Old/New Testament
इतर नियम
22 “आपल्यापैकी कोणाचा बैल किंवा मेंढरु मोकाट सुटलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष न करता ते त्याच्या मालकाकडे पोंचते करा. 2 तो मालक जवळपास राहात नसला किंवा कोण ते माहीत नसला तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्याला परत करा. 3 कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा. व त्या शेजाऱ्याला मदत करा.
4 “कोणाचे गाढव किंवा बैल रस्त्यात पडलेले आढळले तर तिकडे दुर्लक्ष करु नका. त्याला उठवून उभे राहायला मदत करा.
5 “बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकोचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने ते निंद्य आहे.
6 “वाटेत तुम्हाला झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे घरटे आढळले आणि मादी अंडी उबवत किंवा पिल्लांवर बसलेली दिसली तर पिल्लांसकट तिला नेऊ नका. 7 हवी तर फक्त पिल्ले घ्या पण आईला सोडा. हे नियम पाळलेत तर तुमचे कल्याण होईल व तुम्ही चिरायु व्हाल.
8 “नवीन घर बांधलेत तर त्याच्या छताला कठडा [a] अवश्य करा. म्हणजे वरुन तोल जाऊन कोणी पडल्यास त्याच्या हत्येचे पातक तुम्हाला लागणार नाही.
यांची सांगड घालू नये
9 “द्राक्षमळ्यात इतर धान्याचे बियाणे पेरु नये. पेरलेत तर सारेच वाया जाईल. धान्य आणि द्राक्षं यापैकी काहीच तुम्हाला वापरता येणार नाही.
10 “बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.
11 “लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरु नका.
12 “वेगवेगळे धागे एकत्र करुन त्यांचे गोंडे [b] आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.
विवाहविषयक नियम
13 “एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि 14 ‘मी या बाईशी लग्न केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले’ असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल. 15 अशा वेळी त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे. 16 ‘मी या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आतां ती त्याला नकोशी झाली आहे. 17 त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा,’ असे मुलीच्या वडलांनी तेथे सांगून, त्या मंडळींना ती चादर दाखवावी. 18 यावर गावाच्या पंचांनी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी. 19 त्याला चाळीस औंस चांदी [c] दंड करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये.
20 “पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर 21 गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही लाजिरवाणी गोष्ट केली आहे. आपल्या वडलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.
स्वैर वर्तन
22 “एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलमधून या दुराचाराचे निमूर्लन करावे.
23 “एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर 24 त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे ती दुसऱ्याची बायको होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकवा.
25 “पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे. 26 त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असे तिने काही एक केले नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले. 27 त्याला ही मुलगी रानात आढळली. त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.
28 “जिचा वाङनिश्चय झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास 29 त्याने मुलीच्या वडीलांना वीस औंस चांदी [d] द्यावी. आता ती त्याची बायको झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.
30 “आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करुन कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”
उपासनेत सहभागी होण्याविषयी
23 “जो भग्नांड किंवा छिन्नेंद्रिय आहे त्याला परमेश्वराच्या उपासनेत सहभागी होण्यास मनाई आहे. 2 ज्यांच्या आईवडीलांचा रीतसर विवाह झालेला नाही त्यानेही उपासनेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.
3 “अम्मोनी आणि मवाबी यांनी व त्यांच्या पुढच्या दहा पिढ्यांनीही इस्राएलांबरोबर उपासनेत सामील होवू नये. 4 कारण तुमच्या मिसरपासूनच्या प्रवासात तुम्हाला अन्नपाणी देण्यास त्यांनी नकार दिला होता. तसेच बलामला पैसे चारुन त्यांनी त्याला तुम्हांला शाप द्यायला लावले. (मेसोपोटेमियातील पथोर नगरामधला बौर याचा बलाम हा मुलगा.) 5 तुमचा देव परमेश्वर ह्याने मात्र बलामचे ऐकले नाही. उलट त्या शापाचे रुपांतर आशीर्वादात केले. कारण तुमचा देव परमेश्वर याचा तुमच्यावर लोभ आहे. 6 या अम्मोनी किंवा मवाबी लोकांबरोबर कधीही सलोखा करु नका. तुम्ही जिवंत असेपर्यंत त्यांच्याशी मैत्री करु नका.
इस्राएलींनी कोणाला आपले म्हणावे?
7 “अदोमी लोकांचा कधीही तिरस्कार करु नका. कारण ते तुमचे आप्त आहेत. तसेच मिसरींचा द्वेष करु नका. कारण त्यांच्या देशात तुम्ही उपरे होतात. 8 अदोमी आणि मिसरी यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांना इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या प्रार्थनेत सहभागी व्हायला हरकत नाही.
