Old/New Testament
मिर्याम व अहरोन मोशेविषयी तक्रार करतात
12 मिर्याम व अहरोन मोशेविरुद्ध बोलू लागले. त्यांनी त्याच्यावर टीका केली कारण त्याने एका इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले. मोशेने त्या इथिओपीयन-कुशी-स्त्रीशी लग्न केले ते योग्य केले नाही असे त्यांना वाटले. 2 ते स्वतःशीच म्हणाले, “परमेश्वराने लोकांशी बोलण्यासाठी मोशेचा उपयोग केला. पण मोशे काय असा एकच नव्हे. परमेश्वर आमच्याद्वारेही बोलला आहे!”
परमेश्वराने हे ऐकले. 3 (मोशे फार नम्र माणूस होता. त्याने कधी अभिमान धरला नाही किंवा बढाई मारली नाही पृथ्वीवरील कोणत्याही माणसापेक्षा मोशे अधिक नम्र होता.) 4 तेव्हा परमेश्वर आला आणि मोशे, अहरोन व मिर्याम ह्यांच्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तिघे आत्ताच्या आता दर्शनमंडपापाशी या!”
तेव्हा मोशे, अहरोन व मिर्याम दर्शनमंडपापाशी गेले. 5 परमेश्वर एका उंच ढगातून खाली आला दर्शनमंडपाचा दारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, “अहरोन व मिर्याम!” तेव्हा अहरोन व मिर्याम त्याच्याकडे गेले. 6 परमेश्वर म्हणाला, “माझे ऐका! तुमच्यातील संदेष्ट्यांना मी परमेश्वर दृष्टांतातून दर्शन देतो, मी त्यांच्याशी स्वप्नात बोलतो 7 परंतु मोशेचे तसे नाही. मोशे माझ्या सर्व घरण्यात विश्वासू आहे. 8 मी त्याच्याशी बोलताना समोरासमोर बोलतो. मी त्याच्याशी दाखल्याने किंवा गुप्त अर्थ असलेल्या गोष्टींनी बोलत नाही-त्याला समजाव्यात अशा गोष्टी मी त्याला स्पष्टपणे दाखवितो. आणि मोशे परमेश्वराचे रुप स्पष्टपणे बघतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत तुम्हाला कशी झाली?”
9 परमेश्वराचा राग त्यांच्यावर खूप भडकला आणि तो त्यांना सोडून निघून गेला. 10 ढग पवित्र निवास मंडपापासून वर गेला. तेव्हा अहरोनाने वळून मिर्यामकडे पाहिले. तिचे अंग बफर्ासारखे पांढरे झाले होते. तिला भयंकर त्वचेचा रोग झाला होता!
11 म्हणून अहरोन मोशेला विनंती करुन म्हणाला, “माझे स्वामी, आम्ही केलेल्या मूर्खपणाच्या पापाबद्दल आमची क्षमा करा. 12 मेलेल्या जन्मलेल्या बाळाच्या चामड्यासारखे तिचे चामडे होऊ देऊ नका.” (कधी कधी आपले अर्धे चामडे खाऊन टाकल्याप्रमाणे एकादे बाळ जन्मते.)
13 म्हणून मोशेने परमेश्वराला विनंती केली, “देवा, तिला ह्या रोगापासून बरे कर.”
14 परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “जर तिचा बाप तिच्या तोंडावर थुंकला असता तर तिला सात दिवस लाज वाटली असती ना! तेव्हा सात दिवस तिला छावणीच्या बाहेर काढ मग ती बरी होईल; मग तिने परत छावणीत यावे.”
15 म्हणून त्यांनी तिला सात दिवस छावणीच्याबाहेर काढले आणि ती छावणीत परत येईपर्यंत लोकांनी आपला मुक्काम हलविला नाही. 16 त्यानंतर लोकांनी हसेरोथ सोडले आणि पारानाच्या रानापर्यंत त्यांनी प्रवास केला आणि तेथे रानातच त्यांनी आपला तळ ठोकला.
हेर कनान देशात जातात
13 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “कनान देश हेरण्यासाठी काही लोकांना पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांना देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका नेत्याला पाठव.”
3 तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानच्या वाळवंटात असताना हे नेते पाठविले. 4 त्यांची नांवे अशी आहेतः
रऊबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा.
5 शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट.
6 यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
7 इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल.
8 एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा.
9 बन्यामीन वंशातला सोदीचा मुलगा पलटी,
10 जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीयेल,
11 योसेफ वंशातला (मनश्शे)-सूसीचा मुलगा गद्दी,
12 दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल,
13 आशोर वंशातला मीकाएलाचा मुलगा सतूर,
14 नफताली वंशातला बाप्सीचा मुलगा नहब्बी.
15 आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल.
