Old/New Testament
16 यानंतर परमेश्वर हनानीचा मुलगा येहू याच्याशी बोलला. हे बोलणे राजा बाशा याच्याविरुध्द होते. 2 “तुला मी मोठे केले. माझ्या इस्राएली लोकांचा नायक म्हणून तुला मी नेमले. पण तू यराबामच्या वाटेनेच गेलास. इस्राएलींच्या पापाला कारणीभूत झालास. त्यांच्या पातकांनी माझा क्रोध जागा झाला आहे. 3 तेव्हा बाशा, मी तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा नाश करणार आहे. नबाटाचा मुलगा यराबाम याच्या घराण्याचे केले तसेच मी तुझ्या बाबतीत करीन. 4 तुझ्या कुटुंबातील लोक नगरातल्या रस्त्यावर मरतील. कुत्री त्यांची प्रेते खातील. जे रानावनात मरतील ते पक्ष्यांचे भक्ष्य होतील.”
5 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात बाशाच्या इतर पराक्रमांची हकीकत लिहीली आहे. 6 बाशाच्या मृत्यूनंतर तिरसा येथे त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा एला हा त्याच्यानंतर राज्य करु लागला.
7 तेव्हा परमेश्वराने येहू या संदेष्ट्याला संदेश दिला. हा संदेश बाशा आणि त्याचे कुटुंबीय यांच्या विरुध्द होता. बाशाने परमेश्वराविरुध्द बरीच पापे केली होती. त्याचा परमेश्वराला फार संताप आला होता. आधी यराबामच्या कुटुंबाने केले तेच बाशाने केले. बाशाने यराबामच्या कुळाचा संहार केला म्हणूनही परमेश्वराचा कोप झाला होता.
इस्राएलचा राजा एला
8 यहूदाचा राजा म्हणून आसाचे सव्विसावे वर्ष चालू असताना एला हा राजा झाला. एला हा बाशाचा मुलगा तिरसामध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.
9 जिम्री हा एला राजाचा अधिकारी होता. एलाच्या एकूण रथांपैकी अर्धे जिम्रीच्या ताब्यात होते. तरीही त्याने एलाविरुध्द कट केला. एला राजा तिरसा येथे अरसाच्या घरी मद्याच्या धुंदीत होता. अरसा हा तिरसा येथील महालावरचा मुख्य अधिकारी होता. 10 जिम्रीने सरळ घरात घुसून एला राजाला ठार केले. आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष होते. एलानंतर हा जिम्री इस्राएलचा राजा झाला.
इस्राएलचा राजा जिम्री
11 जिम्रीने राज्यावर आल्याबरोबर बाशाच्या घरातील सर्वांची हत्या केली. कोणालाही जिवंत ठेवले नाही. बाशाच्या मित्रांनाही त्याने ठार केले. 12 बाशाबद्दल येहू या संदेष्ट्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी उच्चारली त्याप्रमाणेच बाशाच्या घराण्याचा उच्छेद झाला 13 बाशा आणि त्याचा मुलगा एला यांच्या पापांमुळे हे झाले. त्यांनी स्वतः पापे केली आणि लोकांच्या पापांनाही ते कारण झाले. त्यांनी अनेक मूर्ती केल्यामुळे परमेश्वराचा कोप झाला.
14 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात एलाच्या बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत.
15 आसाचे यहूदाचा राजा म्हणून सत्ताविसावे वर्ष असताना जिम्री इस्राएलचा राजा झाला. जिम्रीने तिरसा येथे सात दिवस राज्य केले. त्याचे असे झाले, इस्राएलच्या सैन्याने पलिष्ट्यांच्या गिब्बथोन येथे तळ दिला होता. ते चढाई करण्याच्या तयारीत होते. 16 जिम्रीने राजाविरुध्द केलेल्या कारस्थानाची माहिती छावणीतल्या लोकांनी ऐकली. त्याने राजाचा वध केल्याचे त्यांना कळले. तेव्हा त्यांनी अम्री याला तिथल्या तिथे राजा केले. अम्री सेनापती होता. 17 तेव्हा अम्री आणि सर्व इस्राएली यांनी गिब्बथोन सोडून तिरसावर हल्ला केला. 18 नगर कब्जात घेतलेले जिम्रीने पाहिले. तेव्हा तो महालात घुसला आणि त्याने आग लावली. महाल आणि तो, दोघही आगीत भस्मसात झाले. 19 आपल्या पापांमुळेच तो मेला. परमेश्वराच्या दृष्टीने जे गैर ते त्याने केले. यानेही यराबामप्रमाणेच दुष्कृत्ये केली. इस्राएलच्या लोकांच्या पापांनाही यराबाम कारणीभूत झाला.
