Old/New Testament
मंदिरातील बांधकाम आणि सामान
4 शलमोनाने वेदी पितळेची केली. ती 30 फूटलांब, 30 फूट रुंद आणि 18 फूट उंच होती. 2 त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास 10 हात होता. त्याची उंची 5 हात आणि त्याचा कडेचा परीघ 30 हात होता. 3 या गंगाळाच्या खालच्या बाजूस सभोवार कडेला बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. त्यांची लांबी 10 हात होती. गंगाळ बनवतानाच या बैलांच्या दोन रांगा ओतल्या होता. 4 बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन बैल पूर्वाभिमुख, तीन पश्चिमाभिमुख, तीन उत्तराभिमुख तर तीन दक्षिणाभिमुख होते. आणि गंगाळ त्यांच्यावर होते. सर्व बैलांचा मागील भाग एकमेकांकडे आणि मध्यभागी आलेला होता. 5 या पितळी गंगाळाची जाडी 3 इंच होती. त्याची कड उमललेल्या कमलपुष्पासारखी होती. त्यात 17,500 गॅलन पाणी मावू शकत असे.
6 याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात वाहायच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होमार्पणाच्या वस्तू वाहण्यापूर्वी धुण्यासाठी होते.
7 शलमोनाने सोन्याचे दहा दीपवृक्षही केले. हे त्याने त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात ठेवले. डावीकडे पाच आणि उजवीकडे पाच असे ते ठेवले. 8 दहा मेजेही शलमोनाने मंदिरात ठेवली. ती ही पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशी ठेवली. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे केले. 9 याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक आवार केले, एक प्रशस्त आवार आणि त्यांना दरवाजे केले. आवारांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले. 10 एवढे झाल्यावर आग्नेयला मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
11 हिराम या कारागिराने हंडे, फावडी व वाडगे बनवले. शलमोनासाठी जे देवाच्या मंदिराचे काम त्याला करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
12 दोन स्तंभ,
स्तंभावरचे कळस,
त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
13 त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या. स्तंभांवरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
14 तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
15 मोठे पितळी गंगाळ आणि त्याला आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
16 शलमोनासाठी त्याने हंडे, फावडी, काटे इत्यादी मंदिरातली उपकरणे केली.
त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते. 17 या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे नमुने बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली. 18 शलमोनाने इतक्या अगणित गोष्टी करवून घेतल्या की त्यांना पितळ किती लागले याची मोजदाद कोणी केली नाही.
19 याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, समर्पित भाकर ठेवण्याची मेजे केली. 20 सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते. 21 याशिवाय फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुध्द सोन्याचे होते. 22 कातऱ्या, वाडगे, कटोरे, अग्निपात्रे, या गोष्टीही शलमोनाने सोन्यात घडवल्या. मंदिराची दारे, अत्यंत पवित्र गाभाऱ्यातली दारे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.
5 मग शलमोनाने काढलेले परमेश्वराच्या मंदिराचे सर्व काम समाप्त झाले. आपले वडील दावीद यांनी मंदिरासाठी दिलेल्या सर्व वस्तू त्याने मग आत आणल्या. सोन्या-रुप्याच्या सर्व वस्तू आणि इतर सामानसुमान त्याने आणले. मंदिराच्या कोषागारात त्याने या सर्व वस्तू ठेवल्या.
पवित्र करारकोश मंदिरात आणण्यात येतो
2 पुढे शलमोनाने परमेश्वराचा करारकोश दावीदनगराहून म्हणजेच सीयोनमधून आणण्यासाठी इस्राएल मधील सर्व वडीलधारी मंडळी, आपापल्या घराण्यांचे प्रमुख, यांना यरुशलेम येथे बोलावून घेतले. 3 सातव्या महिन्यातील मंडपाच्या सणाच्या दिवशी सर्व इस्राएल लोक शलमोनाकडे आले.