16 मोशेने देश हेरावयास पाठविलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेविले.)
17 मोशेने कनान देश हेरण्यास पाठविताना लोकांना सांगितले की “तुम्ही येथून नेगेबमधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा. 18 देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या. 19 ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? ह्या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास 20 योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या.” (हे पहिली द्राक्षे पिकण्याच्या वेळी घडले.)
21 म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन वाळवंटापासून रहोब आणि लेबोहामाथपर्यंतच्या प्रदेशाचा शोध घेतला. 22 त्यांनी नेगेवमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. (हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते.) अहीमन शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहात होते. 23 नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदली द्राक्षाचा घड लागलेला होता. त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघे जण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळींबे व अंजीर ही घेतली. 24 त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.
25 त्या लोकांनी त्या प्रदेशाचा 40 दिवस शोध घेतला. नंतर ते आपल्या छावणीत परत गेले. 26 इस्राएल लोकांची छावणी पारानच्या वाळवंटात कादेशजवळ होती ते लोक मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या सर्व लोकांजवळ गेले. त्यांनी मोशे, अहरोन आणि इतर लोकांना त्यांनी पाहिलेल्या गोष्टीविषयी सांगितले आणि त्या प्रदेशातली फळे त्यांना दाखवली. 27 ते लोक मोशेला म्हणाले, “तू आम्हाला पाठवलेस त्या प्रदेशात आम्ही गेलो. तो प्रदेश अनेक चांगल्या गोष्टींनी भरलेला [a] आहे. त्या प्रदेशात होणारी ही काही फळे पाहा. 28 पण तेथे राहणारे लोक खूप शक्तिशाली आहेत. शहरे खूप मोठी आहेत. शहरांचे रक्षण चांगल्या प्रकारे होते. काही अनाकांच्या वंशाजानाही आम्ही पाहिले. 29 अमालेकी लोक नेगेबमध्ये राहतात. हित्ती, यबूसी आणि अमोरी डोंगराळ भागात राहतात. आणि कनानी लोक समुद्राजवळ आणि यार्देन नदीच्या काठावर राहतात.”
30 मोशेजवळच्या लोकांना गप्प बसायला सांगून कालेब म्हणाला, “परत जाऊन तो प्रदेश आपण घ्यायला पाहिजे. आपण तो प्रदेश सहज घेऊ शकू.”
31 पण जे लोक त्याच्याबरोबर तेथे गेले होते ते म्हणाले, “आपण त्यांच्याशी लढू शकणार नाही. ते आपल्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत.” 32 आणि त्या माणसांनी इस्राएलच्या सर्व लोकांना सांगितले की त्या प्रदेशातल्या लोकांचा पराभव करण्याइतके शक्तिशाली आपण नाहीत. ते म्हणाले, “आम्ही जो प्रदेश पाहिला तो शक्तिशाली लोकांनी भरलेला आहे. ते लोक तिथे जाणाऱ्या कुठल्याही माणसाचा सहज पराभव करण्याइतके शक्तिमान आहेत. 33 आम्ही तिथे खूप नेफीलीम लोक पाहिले. (अनाकाचे वंशज नेफीलीम लोकांपासून आलेले आहेत) त्यांनी आमच्याकडे आम्ही जणू नाकतोडे आहोत अशा नजरेने पाहिले. होय! त्यांच्या दृष्टीने आम्ही नाकतोडेच होतो.”
लोक पुन्हा तक्रार करतात
14 त्या रात्री छावणीतले सगळे लोक जोरजोरात आक्रोश करायला लागले. 2 इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सगळे लोक एकत्र आले आणि मोशेला व अहरोनाला म्हणाले, “आम्ही मिसरमध्ये किंवा वाळवंटात मरुन जायला हवे होते. या नवीन प्रदेशात मारले जाण्यापेक्षा ते अधिक चांगले झाले असते. 3 या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हाला मारून टाकील आणि आमच्या बायका मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
4 नंतर लोक एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
5 तिथे जमलेल्या सर्व लोकांसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले. 6 यहोशवा आणि कालेब यांनी आपले कपडे फाडले (तक्रारी ऐकून झालेल्या दु:खप्रदर्शनासाठी) नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे ही या प्रदेशाच्या शोधात गेलेल्या लोकांपैकी होते. 7 या दोघांनी तिथे जमलेल्या इस्राएल लोकांना सांगितले, “आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे. 8 तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल. 9 म्हणून परमेश्वराविरुद्ध जाऊ नका. त्या प्रदेशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपण त्यांचा पराभव करु शकू. त्यांच्याकडे कसलेही संरक्षण नाही. सुरक्षित राहण्यासाठी काहीही नाही. परंतु आपल्याजवळ परमेश्वर आहे. म्हणून घाबरु नका.”