सैन्यातील शुचिता
9 “युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा. 10 एखाद्याला रात्री स्वप्नावस्था झाल्यास त्याने छावणीच्या बाहेर जावे. छावणीत राहू नये. 11 मग संध्याकाळी स्नान करावे. आणि सूर्यास्त झाल्यावरच परत छावणीत यावे.
12 “प्रातर्विधींसाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी. 13 आपल्या शस्त्रास्त्रांबरोबरच खणण्यासाठी म्हणून एक कुदळ असावी. प्रातर्विधीस बसण्यापूर्वी एक खड्डा खणावा व विधी आटोपल्यावर त्यावर माती पसरुन तो झाकून टाकावा. 14 कारण तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्याहातून शत्रूचा पराभव करण्यासाठी तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबरच राहणार आहे. तेव्हा छावणी पवित्र असावी. नाहीतर काही किळसवाण्या गोष्टी पाहून तो तुम्हांला सोडून जायचा.
इतर नियम
15 “एखादा गुलाम कधी त्याच्या मालकाकडून पळून जाऊन तुमच्याकडे आला तर त्याला मालकाच्या स्वाधीन करु नका. 16 त्याला तुमच्या वेशीमध्ये हव्या त्या गावात राहू द्या. त्याला जाच करु नका.
17 “इस्राएलच्या स्त्रीपुरुषांपैकी कोणीही देवळातील वेश्या होऊ नये. 18 पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.
19 “आपल्या इस्राएल बांधवांपैकी कोणाला काही उसने दिल्यास त्यावर व्याज लावू नका. पैसा, अन्नधान्य किंवा कोणत्याही व्याजी लावता येण्यासारख्या गोष्टीवर व्याज आकारु नका. 20 परक्याकडून व्याज घेतले तरी चालेल. पण आपल्याच बांधवाला व्याज लावू नका. हे नियम पाळलेत तर, ज्या प्रदेशात तुम्ही राहणार आहात तेथे हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हांला तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल.
21 “तुमचा देव परमेश्वर ह्याला नवस बोललात तर तो फेडायला उशीर करु नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला त्याचा जाब विचारील. नवस फेडला नाहीत तर पाप लागेल. 22 पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही. 23 जे वचन तुम्ही देता ते पाळत जा. देव काही तुम्हाला ‘नवस बोला’ असे म्हणत नाही. तुम्ही स्वखुशीने तो बोलता तेव्हा त्याप्रमाणे वागा.
24 “दुसऱ्याच्या द्राक्षमळ्यातून जात असताना वाटल्यास हवी तितकी द्राक्षे खा पण टोपलीत घालून बरोबर घेऊन जाऊ नका. 25 कोणाच्या शेतातून जाताना धान्याची कणसे खुडून खाऊ शकता पण विळ्याने कापून नेऊ नका.
24 “एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी न आवडणारी गुप्त गोष्ट कळाली व ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे. 2 त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरे लग्न करावे. 3-4 त्यातून समजा असे झाले की या नवऱ्याचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या नवऱ्याने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा नवरा वारला तरी पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये. कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे हे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने निंद्य आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका.
5 “एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्याला द्यावी.
6 “कोणाला काही उसने दिल्यास त्याबद्दल जाते किंवा जात्याची तळी तारण म्हणून ठेवून घेऊ नये. नाहीतर त्याच्या तोंडचा घासच काढून घेतल्यासारखे होईल.
7 “कोणी आपल्या इस्राएली बांधवाला पळवले आणि गुलाम म्हणून त्याची विक्री केली तर त्या पळवणाऱ्या माणसाला ठार करावे व आपल्यामधून अशा दुष्कृत्याचे निर्मूलन करावे.
8 “कोणाला महारोग झाल्याचे आढळले तर लेवी याजकाने सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन करा. माझ्या आज्ञेप्रमाणे याजक सांगतील, ते ऐका. 9 मिसरमधून बाहेर पडल्यावर पुढच्या प्रवासात मिर्यामेचे तुमचा देव परमेश्वर ह्याने काय केले ते चांगले लक्षात असू द्या.
10 “तुम्ही कोणाला कर्ज द्याल तेव्हा तारण मिळवायला त्याच्या घरात शिरु नका. 11 बाहेरच थांबा. मग तो आत जाऊन गहाण ठेवण्याची वस्तू घेऊन येईल. 12 तो फार गरीब असला तर दुसरे काहीच त्याच्याजवळ गहाण ठेवण्यासारखे नसल्यामुळे आपले गरम कपडे आणील. तर ते रात्रभर तुम्ही स्वतःजवळ ठेवू नका. 13 त्याला रोजच्या रोज संध्याकाळ झाली की देत जा म्हणजे त्याला पुरेसे अंथरुन पांघरुण मिळेल. त्याबद्दल तो तुम्हाला दुवा देईल. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने हे तुमचे वागणे न्यायीपणाचे व उचित होय.