4 सर्व इस्राएलाचे वडीलधारे जमल्यावर लेवींनी करारकोश उचलून घेतला. 5 याजक आणि लेवी यांनी मिळून तो यरुशलेमला आणला. दर्शन मंडप आणि तेथे असलेली सर्व पवित्र उपकरणेही त्यांनी बरोबर आणली. 6 राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक करारकोशाला सामोरे गेले. कोशासमोर त्यांनी मेंढरांचे आणि गुराढोरांचे बळी अर्पण केले. मोजदाद करता येऊ नये इतके प्राणी त्यांनी बळी दिले. 7 एवढे झाल्यावर, मंदिराच्या आतल्या मुद्दाम तयार करवून घेतलेल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्यात याजकांनी तो परमेश्वराचा करारकोश आणला. करुबांच्या पखांच्या बरोबर खाली तो त्यांनी ठेवला. 8 कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि त्याचे दांडे त्यांनी झाकले. 9 हे दांडे सर्वांत पवित्र गाभाऱ्यासमोरुन दिसतील इतके लांब होते. पण मंदिराच्या बाहेरुन ते दिसत नसत. आजपर्यंत ते तेथे आहेत. 10 दोन दगडी पाट्यांखेरीज या करार कोशात काहीही नव्हते. होरेब पर्वतावर मोशेने त्या दोन पाट्या या करार कोशात ठेवल्या होत्या. इस्राएल लोक मिसरमधून बाहेर पडल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी जो करार केला तो या होरेब पर्वतावरच.
11 एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. ते सर्व शुचिर्भूत झाले होते. ते सर्व नेमके कोणकोणत्या गटातले होते हे यावेळी महत्वाचे नव्हते. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले. 12 मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले. आसाफ, हेमान आणि यदुथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांची मुले आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती. झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये त्यांनी हातात घेतली होती. या लेवी गायकांबरोबर 120 याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते. 13 गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्याला धन्यवाद दिले. कर्णे, झांजा इत्यादी वाद्यांचा एक जल्लोष उडाला. त्यांच्या गाण्याचा आशय असा होता:
“परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे.
त्याची खरी प्रीति सर्वकाळ राहाते.”
तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले. 14 त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, इतके परमेश्वराच्या तेजाने देवाचे मंदिर भरुन गेले होते.
6 मग शलमोन म्हणाला, “मी मेघासारख्या अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे. 2 परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे घर बांधले आहे. तू येथे चिरकाल राहावेस म्हणून हे उच्च कोटीचे घर आहे.”
शलमोनाचे भाषण
3 मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहिले. 4 रशलमोन पुढे म्हणाला,
“इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे वडील दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करुन दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते, 5 ‘माझ्या लोकांना मी मिसरमधून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही. 6 पण आता यरुशलेम हे स्थान मी माझ्यासाठी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे.’
7 “इस्राएलचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे वडील दावीद यांना मंदिर बांधायचे होते. 8 पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद, माझ्या नावाने मंदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले. 9 पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा मुलगा हे काम करील.’ 10 आता परमेश्वराने कबूल केले तसे झाले आहे. माझे वडील दावीद यांच्या जागी मी नवीन राजा झालो आहे. मी इस्राएलचा राजा आहे. असे होईल हे वचन परमेश्वराने दिले होते. आणि मी इस्राएलचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे 11 मी करारकेश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशांत आहे.”
शलमोनाची प्रार्थना
12 शलमोन परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. 13 बाहेरच्या आवारात प्रत्येकी 7 1/2 फूट लांबी, रुंदी आणि उंची असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने बसवला होता. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले 14 शलमोन म्हणाला,
“हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस. 15 तुझा सेवक दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे वडील होते. तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस. 16 तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: ‘माझ्यासमक्ष इस्राएलच्या गादीवर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे.’ 17 तेव्हा आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, हे ही शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.
18 “परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हाला माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो 19 पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिच्याकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी आर्त हाक ऐक. मी तुझा एक दास आहे. 20 या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास. मी या मंदिराकडे तोंड करुन प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक. 21 तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करुन आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन तुझे इथे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हाला क्षमा कर.
