Old/New Testament
आपल्या लोकांनी परत यावे ही परमेश्वराची इच्छा
1 बरेख्या मुलगा जखऱ्या ह्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीला एक वर्ष आणि आठ महिने झाले, तेव्हाची ही गोष्टी. (जखऱ्या बरेख्याचा मुलगा व बरेख्या प्रेषित इद्दोचा मुलगा होय.) हा संदेश पुढीलप्रमाणे होता:
2 परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता. 3 म्हणून तू पुढील गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेस. परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुमच्याकडे येईन.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
4 परमेश्वर म्हणाला, “तुमच्या पूर्वजांप्रमाणे वागू नका. तुमच्या पूर्वजांनी आपली वाईट वर्तणूक बदलावी, वाईट गोष्टी करण्याचे टाळावे, ही सर्व शक्तिमान परमेश्वराची इच्छा असल्याचे, त्या काळच्या संदेष्ट्यांनी त्यांना समजावून सांगितले. होते. पण त्यांनी माझे ऐकले नाही.” परमेश्वराने ह्या गोष्टीची आठवण करुन दिली.
5 परमेश्वर म्हणाला, “तुमचे पूर्वज कालवश झाले आणि ते संदेष्टेसुध्दा चिरकाल जगले नाहीत. 6 ते संदेष्टे माझे सेवक होते. त्यांच्यामार्फत मी तुमच्या पूर्वजांना माझे नियम आणि शिकवणूक कळवीत असे. शेवटी तुमच्या पूर्वजांना धडा मिळाला. ते म्हणाले, ‘सर्व शक्तिमान परमेश्वराने बोलल्याप्रमाणे केले. आमच्या दुराचाराबद्दल व दुष्कृत्यांबद्दल आम्हाला शिक्षा केली.’ आणि ते देवाला शरण आले.”
चार घोडे
7 पारसचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या म्हणजे शेवटच्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्याला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. (जखऱ्या हा बरेख्याचा मुलगा. बरेख्या संदेष्टा इद्दोचा मुलगा.) संदेश असा होता:
8 रात्री, तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक माणूस मी पाहिला. तो दरीमध्ये हादस्सीमच्या झुडुपांत उभा होता. त्याच्या मागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते. 9 मी विचारले, “महाराज, हे घोडे इकडे कशाकरिता?”
तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत म्हणाला, “हे घोडे इकडे कशाकरिता आलेत हे मी तुला दाखवीन.”
10 मग हादस्सीमच्या झुडुपांत उभा असलेला माणूस म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे घोडे पाठविलेत.”
11 नंतर ते घोडे हादस्सीमच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दूताशील बोलले. ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो. सर्वत्र स्थैर्य व शांतता आहे.”
12 मग परमेश्वराच्या दूताने विचारले, “परमेश्वरा, यरुशलेमची आणि यहूदाच्या नगरीचे तू समाधान करण्यापूर्वी त्यांची दु:खातून मुक्तता होण्यास आणखी किती वेळ आहे? गेली सत्तर वर्षे तू या नगरींवर कोपला आहेस.”
13 माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या दूताला मग परमेश्वराने उत्तर दिले. परमेश्वर चांगल्या व सांत्वनपर शब्दांत बोलला. 14 मग परमेश्वराच्या दूताने मला पुढील गोष्ट लोकांना कळविण्यास सांगितल्या: सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो:
“मला यरुशलेम व सियोन यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते.
15 आणि जी राष्ट्रे स्वतःला सुरक्षित समजतात, त्यांच्याबद्दल मला अतिशय राग आहे.
मी थोडासा रागावलो
आणि माज्या लोकांना शिक्षा करण्यासाठी मी त्या राष्ट्रांचा उपयोग केला.
पण त्या राष्ट्रांनी प्रचंड नुकसान केले.”
16 म्हणून परमेश्वर म्हणतो, “मी यरुशलोमला परत येईन आणि दया करुन तिचे दु:ख हलके करीन.”
सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमची पुन्हा उभारणी केली जाईल
आणि तिथे माझे निवासस्थान बांधले जाईल.”
17 देवदूत म्हणाला, “लोकांना हेही सांग की, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
‘माझ्या नगरी पुन्हा संपन्न होतील.
मी सियोनचे सांत्वन करीन.
माझी खास नगरी म्हणून मी यरुशलेमची निवड करीन.’”
चार शिंगे व चार कामगार
18 मग मी वर बघितले असता मला चार शिंगे दिसली. 19 माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी त्या शिंगांचा अर्थ विचारला.
