Old/New Testament
अजऱ्याची यहूदातील कारकीर्द
15 इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राजा झाला. 2 तेव्हा अजऱ्या सोळा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये बावन्र वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या ती यरुशलेममधली होती. 3 अजऱ्याचे वर्तन आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडील अमस्या जसे वागले तसाच हाही वागला. 4 परंतु उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
5 परमेश्वराच्या अवकृपेने राजा अजऱ्या याला कुष्ठरोग झाला. मरेपर्यंत तो त्यातून बरा झाला नाही. तेव्हा तो वेगळा राहू लागला. त्याचा मुलगा योथाम याने राजाच्या या घराची देखभाल केली आणि तोच लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.
6 अजऱ्याने जे केले ते सर्व यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे. 7 अजऱ्याचे निधन झाले. दावीदनगरात त्याचे पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा योथाम त्याच्यानंतर राज्यावर आला.
जखऱ्याची इस्राएलवर अल्पजीवी कारकीर्द
8 यराबामचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनमध्ये सहा महिने राज्य केले. यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीचे तेव्हा अडतिसावे वर्ष होते. 9 जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये केली. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच याने केली.
10 मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट केला. इब्लाममध्ये त्याने जखऱ्याला ठार केले. आणि स्वतः राज्यावर आला. 11 जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. 12 अशा रीतीने परमेश्वराचा शब्द खरा ठरला. येहूच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील असे परमेश्वराने येहूला सांगितले होते.
शल्लूमची इस्राएलवर अल्प कारकीर्द
13 याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा उज्जीया यहूदाचा राजा झाल्याला एकोणचाळिसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.
14 गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून शोमरोनमध्ये आला त्याने शल्लूमला ठार केले. मग मनहेम स्वतः राजा झाला.
15 शल्लूमने जे केले ते सगळे, तसेच त्याने जखऱ्याविरुध्द केलेला कट इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहे.
इस्राएलमध्ये मनहेमचे राज्यअल्प
16 शल्लूमच्या मृत्यूनंतर मनहेमने तिफसाहचा तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचा पाडाव केला. लोकांनी नगराची वेस उघडायला विरोध केला तेव्हा त्यांनाही नेस्तनाबुत करुन त्याने गर्भवती स्त्रियांनाही कापून काढले.
17 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनमध्ये दहा वर्षे राज्य केले. 18 मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अधःपात झाला तीच पापे मनहेमने केली.
19 अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली. 20 हा पैसा उभा करायला मनहेमने श्रीमंत आणि वजनदार लोकांवर कर बसवला. प्रत्येकाला त्याने वीस औंस चांदी कररूपाने द्यायला लावली. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
21 मनहेमच्या पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
22 मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.
पेकह्याची इस्राएलवर कारकीर्द
23 अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले. 24 परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अधःपतन झाले तीच पापे पेकह्याने केली.
25 रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.
26 पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
पेकहाची कारकीर्द
27 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले. 28 पेकहाने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापांनी इस्राएलचा अधःपात झाला. पेकह त्याच मार्गाने गेला.
29 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
30 एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी हे झाले.
31 पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
योथामचे यहूदावर राज्य
32 उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला तेव्हा रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर दुसरे वर्ष चालू होते. 33 योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकची मुलगी यरुशा ही त्याची आई. 34 आपले वडील उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता. 35 पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामने एक वरचा दरवाजा बांधला. 36 यहूदांच्या राजाचा इतिहास या पुस्तकात योथामने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.
37 अरामचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना याच वेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्यक्त केले.
38 योथाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्याला पुरले. त्याच्या नंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.
यहूदाचा राजा आहाज
16 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलचा राजा होता. त्याच्या सतराव्या वर्षी योथामचा मुलगा आहाज यहूदाचा राजा झाला. 2 आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये निषिध्द म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराचे आज्ञापालन करत नसे. 3 त्याची वागणूक इस्राएलच्या राजांसारखी होती. आपल्या मुलालाही त्याने अग्नीतून चालायला लावले. इस्राएली आले तेव्हा परमेश्वराने ज्या लोकांना त्या प्रदेशातून जबरदस्तीने हद्दपार केले त्यांच्यासारखी भीषण कृत्ये आहाजने केली. 4 उंचस्थानातील पुजास्थळे, टेकड्यांवर तसेच प्रत्येक हिरव्यागर्द वृक्षाखाली त्याने यज्ञ केले, धूप जाळला.
5 अरामचा राजा रसीन आणि इस्राएलाचा राजा रमाल्याचा मुलगा पेकह यरुशलेमवर स्वारी करुन आले. रसीन आणि पेकह यांनी आहाजला घेरले. पण ते त्याचा पराभव करु शकले नाहीत. 6 अरामचा राजा रसीन याने यावेळी एलाथ हा भूभाग परत मिळवला. तेथून त्याने सर्व यहुद्यांना हुसकावून लावले. मग अरामी लोक त्याठिकाणी स्थायिक झाले. अजूनही त्यांची तिथे वस्ती आहे.
