Old/New Testament
यहोआहाजच्या कारकिर्दीला सुरुवात
13 येहूचा मुलगा यहोआहाज शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. अहज्याचा मुलगा योवाश यहूदात राज्यावर आल्याला तेविसावे वर्ष चालू होते तेव्हाची ही हकीकत. यहोआहाजने सतरा वर्षे राज्य केले.
2 परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी यहोआहाजने केल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच यहोआहाजने केली, त्यात खंड पडू दिला नाही. 3 मग परमेश्वराचा इस्राएलवर कोप झाला. अरामचा राजा हजाएल आणि हजाएलचा मुलगा बेनहदाद यांच्या हाती परमेश्वराने इस्राएलची सत्ता सोपवली.
इस्राएली लोकांवर परमेश्वराची दया
4 तेव्हा यहोआहाजने मदतीसाठी परमेश्वराची याचना केली. देवानेही त्याची विनंती ऐकली. अरामच्या राजाने इस्राएली लोकांचा केलेला छळ आणि इस्राएलांच्या हाल अपेष्टा परमेश्वराने पाहिल्या होत्या.
5 त्यातून इस्राएलला तारण्यासाठी परमेश्वराने एक्राला पाठवले. तेव्हा मग अराम्यांच्या हातून इस्राएलींची मुक्तता झाली आणि इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपापल्या मुक्कामी परतले.
6 तरीही यराबामच्या घराण्याने जी पापे इस्राएल लोकांना करायला लावली ती करायचे काही त्यांनी सोडले नाही.यराबामची सर्व पापाचरणे त्यांनी चालूच ठेवली शोमरोनमध्ये अशेरा देवतेचे स्तंभ त्यांनी ठेवलेच.
7 अरामच्या राजाने यहोआहाजच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यातील बहुतेक लोकांना त्याने ठार केले. फक्त पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजारांचे पायदळ एवढेच शिल्लक ठेवले. खळ्यातील धान्याच्या मळणीच्या वेळी उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे यहोआहाजच्या सैनिकांची अवस्था होती.
8 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात यहोआहाजने केलेली थोर कृत्ये लिहून ठेवली आहेत. 9 पुढे यहोआहाज मरण पावला आणि पूर्वजांसमवेत त्याचे दफन झाले. शोमरोनमध्ये लोकांनी त्याला पुरले. त्याचा मुलगा योवाश (किंवा यहोआश) त्याच्या जागी राज्य करु लागला.
योवाशची इस्राएलचा राजा म्हणून कारकीर्द
10 यहोआहाजचा मुलगा योवाश शोमरोनमध्ये इस्राएलचा राजा झाला. यहूदाचा राजा योवाश याचे ते सदतिसावे वर्ष होते. योवाशने इस्राएलवर सोळा वर्षे राज्य केले. 11 परमेश्वराने जे जे करु नका म्हणून सांगितले ते सर्व त्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली ती करण्याचे योवाशने सोडले तर नाहीच, उलट तोही त्याच मार्गाने गेला. 12 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात, योवाशने केलेले पराक्रम आणि यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या लढाया यांची हकीकत आलेली आहे. 13 योवाशच्या निधनानंतर त्याचे आपल्या पूर्वजांशेजारी दफन झाले. यराबाम सिंहासनावर आला आणि योवाशचे शोमरोनमध्ये इस्राएलच्या राजांबरोबर दफन झाले.
योवाश अलीशाला भेटतो
14 अलीशा आजारी पडला. त्या आजारातच पुढे तो मरण पावला. इस्राएलचा राजा योवाश त्याला भेटायला गेला. अलीशाबद्दल दु:खातिशयाने त्याला रडू आले. योवाश म्हणाला, “माझ्या बापा, माझ्या बापा, ही इस्राएलच्या रथांची आणि घोड्यांची वेळ आहे का?”
15 अलीशा योवाशला म्हणाला, “धनुष्य आणि काही बाण घे.”
