Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 1-3

एलकाना आणि त्याचे कुटुंबीय यांची शिलोह येथे भक्ती

एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील रामा येथला, एलकाना नावाचा एक गृहस्थ होता. हा एलकाना सूफ घराण्यातला असून यरोहाम (किंवा यरामील) याचा मुलगा. यरोहाम एलिहूचा मुलगा आणि एलिहू तोहूचा. तोहू, एफ्राईम घराण्यातील सूफचा मुलगा होय.

एलकानाला दोन बायका होत्या. एकीचे नाव हन्ना आणि दुसरीचे पनिन्ना. पनिन्नाला मुलंबाळं होती, पण हन्नाला मात्र अजून मूल झाले नव्हते.

एलकाना दरवर्षी रामा या आपल्या गावाहून शिलोह येथे जात असे. तेथे तो यज्ञ आणि सर्वशक्तीमान परमेश्वराची भक्ती करत असे. तेथे हफनी आणि फिनहास हे एलीचे मुलगे याजक म्हणून पौरोहित्य करीत होते. एलकाना दर यज्ञाच्या वेळी पनिन्ना आणि तिची मुले यांना त्यांच्या वाटचे अन्न देई. हन्नालाही तो समान वाटा देई. परमेश्वराने तिची कूस उजवलेली नसतानाही तो देई, कारण हन्नावर त्याचे खरेखुरे प्रेम होते.

हन्नाचा पाण उतारा

पनिन्ना दर वेळी काहीतरी बोलून हन्नाला दु:खवी. मूलबाळ नसल्यावरुन दूषणे देई. असे दरवर्षी चालायचे. शिलो येथील परमेश्वराच्या मंदिरात सर्व कुटुंबीय जमले की पनिन्नाच्या बोलण्यामुळे हन्ना कष्टी होई. एकदा असेच एलकाना यज्ञ करीत असताना हन्ना दु:खीकष्टी होऊन रडू लागली. ती काही खाईना. एलकाना ते पाहून म्हणाला, “तू का रडतेस? तू का खात नाहीस? तू का दु:खी आहेस? तुला मी आहे-मी तुझा नवरा आहे. तू असा विचार कर की मी दहा मुलांपेक्षा अधिक आहे.”

हन्नाची प्रार्थना

सर्वांचे खाणे पिणे झाल्यावर हन्ना गूपचूप उठली आणि परमेश्वराची प्रार्थना करायला गेली. एली हा याजक तेव्हा परमेश्वराच्या पवित्रस्थानाच्या दरवाजाजवळ आपल्या आसनावर बसला होता. 10 हन्ना अतिशय खिन्न होती. परमेश्वराची प्रार्थना करताना तिला रडू कोसळले. 11 परमेश्वराला ती एक नवस बोलली. ती म्हणाली, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझे दु:ख तू बघतोच आहेस. माझा विसर पडू देऊ नकोस. तू मला मुलगा दिलास तर मी तो तुलाच अर्पण करीन. तो परमेश्वराचा नाजीर होईल. तो मद्यपान करणार नाही. त्याचे आम्ही जावळ काढणार नाही.”

12 हन्नाची प्रार्थना बराच वेळ चालली होती. त्यावेळी एलीचे तिच्या तोंडाकडे लक्ष होते. 13 ती मनोमन प्रार्थना करत होती त्यामुळे तिचे ओठ हलत होते पण शब्द बाहेर फुटत नव्हते. त्यामुळे ती दारुच्या नशेत आहे असे एलीला वाटले. 14 एली तिला म्हणाला, “तू फार प्यायलेली दिसतेस. आता मद्यापासून दूर राहा.”

15 हन्ना म्हणाली, “महाशय, मी कोणतेही मद्य घेतलेले नाही. मी अतिशय त्रासलेली आहे. परमेश्वराला मी माझी सर्व गाऱ्हाणी सांगत होते. 16 मी वाईट बाई आहे असे समजू नका. मी फार व्यथित आहे, मला फार दु:खं आहेत म्हणून मी खूप वेळ प्रार्थना करीत होते इतकंच.”

17 तेव्हा एली म्हणाला, “शांतीने जा. इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो तुला देवो.”

18 “तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात अशी आशा आहे.” असे त्याला म्हणून हन्ना निघाली. तिने नंतर थोडे खाल्लेही. आता तिला उदास वाटत नव्हते.

19 दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परमेश्वराची भक्ती करुन एलकानाचे कुटुंबीय रामा येथे आपल्या घरी परतले.