20 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात जिम्रीच्या कारस्थानांची आणि बाकीच्या गोष्टींची माहिती आहे. एला राजाविरुध्द तो बंड करुन उठला तेव्हाची हकीकतही या पुस्तकात आहे.
इस्राएलचा राजा अम्री
21 इस्राएलच्या लोकांमध्ये दोन गट पडलेले होते. अर्धे लोक गिनथचा मुलगा तिब्री याच्या बाजूचे असून त्याला राजा करावे अशा मताचे होते. उरलेले अम्रीचे चाहते होते. 22 तिब्रीच्या बाजूला असलेल्या गटापेक्षा अम्रीला पाठिंबा देणाऱ्यांचा गट वरचढ होता. त्यामुळे तिब्री मारला गेला आणि अम्री राजा झाला. 23 यहूदाचा राजा आसा याला सत्तेवर आल्यावर एकतिसावे वर्ष चालू असताना अम्री इस्राएलचा राजा झाला. अम्रीने इस्राएलवर बारा वर्षे राज्य केले. त्यापैकी सहा वर्षे तो तिरसामध्ये होता. 24 त्याने शोमरोन टेकडी शेमर याच्याकडून सुमारे दीडशे पौंड चांदी देऊन विकत घेतली. या टेकडीवर त्याने नगर बांधले. शेमर या नावावरुनच त्याने नगराचे नाव शोमरोन ठेवले.
25 अम्रीच्या हातूनही परमेश्वराच्या दृष्टीने गैर गोष्टी घडल्या. आपल्या आधीच्या सर्व राजांपेक्षा हा वाईट होता. 26 नबाटाचा मुलगा यराबाम याने जी पापे केली तीच यानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली. त्यामुळे इस्राएलवर परमेश्वर देवाचा कोप ओढवला. दीडदमडीच्या दैवतांची त्याने पूजा केली म्हणून परमेश्वर संतापला.
27 अम्रीच्या इतर गोष्टी आणि त्याचे पराक्रम याची हकीकत इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात लिहिलेली आहे. 28 अम्री मरण पावल्यावर त्याचे शोमरोन येथे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहाब हा राज्य करु लागला.
इस्राएलचा राजा अहाब
29 यहूदाचा राजा आसा याच्या काराकिर्दींच्या अडतिसाव्या वर्षी अम्रीचा मुलगा अहाब इस्राएलचा राजा झाला. शोमरोन या नगरातून त्याने इस्राएलवर बावीस वर्षे राज्य केले. 30 परमेश्वराने जे चुकीचे म्हणून सांगितले होते, ते सर्व अहाबने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता. 31 नबाटाचा मुलगा यराबाम याने केले ते तर अहाबने केलेच, पण ते पुरेसे वाटले नाही म्हणून की काय त्याने आणखी ही दुष्कृत्ये केली. एथबाल याची मुलगी ईजबेल हिच्याशी त्याने लग्न केले. एथबाल हा सिदोन्यांचा राजा होता. त्यानंतर अहाब बाल या दैवताच्या भजनी लागला. 32 शोमरोन येथे त्याने बालच्या पूजेसाठी देऊळ बांधले. वेदीही बांधली. 33 अशेराच्या पूजेसाठी स्तंभ उभारला. आपल्या आधींच्या राजापेक्षा याच्यावर इस्राएलच्या परमेश्वर देवाचा कोप जास्त झाला.
