Old/New Testament
वल्हांडण सण
16 “अबीब महिन्यात लक्षात ठेवून तुमचा देव परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण हा सण साजरा करा. कारण याच महिन्यात तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला रात्रीच्या वेळी मिसरमधून बाहेर काढले. 2 परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वराला अर्पण करा. शेळ्या मेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा. 3 त्यावेळी खमीर घातलेली भाकर खाऊ नका. बेखमीर भाकरी तुम्ही सात दिवस खावी. ही भाकरी म्हणजे ‘संकटाची भाकर’ होय. त्याने तुम्हाला मिसरमधील संकटांची जन्मभर आठवण राहील. किती गडबडीने तुम्हाला तो देश सोडावा लागला होता! त्याचा तुम्ही आमरण विसर पडू देऊ नका. 4 तेव्हा या सात दिवसात देशभर कुणाच्याही घरी खमीर असता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बळी द्याल तो उजाडायाच्या आत खाऊन संपवून टाका.
5 “वल्हांडणाच्या पशूचे यज्ञार्पण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला वस्तीसाठी दिलेल्या कोणत्याही नगराच्या आत करु नका. 6 देव आपले निवासस्थान निवडील तेथेच व सुर्य अस्त होण्याच्या वेळीच ते केले पाहिजे. मिसरमधून परमेश्वराने तुम्हाला बाहेर काढल्याप्रित्यर्थ हा सण आहे. 7 परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच हा यज्ञपशू शिजवून खा. मग सकाळी आपापल्या घरी परत जा. 8 सहा दिवस खमीर विरहीत भाकर खा. सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करु नये. या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन तुमचा देव परमेश्वर ह्याप्रित्यर्थ पवित्र मेळा भरवावा.
सप्ताहांचा (किंवा पन्नासाव्या दिवसाचा) सण
9 “पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा. 10 मग, आपल्या इच्छेनुसार एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा. 11 परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या विशेष निवासस्थानी जा. तेथे तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात सहकुटुंब सहपरिवार आनंदात वेळ घालवा. आपली मुलेबाळे, दास, लेवी गावातील पांथस्थ, अनाथ, विधवा या सर्वांना बरोबर घ्या. 12 तुम्ही मिसरमध्ये दास होता हे विसरु नका. तेव्हा हे नियम न चुकता पाळा.
मंडपाचा सण
13 “खळयातील आणि द्राक्षकुंडांमधील उत्पन्न जमा केल्यावर सात दिवसांनी मंडपाचा सण साजरा करा. 14 हा सणही मुलंबाळं, नोकरचाकर, लेवी, शहरातील वाटसरु, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा. 15 तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या निवासस्थानी, त्याच्या सन्मानार्थ सात दिवस हा सण साजरा करा. तुमच्या पिकांवर आणि तुम्ही घेतलेल्या कष्टांवर तुमचा देव परमेश्वर याची कृपादृष्टि आहे. तेव्हा आनंदात राहा.
16 “तुमचा देव परमेश्वर याच्या पवित्र निवासस्थानी तुम्हातील सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा एकत्र जमले पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मंडपाचा सण हे ते तीन प्रसंग होत. येताना प्रत्येकाने भेटवस्तू आणली पाहिजे. 17 प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय दिले याचा विचार करुन आपण काय द्यायचे ते ठरवावे.
लोकांसाठी न्यायाधीश व अधिकारी
18 “तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेल्या नगरांमध्ये आपापल्या वंशाप्रमाणे न्यायाधीश व अधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात. या व्यक्तींनी नीतीने न्यायदान करावे. 19 त्यांनी नेहमी नि:पक्षपाती असले पाहिजे. त्यांनी लाच घेऊन न्यायनिवाडा करता कामा नये. पैसे पाहून भल्या भल्यांचेही डोळे फिरतात व ते निरपराध लोकांच्या म्हणण्याचा विपर्यास करतात. 20 चांगुलपणा आणि नि:पक्षपातीपणा यांचीच नेहमी कास धरावी. म्हणजे तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिलेला हा प्रदेश संपादन करुन तेथे तुम्ही सुखाने राहाल.
परमेश्वर मूर्तीचा तिरस्कार करतो
21 “जेव्हा तुमचा देव परमेश्वर यासाठी तुम्ही वेदी उभाराल तेव्हा तिच्याशेजारी अशेरा देवीच्या सन्मानार्थ लाकडी स्तंभ उभारु नका. 22 कोणत्याही खोट्या दैवतांसाठी स्तंभ उभारु नका. तुमचा देव परमेश्वर ह्याला अशा गोष्टींचा तिरस्कार वाटतो.
यज्ञपशू निर्दोष असावा
17 “यज्ञात अर्पण करायचा गोऱ्हा किंवा मेंढरु यांच्यात कोणतेही व्यंग असता कामा नये. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.