शमुवेलचा जन्म

पुढे एलकाना आणि हन्नाचा संबंध आला तेव्हा परमेश्वराला तिचे स्मरण झाले. 20 यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”

21 एलकाना त्या वर्षी यज्ञ करण्यासाठी आणि देवाला बोललेले नवस फेडण्यासाठी शिलो येथे सहकुटुंब गेला 22 हन्ना मात्र गेली नाही. ती म्हणाली, “मुलगा जेवण खाऊ शकेल इतपत मोठा झाला की मी त्याला शिलोहला घेऊन जाईन. त्याला परमेश्वराला वाहीन. तो नाजीर होईल. मग तो तिथेच राहील.”

23 हन्नाचा पती एलकाना त्यावर म्हणाला, “तुला योग्य वाटेल तसे कर. तो खायला लागेपर्यंत तू हवी तर घरीच राहा. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद खरा ठरो.” तेव्हा हन्ना घरीच राहिली कारण शमुवेल अंगावर पीत होता. त्याचे दूध तुटेपर्यंत ती राहिली.

हन्ना शमुवेलला घेऊन सिलो येथे एलीकडे जाते

24 तो पुरेसा मोठा झाल्यावर हन्ना त्याला शिलोहे येथे परमेश्वराच्या मंदिरात घेऊन आली. तिने तीन वर्षाचा एक गोऱ्हा वीस पौंड पीठ आणि द्राक्षरसाचा बुधला हे ही आणले.

25 ते सर्व परमेश्वरासमोर गेले. एलकानाने नेहमी प्रमाणे परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा बळी दिला. [a] मग हन्नाने मुलाला एलीच्या स्वाधीन केले. 26 ती एलीला म्हणाली “महाशय, माझ्यावर कृपादृष्टी असू द्या मी खरे तेच सांगते. मीच इथे तुमच्याजवळ बसून पूर्वी परमेश्वराजवळ याचना केली होती. 27 परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला. 28 आता मी तो परमेश्वराला अर्पण करते. तो आयुष्यभर परमेश्वराची सेवा करील.”

हन्नाने मग मुलाला तिथेच ठेवले [b] आणि परमेश्वराची भक्ती केली.

हन्नाचे धन्यवाद

हन्नाने परमेश्वराला धन्यवाद देणारे गीत म्हटले;

“परमेश्वराबद्दल माझ्या मनात आनंद मावत नाही.
    त्याच्यामुळे मला सामर्थ्य आले [c]
माझ्या शत्रुंना मी हसते. [d]
    माझ्या विजयाचा मला आनंद आहे!

परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही.
    देवा, तुझ्यावाचून कोणी नाही.
    आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.

लोकहो, बढाया मारु नका.
    गर्वाने बोलू नका.
कारण परमेश्वर सर्वज्ञ आहे.
    तोच लोकांचे नेतृत्व करतो आणि त्यांना न्याय देतो.
शूरांची धनुष्यं भंगतात
    आणि दुर्बळ लोक शक्तीशाली होतात.
पूर्वी ज्यांच्याकडे अन्नाधान्याचे मुबलक साठे होते
    त्यांना आज अन्नासाठी मोल मजुरी करावी लागत आहे.
आणि जे पूर्वी भुकेकंगाल होते
    ते आता आराम करत आहेत.
आजपर्यंत नि:संतान होती
    तिला आता सात मुलं आहेत.
पण मुलबाळ असलेली दु:खी आहे.
    कारण तिची मुलं तिच्यापासून लांब गेली आहेत.

परमेश्वर लोकांना मरण देतो
    आणि परमेश्वरच त्यांना जीवन देतो.
तोच अधोलोकाला नेतो
    आणि वरही आणतो.
परमेश्वरच काहीना दरिद्री तर
    काहींना श्रीमंत करतो.
काही लोकांना लाचार करतो
    तर काहींचा सन्मान परमेश्वरच करतो.
गरीबांना धुळीतून उचलून
    त्यांचे दु:ख हरण [e] त्यांचा गौरव करुन
त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो,
    मानाचे स्थान देतो.
जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली.
    सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे. [f]

सज्जनांना तो आधार देतो.
    त्यांना लटपटू देत नाही.
पण दुर्जनांचा संहार करतो.
    त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ
    अशा वेळी कुचकामी ठरते.
10 शत्रूंचा तो नाश करुन
    त्याच्यावर गर्जेल.
दूरदूरच्या प्रदेशांचाही तो न्याय करील.
    राजाला सामर्थ्य देईल.
    आपल्या खास राजाला बलवान करील.”

11 एलकाना आणि त्याचे कुटुंबीय रामा येथे परतले. मुलगा मात्र शिलोह येथे एली याजकाच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत राहिला.