34 याच काळात बेथेलच्या हिएलने यरीहो नगर पुन्हा बांधले. हे काम त्याने सुरु केले तेव्हा त्याचा मोठा मुलगा अबीराम वारला. आणि नगराचे दरवाजे बांधून होत आले तेव्हा त्याचा सर्वात धाकटा मुलगा सगूब हा वारला. नूनचा मुलगा यहोशवा याच्यामार्फत परमेश्वराने जे भाकित केले त्यानुसार हे घडले. [a]
एलीया आणि दुष्काळ
17 गिलादमधील तिश्बी या गावात एलीया हा संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल.”
2 मग परमेश्वर एलीयाला म्हणाला, 3 “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. 4 त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.” 5 तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला. 6 रोज सकाळ संध्याकाळ त्याला कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
7 पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ सुकला. 8 तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, 9 “सिदोनमधील सारफथ येथे जाऊन राहा तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”
10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?” 11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”
12 तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.”
13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. 14 इस्राएलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, ‘तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.’”
15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. 16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
17 काही दिवसांनंतर या बाईचा मुलगा आजारी पडला. त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला. 18 तेव्हा ती बाई म्हणाली, “एलीया, तू तर संदेष्टा आहेस मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
19 एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्याला ठेवले. 20 एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?” 21 मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घातल्यासारखे करुन प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
22 एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्र्वासेच्छवास पुन्हा सुरू झाला व तो जिवंत झाला. 23 एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा मुलगा जिवंत आहे.”
24 ती बाई म्हणाली, “तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्यामार्फत बोलतो हे आता मला कळले.”-
एलीया आणि बालचे संदेष्टे
18 लागोपाठ तिसऱ्या वर्षी पाऊस पडला नाही तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, “अहाब राजाला जाऊन भेट मी लौकरच पाऊस पाडणार आहे.” 2 तेव्हा एलीया अहाबला भेटायला गेला.
शोमरोनमध्ये तेव्हा अन्नधान्याचे दुर्भिक्ष्य होते. 3 अहाब राजाने आपल्या महालाचा प्रमुख ओबद्या याला बोलावणे पाठवले. (ओबद्या परमेश्वराचा खरा अनुयायी होता. 4 एकदा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले. त्यांच्या अन्नपाण्याची तरतूद केली.) 5 अहाब राजा ओबद्याला म्हणाला, “माझ्याबरोबर चल आपण सगळ्या ओहोळझऱ्यांचा शोध घेऊ. आपली खेचरे, घोडी तग धरुन राहतील इतपत चारा शोधून काढू म्हणजे मग आपल्याला आपले पशू मारावे लागणार नाहीत.” 6 त्या दोघांनी मग आपापसात पाहणी करायच्या प्रदेशाची वाटणी केली आणि सगळा प्रदेश पाण्यासाठी पायाखाली घातला. दोघेजण दोन वाटांनी गेले. 7 ओबद्याला वाटेत एलीया भेटला. ओबद्याने त्याला ओळखून अभिवादन केले. ओबद्या त्याला म्हणाला, “एलीया? स्वामी, खरोखर तुम्हीच आहात का?”
8 एलीया म्हणाला, “होय, मीच आहे. आता मी इथे असल्याचे आपल्या राजाला जाऊन सांग.”
9 तेव्हा ओबद्या म्हणाला, “तुमचा ठावठिकाणा मी अहाबला सांगितला तर तो मला मारुनच टाकील. मी आपला काही अपराध केला नाही, मग तुम्ही माझ्या जिवावर का उठलात? 10 परमेश्वर देवाशपथ, राजा सर्वत्र तुमचा शोध घेत आहे. त्यासाठी त्याने गावोगाव माणसे पाठवली आहेत. जेथे जेथे तुम्ही सापडला नाहीत असे कळले तिथे तिथे त्याने तिथल्या राजांना एलीया इथे नाही असे शपथेवर सांगायला सांगितले. 11 आणि आता तुम्ही मला म्हणता, जा त्याला जाऊन सांग म्हणून! 12 तुम्ही इथे आहात म्हणून मी अहाब राजाला सांगितले तर परमेश्वराचा आत्मा तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ठिकाणी घेऊन जाईल. अहाब राजाला मग इथे तुम्ही सापडणार नाही. मग तो माझा जीव घेईल. मी लहानपणापासून देवाविषयी आदर बाळगून आहे. 13 मी काय केले ते तुम्हाला माहीत आहे ना? ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांना मारायला निघाली होती तेव्हा मी एकेका गुहेत पन्नास असे शंभर संदेष्ट्यांना दोन गुहांमध्ये लपवले होते. त्यांना खायला प्यायला दिले. 14 आणि आता तुम्ही मला राजाला आपली खबर द्यायला सांगत आहात. तो नि:संशय मला मारणार!”
