Old/New Testament
यहूदाचा राजा अबीया
13 इस्राएलचा राजा यराबामच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला. 2 त्याने यरुशलेममध्ये तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई. गिबा नगरातील उरीएलची ती मुलगी. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई जुंपली. 3 अबीयाच्या सैन्यात 400,000 शूर योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामकडे 800,000 सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.
4 एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका, 5 दावीद आणि त्याची मुले यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलच्या परमेश्वर देवानेच त्यांना अधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या. देवाने दावीदाशी तसा मिठाचा करारच केला आहे. [a] 6 पण यराबामने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याकडे पाठ फिरवली. यराबाम नबाटाचा मुलगा. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक. शलमोन दावीदाचा मुलगा. 7 मग कुचकामी आणि वाईट माणसांशी यराबामशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा मुलगा रहबाम याच्या विरुद्ध होती. रहबाम तरुण आणि अनुभवी होता. त्याला यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.
8 “आता तुम्ही लोकांना परमेश्वराचे राज्य म्हणजे दावीदाच्या मुलांची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुम्ही संख्येने वरचढ आहात आणि यराबामने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत. 9 परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले आहे. हे याजक अहरोनचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले आहेत. अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वतःवर संस्कार केला की तो जे खरे परमेश्वरच नव्हेत त्यांचा याजक बनतो.
10 “पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनचे वंशज आहेत. लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात. 11 परमेश्वराला ते होमार्पणे वाहतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील मुद्दाम करवून घेतलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात. रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वराला सोडले आहे. 12 खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देंवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यात तुम्हाला यश येणार नाही.”
13 पण यराबामने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला. 14 यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले. 15 मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी आरोळ्या ठोकल्या. त्याबरोबर देवाने यराबामच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला. 16 इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला. देवाने यहूदांच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला. 17 अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे 5,00,000 योध्दे मारले गेले. 18 अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहुदा सैन्याने विजय मिळवला.
19 अबीयाच्या सैन्याने यराबामच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामकडून अबीयाच्या सैन्याने बळकावला.
20 अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामवर प्रहार केला आणि तो मेला. 21 अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा बायका केल्या. त्याला बावीस मुलगे आणि सोळा मुली झाल्या. 22 इद्दो या भविष्यवाद्याच्या नोंदवह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.
14 अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दावीदनगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा मुलगा आसा हा त्याच्यानंतर राज्य करु लागला. आसाच्या कारकिर्दीत लोकांना दहा वर्षे शांतता लाभली.
यहूदाचा राजा आसा
2 आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने न्याय्य आणि उचित असा कारभार केला. 3 त्याने मूर्तिपूजेसाठी वापरात येणाऱ्या चमत्कारिक वेद्या काढून टाकल्या. उच्च स्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले. 4 त्याने यहूदी लोकांना परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजाचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले. 5 यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्च स्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती. 6 या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.
7 आसा यहूदातील लोकांना म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहात आहोत, तेव्हाच हे करु. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.
8 आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील 3,00,000 जण आणि बन्यामिन वंशातील 2,80,000 लोक होते. यहूदी लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्य-बाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.
9 पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता. त्याच्या कडे 10,00,000 सैनिक आणि 300 रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन थेट मारेशा नगरापर्यंत आला. 10 आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्याने आपले सैन्य उभे केले.
11 आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवंसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी विजय मिळवू नये.”
12 मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला. 13 आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यात कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूशींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या. 14 गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले. 15 मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरुशलेमला परतले.
येशू आपल्या मित्रांबरोबर बेथानी येथे(A)
12 मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. 2 म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता. 3 तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले.
4 पण त्याच्या शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला, 5 “हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या तीनशे रुपयाच्या किमतीचे होते.” 6 गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत, ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला.
7 “तिला एकटे सोडा,” येशूने उत्तर दिले, “मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले. 8 तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.”
लाजराविरुद्ध कट
9 मग तो तेथे आहे हे यहूदीयांतील बऱ्याच जणांना कळले. तेव्हा फक्त येशूसाठीच नव्हे तर ज्याला त्याने मेलेल्यातून उठविले होते त्या लाजराला पाहावे म्हणून ते आले. 10 तेव्हा मुख्य याजकांनी लाजराला मारण्याचा कट केला. 11 कारण त्याच्यामुळे पुष्कळ लोक येशूकडे जात होते व त्याच्यावर विश्वास ठेवीत होते.
येशू यरुशलेमात प्रवेश करतो(B)
12 दुसऱ्या दिवशी सणासाठी आलेल्या मोठ्या जमावाने ऐकले की येशू यरुशलेमकडे येत आहे. 13 त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास गेले. ते ओरडून जयघोष करीत होते.
“‘होसान्ना!’
‘प्रभूच्या नावाने येणारा धन्यावदित असो!’ (C)
इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”
14 येशूला एक शिंगरु दिसले त्यावर तो बसला. आणि संदेष्ट्यांनी लिहिल्याप्रमाणे हे झाले. ते असे:
15 “सीयोनेच्या कन्ये, भिऊ नको;
पहा, तुझा राजा येत आहे;
गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.” (D)
16 सुरवातीला शिष्यांना या गोष्टी समजल्या नाहीत पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना जाणीव झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यांनी या गोष्टी त्याच्यासाठी केल्या.
17 मग जो जमाव त्याने लाजरला कबरेतून आणलेले व मरणातून उठविलेले पाहत होता तो जमाव सातत्याने त्याच्याविषयी सांगत होता. 18 पुष्कळ लोक त्याला जाऊन भेटले कारण त्याने तो चमत्कार केला होते हे त्यांनी ऐकले होते. 19 म्हणून परुशी एकमेकांस म्हणाले, “पहा, याच्यापुढे आपले काही चालत नाही. सगळे जग त्याच्यामागे चालले आहे!”
येशू जीवन आणि मरण याविषयी बोलतो
20 आता सणाच्या वेळी उपासनेसाठी जे लोक वर गेले होते त्यांच्यात काही ग्रीक होते. 21 ते फिलिप्पाकडे आले, जो गालीलातील बेथसैदा येथील होता, त्यांनी विनंति केली, “महाराज, येशूला पाहावे अशी आमची इच्छा आहे.” 22 फिलिप्प अंद्रियाकडे हे सांगण्यास गेला; नंतर अंद्रिया व फिलिप्प यांनी येशूला सांगितले.
23 येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे. 24 मी तुम्हांला खरे सांगतो, गव्हाचा दाणा भूमीत पडून मेला नाही, तर एकटाच राहतो, पण तो मेला तर पुष्कळ फळ देतो. 25 जो आपल्या जिवावर प्रीति करतो तो त्याला गमावेल पण जो या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याला अनंतकाळाच्या जीवनासाठी राखील. 26 जो कोणी माझी सेवा करतो त्याने मला अनुसरले पाहिजे. जेथे मी असेन तेथे माझे सेवकही असतील. जो माझी सेवा करतो त्याचा सन्मान माझा पिता करील.”
2006 by World Bible Translation Center