Old/New Testament
मोशे याजकांना तयार करतो
8 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 “तू अहरोन व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे ह्यांना आणि त्यांची वस्त्रे अभिषेकाचे तेल, पापार्पणाचा गोऱ्या दोन मेंढे आणि बेखमीर भाकरीची टोपली घेऊन, 3 दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.”
4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. लोक दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले. 5 मग मोशे लोकांना म्हणाला, “परमेश्वराने जे करावयाची आज्ञा दिली आहे, ते हे.”
6 मग मोशेने अहरोन व त्याच्या मुलांना आणवून पाण्याने आंघोळ घातली. 7 मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्याला झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि अहरोनावर नक्षीदार सुंदर पट्टी आवळून बांधली. 8 मग मोशेने त्याच्यावर न्यायाचा ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले; 9 नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.
10 मग मोशेने अभिषेकाचे तेल घेतले आणि पवित्र निवास मंडपावर व त्यातील सर्व वस्तूंवर ते शिंपडून त्यांना पवित्र केले. 11 अभिषेकाच्या तेलातून थोडे घेऊन त्याने ते वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक यांच्यावरही त्याने अभिषेकाचे तेल शिंपडले. अशा रीतीने त्याने ते सर्व अभिषेकाने पवित्र केले. 12 मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करुन त्याला पवित्र केले. 13 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना विणलेले सदरे घातले, कमरेस कमरबंद घातले व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
14 मग मोशेने पापार्पणाचा गोऱ्हा आणला आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. 15 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या सर्व शिंगांना ते लावले, अशाप्रकारे त्याने वेदी शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले, अशा रीतीने लोकांनी यज्ञे अर्पण करावीत म्हणून ती पवित्र करण्यासाठी त्याने प्रायश्चित केले. 16 गो-ह्याच्या आंतड्यावरील सर्व चरबी, काळजावरील चरबीचा पडदा आणि चरबीसहित दोन्ही गुरदे घेऊन मोशेने वेदीवर त्यांचा होम केला. 17 परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्रीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.
18 मग त्याने होमापर्णाचा मेंढा आणला. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. 19 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोंवती शिंपडले. 20-21 मग त्याने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याची आंतडी व पाय पाण्याने धुतले व ते घेऊन, तसेच त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन संपूर्ण मेंढ्याचा त्याने वेदीवर होम केला. ते परमेश्वराकरिता अग्नीद्वारे केलेले अर्पण झाले. त्याच्या सुवासाने परमेश्वराला आनंद झाला. परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
22 मग मोशेने दुसरा मेंढा आणला; तो अहरोन व त्याची मुले यांची याजक म्हणून नेमणूक झाली हे दाखवण्याकरिता होता. अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात त्या मेंढ्याच्या डोक्यावर ठेवले. 23 मोशेने त्याचा वध केला व त्याचे थोडे रक्त घेऊन अहरोनाच्या उजव्या कानाच्या पाळीला: उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावले. 24 मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणून त्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला, काही रक्त लावले व मग ते रक्त त्याने वेदीवर व सभोंवती शिंपडले. 25 मोशेने चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील सर्व चरबी काळजावरील चरबीचा पडदा, दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील चरबी व उजवी मांडी घेतली; 26 दररोज एक बेखमीर भाकरीची टोपली देवासमोर ठेवली जात असे मोशेने त्यातून एक बेखमीर पोळी, तेल लावलेली एक भाकर व एक पापडी घेऊन त्या, चरबीवर व मागच्या बाजूच्या उजव्या मांडीवर ठेवल्या. 27 हे सर्व त्याने अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवले आणि परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ते ओवाळले. 28 मग मोशेने ते त्यांच्या हातातून घेऊन वेदीवरील होमार्पणासहित त्यांचा होम केला; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचे याजक म्हणून समर्पण करण्यासाठी हे अर्पण केले. हे होमार्पण होते परमेश्वराला त्यामुळे संतोष झाला. 29 मोशेने मेढ्याच्या उराचा भाग घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून तो परमेश्वरासमोर ओवाळला; याजकाच्या समर्पणासाठी असलेल्या मेंढ्याचा हा भाग मोशेच्या वाट्याचा होता; परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.