14 “तुमच्याकडे काम करणाऱ्या गरीब आणि गरजू नोकरांचे शोषण करु नका. मग तो इस्राएली बांधव असो की तुमच्या गावात राहणारा कोणी परकीय असो. 15 त्याला रोज सूर्यास्तापूर्वी त्याचा रोजगार देत जा. कारण हातावर पोट असल्यामुळे त्याचा उदरनिर्वाह या पैशावरच होतो. तुम्ही मजुरी दिली नाहीत तर तो परमेश्वराकडे आपले गाऱ्हाणे सांगेल आणि तुम्ही पापाचे धनी व्हाल.
16 “मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आईवडलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आईवडलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्याला मिळावी.
17 “गावातील परकीय आणि अनाथ यांना उचित वागणूक मिळावी. विधवेचा कपडालत्ता गहाण ठेवून घेऊ नये. 18 मिसरमध्ये तुम्ही गरीब गुलाम होतात आणि तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला तेथून सोडवून मुक्त केले हे लक्षात ठेवा. दीन दुबळ्यांशी असे वागा हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगत आहे.
19 “शेतातील पीक कापताना एखादी पेंढी तिथेच राहिली तर ती आणायला परत जाऊ नका. अनाथ, उपरे विधवा ह्यांच्यासाठी ती राहू द्या. त्यांना थोडे धान्य मिळाले तर तुम्हांला तुमच्या प्रत्येक कार्यात तुमचा देव परमेश्वर ह्याचा आशीर्वाद मिळेल. 20 जैतून वृक्षांची फळांसाठी झाडणी कराल तेव्हा डहाळ्यांमध्ये कुठे फळे राहिली आहेत का हे पुन्हा पुन्हा तपासू नका. उरलेली फळे अनाथ, परकीय, विधवा यांच्यासाठी राहू द्या. 21 द्राक्षमळ्यातून द्राक्षे खुडताना उरली सुरली द्राक्षेही त्यांच्यासाठीच राहू द्या. 22 तुम्हीही मिसरमध्ये गरीब गुलाम होता म्हणून मी तुम्हाला हे करायला सांगत आहे. त्याची आठवण ठेवा आणि गरिबांसाठी एवढे करा.
यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)
14 वल्हांडण [a] आणि बेखमीर भाकरीच्या सणाच्या [b] दोन दिवस अगोदर प्रमुख याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते. 2 कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”
एक स्त्री काही तरी विशेष करते(B)
3 येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणी एक स्त्री वनस्पतींपासून बनविलेल्या शूद्ध, सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या मस्तकावर ओतले.
4 तेथे असलले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही. 5 कारण हे सुगंधी तेल तीस दिनारापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” त्यांनी तिच्यावर कडक टीका केली.
6 पण येशू म्हणाला, “तिला एकाकी असू द्या. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे. 7 गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे त्या वेळेला त्यांना मदत करणे तुम्हांला शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही. 8 तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे. 9 मी तुम्हांला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”
यहूदा येशूचा शत्रु होतो(C)
10 नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी प्रमुख याजकांकडे गेला. 11 त्यांना हे ऐकून आनंद झाला. आणि त्यांनी त्याला पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधि पाहू लागला.
येशू वल्हांडण सणाचे भोजन खातो(D)
12 बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा मारीत असत तेव्हा येशूचे शिष्य त्याला म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”
13 येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठविले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा, आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हांला भेटेल, त्याच्या मागे जा. 14 आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’ 15 आणि तो तुम्हांला माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपणासाठी तयारी करा.”
16 शिष्य निघाले आणि ते शहरात गेले. आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली.
17 संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला. 18 मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एक जण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवीत आहे.”
19 शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येक जण त्याला म्हणू लागला, “तो मी आहे का?”
20 तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवीत आहे तोच. 21 हाय, हाय, त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याचा नाश होवो. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.”
प्रभु भोजन(E)
22 ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुति केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
23 नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुति केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यांतून प्याले. 24 मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे [c] रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे. 25 मी तुम्हांला खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षारस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपज (द्राक्षारस) पिणार नाही.”
26 नंतर त्यांनी उपकारस्तुतिचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.
2006 by World Bible Translation Center