Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहेज्केल 47-48

मंदिरातून वाहणारे पाणी

47 त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या दाराशी नेले. मंदिराच्या पूर्वेकडील उंबऱ्याच्या खालून पाणी वाहताना मला दिसले (मंदिराचे तोंड पूर्वेला होते.) मंदिराच्या दक्षिणेच्या भागाखालून पाणी वेदीच्या दक्षिणबाजूने वाहात होते. त्या माणसाने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. पाणी दाराच्या दक्षिणेकडून येत होते.

हातात मोजमापाची फीत घेऊन तो माणूस पूर्वेला गेला. त्याने 1,000 हात (1/3 मैल) अंतर मोजले मग त्याने मला त्या अंतरापर्यंत पाण्यातून जायला सांगितले. पाणी फक्त घोट्यापर्यंत होते. मग त्याने आणखी 1,000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजले. पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले. तेथे पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले. मग त्याने पुन्हा 1,000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजून, तेथपर्यंत मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तेथे पाणी कमरेइतक्या खोलीचे होते. त्या माणसाने पुढे आणखी 1,000 हात (1/3 मैल) अंतर मोजले. पण येथे पाणी खूपच खोल असल्याने त्यातून चालणे शक्य नव्हते. त्याची नदी झाली होती. पाणी पोहता येईल इतके खोल होते. पार करता येणार नाही इतक्या खोलीची ती नदी होती. तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला दिसलेल्या गोष्टी तू लक्षपूर्वक पाहिल्यास ना?”

मग त्याने मला नदीच्या काठाने परत आणले. नदीच्या काठाने परत येताना नदीच्या दोन्ही तीरांवर मला दाट झाडी दिसली. तो माणूस मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेला वाहते. हे अरब दरीतून जाऊन मृत समुद्राला मिळते. त्यामुळे त्या समुद्राचे पाणी ताजे होते. हे पाणी मृत समुद्राला मिळत असल्याने तेथील पाणी ताजे व स्वच्छ होते. तेथे खूप मासे मिळतात. ह्या नदीकाठच्या प्रदेशात सर्व प्रकारचे प्राणी आहेत. 10 एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत तुला मच्छीमार नदीकाठी उभे असलेले दिसू शकतील. आपापली जाळी टाकून अनेक प्रकारचे मासे ते पकडत असल्याचे तुला दिसेल. भूमध्य समुद्रात जितक्या प्रकारचे मासे आहेत, तितक्याच प्रकारचे मासे मृतसमुद्रात आहेत. 11 पण दलदल आणि पाणथळीच्या लहान लहान जागा मिठासाठी तशाच ठेवल्या जातील. 12 नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची फळझाडे वाढतात. त्यांची पाने कधीच सुकून गळत नाहीत. त्या झाडांवर नेहमीच फळे असतात. दर महिन्याला झाडांना बहर येतो का? कारण झाडांना मंदिरातून येणारे पाणी मिळते. झाडांची फळे खाण्यासाठी उपयोगी पडतील व पाने औषधी असतील.”

वंशांसाठी जमिनीची विभागणी

13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “इस्राएलच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी पुढीलप्रमाणे होईल. योसेफाला दोन भाग मिळतील. 14 तुम्ही जागेची सारखी वाटणी कराल. मी तुमच्या पूर्वजांना ही जमीन देण्याचे कबूल केले होते. म्हणून मी ती तुम्हाला देत आहे.

15 “जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला भूमध्य समुद्रापासून, हेथलोनच्या बाजूने हमाथकडे रस्ता वळतो तेथपर्यंत आणि पुढे सदाद, 16 बेरोथा, सिब्राईम (जे दिमिष्क व हमाथ यांच्या सीमेवर आहे.) हासेर-हत्तीकोन (जे हौरानच्या सीमेवर आहे.) हासेर-हत्तीकोने (जे हौरानच्या सीमेवर आहे.) येथपर्यंत. 17 म्हणजेच उत्तरेची सीमा समुद्रापासून, दिमिष्क व हमाथ यांच्या उत्तरसीमेवर असलेल्या हसर-एनोनपर्यंत असेल.

18 “पूर्वेला सीमारेषा हसर-एनोनपासून हौरान व दिमिष्कमधून. पुढे यार्देन नदीच्या कडेने गिलाद व इस्राएलच्या मधून पूर्व समुद्राच्या पुढे पार तामारपर्यंत जाईल.

19 “दक्षिणेला तामारपासून पार मेरीबोथ-कादेशच्या हिरवळीच्या प्रदेशा पलीकडे मिसरच्या ओढ्याच्या पुढे भूमध्य समुद्रापर्यंत सीमा असेल.

20 “पश्र्चिमेला अगदी लेबो-हामाथपर्यंतचा भूमध्य समुद्र हीच सीमा असेल.