10 सर्व लोक यहोशवाला आणि कालेबला दगडांनी ठार मारण्याची भाषा बोलू लागले. परंतु परमेश्वराची प्रभा दर्शन मंडपावर दिसू लागली. तेथून ती सर्व लोकांना दिसली. 11 परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक किती वेळ माझ्याविरुद्ध जाणार आहेत? त्यांचा माझ्यावर विश्वास नाही असे ते दाखवितात ते माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला नकार देतात. मी त्यांना खूप शक्तिशाली चिन्हे दाखवली तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी त्यांच्या मध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत. 12 मी त्यांना एखाद्या भयानक आजारने मारून टाकीन. मी त्यांचा नाश करीन. मी तुझा उपयोग करुन दुसरे राष्ट्र निर्माण करीन. तुझा देश या लोकांपेक्षा मोठा आणि शक्तिमान असेल.”
13 नंतर मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू असे केलेस तर ते मिसर मधील लोक ऐकतील तुझ्या लोकांना मिसरमधून बाहेर आणण्यासाठी तू तुझ्या महान शक्तीचा उपयोग केलास हे त्यांना माहीत आहे. 14 मिसरमधल्या लोकांनी कनानच्या लोकांना हे सांगितले आहे. तू परमेश्वर आहेस हे त्यांना अगोदरच माहीत झालेले आहे. तू आपल्या लोकांबरोबर असतोस हे त्यांना माहीत झाले आहे. लोकांनी तुला पाहिले हे त्यांना माहीत आहे. लोकांना खास ढगाविषयी माहिती आहे. तुझ्या लोकांना मार्ग दाखविण्यासाठी तू त्या ढगाचा उपयोग करतोस हे त्या लोकांना माहीत आहे. रात्री त्या ढगाचा अग्नी होतो आणि तुझ्या लोकांना मार्ग दाखवतो हे ही त्यांना माहीत आहे. 15 म्हणून आता तू या लोकांना मारू नकोस. जर तू त्यांना मारलेस तर सर्व देशांना ही बातमी कळेल व ते म्हणतील. 16 ‘परमेश्वर त्या लोकांना त्याने वचन दिलेल्या प्रदेशात आणू शकत नव्हता म्हणून परमेश्वराने त्यांना वाळवंटात मारून टाकले.’
17 “प्रभू, म्हणून आता तू तुझी शक्ती दाखव. तू, ‘मी ती दाखवीन’ असे म्हणाला होतास त्याप्रमाणे दाखव. 18 तू म्हणालास, ‘परमेश्वराला रागवायला वेळ लागतो. तो महान प्रीतिने भरलेला आहे. परमेश्वर अपराधांची व अधर्माची क्षमा करतो [b] पण जे लोक अपराधी आहेत त्यांना परमेश्वर नेहमी शिक्षा करतो. त्यांच्या मुलांना व नातवंडांना शिक्षा करतो आणि पंतवंडाना देखील त्या वाईट गोष्टी [c] बद्दल शिक्षा करतो.’ 19 आता तुझे दिव्य प्रेम या लोकांना दाखव. त्यांच्या पापाची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही क्षमा कर.”
20 परमेश्वराने उत्तर दिले, “तू सांगितलेस त्याप्रमाणे मी लोकांना क्षमा करीन. 21 पण मी तुला सत्य सांगतो. मी नक्कीच जिवंत आहे आणि माझी प्रभा नक्कीच साऱ्या पृथ्वीवर भरून आहे. हे जसे खरे आहे तसेच खरेपणाने मी तुला वचन देतो. 22 मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी दहादा परीक्षा पाहिली. 23 मी त्यांच्या पूर्वजांना वचन दिले. मी त्यांना तो प्रदेश देण्याचे वचन दिले. पण त्यांच्यापैकी जे लोक माझ्याविरुद्ध गेले ते कधीही त्या प्रदेशात पाऊल टाकणार नाहीत. 24 पण माझा सेवक कालेब वेगळा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून मी त्याला त्याने आधी पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाईन. आणि त्याच्या वंशजांना तो प्रदेश मिळेल. 25 अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात रहात आहेत. म्हणून उद्या तुम्ही ही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या वाळवंटात परत जा.”