22 “एखाद्याने दुसऱ्याची काही आगळीक केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असताना, 23 तू स्वर्गातून ऐक. तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर. ज्याच्या हातून आगळीक घडली असेल त्याला शासन कर. त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे. ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर.
24 “इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने क्षमायाचना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लगले तर 25 तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांना क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.
26 “इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही आणि त्यावेळी पश्चात्तापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहात क्षमायाचना केली, तू केलेल्या शिक्षेमुळे पापाचरण थांबवले, 27 तर स्वर्गातून त्यांचे ऐकून घे. त्याचे ऐक आणि त्यांना माफ कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. ती तूच तुझ्या लोकांना दिलेली जमीन आहे.
28 “कदाचित् एखादेवेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूचा हल्ला झाला, असे काही झाल्यास 29 तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो तो आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल. 30 तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. तू स्वर्गात राहातोस. तू त्यांची प्रार्थना ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येकाचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्याला ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस. 31 असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वसती असेपर्यंत लोक तुझा धाक बाळगतील आणि तुझे ऐकतील.
32 “तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे समर्थ बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहात प्रार्थना केली तर 33 तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांनाही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. हे मी बांधलेले मंदिर तुझ्या नावाचे आहे हे पृथ्वीवरील सर्व लोकांना कळेल.
34 “शत्रूशी लढण्यासाठी जेव्हा तू आपल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहात प्रार्थना करु लागतील. 35 तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.
36 “पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्या विरुध्द पाप करतील तेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल. 37 पण तिथे त्यांचे ह्रदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते म्हणतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.’ 38 असतील तिथून ते अंतरीच्या उमाळ्याने तुला शरण येतील. या देशाच्या तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाखातर मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. 39 असे होईल तेव्हाही तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक. त्यांच्या विनवणीला कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्या विरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांना क्षमा कर. 40 आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.
41 “आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या
या करारकोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी ये.
तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत.
तुझे भक्त या सुजनतेने सुखी होवोत.
42 हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्वीकार कर.
तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”
24 यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. “किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!”
25 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला आधीच सांगितले. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो, ती कामे सुध्दा मी कोण आहे याची साक्ष देतात. 26 पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत. 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात. 28 मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही. 29 माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही. 30 माझा पिता आणि मी एक आहोत.”
31 तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडें उचलले. 32 परंतु येशू त्यांना म्हणाला, “पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जिवे मारीत आहात?”
33 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हांला मारीत नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वतःला देवासारखेच आहोत असे मानता! आणि म्हणून आम्ही तुम्हांला धोंडमार करुन ठार करीत आहोत!”
34 येशूने उत्तर दिले, “तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे; ‘मी म्हणालो, तुम्ही देव आहात’ [a] 35 ज्या लोकांना देवाने त्याची आज्ञा वचने दिली त्यांच्याविषयी ते सांगते. पवित्र शास्त्रात त्या लोकांना देवाने असे म्हटले आणि पवित्र शास्त्र नेहमीच खरे आहे. 36 त्याच्या कामासाठी देवाने मला निवडले. देवाने मला जगात पाठविले. मी देवाचा पुत्र आहे. आणि तुम्ही म्हणता, मी बोलतो त्या गोष्टी देवाविरूद्ध आहेत, 37 जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. 38 परंतु माझा पिता करतो तीच कृत्ये जर मी करतो, तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा. मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की, पिता माइयामध्ये आहे, आणि मी पित्यामध्ये आहे.”
39 यहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला. परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला.
40 मग येशू यार्देन नदी ओलांडून माघारी गेला. येशु जेथे योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे तेथे गेला. येशू तेथेच राहिला. 41 आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. लोक म्हणाले, “योहानाने कधी चमत्कार केला नाही. परंतु योहानाने या मनुष्याविषयी जे सांगितले ते खरे आहे.” 42 आणि त्याठिकाणी अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.
2006 by World Bible Translation Center