मूर्तिपूजकांना शासन
2 “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या प्रदेशात राहायला लागल्यावर एखाद्या नगरात दृष्कृत्ये घडल्याचे तुमच्या कानावर येईल. परमेश्वराच्या कराराचा भंग केल्याचे पाप एखाद्या बाईच्या किंवा पुरुषाच्या हातून झाल्याचे कळेल. परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध 3 त्याने इतर दैवतांची पूजा केली, किंवा सूर्य, चंद्र, तारे यांना देवपण दिले अशा स्वरुपाचे ते असेल. मी जी परमेश्वराची आज्ञा तुम्हाला दिली त्याच्या हे विरुद्ध आहे. 4 अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची बालंबाल खात्री झाली पाहिजे. हे खरे असल्याचे सिद्ध झाले 5 तर ही दुष्कृत्ये करणाऱ्याला स्त्री असो वा पुरुष तुम्ही शिक्षा करा. नगराच्या वेशीजवळ भर चौकात त्या व्यक्तीला आणून तिला दगड धोंड्यांनी मरेपर्यंत मारा. 6 त्या व्यक्तिच्या दुष्कृत्याला दोन किंवा तीन साक्षीदार असले पाहिजेत. एकच साक्षीदार असेल तर मात्र अशी शिक्षा करु नका. 7 प्रथम साक्षीदारांनी मारायला हात उचलावा, मग इतरांनी मारावे. अशाप्रकारे आपल्यामधून अमंगळपणा निपटून काढावा.
अवघड न्यायनिवाडे
8 “एखादे खुनाचे प्रकरण, दोन व्यक्तीमधील वाद, किंवा मारामारीत एखादा जखमी होणे अशा सारख्या काही खटल्यांमध्ये न्यायानिवाडा करणे तुम्हाला आवाक्या बाहेरचे वाटेल. या वादांची सुनावणी चाललेली असताना उचित काय ते ठरवणे न्यायाधीशांना जड जाईल. अशा वेळी परमेश्वराने निवडलेल्या पवित्र निवासस्थानी जावे. 9 तेथे लेवी वंशातील याजक व त्यावेळी कामावर असलेला न्यायाधीश यांचा सल्ला घ्या. या समस्येची सोडवणूक ते करतील. 10 परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी ते आपला निर्णय तुम्हाला सांगतील. त्यांचे म्हणणे ऐकून तसे करा. ते जे जे करायला सांगतील ते ते सर्व कुचराई न करता अंमलात आणा. 11 त्यांचा निवाडा शिरोधार्य मानून त्यांच्या सूचनांमध्ये काडीमात्र बदल न करता त्यांच्या सूचना पाळा.
12 “जो याजकाचे व न्यायाधीशाचे ऐकणार नाही त्याला चांगले शासन करा. त्याला मृत्युदंड द्या. इस्राएलमधून या नीच माणसाचे उच्चाटन करा. 13 हे ऐकून इतरांना दहशत बसेल व घाबरुन ते पुढे उन्मत्तपणा करणार नाहीत.
राजाची निवड
14 “तुमचा देव परमेश्वर देत असलेल्या प्रदेशात तुम्ही जात आहात. त्याचा ताबा घेऊन तुम्ही तेथे राहाल. मग इतर राष्ट्रांप्रमाणे आपणही आपल्यावर राजा नेमावा असे तुम्हाला वाटेल. 15 तेव्हा परमेश्वराने निवड केलेल्या व्यक्तिची तुम्ही राजा म्हणून नेमणूक करा. राजा हा तुमच्यापैंकीच असला पाहिजे, परदेशी असता कामा नये. 16 त्याने स्वतःसाठी अधिकाधिक घोडे बाळगता कामा नयेत. घोडदळ वाढवण्यासाठी त्याने मिसरमध्ये माणसे पाठवता कामा नयेत. कारण, ‘तुम्ही पुन्हा माघारी फिरता कामा नये,’ असे परमेश्वराने बजावले आहे. 17 तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
18 “राज्य करायला लागल्यावर त्याने स्वतःसाठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्या जवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे. 19 नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने परमेश्वर देवाचा आदर ठेवावा. 20 म्हणजे आपल्या प्रजेपेक्षा, भाऊबंदापेक्षा आपण कोणी उच्च आहोत अशी जाणीव त्याला स्पर्श करणार नाही. तो नियमांपासून विचलीत होणार नाही. अशाप्रकारे वागल्यास तो व त्याचे वंशज इस्राएलांवर दीर्घकाळ राज्य करतील.
याजक लेवींचा निर्वाह
18 “लेवी वंशातील लोकांना इस्राएलमध्ये जमिनीत वाटा मिळणार नाही. ते याजक म्हणून काम करतील. परमेश्वरासाठी अग्नीत अर्पण केलेल्या बलींवर त्यांनी निर्वाह करावा. तोच त्यांचा वाटा. 2 इतर वंशांप्रमाणे लेवींना जमिनीत वाटा नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वरच त्यांचा वाटा आहे.