एलीचे कुपुत्र

12 एलीची मुले वाईट होती. त्यांना परमेश्वराची पर्वा नव्हती. 13 याजकांनी लोकांना जशी वागणूक द्यावी तशी ते देत नव्हते. खरी रीत अशी होती की लोकांनी यज्ञासाठी बळी आणल्यावर याजकांनी ते मांस शिजत ठेवायचे. याजकाच्या नोकराने तीन काटे असलेली आकडी आणायची. 14 तपेल्यात तो त्रिशूल खुपसून त्यावर येईल तेवढेच मांस याजकाने स्वीकारायचे. शिलोह येथे यज्ञासाठी येणाऱ्या सर्व इस्राएलीच्या बाबतीत याजकांनी असेच करायला हवे होते. 15 पण एलीची मुले मात्र असे करत नसत. वेदीवर चरबीचे हवन करण्याआधीच त्यांचा नोकर लोकांजवळ येऊन म्हणे, “याजकांसाठी म्हणून थोडे मांस भाजायला द्या. शिजलेले मांस ते घेणार नाहीत.”

16 “हवान तर होऊ दे, मग हवे तेवढे त्यातून काढून घे,” असे कोणी म्हणालेच तर तो नोकर म्हणे, “नाही, आत्ताच द्या नाहीतर मी जबरदस्तीने काढून घेईन.”

17 परमेश्वराला देण्यात येणाऱ्या यज्ञबली विषयी हफनी आणि फिनेहास यांना कोणताही आदरभाव नव्हता हेच यातून दिसून येई. हे परमेश्वराविरुध्द असलेले मोठे पाप होते.

18 पण शमुवेल मात्र परमेश्वराची सेवा करत असे. एफोद घालून तो मदत करी. 19 त्याची आई दरवर्षी त्याच्यासाठी लहानसा अंगरखा शिवत असे. दरवर्षी नवऱ्याबरोबर शिलोह येथे यज्ञासाठी जाताना ती तो घेऊन जाई.

20 एलकाना आणि त्याची बायको यांना एली मनापासून आशीर्वाद देई. तो म्हणे, “हन्नापासून तुला आणखी संतती होवो. परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेला मुलगा तुम्ही परमेश्वराला दिलात, तेव्हा तुम्हाला आणखी मुले होवोत.”

हन्ना आणि एलकाना मग घरी परतली. 21 परमेश्वराने हन्नावर कृपा केली आणि तिला नंतर तीन मुलगे आणि दोन मुली झाल्या. शमुवेल परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात वाढत होता.

एली आपल्या नीच मुलांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी

22 एली आता म्हतारा होत चालला. शिलोह येथे येणाऱ्या इस्राएलींशी होणारे आपल्या मुलांचे वर्तन पुन्हा पुन्हा त्याच्या कानावर येऊ लागले. दर्शन मंडपाच्या दाराशी सेवेत असलेल्या बायकांशी त्यांनी कसा अतिप्रसंग केला हेही त्याने ऐकले.

23 तेव्हा तो मुलांना म्हणाला, “तुमचे प्रताप माझ्या कानावर आले आहेत. अशी नीच कृत्ये तुम्ही का करता? 24 मुलांनो, असे करत जाऊ नका. परमेश्वराचे लोक तुमच्याविषयी फार वाईट बोलत आहेत. 25 एका माणसाने दुसऱ्या माणसाचा काही अपराध केला तर परमेश्वर एकवेळ त्याच्या मदतीला येईल. पण परमेश्वराविरुध्दच पातक केले तर त्याच्या मदतीला कोण धावून येणार?”

पण एलीच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याकडे साफ दुर्लक्ष केले. तेव्हा परमेश्वराने या मुलांना मारायचे ठरवले.

26 शमुवेल मोठा होत चालला. परमेश्वर आणि लोक त्याच्यावर प्रसन्न होते.

एलीच्या घराण्याविषयी अरिष्ट सूचक भविष्य

27 एकदा परमेश्वराचा संदेष्टा एलीकडे आला आणि म्हणाला, “परमेश्वराने हा निरोप दिला आहे: ‘तुझे पूर्वज फारोच्या घराण्यात दास होते. तेव्हा मी त्यांच्या पुढे प्रगट झालो. 28 इस्राएलच्या सर्व घराण्यांमधून तुमच्याच घराण्याची मी माझे याजक होण्यासाठी म्हणून निवड केली. वेदीवर यज्ञबली अर्पण करावा, धूप जाळावा, एफोद घालावा म्हणून मी तुम्हाला निवडले. इस्राएलचे लोक यज्ञ करतात त्यातील मांस मी तुम्हाला घेऊ दिले. 29 तेव्हा तुम्ही त्या यज्ञाचा आणि देणग्यांचा आदर ठेवत नाही हे कसे? माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांचाच मान ठेवतोस? इस्राएल लोक मला जे मांस वाहतात, त्यातील उत्कृष्ट भाग स्वतःसाठी घेऊन तू पुष्ट झाला आहेस.’