तो म्हणाला, “इस्राएल, यहूदा व यरुशलेम येथील लोकांना देशोधडीला लावण्यास ह्याच शिंगांनी भाग पाडले.”
20 मग परमेश्वराने मला चार कामगार दाखविले. 21 मी देवाला विचारले, “ते चार कामगार कशासाठी येत आहेत?”
तो म्हणाला, “ते शिगांना घाबरवण्यासाठी आणि त्यांना दूर भिरकावून देण्यासाठी आले आहेत. त्या शिंगांनी यहूदाच्या लोकांना बळजबरीने देशोधडीला लावले. त्या शिंगांनी कोणालाही दया दाखवीली नाही. ती म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करुन त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची प्रतीके आहेत.”
यरुशलेमची मोजणी
2 मग मी नजर वर वळविली, तेव्हा मला मोजमापाची दोरी घेतलेला एक माणूस दिसला. 2 मी त्याला विचारले, “तू कोठे चाललास?”
तो मला म्हणाला, “मी यरुशलेमची मोजणी करायाला चाललोय मला यरुशलेमची लांबी-रुंदी पाहायची आहे.”
3 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून गेला. आणि दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला. 4 दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हमाला, “धावत जा, आणि त्या तरुणाला सांग की यरुशलेम मोजमाप करण्यापलीकडे होईल. त्याला पुढील गोष्टी सांग
‘यरुशलेम ही तटबंदी नसलेली नगरी असेल.
कारण तेथे खूप माणसांचे व प्राण्यांचे वास्तव्य असेल.’
5 परमेश्वर म्हणतो,
‘मी तिचे रक्षण करणारा अग्नीची भिंत बनेन.
तिला वैभव प्राप्त व्हावे म्हणून मी स्वतः तेथे राहीन.’”
आपल्या लोकांना देवाचे पाचारण
देव म्हणतो,
6 “त्वरा करा! उत्तरे तील प्रदेशातून पळून जा.
होय! मी तुमच्या लोकांना प्रत्येक दिशेला पांगविले हे सत्य आहे.
7 तुम्ही सियोनवासी बाबेलचे कैदी आहात.
पण आता निसटा! त्या नगरातून दूर पळा!”
8 सर्वशक्तिमान परमेश्वर माझ्याविषयी असे म्हणाला,
“की त्याने तुमची लूट करणाऱ्या मला पाठवले.
तुम्हाला मान मिळावा म्हणून त्याने मला पाठवले.
का? कारण जर त्यांनी तुला दुखविले तर ते (कृत्य) देवाच्या डोळ्यातील बुबुळाला इजा करण्यासारखेच आहे.
9 बाबेलच्या लोकांनी माझ्या लोकांना कैदी म्हणून पकडून नेले.
आणि त्यांना गुलाम बनवले.
पण मी त्यांचा पराभव करीन आणि ते माझ्या लोकांचे गुलाम होतील.”
तेव्हा तुम्हाला पटेल की सर्वशक्तिमान परमेश्वराने मला पाठविले आहे.
10 परमेश्वर म्हणतो,
“सियोने, खूष हो!
का? कारण मी येत आहे व मी तुझ्या नगरीत राहीन.
11 त्या वेळी पुष्कळ राष्ट्रांमधील लोक
माझ्याकडे येतील.
ती माझी माणसे होतील.
मी तुझ्या नगरीत राहीन.”
मग मला सर्व शक्तिमान परमेश्वराने पाठविले
असल्याचे तुला समजेल.
12 स्वतःची खास नगरी म्हणून परमेश्वर यरुशलेमची फेरनिवड करील
यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.
13 सर्वजण शांत राहा!
आपल्या पवित्र निवासातून परमेश्वर येत आहे.
मुख्याजक
3 मग देवदूताने मला मुख्यायाजक यहोशवा दाखविला. योशीया परमेश्वराच्या दूताच्या पुढे होता. सैतान योशीयच्या उजव्या बाजूस उभा होता. सैतान योशीयावर वाईट कृत्ये करीत असल्याचा आरोप करण्यासाठी आला होता. 2 मग परमेश्वराचा दूत म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला दोष देतो, आणि तो तुला दोष देतच राहील. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरुशलेमची निवड केली आहे. आगीतून पेटलेल्या काटकीला ओढून काढावे, तसे देवाने यरुशलेमला वाचविले.”
3 यहोशवा देवदूतापुढे उभा होता. त्याने मळकी वस्त्रे घातली होती. 4 मग जवळ उभ्या असलेल्या इतर देवदूतांना हा देवदूत म्हणाला, “यहोशवाची मळकी वस्त्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत योशीयाशी बोलला. तो म्हणाला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि वस्त्रबदल म्हणून तुला नवीन वस्त्रे देत आहे.”