30 मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र केली.
31 मोशे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना म्हणाला, “मी सांगितल्याप्रमाणे, ‘अहरोन व त्याच्या मुलांनी हे मांस खावे;’ तेव्हा ही भाकरीची टोपली व याजकाच्या समर्पणासाठीचे हे मांस घ्या; दर्शनमंडपाच्या दारापाशी ते शिजवा आणि मी सांगितल्याप्रमाणे मांस व भाकर तेथेच खा. 32 मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका; 33 तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये. 34 परमेश्वराने आज्ञा केली आहे की आज केल्याप्रमाणे तुमच्यासाठी प्रायश्चित करावे. 35 तेव्हा दर्शनमंडपाच्या दारापाशी तुम्ही सात दिवस व रात्री राहा, ही परमेश्वराची आज्ञा तुम्ही पाळली नाही तर तुम्ही मराल; कारण परमेश्वराने मला तशी आज्ञा दिली आहे.”
36 तेव्हा मोशेच्याद्वारे परमेश्वराने ज्या गोष्टी विषयी आज्ञा दिली होती त्या सर्व अहरोन व त्याच्या मुलांनी केल्या.
याजक आपले काम सुरू करतात
9 आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना (पुढाऱ्यांना) बोलावले. 2 मोशे अहरोनाला म्हणाला, “पापार्पणासाठी एक निर्दोष गोऱ्हा व होमार्पणासाठी निर्दोष मेंढा आण आणि त्यांना परमेश्वराला अर्पण कर; 3 आणि इस्राएल लोकांना असे सांग, ‘तुम्ही पापार्पणासाठी एक बकरा आणा व होमार्पणासाठी एक गोऱ्हा व एक कोकरु आणा; ही दोन्ही एक एक वर्षाची व निर्दोष असावीत; 4 आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी बली म्हणून एक बैल, एक मेंढा व तेलात मळलेले अन्नार्पण आणा कारण आज परमेश्वर तुम्हाला दर्शन देणार आहे.’”
5 मग मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व लोक आले व त्यांनी ते सर्व दर्शनमंडपाच्या दारापाशी आणले मग सर्वजन येऊन परमेश्वरासमोर उभे राहिले. 6 तेव्हा मोशे म्हणाला, “परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही सर्वकाही करावे; मग परमेश्वराचे तेज तुम्हाला दिसेल.”
7 मग मोशेने अहरोनाला सांगितले, “जा व परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व काही कर; वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्चित कर आणि लोकाकडील बळीही अर्पण करुन त्यांच्यासाठी प्रायश्चित कर.”
8 तेव्हा अहरोन वेदीजळ गेला व त्याने स्वतःसाठी पापार्पणाचा गोऱ्हा वधला. 9 मग अहरोनाचे मुलगे रक्त घेऊन त्याच्यापाशी गेले. तेव्हा त्याने आपले बोट त्यात बुडवून ते वेदीच्या शिंगांना लावले मग ते वेदीच्या पायथ्याशी ओतले. 10 त्याने पापार्पणाची चरबी, गुरदे व काळजावरील चरबीचा पडदा घेऊन त्यांचा वेदीवर परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणेच होम केला. 11 मग अहरोनाने मांस कातडे छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले.
12 नंतर त्याने होमबली वधला व त्याचे तुकडे केले; अहरोनाच्या मुलांनी त्या होमबलीचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोंवती शिंपडले. 13 मग अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला. 14 त्याने त्याची आंतडी व पाय धुवून त्यांचाही वेदीवर होम केला.
15 मग त्याने लोकांकडचे अर्पण जवळ नेले व त्यांच्यासाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधला आणि पहिल्याप्रमाणेच तोही पापार्पण म्हणून अर्पिला. 16 त्याने होमबलीही जवळ नेऊन परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे तो अर्पिला. 17 मग त्याने अन्नार्पण वेदीजवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन दररोज सकाळच्या होमार्पणासह तेही अर्पण केले.