परमेश्वर लोकांना शिक्षा करतो
26 परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला, 27 “हे वाईट लोक किती काळ माझ्याविरुद्ध तक्रार करीत राहणार आहेत? मी त्यांच्या तक्रारी आणि कुरकुरी ऐकलेल्या आहेत. 28 म्हणून तू त्यांना सांग, ‘ज्याविषयी तुम्ही तक्रार करत. त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला करील. तुम्हाला पुढील गोष्टी होतील. 29 तुम्ही या वाळवंटात मराल. वीस वर्षांचा किंवा त्याहून मोठा असलेला आणि माझ्या लोकापैकी असलेला प्रत्येक जण मरेल. तुम्ही माझ्याविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध तक्रार केली आहे. 30 म्हणून जो प्रदेश देण्याचे वचन मी तुम्हाला दिले त्या प्रदेशात तुमच्यापैकी कोणीही प्रवेश करणार नाही आणि कोणीही राहाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा त्या प्रदेशात जातील. 31 त्या प्रदेशातील लोक तुमची मुले नेतील अशी भीती तुम्हाला वाटली आणि त्याविरुद्ध तुम्ही तक्रार केली. पण मी तुम्हाला सांगतो की मी ती मुले त्या प्रदेशात आणीन. तुम्ही ज्या गोष्टींचा स्वीकार करायला नकार दिला त्या गोष्टींचा ते उपभोग घेतील. 32 आणि तुमच्याबद्दल बोलायचे तर तुम्ही या वाळवंटात मराल.
33 “‘तुमची मुले इथे या वाळवंटात 40 वर्षे भटकणारे मेंढपाळ असतील. त्यांना दु:ख भोगावे लागेल कारण तुम्ही माझ्याशी इमानदार नव्हता. या वाळवंटात जोपर्यंत तुम्ही मरणार नाही तोपर्यंत त्यांना दु:ख भोगावे लागेल. 34 तुम्हाला तुमच्या पापाबद्दल 40 वर्षे दु:ख भोगावे लागेल. (त्या माणसांना तो प्रदेश शोधायला 40 दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष) मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हाला समजेल.’
35 “मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट माणसांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरुद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या वाळवंटात मरतील.”
36 मोशेने ज्या लोकांना नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तिवान नाहीत. 37 इस्राएल लोकांमध्ये संकटे पसरविण्यास तेच लोक जबाबदार होते म्हणून परमेश्वराने त्या लोकांना मारण्यासाठी आजार निर्माण केला. 38 यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो प्रदेश शोधायला पाठवलेल्या लोकांत होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. ज्या आजाराने इतर सर्वजण मेले, तो आजार त्या दोघांना झाला नाही.
लोक कनानमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात
39 मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांना सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले. 40 दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या प्रदेशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हाला वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या प्रदेशात आम्ही जाऊ.”
41 पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हाला यश मिळणार नाही. 42 त्या प्रदेशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल. 43 अमालेकी आणि कनानी लोक तेथे तुमच्याविरुद्ध लढतील. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
44 परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही. 45 डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
येशू मृत मुलीला जीवन देतो व आजारी स्त्रीला बरे करतो(A)
21 नंतर येशू नावेत बसून परत सरोवरापलीकडे गेल्यावर, मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. तो सरोवराजवळ होता. 22 याईर नावाचा यहूद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला. याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला. 23 आणि आग्रहाने विनंति करून त्याला म्हणाला, “माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे. मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा.”
24 मग येशू त्याच्याबरोबर गेला. लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागे चालत होता व ते त्याच्याभोवती गर्दी करीत होते.
25 त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती बारा वर्षांपासून रक्तस्रावाने पीडलेले होती. 26 बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊनसुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते. पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता.
27 त्या स्त्रीने येशूविषयी ऐकले तेव्हा ती गर्दीत त्याच्यामागे आली व त्याच्या झग्याला तिने स्पर्श केला. 28 कारण ती म्हणत होती, “जर मी त्याच्या कपड्यांना शिवले तरी बरी होईन.” 29 जेव्हा तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला, तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला. व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणवले. 30 येशूला ताबडतोब जाणीव झाली की, आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे. तो गर्दीत वळून म्हणाला, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?”
31 शिष्य येशूला म्हणाले, “लोक तुमच्याभोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता, आणि तरीही विचारता, मला कोणी स्पर्श केला?”
32 परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभोवार बघतच राहिला. 33 त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती स्त्री भीतिने थरथर कांपत होती. तिने य़ेशूला सर्व काही सांगितले. 34 येशू त्या स्त्रीला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतिने जा आणि त्रासापासून मुक्त राहा.”
35 तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हणाली, “तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता?”
36 येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहूद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास धर.”
37 येशूने फक्त पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांनाच आपल्याबरोबर येऊ दिले. 38 ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. त्याने लोकांना मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले. 39 तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही. ती झोपली आहे.” 40 ते सर्व त्याला हसले.
त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आईवडील व जे त्याच्याबरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला. 41 त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला, “तलीथा कूम” (म्हणजे “लहान मुली मी तुला सांगतो, ऊठ.”) 42 ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली (ती बारा वर्षाची होती.) ते फार आश्चर्यचकित झाले. 43 नंतर त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की हे कोणाला कळता कामा नये. त्याने तिला खाण्यास देण्याविषयी सांगितले.
2006 by World Bible Translation Center