Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 14-15

14 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व (तांबडा) समुद्र यांच्यामध्ये व बालसफोना जवळ असलेल्या पी-हहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा. त्यामुळे इस्राएल लोक रानात वाट चुकले आहेत व गोंधळल्यामुळे राहण्यासाठी त्यांना जागा सापडत नाही असे फारोला वाटेल. मी फारोचे मन कठीण करीन व तो तुमचा पाठलाग करील परंतु मी फारो व त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे.” तेव्हा इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे केले.

फारो इस्राएल लोकांचा पाठलाग करितो

इस्राएल लोक निसटून गेल्याचे फारोला समजले तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले. फारो म्हणाला, “आपण इस्राएली लोकांना आपल्या हातून पळून का जाऊ दिले? आता आपण आपल्या गुलामांना मुकलो आहोत!”

तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लोकांना घेऊन तो निघाला. त्याने सहाशे उत्तम योद्धे व सर्व रथ आपल्या बरोबर घेतले. प्रत्येक रथात एक अधिकारी होता. इस्राएल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने इस्राएल लोकांचा पाठलाग केला.

मिसरच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. त्यांनी इस्राएल लोकांचा पाठलाग करुन इस्राएलींना लाल समुद्र व बालसफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.

10 फारो व त्याचे सैन्य आपणाकडे येताना इस्राएल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले; आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करु लागले. 11 ते मोशेला म्हणाले, “तू आम्हाला मिसरमधून येथे रानात मरावयास का आणले? आम्ही शांतीने मिसरमध्ये मरण पावलो असतो आणि आमच्या कबरांसाठी तेथे भरपूर जागा होती; 12 असे होईल हे आम्ही तुला सांगितले होते! मिसरमध्ये आम्ही म्हणालो, ‘आमची चिंता करु नकोस; आम्ही येथेच राहून मिसरच्या लोकांची सेवाचाकरी करु;’ मिसरामधून येथे रानात येऊन मरण्यापेक्षा, आम्ही मिसरमध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते.”

13 परंतु मोशेने उत्तर दिले, “भिऊ नका! स्थित उभे राहा आणि परमेश्वर आज तुम्हाला वांचवील ते पाहा. आजच्या दिवसानंतर हे मिसरचे लोक तुम्हाला पुन्हा कधीही दिसणार नाहीत. 14 शांत राहण्यावाचून तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. परमेश्वर तुमच्याकरिता त्यांच्याशी लढेल.”

15 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुला माझा धावा करण्याची काही गरज नाही! इस्राएल लोकांना पुढे चालण्याची आज्ञा कर. 16 तांबड्या समुद्रावर तुझ्या हातातली काठी उगार म्हणजे समुद्राचे दोन भाग होतील आणि इस्राएल लोक भर समुद्रातील कोरड्या भूमीवरून चालत जाऊन समुद्र ओलांडतील. 17 मी मिसरच्या लोकांची मने कठीण केली आहेत म्हणून ते तुमचा पाठलाग करतील. परंतु फारो व त्याचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ यांच्यापेक्षा मी अधिक सामर्थ्यवान आहे, असे माझे महात्म्य मी तुम्हाला दाखवून देईन. 18 मग मिसरच्या लोकांना समजेल की मी गौरवशाली परमेश्वर आहे, फारो व त्याच्या घोडेस्वारांचा व रथांचा पराभव केल्यावर मिसरचे लोक मला मान देतील.”

परमेश्वर मिसरी सैन्याचा पराभव करतो.

19 इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला. 20 अशा रीतीने तो उंच ढग मिसरचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; तेव्हा इस्राएल लोकांना प्रकाश मिळाला परंतु मिसरच्या लोकांभोवती अंधार राहिला; त्यामुळे त्या रात्री मिसरचे लोक इस्राएल लोकांना गाठण्यासाठी जराही त्यांच्या जवळ जाऊ शकले नाहीत.

21 मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला व परमेश्वराने पूर्वेकडून जोराचा वारा वाहावयास लाविला. तो रात्रभर वाहिला. तेव्हा समुद्र दुभंगला आणि त्यातील मार्ग वाऱ्यामुळे सुकून कोरडा झाला. 22 आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले. 23 त्यानंतर फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यांनी समुद्रातून इस्राएल लोकांचा पाठलाग केला. 24 तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसरच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. 25 रथांची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसरच्या लोकांना कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलच्या बाजूने आम्हाविरुद्ध लढत आहे.”

26 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी खाली पडून एकत्र होईल व ते फारोचे घोडे, रथ व स्वार यांना बुडवून टाकील.”

27 म्हणून दिवस उजाडण्याच्या आत मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसरच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराने त्यांना पाण्यात बुडवून टाकले. 28 पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यातले कोणीही वाचले नाही.

29 परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमिवरुन भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले. 30 तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिसरच्या लोकांपासून इस्राएल लोकांना वाचविले व त्यांनी ताबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर मिसरच्या लोकांची प्रेते पडलेली पाहिली. 31 तसेच परमेश्वराने आपल्या महान सामर्थ्याने मिसरच्या लोकांचा पराभव केला तेही त्यांनी पाहिले; तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि त्यांनी त्याच्यावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.

मोशेचे गीत

15 नंतर मोशे व इस्राएल लोक परमेश्वराला हे गीत गाऊ लागले:

“मी परमेश्वराला गीत गाईन
    कारण त्याने महान कृत्ये केली आहेत;
घोडा व स्वार यांना
    त्याने समुद्रात फेकून दिले आहे.
परमेश्वर माझे सामर्थ्य आहे.
    तो माझे रक्षण करितो.
    मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन; [a]
परमेश्वर माझा देव आहे;
    तो माझ्या पूर्वजाचा देव आहे;
मी त्याचे गौरव करीन.
परमेश्वर महान योद्धा आहे;
    त्याचे नांव याव्हे आहे.
त्याने फारोचे रथ व स्वार यांना
    समुद्रात फेकून दिले;
त्याने फारोचे उत्तम लष्करी
    अधिकारी तांबड्या समुद्रात बुडविले.
खोल पाण्याने त्यांना बुडविले;
    ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.

“हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;
    त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.
तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरुद्ध बंड करून
    उठणाऱ्यांचा नाश करतोस;
अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे
    तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
तू वाहविलेल्या जोराच्या वाऱ्याने
    पाणी राशी सारखे उंच उभे राहिले
व जोराने वाहणाऱ्या पाण्याची टणक भिंत झाली;
    समुद्राचे पाणी अगदी खोलवर घट्ट टणक बनले.

“शत्रु म्हणाला,
    ‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन,
मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल.
    माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन;
    माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वतः करिता घेईन.’
10 परंतु तू त्यांच्यावर फुंकर वायु सोडलास
    आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;
ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल
    पाण्यात तळापर्यंत बुडाले.

11 “परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का?
    नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही;
    तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस!
    तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे!
    तू महान चमत्कार करतोस!
12 तू तुझा उजवा हात उगारला पृथ्वीने
    त्यांना गिळून टाकले.
13 तू उद्धारिलेल्या लोकांना
    तू तुझ्या दयाळूपणाने चालविले आहेस;
तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र
    आणि आनंददायी प्रदेशात नेले आहेस.

14 “इतर राष्ट्रे ही गोष्ट
    ऐकून भयभीत होतील;
    पलिष्टी लोक भीतीने थरथरा कांपतील.
15 मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक
    भीतीने थरथरा कांपतील
    आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.
16 तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,
    आणि परमेश्वराचे लोक म्हणजे तू तारलेले लोक निघून पार जाईपर्यंत
ते तुझ्या लोकांना काहीही न करता,
    दगडासारखे एकाच जागी उभे राहतील;
17 तू तुझ्या लोकांना
    तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील;
हे परमेश्वरा, तू त्यांना तुझ्या सिहांसनासाठी तयार केलेल्या ठिकाणाजवळ राहू देशील,
    व तू हे परमेश्वरा तू तुझे मंदिर बांधशील.

18 “परमेश्वर सदासर्वदा राज्य करो!”

19 फारोचे घोडे, घोडेस्वार व रथ समुद्रात गेले आणि परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.

20 त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया गाऊ व नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;

21 “परमेश्वराला गीत गा;
    कारण त्याने महान कृत्ये केली आहेत.
त्याने घोडा व घोडेस्वार यांना
    समुद्रात फेकून दिले आहे....”

22 मोशे इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी मिळाले नाही. 23 तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नांवाच्या ठिकाणी पोहोंचले; तेथे पाणी होते परंतु ते फार कडू असल्यामुळे लोकांना ते पिववेना, (म्हणूनच त्या ठिकाणाचे नांव मारा पडले).

24 लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”

25 मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. मोशेने ते झाड पाण्यात टाकले तेव्हा ते पाणी गोड म्हणजे पिण्यालायक झाले.

त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांच्या विश्वासाची कसोटी घेतली. 26 परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा; ज्या गोष्टी चांगल्या आहेत असे तो म्हणतो त्या तुम्ही करा; जर तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा व विधी पाळाल तर तुम्हाला मिसरच्या लोकांप्रमाणे पीडा भोगाव्या लागणार नाहीत आणि मी जो परमेश्वर त्या मी मिसरच्या लोकांवर जे रोग पाठवले ते तुम्हांवर पाठविणार नाही; मी परमेश्वर आहे; तुम्हाला बरे करणारा मीच आहे.”

27 मग इस्राएल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणी गेले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.

मत्तय 17

येशू मोशे व एलीयाबरोबर दिसतो(A)

17 सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले. त्याचे शिष्य पाहत असतानाच येशूचे रुप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. तेव्हा मोशे व एलीया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले.

पेत्र येशूला म्हणाला, “प्रभु, येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”

पेत्र बोलत आहे, इतक्यात, एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या ढगातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”

येशुबरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार भ्याले होते. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.” मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही.

येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, डोंगरावर त्यांनी जे पाहिले ते कोणालाही सांगू नये. मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत वाट पाहा.

10 मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की, एलिया अगोदर आला पाहिजे?”

11 तेव्हा त्याने उत्तर दिले, “एलिया येऊन सर्व काही पूर्ववत करील हे खरे, 12 पण मी तुम्हांला सांगतो की, एलीया आलाच आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्याला केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे.” 13 तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे.

येशू एका फेफरेकरी मुलाला बरे करतो(B)

14 नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, 15 “प्रभु, माझ्या मुलावर दया करा. त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. 16 मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना.”

17 येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा.” 18 येशूने त्या मुलामध्ये असलेल्या भुताला कडक रीतीने धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.

19 नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला (त्याच्यातील भूत) का काढता आले नाही?”

20 तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता, येथून निघून तेथे जा, तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.” 21 [a]

येशू स्वतःच्या मरणाविषयी बोलतो(C)

22 जेव्हा ते एकत्र गालीलात आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाणार आहे. 23 ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दु:खी झाले.

येशू कर देण्याविषयी शिकवितो

24 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा मंदिराचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू कराचा रूपया देत नाही काय?”

25 त्याने म्हटले, “होय देतो.”

मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्याअगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?”

26 जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून.”

तेव्हा येशूने त्याला म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत. 27 तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रूपयांचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल दे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center