तेव्हा योवाशने धनुष्य व काही बाण घेतले 16 अलीशा मग राजाला म्हणाला, “धनुष्यावर हात ठेव.” योवाशने त्याप्रमाणे केले. अलीशाने मग आपले हात राजाच्या हातांवर ठेवले. 17 अलीशा त्याला म्हणाला, “पूर्वेकडची खिडकी उघड.” योवाशने खिडकी उघडली. तेव्हा अलीशाने त्याला बाण मारायला सांगितले.
योवाशने बाण सोडला. अलीशा त्याला म्हणाला, “परमेश्वराचा हा विजयाचा तीर होय. अरामवरील विजयाचा बाण. अफेक येथे तू अराम्यांचा पाडाव करशील, त्यांना नेस्तनाबूत करशील.”
18 अलीशा पुढे म्हणाला, “बाण घे.” योवाशने ते घेतले. अलीशाने मग इस्राएलच्या राजाला भूमीवर बाण मारायला सांगितले.
योवाशने जमिनीवर तीन बाण मारले. मग तो थांबला. 19 अलीशा संदेष्टा योवाशवर रागावला. तो त्याला म्हणाला, “तू पाच सहावेळा तरी मारायला हवे होतेस. तरच तू अराम्यांना पुरते नेस्तनाबूत करु शकला असतास. आता तू फक्त तीनदाच त्यांचा पराभव करशील.”
अलीशाच्या कबरेवरचा चमत्कार
20 अलीशाने देह सोडला आणि लोकांनी त्याला पुरले.
पुढे वसंतात मवाबी सैन्यातील काहीजण इस्राएलला आले. लढाईनंतर लूट करायला ते आले होते. 21 काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरीतच तो मृतदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.
योवाश अराम्यांकडून इस्राएल नगरे जिंकून घेतो
22 यहोआहाजच्या कारकिर्दीमध्ये अरामचा राजा हजाएल याने इस्राएलचा छळ केला होता. 23 पण परमेश्वरालाच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वराला इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्याला त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.
24 अरामचा राजा हजाएल मरण पावला. त्याच्यानंतर बेन-हदाद राज्य करु लागला. 25 मृत्यूपूर्वी हजाएलने योवाशचे वडील यहोआहाज ह्यांच्या कडून युध्दात काही नगरे हस्तगत केली होती. पण योवाशने ती आता हजाएलचा मुलगा बेन-हदाद याच्याकडून परत मिळवली. योवाशने बेनहदादचा तीनदा पराभव केला आणि इस्राएलची नगरे जिंकून घेतली.
अमस्याचे यहूदावर राज्य
14 योवाशचा मुलगा अमस्या यहुदाचा राजा झाला. तेव्हा इस्राएलचा राजा यहोआहाज याचा मुलगा योवाश गादीवर आल्याला दुसरे वर्ष होते. 2 अमस्या राज्य करु लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. अमस्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. अमस्याच्या आईचे नाव यहोअदान. ही यरुशलेमची होती. 3 परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित तेच अमस्याने केले. पण त्याबाबतीत तो आपला पूर्वज दावीद याच्या इतका पूर्णत्वाला गेला नाही. आपले वडील योवाश यांनी केले तेच अमस्याने केले. 4 त्याने उंचवट्यावरील पुजास्थळे नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी अजूनही लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
5 राज्यावर त्याची चांगली पकड असतानाच, आपल्या वडीलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला. 6 पण त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही कारण मोशेच्या नियमशास्त्रात याबद्दलचे नियम सांगितलेले आहेत. मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने पुढील आज्ञा सांगितलेली आहे: “मुलांच्या गुन्ह्या करिता आईवडिलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडिलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”
7 मिठाच्या खोऱ्यात अमस्याने दहाहजार अदोम्यांना मारले. या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “जोकथेल” ठेवले अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.
अमस्याची योवाशवर चढाई करण्याची इच्छा
8 इस्राएलचा राजा येहू याचा मुलगा यहोआहाज त्याचा मुलगा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. संदेशात म्हटले होते, “ऊठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू.”