3 “यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरु मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा. 4 धान्य, नवीन द्राक्षारस व तेल या आपल्या उत्पन्नातील पहिला वाटाही त्यांना द्यावा. तसेच मेंढरांची पहिल्यांदा कातरलेली लोकरही लेवींना द्यावी. 5 कारण तुम्हा सर्वांमधून लेवी व त्याच्या वंशजांना तुमचा देव परमेश्वर ह्याने आपल्या निरंतर सेवेसाठी निवडून घेतले आहे.
6 “प्रत्येक लेवीच्या मंदिरातील सेवेच्या ठराविक वेळा असतील. पण दुसऱ्या कुठल्या वेळेला त्याला काम करायचे असल्यास तो करु शकतो. इस्राएलमध्ये कुठल्याही नगरात राहणारा कुणीही लेवी घर सोडून परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी येऊ शकतो. हे केव्हाही करायची त्याला मुभा आहे. 7 आपल्या इतर बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी. 8 त्याला इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच.
इतर राष्ट्रांचे अनुकरण नको
9 “तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या प्रदेशात राहायला जाल तेव्हा तिकडच्या राष्ट्रातील लोकांप्रमाणे भयंकर कृत्ये करु नका. 10 आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका. 11 वशीकरण करणाऱ्याला थारा देऊ नका. मध्यस्थ, मांत्रिक तुमच्यापैकी कोणी बनू नये. मृतात्म्याशी संवाद करणारा असू नये. 12 अशा गोष्टी करणाऱ्यांचा तुमचा देव परमेश्वर ह्याला तिरस्कार आहे. म्हणून तर तो इतर राष्ट्रांना तुमच्या वाटेतून बाजूला करत आहे. 13 तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा.
परमेश्वराचा विशेष संदेष्टा
14 “इतर राष्ट्रांना आपल्या भूमीतून हुसकावून लावा. ते लोक मांत्रिक, चेटूककरणारे अशांच्या नादी लागणारे आहेत. पण तुमचा देव परमेश्वर तुम्हाला तसे करु देणार नाही. 15 तो तुमच्यासाठी संदेष्ट्याला पाठवील. तुमच्यामधूनच तो उदयाला येईल. तो माझ्यासारखा असेल. त्याचे तुम्ही ऐका. 16 तुमच्या सांगण्यावरुनच देव असे करत आहे. होरेब पर्वताशी तुम्ही सर्व जमलेले असताना तुम्हाला या पर्वतावरील अग्नीची आणि देववाणीची भीती वाटली होती. तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पुन्हा हा आमचा देव परमेश्वर ह्याचा आवाज आमच्या कानी न पडो. तसा अग्नीही पुन्हा दृष्टीस न पडो, नाहीतर खचितच आम्ही मरु.!’
17 “तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘यांचे म्हणणे ठिकच आहे. 18 मी यांच्यामधूनच तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करीन. माझी वचने त्याच्या मुखाने ऐकवीन. माझ्या आज्ञेप्रमाणे तो लोकांशी बोलेल. 19 हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’
भोंदू संदेष्ट्याची पारख
20 “पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीने बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे. 21 तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार? 22 तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वतःचेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.
मंदिराचा भावी विध्वंस(A)
13 येशू मंदिरातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, खूप मोठ्या दगडांनी बांधलेली या मंदिराची इमारत किती सुंदर आहे.”
2 येशू त्याला म्हणाला “तू या मोठ्या इमारती पाहतोस ना? येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही. त्यातील प्रत्येक खाली पडला जाईल.”
3 येशू मंदिरासमोरच्या जैतुनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया यांनी त्याला एकांतात विचारले, 4 “या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हांस सांगा. आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?”
5 नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. 6 पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील. 7 जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या आफवांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडाणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही. 8 एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी धरणीकंप होतील आणि दुष्काळ होतील. पण या गोष्टी म्हणजे नाशाची सुरूवात आहे.
9 “तुम्ही सावध असा. ते तुम्हांला न्याय सभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हांला मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हांला राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे राहावे लागेल. 10 या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे. 11 ते तुम्हांला अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळची करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचविले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल.
12 “भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांविरूद्ध उठतील आणि ते त्यांना ठार करवितील. 13 आणि माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल.
14 “जेव्हा तुम्ही ‘नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट’, (दानीयेल संदेष्ट्याने सांगितलेला ओसाडीचा अमंगल पदार्थ) जो जिथे नको तेथे पाहाल.” (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) “तेव्हा जे येहूदीयांत आहेत त्यांनी डोंगरात पळून जावे. 15 जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. 16 आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये.
17 “त्या दिवसांत ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पीत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल. 18 हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. 19 कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल. 20 देवाने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.
2006 by World Bible Translation Center