7 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास आहे, तुझ्या मुलासारखाच आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करुन आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला ये आणि मला वाचव.” 8 आहाजने याखेरीज परमेश्वराच्या मंदिरातले आणि राजवाड्याच्या खजिन्यातले सोनेरुपे बाहेर काढले. ते त्याने अश्शूरच्या राजाला नजराणा म्हणून पाठवले.
9 अश्शूरच्या राजानेही आहाजच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि दिमिष्कावर स्वारी केली. दिमिष्क सर करुन तेथील लोकांना त्याने कीर येथे पकडून नेले. रसीनलाही त्याने ठार केले.
10 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याला भेटायला आहाज दिमिष्काला गेला. तेथील वेदी त्याने पाहिली. तेव्हा तिचा नमुना आणि आराखडा त्याने उरीया या याजकाला पाठवला. 11 दिमिष्काहून आहाजने पाठवलेल्या त्या नमुन्याबरहुकूम उरीया याजकाने वेदी उभारली. राजा आहाज दिमिष्काहून परत येण्यापूर्वी त्याने काम पूर्ण केले.
12 राजाने दिमिष्काहून येताच वेदी पाहिली. तिच्यावर यज्ञ अर्पण केला. 13 होमार्पण आणि धान्यार्पणही केले. पेयार्पण केले तसेच शांतिअर्पणाचे रक्तही वेदीवर शिंपडले.
14 आत्ताची वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामध्ये परमेश्वरासमोर जी पितळी वेदी होती ती आहाजने तिथून हलवली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली. 15 मग उरीया याजकाला त्याने आज्ञा केली, “मोठ्या वेदीवर सकाळचे होमार्पण, संध्याकाळचे धान्यार्पण, देशातील सर्व लोकांचे पेयार्पण करीत जा. तसेच होमार्पणाचे आणि यज्ञाचे रक्त त्या वेदीवर शिंपडत जा. पितळेची वेदी देवाला प्रश्न विचारण्याकरता माझ्या साठी असावी.” 16 उरीया याजकाने राजाची आज्ञा मानून त्याप्रमाणे सर्वकाही केले.
17 आहाजने मग बैठकी कापून त्याचे नक्षीदार कठडे काढून टाकले. बैठकींची स्नान पात्रे काढून टाकली. पितळी बैलांवरचा हौद काढून तो खाली फरसबंदीवर ठेवला. 18 शब्बाथ दिवसासाठी मंदिराच्या आत बांधलेली आच्छादित जागा काढून टाकली. राजासाठी असलेले बाहेरचे प्रवेशद्वारही आहाजने काढून टाकले. परमेश्वराच्या मंदिरातून हे सर्व काढून त्याने अश्शूरच्या राजाला दिले.
19 यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहाजचे सर्व पराक्रम लिहिलेले आहेत. 20 आहाजच्या निधनानंतर त्याचे दावीदनगरात पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. आहाजनंतर त्याचा मुलगा हिज्कीया नवा राजा झाला.
येशू आणि निकदेम
3 निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परूशी लोकांपैकी एक असून तो यहूदी लोकांचा एक महत्त्वाचा पुढारी होता. 2 एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, “रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हांला माहीत आहे. कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत.”
3 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखाद्या माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही.”
4 निकदेम म्हणाला. “जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही! म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही!”
5 येशूने उत्तर दिले. “मी तुम्हांला खरे सांगतो: मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. 6 मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो. परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. 7 तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हांला सांगितल्याबहल आश्चर्यचकित होऊ नका. 8 वाऱ्याला वहायला पाहिजे तिकडे तो वाहतो, वारा वाहताना तुम्हांला त्याचा आवाज ऐकू येतो. परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्थेक माणसाचे असेच असते.”
9 निकदेम म्हणाला, “हे सारे कसे शक्य आहे?”
10 येशू म्हणाला, “तुम्ही इस्राएलाचे प्रमुख शिक्षक आहात. तरीही तुम्हांला या गोष्टी कळत नाहीत काय? 11 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. आम्हांला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविष्यी आम्ही सांगतो. परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानीत नाही. 12 मी तुम्हांला जगातील गोष्टीविषयी सांगितले पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हांला स्वर्गातील गोष्टीविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही! 13 मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरुन खाली आला.”
14 “मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले. [a] मनुष्याच्या पुत्रालाही तसेच उंच केले पाहिजे. 15 अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचे जीवन मिळू शकते.”
16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे. 17 देवाने आपल्या पुत्राला जगात पाठविले. जगाचा न्याय करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठविला नाही, तर आपल्या पुत्राद्वारे जगाचे तारण व्हावे यासाठी देवाने त्याला जगात पाठविले. 18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही.
2006 by World Bible Translation Center