15 यावर एलीया त्याला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आज मी राजासमोर उभा राहाणार आहे, असे मी वचन देतो.”
16 तेव्हा ओबद्या राजाकडे गेला. त्याने अहाब राजाला एलीयाचा ठावठिकाणा सांगितला. राजा एलीयाला भेटण्यासाठी आला.
17 अहाबने एलीयाला पाहिले तेव्हा अहाब त्याला म्हणाला, “इस्राएलला त्रस्त करुन सोडणारा तूच का तो?”
18 एलीया यावर म्हणाला, “माझ्यामुळे इस्राएलवर संकट आलेले नाही. ते तुम्ही आणि तुमचे वडील यांच्यामुळे उद्भवलेले आहे. परमेश्वराच्या आज्ञा पाळायचे सोडून तुम्ही इतर अमंगळ दैवतांच्या नादी लागलात तेव्हा हा त्रास सुरु झाला. 19 आता कर्मेल पर्वतावर समस्त इस्राएलींना जमायला सांग. बालच्या साडेचारशे संदेष्ट्यांनाही तेथे घेऊन ये. तसेच अशेरा देवीच्या चारशे संदेष्ट्यांनाही. ईजबेल राणीचा त्या संदेष्ट्यांना पाठिंबा आहे.”
20 तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबने कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले. 21 एलीया तेथे सर्वांसमोर आला आणि म्हणाला, “कोणाच्या मागे जायचे हे तुम्ही केव्हा ठरवणार? जर परमेश्वरच खरा देव असेल तर तुम्ही त्याला अनुसरायला हवे. पण बाल खरा देव असेल तर त्याला तुम्ही अनुसरा.”
लोक यावर काहीच बोलले नाहीत. 22 तेव्हा एलीया म्हणाला, “परमेश्वराचा संदेष्टा असा इथे मी अगदी एकटाच आहे. दुसरा कोणीही नाही. पण बालचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत. 23 तेव्हा दोन गोऱ्हे आणा. बालच्या संदेष्ट्यांनी त्यातला एक घ्यावा. त्याला मारुन त्याचे तुकडे-तुकडे करावे. मग ते मांस लाकडे रचून त्यावर ठेवावे. विस्तव मात्र पेटवू नका. दुसऱ्या गोऱ्ह्याचे मी तसेच करीन. मीही विस्तव पेटवणार नाही. 24 तुम्ही बालचे संदेष्टे मिळून तुमच्या देवाची प्रार्थना करा. मी परमेश्वराची प्रार्थना करीन. ज्याच्या प्रार्थनेने विस्तव पेटेल तोच खरा देव.”
ही कल्पना सर्व लोकांना पटली.
25 मग एलीया बालच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा तुम्हीच आधी सुरुवात करा. एक गोऱ्हा निवडा आणि आपल्या देवाची नावे घ्यायला लागा. फक्त विस्तव लावू नका.”
26 तेव्हा त्या संदेष्ट्यांनी एक गोऱ्हा घेतला आणि ते तयारीला लागले. दुपारपर्यंत त्यांनी बालची प्रार्थना केली. “बाल आमच्या हाकेला ओ दे” अशी त्यांनी विनवणी केली. पण कसलाही आवाज आला नाही किंवा उत्तर दिले नाही. आपण रचलेल्या वेदीभोवती ते संदेष्टे नाचले तरी अग्नी काही प्रज्वलित झाला नाही.
27 दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरंच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादेवेळी प्रवासात किंवा झोपेत असेल. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करुन त्याला उठवा.” 28 तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वतःवर वार करुन घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले. 29 दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते अंगात आल्यासारखे वागत राहिले. पण काहीही घडले नाही बालकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते!