9 तेव्हा योवाशने यहूदाचा राजा अमस्या याला उत्तर पाठवले की, “लबानोनमधल्या काटेरी झुडुपाने लबानोनमधल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला, ‘तुझ्या मुलीला माझ्या मुलाची बायको करुन घ्यायचे आहे.’ पण लबानोनमधला एक वन्यपशू वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून पुढे गेला. 10 अदोमचा तू पराभव केलास हे खरे पण त्या विजयाने तू उन्मत्त झाला आहेस. पण आहेस तिथेच राहून बढाया मार. स्वतःला संकटात लोटू नको. हे ऐकले नाहीस तर तुझा आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल.”
11 योवाशच्या या इषाऱ्याकडे अमस्याने दुर्लक्ष केले. तेव्हा यहूदातील बेथ-शेमेश या ठिकाणी इस्राएलचा राजा योवाश यहूदाचा राजा अमस्या याच्या समोर लढाईला उभा ठाकला. 12 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. यहूदातील एकूण एक सर्व माणसांनी आपापल्या तंबूत पळ काढला. 13 अहज्यापुत्र योवाशचा मुलगा यहूदाचा राजा अमस्या याला इस्राएलचा राजा योवाश याने बेथशेमेश येथे अटक केले. योवाशने अमस्याला यरुशलेम येथे आणले. तेथे पोचल्यावर यरुशलेमच्या तटबंदीला योवाशने एफ्राईमच्या दरवाज्यापासून कोपऱ्यातील दरवाजापर्यंत जवळ जवळ सहाशे फुटांचे खिंडार पाडले. 14 पण परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने, चांदी आणि सर्व पात्रे योवाशने लुटली. तसेच येथील सर्व माणसांना बंदिवान केले. मगच तो शोमरोनला परतला.
15 यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या या लढाईतील पराक्रमाबरोबरच योवाशने केलेल्या इतर महान कृत्यांचीही नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात केलेली आहे. 16 योवाश मरण पावला आणि आपल्या पूर्वंजांना जाऊन मिळाला. इस्राएलच्या राजांशेजारी शोमरोनमध्ये त्याचे दफन झाले. योवाशनंतर त्याचा मुलगा यराबाम गादीवर आला.
अमस्याचा मृत्यू
17 इस्राएलचा राजा यहोआहाज याचा मुलगा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जिवंत होता. 18 त्याने केलेल्या सर्व थोर कृत्यांची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात केलेली आहे. 19 अमस्याविरुध्द यरुशलेममध्ये लोकांनी कट केला. तेव्हा अमस्या लाखीश येथे पळाला. पण लोकांनी माणसे पाठवून त्याचा लाखीशर्पंत पाठलाग केला आणि त्यांनी अमस्याचा तेथे वध केला. अमस्याचा मृत्यू 20 लोकांनी अमस्याचा मृतदेह घोड्यावर लादून परत आणला. दावीदनगरात यरुशलेम येथे आपल्या पूर्जजांच्या समवेत त्याचे दफन झाले.
यहूदावर अजऱ्याचा अंमल
21 मग यहूदाच्या सर्व लोकांनी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता. 22 राजा अमस्याच्या निधनानंतर त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.
दुसरा यराबाम याची इस्राएलवर सत्ता
23 इस्राएलचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनमध्ये राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा योवाश याचा मुलगा अमस्या याच्या कारकिर्दींचे पंधरावे वर्ष होते. यराबामने एक्के चाळीस वर्षे राज्य केले. 24 यराबामने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच या यराबामने चालू ठेवली. 25 लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंतची इस्राएलची भूमी यराबामने पुन्हा संपादन केली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्या प्रमाणेच हे घडले. 26 इस्राएलचे दास काय किंवा स्वतंत्र माणसे काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, हे परमेश्वराने पाहिले. यातला कोणीच इस्राएलला वर आणण्याच्या पात्रतेचा नाही हे त्याने ओळखले 27 इस्राएलचे नाव जगाच्या पाठीवरुन पुसून टाकू असे काही परमेश्वर म्हणाला नव्हता. तेव्हा योवाशचा मुलगा यराबाम याच्यामार्फत परमेश्वराने इस्राएलला तारले.
