Old/New Testament
21 पुढे यहोशाफाट वारला. त्याचे त्याच्या पूर्वजांजवळ दफन केले. दावीद नगरात त्याला पुरले. यहोशाफाटच्या जागी त्याचा मुलगा यहोराम गादीवर बसला. 2 अजऱ्या, यहीएल, अजऱ्या, मीखाएल व शफट्या हे यहोरामचे भाऊ, व यहोशाफाटचे मुलगे. यहोशाफाट हा यहूदाचा राजा होता. 3 यहोशाफाटने आपल्या मुलांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्या-रुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याला त्याने राज्य दिले.
यहूदाचा राजा यहोराम
4 यहोराम आपल्या वडिलांच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला. 5 वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. 6 अहाबच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या राहणीला अनुसरुनच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या मुलीशी यहोरामने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या. 7 पण परमेश्वराने दावीदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दावीदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दावीदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दावीदाशी करार केला होता.
8 यहोरामच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वतः आपला राजा निवडला. 9 तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करुन गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. 10 तेव्हा पासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू राहिली आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामची सत्ता झुगारली. यहोरामने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले. 11 यहोरामने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली. असे करण्याने, परमेश्वराला लोकांनी जसे वागावे असे वाटत होते त्यात खंड पडला. यहोरामने यहूदा लोकांना परमेश्वरापासून दूर नेले.
12 एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामला असा संदेश आला:
“परमेश्वरा देवाने असे सांगितले आहे. तुझे पूर्वज दावीद यांचा हा परमेश्वर आहे, परमेश्वर म्हणतो, ‘यहोराम, तुझे आचरण आपले वडील यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही. 13 उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरुशलेममधील लोकांना तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वतःच्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते. 14 तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांना जबर शासन करणार आहे.तुझी मुले,बायका,मालमत्ता? यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे. 15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसे दिवस बळावेल. त्यात तुझी आतडी बाहेर पडतील.’”
16 कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामविरुध्द भडकावले. 17 या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी धनदौलत लुटून नेली. यहोरामच्या बायकामुलांनाही त्यांनी पळवले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा मुलगा तेवढा बचावला.
18 या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले. 19 त्या आजारात दोन वर्षांनी त्याची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडिलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामच्या सन्मानार्थ पेटवला नाही. 20 यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीदनगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरीत नव्हे.
यहूदाचा राजा अहज्या
22 यहोरामच्या जागी यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा सर्वांत धाकटा मुलगा अहज्या याला राजा केले. यहोरामच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामच्या इतर सर्व थोरल्या मुलांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला. 2 त्यावेळी तो बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. तिच्या वडिलांचे नाव अम्री. 3 अहज्याची वागणूकही अहाबच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्याला दुराचरण करण्यास प्रवृत्त केले. 4 अहाबच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वराला मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अहाबच्या घराण्याने त्याला सल्ला द्यायला सुरुवात केली. त्यांचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. बदसल्ल्यामुळेच त्याचा मृत्यू ओढवला. 5 अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामच्या बरोबर अरामचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा. योराम या लढाईत अराम्यांकडून जायबंदी झाला. 6 तेव्हा तो दुखण्याला उतार पडावा यासाठी इज्रेल येथे परतला. रामोथ येथे अरामचा राजा हजाएल याच्याशी लढताना तो घायाळ झाला होता. योरामला भेटायला म्हणून अहज्या इज्रेल येथे गेला. यहूदाचा राजा यहोराम याचा अहज्या हा मुलगा. योरामच्या वडिलांचे नाव अहाब. दुखापतीमुळे तो इज्रेला आला होता.
7 अहज्या (किंवा यहोआहाज) योरामला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी धाडले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामबरोबर निमशीचा मुलगा येहू याला भेटायला गेला. अहाबच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती. 8 अहाबच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले. 9 यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या माणसांनी त्याला तो शोमरोनमध्ये लपण्याच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्याला ठार केले आणि त्यांनी त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वराला शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.
राणी अथल्या
10 अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला मुलगा मरण पावला आहे हे पाहिल्यावर यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला. 11 पण यहोशबाथ हिने अहज्याचा मुलगा योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामची मुलगी आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथने योवाशला लपवल्यामुळे अथल्या त्याला मारु शकली नाही. 12 परमेश्वराच्या मंदिरात त्याला याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने राणी म्हणून अंमल चालवला.
येशू शिष्यांचे समाधान करतो
14 “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. 2 माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. 3 मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. 4 आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”
5 थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”
6 येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. 7 जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”
8 फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.”
9 येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस? 10 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. 11 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.
12 “मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो. 13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14 जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.
पवित्र आत्म्याचे अभिवचन
15 “जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल. 16 आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हांला दुसरा साहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्वकाळ राहावे. 17 साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील.
18 “मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. 19 आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. 20 त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे. 21 ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन.”
22 मग यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वतःला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?”
23 येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू. 24 जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”
25 “मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत. 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.
27 “शांति मी तुमच्याजवळ ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका. 28 ‘मी जातो आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे. 29 मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.
30 “मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही. 31 परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो.
“चला आता, आपण निघू या.”
2006 by World Bible Translation Center