21 “तेव्हा तुम्ही ही जमीन इस्राएलच्या वंशांमध्ये आपापासात वाटाल. 22 तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहात असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहात आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही ह्या लोकांना द्यावा. 23 हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएलींनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

इस्राएलच्या वंशांसाठी जमीन

48 “उत्तर-सीमा पूर्वेकडील भूमध्य समुद्रापासून पुढे हेथलोन, हामाथची खिंड ओलांडून पार पुढे दिमिष्क व हामाथ यांच्या सीमेवरील हसर-एनोनपर्यंत जाते. काही वंशांना दिलेला जमिनीचा पट्टा ह्या सीमेच्या पूर्वेकडून पश्र्चिमेकडे पसरलेला असेल. ज्यांना ही जमीन दिली जाईल ते वंश उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढीलप्रमाणे आहेत. दान, आशेर, नफताली, मनश्शे, एफ्राईम, रऊबेन, यहूदा.

जमिनीचा विशेष विभाग

“ह्या जमिनीचा पुढचा भाग विशेष वापरासाठी आहे. हा भाग यहूदाला मिळालेल्या जमिनीच्या दक्षिणेला आहे. हा प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा आहे. पूर्वेकडून पश्र्चिमेकडे त्याची रुंदी इतर वंशांना मिळालेल्या जमिनीच्या रुंदी एवढीच असेल ह्या जमिनीच्या मध्यावर मंदिर असेल. तुम्ही जमीन परमेश्वराला अर्पण करावी. ती लांबीला 25,000 हात (8.3 मैल) व रुंदीला 20,000 हात (6.6 मैल) असेल. 10 ही विशेष जमीन याजकांना आणि लेवी यांच्यात विभागली जाईल.

“याजकांना ह्या जमिनीचा एक भाग मिळेल. ही जमीन उत्तरेला 25,000 हात लांबीची, पूर्वेला व पश्र्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी 25,000 हात असेल. ह्या जमिनीच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल. 11 ही जमीन सादोकच्या वशांजासाठी असेल. माझे पवित्र याजक म्हणून ह्या लोकांची निवड केली गेली होती का? कारण इस्राएलच्या लोकांनी जेव्हा माझा त्याग केला, तेव्हा त्यांनी माझी सेवा केली. लेवीच्या इतर वंशांप्रमाणे सादोकच्या लोकांनी मला सोडून दिले नाही. 12 ह्या पवित्र जमिनीच्या भागातील हा खास हिस्सा विशेषतः ह्या याजकांसाठीच असेल. हा भाग लेवींच्या भागाच्या पलीकडेच असेल.

13 “याजकांना मिळालेल्या जमिनीच्या भागाचा पुढचा भाग लेवींचा हिश्शाचा असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा व 10,000 हात (3.3 मैल) रुंदीचा असेल. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे 25,000 हात (8.3 मैल) लांबीची व 20,000 हात (6.6 मैल) रुंदीची जमीन मिळेल. 14 लेवी ह्या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु शकणार नाहीत. त्यांनी देशाचा भाग वेगळा तोडता कामा नये. का? कारण ही जमीन परमेश्वराची आहे. ती विशेष आहे तो जमिनीचा सर्वांत उत्कृष्ट भाग आहे.

नगराच्या मालमत्तचे हिस्से

15 “याजक व लेवी यांना दिलेली जमीन सोडून, 5,000 हात (1.6 मैल) रुंदीची व 25,000 हात (8.3 मैल) लांबीची जमीन शिल्लक राहील. ती नगरासाठी, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. सामान्य लोकांनी या जागेचा वापर करावा. नगर ह्या जमिनीच्या मध्यावर वसेल. 16 नगरीची मापे पुढीलप्रमाणे असतील उत्तर बाजू 4,500 हात दक्षिण बाजू 4,500 हात पूर्व व पश्र्चिम बाजूही तेवढ्याच म्हणजे 4,500 हात असतील. 17 नगरासाठी कुरण असेल. त्यांची चारी बाजूंची लांबी सारखी म्हणजे 250 हात (437 फूट 6 इंच) असेल. 18 पवित्र भागाच्या पूर्वेला व पश्र्चिमेला जी जमीन उरेल, तिची लांबी 10,000 हात (3.3 मैल) असेल. ही जमीन पवित्र भागाच्या बाजूला लागून असेल. ह्या जमिनीत नगराच्या कामगारांसाठी धान्य पिकविले जाईल. 19 नगरातील कामकरी जमिनीची मशागत करतील. हे लोक इस्राएली वंशांपैकी असतील.

20 “हा जमिनीचा विशेष भाग चौरसाकृती असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांब व 25,000 हात (8.3 मैल) रुंद असेल. खास उद्देशासाठी तुम्ही हा भाग वेगळा ठेवावा. ह्यातील एक हिस्सा याजकसाठी, एक लेवींसाठी व एक नगरासाठी असेल.

21-22 “जमिनीच्या विशेष भागाचा एक हिस्सा राजाचा असेल. हा जमिनीचा विशेष भाग चौरसाकृती असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा व 25,000 हात (8.3 मैल) रुंदीचा असेल. ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर ह्या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.