5 मग मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला स्वच्छ फेटा बांधा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला. परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्याला स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली. 6 मग परमेश्वराच्या दूताने यहोशवाला पुढील गोष्टी सांगितल्या:
7 सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला,
“मी सांगतो त्या प्रमाणे जीवन जग.
मी सांगितलेल्या गोष्टी कर.
मग माझ्या मंदिराचा तूच मुख्य अधिकारी होशील.
मंदिराच्या पटांगणाची तू निगा राखशील.
येथे उभ्या असलेल्या देवदूतांप्रमाणे तुलाही माझ्या
मंदिरात कोठेही वावरायला मोकळीक असेल.
8 तेव्हा यहोशवा मुख्ययाजका,
तू स्वतः व तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे.
माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत.
त्याला कोंब म्हणतील.
9 पाहा! मी यहोशवापुढे विशेष दगड ठेवतो.
त्याला सात बाजू [a] आहेत.
मी त्यावर खास संदेश कोरीन.
तो संदेश, मी एका दिवसात पृथ्वीवरील [b] सर्व पाप नाहीसे करीत असल्याचे दाखवील.”
10 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“त्या वेळी, लोक आपल्या
मित्रांबरोबर व शेजाऱ्यांबरोबर बसून गप्पा मारतील.
ते एकमेकांना अंजिराच्या झाडाखाली
व द्राक्षवेलीखाली बसण्यासाठी बोलवतील.”
दिवठाण आणि जैतुनाची दोन झाडे
4 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने मला जागे केले. झोपेतून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे मला वाटले. 2 मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते आहे?”
मी म्हणालो, “मला भरीव सोन्याचे दिवठाण दिसत आहे. त्यावर सात दिव [c] आहेत. दिवठाणाच्या डोक्यावर एक वाटी आहे. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते. 3 वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.” 4 माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, या गोष्टींचा अर्थ काय?”
5 तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?”
“नाही महाराज!” मी म्हणालो
6 मग त्याने मला सांगितले “हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे. तो असा: ‘तुझ्या बलाने अथवा शक्तीने नव्हे तर माझ्या आत्म्याद्वारे तुला मदत मिळेल.’ सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. 7 तो उंच पर्वत जरुब्बाबेलला सपाट प्रदेश वाटेल. तो मंदिर उभारेल. मंदिराचा सर्वांत महत्वाचा दगड बसविल्यावर लोक ‘सुंदर! सुंदर!’” असा जल्लोश करतील.
8 परमेश्वराच्या संदेशाने मला आणखी सांगितले, 9 “जरुब्बाबेल माझ्या मंदिराचा पाया घालेल. तो जेव्हा मंदिर बांधून पूर्ण करील तेव्हा तुम्हाला समजेल की सर्व शक्तिमान परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठविले आहे. 10 लोकांना लहानशा आरंभाची लाज वाटणार नाही. आणि जेव्हा जरुब्बाबेल ओळंबा घेऊन पूर्ण बांधून झालेल्या मंदिराची मोजमापे घ्याला लागेल व तपासून पाहील, तेव्हा त्यांना खरोखरीच आनंद वाटेल. तू पाहिलेल्या दगडाच्या सात बाजू म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्व काही पाहतात.”
11 मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?” 12 मी त्याला असेही म्हणालो की मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून सोनेरी तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
13 तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला ह्या गोष्टींबद्दल माहीती नाही?”
मी म्हणालो, “नाही, महाराज!”
14 तेव्हा देवदूत म्हणाला, “परमेश्वराची सेवा करण्यासाठी सर्व जगातून निवडलेल्या दोन माणसांची [d] ती प्रतीके आहेत.”
बाबेलचा नाश होतो
18 यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला आकाशातून खाली येताना पाहिले. त्याच्याकडे मोठे अधिकार होते. आणि त्याच्या गौरवाने पृथ्वी झळाळत होती. 2 प्रचंड आवाजात तो ओरडला:
“पडली!
महान बाबेल पडली!
ती दुष्ट आत्म्यांचे घर बनली आहे.
आणि प्रत्येक दुष्ट आत्म्याचा आश्रय
आणि प्रत्येक अशुद्ध,
धिक्कारलेल्या पक्षांचा
आश्रय झाली आहे.
3 कारण तिच्या व्याभिचाराचा द्राक्षारस जो वेड लावणारा आहे
तो सर्व राष्ट्रांनी प्याली आहेत.
पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आहे
आणि पृथ्वीवरील व्यापारी तिच्या अति संपत्तीने व ऐषारामाने श्रीमंत झाले आहेत.”
