोकरे. त्यांचे परमेश्वराला होमार्पण करण्यात आले. 33 सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वराला वाहिलेले पशू. 34 होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. या पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते. 35 होमबली पुष्कळ होते. शांतिअर्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणेही विपुल होती. 36 परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदित झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला.
येशू त्याच्या अनुयायांसाठी प्रार्थना करतो
17 येशूने हे बोलणे संपविल्यावर आपले डोळे आकाशाकडे लावले आणि प्रार्थना केली: “पित्या, वेळ आली आहे, पुत्राचे गौरव कर, यासाठी की, पुत्र तुझे गौरव करील. 2 तू त्याला जे दिले आहे त्या सर्वांना त्याने अनंतकालचे जीवन द्यावे यासाठी सर्व मनुष्यांवर तू त्याला अधिकार दिलास त्याप्रमाणे त्याने तुझे गौरव करावे. 3 आणि अनंतकाळचे जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. 4 तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले. 5 तर आता हे पित्या, जग होण्यापूर्वी तुझ्याबरोबर जे गौरव मला होते त्याद्वारे तू स्वतःबरोबर माझे गौरव कर.
6 “ज्यांना तू मला या जगातून दिलेस, त्यांना मी तुला प्रगट केले. ते तुझे होते, व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस. आणि त्यांनी तुझे वचन पाळले, 7 आता त्यांना माहीत आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते. 8 कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली. आणि त्यांनी ती स्वीकारली, त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की, मी तुझ्यापासून आलो आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस. 9 मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करीत नाही. तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस, त्यांच्यासाठीच कारण ते तुझे आहेत. 10 माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे. आणि त्यांच्याद्वारे गौरव माझ्याकडे आले आहे.
11 “आणि यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत, आणि मी तुझ्याकडे येत आहे, हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस, त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. 12 मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्थंत जे नाव तू मला दिलेस त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. आणि मी त्यांना संभाळले आणि ज्याने नाशाचा मार्ग निवडला होता त्याच्याशिवाय त्यांच्यातील कोणी नाश पावला नाही, हे यासाठी झाले की शास्त्रलेख पूर्ण व्हावा.
13 “पण आता मी तुझ्याकडे येत आहे. आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो.” 14 “मी त्यांना तुझे शब्द दिले आहेत आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.
15 “या जगातून तू त्यांना काढून घ्यावेस अशी माझी प्रार्थना नाही, पण दुष्टांपासून तू त्यांचे रक्षण करावेस. 16 जसा मी या जगाचा नाही, तसे तेसुद्धा या जगाचे नाहीत. 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे. 18 जसे तू मला या जगात पाठविले तसे मी त्यांना या जगात पाठवितो. 19 त्यांच्यासाठी मी स्वतःला पवित्र करतो यासाठी की तेसुद्वा खऱ्या अर्थाने पवित्र व्हावेत.
20 “आणि मी फक्त त्यांच्यासाठीच विनंति करतो असे नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंति करतो. 21 यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे, पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसेच त्यांनी आम्हांमध्ये असावे. यासाठी की, तू मला पाठविले असा जगाने विश्वास धरावा. 22 आणि तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनीही एक व्हावे. 23 मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. ते पूर्णपणे ऐक्यात आणले जावेत यासाठी की, हे जगाला माहीत व्हावे की तू मला पाठविलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीति केलीस तशी मीही त्यांच्यावर केली.
24 “हे पित्या, जे लोक तू मला दिलेस, त्यांनी मी जेथे आहे तेथे माझ्याबरोबर असावे असे मला वाटते. आणि त्यांनी माझे गौरव करावे, जगाच्या निर्मितीपूर्वी तू माझ्यावर प्रीति केली, म्हणून जे गौरव तू मला दिलेस, तेच हे गौरव आहे. 25 नीतिमान पित्या, जरी जग तुला ओळखत नाही, तरी मी तुला ओळखतो, आणि त्यांना माहीत आहे की, तू मला पाठविलेले आहेस. 26 मी त्यांना तुझा परिचय करून दिला आहे, व तुझी ओळख करून देतच राहीन, यासाठी की जे प्रेम तू माझ्यावर करतोस ते त्यांच्यावरही करावेस आणि मी स्वतः त्यांच्यामध्ये असावे.”
2006 by World Bible Translation Center