18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोंवती शिंपडले. 19 अहरोनाच्या मुलांनी बैलाची व मेंढ्याची चरबी, चरबीदार शेपूट, आंतड्यावरील चरबी, गुरदे आणि काळजावरील चरबीचा पडदा ही सर्व अहरोनाकडे आणली. 20 त्यांनी ती सर्व चरबी त्या बलींच्या ऊराच्या भागावर ठेवली; मग अहरोनाने त्या सर्वाचा वेदीवर होम केला. 21 अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.
22 मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करुन त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.
23 मोशे व अहरोन दर्शन मंडपात गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांना दिसले; 24 तेव्हा परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
देव अहरोनाच्या दोन मुलांचा नाश करतो
10 मग अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपआपली धुपाटणी घेतली व त्यात वेगळ्या अग्नीने धूप पेटवला; परंतु मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी अग्नीचा उपयोग न करता वेगव्व्याच अग्नीचा उपयोग केला; 2 म्हणून परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; ते परमेश्वरासमोर मरण पावले.
3 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.’” तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.
4 अहरोनाचा चुलता उज्जिएल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन मुलगे होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “ह्या पवित्र स्थानाच्या पुढच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”
5 तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.
6 मोशेने अहरोन व त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्यांना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा; 7 पण तुम्ही दर्शनमंडपाच्याबाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.
8 मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, 9 “जेव्हा तू व तुझे मुलगे तुम्ही दर्शनमंडपात जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधि आहे. 10 तुम्ही परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र व सामान्य तसेच शुद्ध व अशुद्ध ह्यामधील भेद जणावा; 11 आणि परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांना शिकवावे.”
12 मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार ह्या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, “परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे; 13 परमेश्वरासाठी अर्पिलेल्या अर्पणाचा तो भाग आहे आणि मी दिलेल्या विधीनियमांच्या शिकवणुकीप्रमाणे तो भाग तुझा व तुझ्या मुलांच्या हव्काचा आहे; परंतु तो तुम्ही पवित्र जागी खावा.
14 “त्याप्रमाणे तू, तुझे मुलगे, व तुझ्या मुली ह्यांनी, ओवळलेला ऊर व मागचा पाय स्वच्छ ठिकाणी खावा; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञापैकी तुला तो हक्क म्हणून दिला आहे. 15 ओवाळणीचा ऊर व समर्पणाची मांडी ही चरबीच्या हव्याबरोबर ओवाळणीचे अर्पण म्हणून लोकांनी परमेश्वरासमोर ओवाळण्यासाठी अणावी; ओवाळून झाल्यावर परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा भाग तुझा व तुझ्या मुलाबाळांचा कायमच्या हक्काचा आहे.”
16 मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्याला कळाले; तेव्हा अहरोनाचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला, 17 “तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हांला दिले होते; 18 त्याचे रक्त पवित्रस्थानात आणण्यात आले नव्हते; माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही त्याचे मांस पवित्र जागीं बसून अवश्य खावयाचे होते.”
19 परंतु अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा, आज त्यांनी आपले पापार्पण व होमार्पण परमेश्वरासमोर अर्पण केले, आणि तरी आज माझ्यावर कशी संकटे आली आहेत हे तू जाणतोस; तेव्हा आज मी पापबली खाल्ला असता तर परमेश्वराला ते आवडले असते, असे तुला वाटते काय? नाही ना!”
20 मोशेने हे ऐकले, तेव्हा त्याचे समाधान झाले.
मनुष्याचा पुत्र सर्वाचा न्याय करील
31 “मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल. 32 मग सर्व राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. 33 तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे. 35 हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी प्रवासी असता तुम्ही माझा पाहुणचार केलात 36 मी कपड्यांशिवाय होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे समाचारासाठी आलात.
37 “मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? 38 आम्ही तुला प्रवासी म्हणून कधी पाहिले आणि तुझा पाहुणचार केला? किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? 39 आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्या समाचारास आलो?’
40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे सांगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.’
41 “मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. 42 ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. 43 मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’
44 “मग ते लोक सुद्धा त्याला उत्तर देतील, ‘प्रभु आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही?’
45 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खरे सांगतो: माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.’
46 “मग ते अनीतिमान लोक अनंतकाळच्या शिक्षेसाठी जातील, पण नीतिमान अनंतकाळच्या जीवनासाठी जातील.”
2006 by World Bible Translation Center