4 मग मी दुसरा एक आवाज आकाशातून ऐकला. तो म्हणाला:
“माइया लोकांनो, तिच्यातून बाहेर
या यासाठी की तिच्या पापात तुमचा वाटा असू नये यासाठी
की तुमच्यावर तिच्या कोणत्याही पीडा येऊ नयेत.
5 कारण तिची पापे स्वर्गाला भिडली आहेत.
आणि देवाला तिच्या अपराधांची आठवण झाली आहे.
6 तिने ज्याप्रमाणे तुम्हाला दिले आहे, तसे तुम्ही तिचे परत करा.
तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा
तिने दुसऱ्यांना दिले त्याच्या दुप्पट प्रमाणात
तेच मद्य तिच्या प्याल्यात भरा.
7 तिने स्वतःला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात
तुम्ही तिला छळ व दु:ख द्या.
ती तिच्या अंतःकरणात गर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते,
मी विधवा नाही.’
आणि ‘मी केव्हाच शोक करणार नाही.’
8 म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील.
(त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती
आगीत भस्म होऊन जाईल
कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.
9 “पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळत असताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील. 10 तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूर उभे राहतील, आणि ओरडतील:
‘भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल,
सामर्थ्याच्या शहरा!
एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!’
11 “पृथ्वीचे व्यापारी तिच्यासाठी रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणीही घेणार नाही. 12 तो माल असा: सोने, चांदी, मौल्यावान रत्ने, मोती, तागाचे तलम कापड, किरमिजी, रेशमी व जांभळे कापड, निरनिराळ्या प्रकारचे सुगंधी लाकूड, सर्व प्रकारची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची हस्तीदंती पात्रे, मोलवान लाकडे, तांब्याची, लोखंडाची व संगमरवरी पाषाणाची पात्रे. 13 दालचिनी, उटणे ऊद, धूप, द्राक्षारस व जैतुनाचे तेल, मैदा व गहू, गुरेढोरे व मेंढरे, घोडे व रथ, दासदासी, मानवी जीव.
14 ‘बाबेल, ज्या उत्तम गोष्टींची तुला अपेक्षा होती,
त्या गोष्टी आता तुझ्यापासून गेल्या आहेत तुझी सर्व श्रीमंती व वैभव नाहीसे झाले आहे.
त्याची तुला परत कधी भरपाई होणार नाही.’
15 “ज्या व्यापाऱ्यांनी असा माल विकला, आणि त्यांची संपत्ति तिच्यापासून मिळविली ते तिच्या पिडेच्या भितीमुळे दूर उभे राहतील, ते रडतील व शोक करतील. 16 आणि ओरडतील:
‘भयंकर! भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे,
किरमीजी व जांभळे पोशाख
नेसून जी नगरी सजली होती सोने,
मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती झगमगत होती!
17 एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ति नष्ट झाली!’
“प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील. 18 आणि ती जळत असताना तिचा धूर ते पाहतील तेव्हा ते ओरडून म्हणतील, ‘या नगरीसारखी दुसरी एवढी महान नगरी झाली नाही.’ 19 मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील.
‘भयंकर! भयंकर! हे महान नगरी,
ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे
श्रीमंत झाले एका तासात तिचा सर्वनाश झाला.
20 हे स्वर्गा, तिच्याबद्दल आनंद कर!
संतानो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो आनंद करा!
तिने ज्या प्रकारे तुम्हाला नागविले त्याबद्दल देवाने तिचा न्याय केला आहे.’”
21 मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला. आणि म्हणाला:
“अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल
आणि परत ती कधीही कोणाला सापडणार नाही.
22 वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा
आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधी तुझ्या येथे ऐकू येणार नाही.
कोणताही कारागिरीचा व्यापारी
तुझ्यामध्ये आढळणार नाही
तुझ्या येथे जात्याचा आवाज
कधी ऐकू येणार नाही.
23 दिव्याचा प्रकाश तुझ्यामध्ये
पुन्हा कधी प्रकाशणार नाही
तुझ्या येथे वधूवरांचा आवाज
पुन्हा कधी ऐकू येणार नाही
तुझे व्यापारी जगातील मोठी माणसे होती
तुझ्या जादूटोण्यामुळे सर्व राष्ट्रे बहकली गेली
24 त्या नगरीमध्ये संदेष्ट्यांचे देवाच्या पवित्र लोकांचे
आणि जगात ज्यांची हत्या करण्यात आली अशांचे रक्त सांडल्याचे दिसून आले.”
2006 by World Bible Translation Center