28 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात यराबामच्या पराक्रमांची नोंद आहे. दिमिष्क आणि हमाथ त्याने इस्राएलच्या भूमीला पुन्हा जोडले याचीही नोंद त्यात आहे. (ही नगरे यहूदाच्या ताब्यात होती) 29 यराबाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. यराबामचा मुलगा जखऱ्या राजा म्हणून गादीवर आला.
काना येथील लग्न
2 दोन दिवसांनी गलीलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. 2 येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते. 3 लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता. सगळा द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.”
4 येशूने उतर दिले, “आई, तू मला यात का गुंतवितेस? माझी वेळ अजून आलेली नाही.”
5 येशूची आई नोकरांना म्हणाली, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.”
6 त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते, यहूदी लोक विशेष विधीप्रसंगी धुण्यासाठी [a] पाणि ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात वीस ते तीस बादल्या पाणी मावत असे.
7 येशू नोकरांना म्हणाला, “हे रांजण पाण्याने भरा.” मग नोकरांनी ते रांजण काठोकाठ भरले.
8 मग येशू नोकरांना म्हणाला, “आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजनप्रमुखाकडे न्या.”
मग नोकर ते पाणी घेऊन भोजनप्रमुखाकडे गेले. 9 मग लग्नसमारंभातील भोजनप्रमुखाने ते चाखून पाहिले, तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कोठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कोठून आला होता हे माहीत होते. लग्नसमारंभाच्या भोजनप्रमुखाने वराला बोलाविले. 10 तो वराला म्हणाला, “लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात. नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस.”
11 स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालीलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला. आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
12 नंतर येशू कफर्णहूम गावी गेला. येशूची आई, भाऊ व त्याचे शिष्य त्याच्यासोबत गेले. ते सर्व काही दिवस कफर्णहूमास राहिले.
येशू मंदिरात जातो(A)
13 यहूदी लोकांचा वल्हांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला. 14 येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती. 15 येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वाना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथेपालथे केले आणि त्यांचे पैसे विस्कटून टाकले. 16 येशू कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, “या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका!”
17 हे घडले तेव्हा येशूच्या शिष्यांना पवित्र शास्त्रात जे लिहिले होते त्याची आठवण झाली:
“तुझ्या मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले जाईल” (B)
18 यहूदी लोक येशूला म्हणाले, “एखादा चमत्कार करुन आम्हांला चिन्ह दाखवा. आणि या गोष्टी करण्याचा तुम्हांला अधिकार आहे हे सिद्द करा.”
19 येशूने उत्तर दिले, “हे मंदिर नष्ट करा म्हणजे मी ते तीन दिवसांत पुन्हा उभारीन.”
20 यहूदी लोक म्हणाले, “लोकांना हे मंदिर बांधण्यासाठी शेहेचाळीस वर्षे लागली! आणि तुम्ही ते तीन दिवसांत बांधू शकता यावर तुमचा खरोखरच विश्वास आहे काय?”
21 (परंतु येशू मंदिराविषयी म्हणजे स्वतःच्या शरीराविषयी बोलला. 22 नंतर येशू मेलेल्यांतून पुन्हा उठविला गेला, तेव्हा त्याच्या शिष्यांना तो हे बोलल्याचे आठवले. आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्याविषयी लिहिलेल्या पवित्र शास्त्रावर आणि जे शब्द येशू बोलला त्यावर विश्वास ठेवला.)
23 वल्हांडण सणासाठी येशू यरुशलेमात होता. पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला कारण तो करीत असलेले चमत्कार त्यांनी पाहिले. 24 परंतु येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही. कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते. 25 लोकांविषयी कोणी येशूला सांगावे याची त्याला काहीच गरज नव्हती. लोकांच्या मनात काय आहे हे येशू जाणून होता.
2006 by World Bible Translation Center