30 “तुझे घराणेच निरंतर त्याची सेवा करील असे इस्राएलचा देव जो परमेश्वर याने म्हटले होते खरे. पण आता त्याचे म्हणणे असे आहे की, ‘इथून पुढे असे होणार नाही. माझा आदर ठेवतात त्यांचा मी मान राखीन. पण जे अनादर करतात त्यांच्यावर संकटे कोसळतील. 31 तुझ्या सर्व वंशजांचा संहार करायची वेळ येऊन ठेपली आहे. तुझ्या घराण्यातील कोणीही आता दीर्घायुषी होणार नाही.. 32 इस्राएलमध्ये सर्व चांगले घडेल. पण तुझ्या घरात मात्र सगळी दुर्दशा होईल. [g] तुझ्या घरातले कोणी म्हातारा होई पर्यत जगणार नाही. 33 माझ्या वेदीजवळ याजक म्हणून सेवा करायला फक्त एकाला मी शिल्लक ठेवीन. त्याला दीर्घायुष्य लाभेल. तो जराजर्जर होईपर्यंत जगेल. तुझे वंशज मात्र तलवारीला बळी पडतील. 34 हे सर्व खरेच घडणार आहे याची प्रचीती मी तुला दाखवीन. तुझे दोनही मुलगे हफनी आणि फिनहास, एकाच दिवशी मरतील. 35 मी एका विश्वासू याजकाची माझ्यासाठी निवड करीन. तो माझे ऐकेल आणि माझ्या मनाप्रमाणे काम करील. या याजकाच्या घराण्याला मी स्थिरस्थावर करीन. मी निवडलेल्या राजापुढे तो सेवेत राहील. 36 मग तुझ्या घरातील उरले सुरले लोक येऊन या याजकापुढे नतमस्तक होतील. किरकोळ रक्कम किंवा भाकरतुकडा याच्यासाठी ते पदर पसरतील आणि म्हणतील, “माझ्या भाकरीची सोय व्हावी म्हणून याजकपदातील एखादे काम मला द्या.”’”

परमेश्वराची शमुवेलला हाक

लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मग्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.

एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता. परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता. तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे.” एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.”

पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.”

शमुवेल झोपायला गेला. पुन्हा परमेश्वराने हाक मारली. “शमुवेल.” शमुवेल परत धावत एलीकडे गेला आणि आपण आल्याचे त्याने सांगितले.

एली म्हणाला, “मी कोठे बोलावलं तुला? जा, झोप.”

परमेश्वर अजून शमुवेलशी कधी प्रत्यक्ष बोलला नव्हता, त्याला त्याने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे शमुवेलने परमेश्वराला ओळखले नाही.

परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.

परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले. तो शमुवेलला म्हणाला, “जाऊन झोप. पुन्हा हाक आली तर म्हण, ‘हे परमेश्वरा, बोल हा तुझा सेवक ऐकत आहे.’”

तेव्हा शमुवेल परत जाऊन झोपला. 10 परमेश्वर आला आणि तिथे उभा राहिला. पहिल्या सारखीच त्याने “शमुवेल, शमुवेल”, म्हणून हाक मारली.

शमुवेल म्हणाला, “बोल, मी तुझा दास ऐकत आहे.”

11 तेव्हा परमेश्वराने शमुवेलला सांगितले, “इस्राएलामध्ये मी आता लौकरच काहीतरी करणार आहे. ते ऐकून लोकांना धक्का बसेल. 12 एली आणि त्याच्या कुटुंबियाबद्दल मी जे बोललो होतो ते सर्व मी अथ पासून इतिपर्यंत करुन दाखवणार आहे. 13 त्याच्या घराण्याचे पारिपत्य करीन असे मी एलीला म्हणालो होतो. आपल्या बहकलेल्या मुलांचे वागणे बोलणे परमेश्वराविरुध्द आहे हे त्याला माहीत असून त्यांना तो ताळ्यावर आणू शकलेला नाही, म्हणून मी हे करणार आहे. 14 आता यज्ञ आणि अर्पण यांनी त्याच्या घरच्यांची पापे धुतली जाणार नाहीत अशी मी शपथ वाहिली आहे.”

15 रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.

16 पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले.

तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.