30 मग एलीया सर्व लोकांना उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले. 31 त्याला बारा दगड मिळाले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबलाच परमेश्वराने “इस्राएल” या नावाने संबोधले होते. 32 परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गॅलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती. 33 एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले. 34 मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या लाकडांवर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले. 35 वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले.
36 दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करुन दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे. 37 हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वतःजवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”
38 तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले. 39 सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.
40 एलीया म्हणाला, “त्या बालच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसूट देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.
पावसाचे आगमन
41 एलीया मग अहाब राजाला म्हणाला, “जा, आता तू तुझे खाणेपिणे उरकून घे कारण खूप जोराचा पाऊस पडणार आहे.” 42 तेव्हा आहाब राजा त्यासाठी निघाला. त्याचवेळी एलीया कर्मेल डोंगराच्या माथ्यावर चढून गेला. तेथे पोहोंचल्यावर ओणवून, गुडघ्यांत डोके घालून बसला. 43 आणि आपल्या बरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा.”
समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्याला पुन्हा जाऊन पाहायला सांगितले. असे सातवेळा झाले. 44 सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, “एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता.”
तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्याला रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाही तर पावसामुळे त्याला थांबावे लागेल.”
45 पाहता पाहता आकाश ढगांनी भरुन गेले. वारा सुटला आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. अहाब आपल्या रथात बसून इज्रेलला परत जायला निघाला. 46 यावेळी एलीयात परमेश्वरी शक्ती संचारली. धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरुन घटृ खोचले आणि थेट इज्रेलपर्यंत तो अहाबच्या पुढे धावत गेला.
येशूला अटक(A)
47 तो बोलत असता लोकांचा जमाव आला. आणि बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एक जण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.
48 परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा तू विश्वासघात करतोस काय?” 49 त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे पाहून म्हणाले, “प्रभु. आम्ही तलवारीने मारावे काय?” 50 त्यांच्यापैकी एकाने मुख्य याजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला.
51 येशूने उत्तर दिले, “असे काही करु नका.” त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्याला बरे केले.
52 नंतर येशू मुख्य याजक, मंदिराचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे. 53 मी तर तुम्हांबरेबर दररोज मंदिरात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची आणि अंधाराची राज्य करण्याची वेळ आहे.”
मी येशूला ओळखतो असे म्हणण्याची पेत्राला भीति वाटते(B)
54 त्यांनी त्याला अटक केली व ते त्याला मुख्य याजकाच्या घरी घेऊन गेले. पण पेत्र दुरुन त्यांच्या मागे चालला. 55 त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला, आणि त्याच्याभोवती बसले. पेत्रही त्यांच्यात बसला. 56 एका दासीने तेथे त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”
57 पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्याला ओळखत नाही!” 58 थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्याला पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!”
पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!”
59 नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालीलाचा आहे.”
60 परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!”
तो बोलत असताना त्याच क्षणी कोंबडा आरवला. 61 आणि प्रभुने वळून पेत्राकडे पाहिले. पेत्राला प्रभूने उच्चारलेले वाक्य आठवले. “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्याला आठवले. 62 मग तो बाहेर गेला आणि अतिदु:खाने रडला.
लोक येशूचा उपहास करतात(C)
63 येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्याला मारायला सुरुवात केली. 64 त्यांनी त्याचे डोळे बांधले, व त्याला प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?” 65 आणि ते त्याचा अपमान करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.
यहूदी पुढांऱ्यांसमोर येशू(D)
66 दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यात दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक, व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली. आणि ते त्याला त्यांच्या सभेत घेऊन गेले. 67 ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हांला सांग.”
येशू त्यांना म्हणाला, “जरी मी तुम्हांला सागितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. 68 आणि जरी मी तुम्हांला प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. 69 पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.”
70 ते सर्व म्हणाले, “तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय?” त्याने त्यांना उत्तर दिले, “मी आहे असे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.”
71 मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”
2006 by World Bible Translation Center