23-27 “ह्या विशेष जमिनीच्या दक्षिणेकडची जमीन यार्देन नदीच्या पूर्वेला राहणाऱ्या वंशांना मिळेल. पूर्व-सीमेपासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरलेल्या ह्या जमिनीचा हिस्सा ज्या वंशांना मिळेल, ते वंश उत्तरेकडून दक्षिणेकडे असे: बन्यामीन, शिमोन, इस्साखार, जबुलून, गाद.

28 “गादच्या जमीनीची दक्षिण सीमा तामारपासून मरीबोथ-कादेशाच्या हिरवळीच्या प्रदेशापर्यंत आणि तेथून पुढे मिसराच्या ओढ्याच्या बाजूने थेट भूमध्य समुद्रापर्यंत जाते. 29 हीच जमीन इस्राएलच्या वंशात विभागली जाईल. प्रत्येक वंशाला येथेच जमिनीचा भाग मिळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

नगरीची प्रवेशद्वारे

30 “नगरीची प्रवेशद्वारे पुढीलप्रमाणे त्यांना, इस्राएलच्या वंशांवरुन नावे देण्यात येतील.

“नगरीची उत्तर बाजू 4,500 हात (1.5 मैल) लांबीची असेल. 31 तिला तीन द्वारे असतील. रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.

32 “नगरीची पूर्व बाजू 4,500 हात (1.5 मैल) लांब असेल. तिला तीन द्वारे असतील. योसेफाचे द्वार, बन्यामीनाचे द्वार व दानाचे द्वार.

33 “नगरीची दक्षिण बाजूसुद्धा 4,500 हात (1.2 मैल) लांबीची असेल. तिलाही शिमोनाचे द्वार, इस्साखाराचे द्वार व जबुलूनाचे द्वार अशी तीन द्वारे असतील.

34 “नगरीची पश्र्चिम बाजूही 4,500 हात (1.5 मैल) लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार.

35 “नगरीभोवतीचे अंतर 18,000 हात (6 मैल) असेल. या क्षणापासून नगरीचे नाव परमेश्वर तेथे आहे [a] असे पडेल.”

1 योहान 3

आपण देवाची मुले आहोत

पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हांला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले! आणि आम्ही खरोखरच (देवाची मुले) आहोत! या कारणामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्यांनी (जगाने) ख्रिस्ताला ओळखले नाही. प्रिय मित्रांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात कसे असेल ते अजून माहीत करुन देण्यात आले नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, तो स्वतःला शुद्ध करतो, जसा ख्रिस्त शुद्ध आहे.

प्रत्येकजण जो पाप करतो तो देवाचा नियम मोडतो. कारण पाप हे नियमभंग आहे. लोकांचे पाप घेऊन जाण्यासाठी ख्रिस्त प्रकट झाला हे तुम्हांस माहीत आहे, आणि त्याच्यामध्ये कोणतेही पाप नाही. प्रत्येकजण जो ख्रिस्तामध्ये राहतो तो पाप करीत राहात नाही. प्रत्येकजण जो पाप करीत राहतो त्याने त्याला पाहिले नाही, आणि त्याला तो ओळखत सुद्धा नाही.

प्रिय मुलांनो, तुम्हांला कोणी फसवू नये. जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे. जो पापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला.

जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही. कारण खुद्द देवाची बी त्या व्यक्तीमध्ये असते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही. कारण तो देवाचे मूल बनला आहे. 10 जी देवाची मुले आहेत व जी सैतानाची मुले आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता: प्रत्येकजण जे योग्य ते करीत नाही आणि जो त्याच्या भावावर प्रेम करीत नाही तो देवाचा नाही.

आम्ही एकमेकांवर प्रीति केली पाहिजे

11 आपण एकमेकांवर प्रीति करावी, ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे. 12 काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा) होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसे केले कारण त्याची स्वतःची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.

13 बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीति करतो. जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो. 15 जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेले अनंतकाळचे जीवन मिळत नाही.

16 अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. 17 जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते असे आपण कसे म्हणू शकतो? 18 प्रिय मुलांनो, आपली प्रीति केवळ शब्दांनी बोलण्याएवढीच मर्यादित नसावी तर ती कृती सहीत व खरीखुरी असावी.

19 आम्ही सत्याचे आहोत ते यावरुन आम्हांस कळेल आणि अशाप्रकारे देवासमोर आमच्या अंतःकरणाची खात्री पटेल 20 जेव्हा जेव्हा आमचे अंतःकरण आम्हांला दोष देईल, हे यासाठी की आमच्या अंतःकरणापेक्षा देव महान आहे, आणि सर्व काही (तो) जाणतो.

21 प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हांला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हांला खात्री आहे. 22 आणि देवाकडे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होते. कारण आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, आणि त्याला जे संतोषकारक आहे ते आम्ही करीत आहोत. 23 तो आम्हांला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे, जशी येशूने आम्हांला आज्ञा केली आहे. 24 जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. देव आमच्यामध्ये राहतो हे आम्हांला यावरुन समजते, त्याने दिलेल्या आत्म्यामुळे आम्हाला हे समजते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center