17 एली म्हणाला, “परमेश्वर तुझ्याशी काय बोलला? मोकळेपणाने सर्व सांग. काही लपवलेस तर परमेश्वर तुला शिक्षा करील.”

18 तेव्हा काहीही न लपवता एलीला शमुवेलने सर्व काही सांगितले.

एली म्हणाला, “तो परमेश्वर आहे. त्याला योग्य वाटेल ते तो करो.”

19 शमुवेल वाढत होता. तेव्हा परमेश्वर त्याच्या बरोबर होता. शमुवेलचे कुठलेही वचन त्याने खोटे ठरु दिले नाही. 20 परमेश्वराचा खरा संदेष्टा म्हणून दान पासून बैर शेबापर्यंत सर्व इस्राएलमध्ये शमुवेलची ख्याती पसरली. 21 शिलोह येथे परमेश्वर त्याला दर्शन देत राहिला. म्हणजेच आपल्या वचनाच्याद्वारे तो शमुवेलसमोर प्रगट झाला.

लूक 8:26-56

भुते अंगात असलेला माणूस(A)

26 नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले. 27 जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.

28-29 जेव्हा त्याने येशूला पाहिले, तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्यापुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “येशू, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंति करतो की, मला त्रास देऊ नको.”तो असे म्हणाला कारण येशूने भुताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते. पायात बेड्या होत्या व त्याला पहाऱ्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भुते त्याला एकांतात घेऊन जात असत.

30 येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”

तो म्हणाला, “सैन्य,” कारण त्याच्यात अनेक भुते शिरली होती. 31 भुतांनी येशूला विनवणी केली की, आम्हांला अनंतकाळच्या अंधारात [a] जाण्याची आज्ञा करु नको. 32 डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी त्याला विनंति केली, “आम्हांला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे.” आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. 33 मग भुते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला.

34 जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले, तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले. 35 काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भुते निघाली होती, त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले. त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता. या घटनेचे त्यांना भय वाटले. 36 ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. 37 तेव्हा गरसेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले. कारण ते सर्व फार घाबरले होते.

मग येशू नावेत बसून परत गेला. 38 ज्याच्या अंगातून भुते तिघाली होती तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी विनवणी करु लागला. पण येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला, 39 “घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग.”

तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगारातील सर्व लोकांना त्याने सांगितले.

येशू मेलेल्या मुलीला जिवंत करतो व आजारी स्त्रीला बरे करतो(B)

40 नंतर जेव्हा येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. 41 त्याचवेळी याईर नावाचा एक मनुष्य आला. तेथील सभास्थानाचा तो अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंति केली. 42 कारण त्याला बारा वर्षांची एक मुलगी होती आणि ती मरावयास टेकली होती.

येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती व तो चेंगरला जात होता. 43 आणि एक स्त्री तेथे होती. तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता. तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करु शकले नाही. 44 ती त्याच्या मागोमाग आली. व तिने त्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि ताबडतोब तिचा रक्तस्राव थांबला. 45 मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?”

ते सर्व जण नाकारीत असताना पेत्र म्हणाला, “सर्व जण आपल्याभोवती गर्दी करीत आहेत आणि तुम्हांला चेंगरीत आहेत.”

46 परंतु येशू म्हणाला, “कोणी तरी मला स्पर्श केला आहे. कारण मला माहीत आहे की, माझ्यातून शक्ति निघाली आहे.” 47 आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कांपत आली आणि त्याच्या पाया पडली. तेथे तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कसे बरे झालो ते सांगितले. 48 तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.”

49 तो हे बोलत असतानाच कोणी तरी सभास्थानाच्या अधिकार्याच्या घरुन आले आणि म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”

50 येशूने हे ऐकले व तो सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास ठेव आणि ती मरणातून वाचविली जाईल.”

51 जेव्हा येशू त्या घरी आला, त्याने आपणाबरोबर पेत्र, योहान, याकोब आणि मुलीचे आईवडील यांच्याशिवाय कोणालाही आत येऊ दिले नाही. 52 सर्व लोक तिच्यासाठी रडत होते. येशू म्हणाला, “रडणे थांबवा, ती मेलेली नाही, ती झोपेत आहे.”

53 पण ते त्याला हसले. कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे. 54 परंतु त्याने तिचा हात धरला आणि मोठ्याने म्हणाला, “मुली, ऊठ!” 55 मग, तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली. 56 तेव्हा तिचे आईवडील आश्चर्याने थक्क झाले, परंतु जे घडले त्याबद्दल कोणालाही सांगू नका अशी त्याने त्यांना आज्ञा केली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center