Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यिर्मया 12-14

यिर्मयाचे देवापाशी गाऱ्हाणे

12 परमेश्वरा, जेव्हा मी तुझ्याशी वाद घालतो,
    तेव्हा तुझेच म्हणणे बरोबर ठरते.
पण काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत.
त्याबद्दल मला तुला विचारावेसे वाटते.
    दुष्ट लोकच यशस्वी का होतात?
    तू ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस, अशांना सुखाचे आयुष्य का मिळते?
त्या दुष्टांना तूच इथे वसविलेस ती माणसे मजबूत मुळे असलेल्या झाडांप्रमाणे आहेत.
    ती वाढतात आणि फळे देतात.
तोंडाने, तू त्यांना जवळचा व प्रिय असल्याचे, ते सांगतात.
    पण मनाने ते तुझ्यापासून फार दूर आहेत.
पण, परमेश्वरा, तू माझे मन जाणतोस.
    तू मला पाहतोस आणि माझ्या मनाची परीक्षा घेतोस.
कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण.
    कत्तलीच्या दिवसासाठी त्यांची निवड कर.
किती काळ जमीन कोरडी राहणार?
    किती काळ गवत वाळून मरणार?
त्या दुष्ट लोकांच्या चुकीमुळे प्राणी
    आणि पक्षी मरुन गेले.
तरीसुद्धा ते लोक म्हणतात,
    “आमचे काय होईल हे पाहण्याइतक्या
    दीर्घकाळ यिर्मया जगणार नाही.”

यिर्मयाला देवाने दिलेले उत्तर

“यिर्मया, माणसांबरोबर धावण्याच्या शर्यतीत जर तू दमतोस,
    तर मग घोड्यांशी तू कशी स्पर्धा करणार?
जर तू सुरक्षित ठिकाणी कंटाळलास,
    तर धोकादायक ठिकाणी काय करशील?
यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या कांटेरी झुडुंपात
    तू काय करशील?
ही सर्व माणसे तुझेच भाऊबंद आहेत.
    तुझ्याच कुटुंबातील माणसे तुझ्याविरुद्ध कट करीत आहेत.
    तुझ्याच घरातील माणसे तुझ्याविरुद्ध आवाज उठवीत आहेत.
जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले,
    तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.”

परमेश्वर आपल्या लोकांना म्हणजेच यहूदाला झिडकारतो

“मी परमेश्वराचा माझ्या घराचा त्याग केला आहे.
    मी माझी मालमत्ता [a] सोडली आहे.
मी माझी प्रियतमा (यहूदा) तिच्या वैऱ्यांच्या ताब्यात दिली आहे.
माझे स्वतःचेच लोक जंगली सिंहाप्रमाणे माझ्याविरुद्ध उलटले.
ते माझ्याकडे पाहून डरकाळ्या फोडू
    लागल्याने मी त्यांच्याकडे पाठ फिरविली.
मरायला टेकल्यामुळे गिधाडांनी घेरलेल्या प्राण्याप्रमाणे
    माझ्या लोकांची स्थिती आहे.
गिधाडे तिच्याभोवती (यहूदाभोवती) घिरट्या घालतात.
    वन्य प्राण्यांनो, तुम्हीसुध्दा
    या आणि काही खाद्य मिळवा.
10 पुष्कळ मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे.
    त्यांनी द्राक्षेवेली पायदळी तुडविल्या.
    त्यांनी माझ्या द्राक्षमळ्याचे वैराण वाळवंट केले.
11 त्यांनी माझा मळा उजाड केला.
    तो सुकून मरुन गेला.
    तेथे कोणीही राहत नाही.
सर्व देश म्हणजे एक निर्जन वाळवंट झाले आहे.
    त्या मळ्याची काळजी घेण्यासाठी एकही माणूस उरला नाही.
12 त्या रिकाम्या वाळवंटाच्या हिरवळीतून
    लूट करण्याकरिता सैन्य आले.
परमेश्वराने त्या सैन्याचा उपयोग
    त्या देशाला शिक्षा करण्यासाठी केला.
देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत राहणाऱ्या सर्वांना शिक्षा केली.
    कोणीही वाचला नाही.
13 लोकांनी गहू पेरला,
    तर तिथे काटे उगवतील.
लोक दमेपर्यंत खूप कष्ट करतील,
    पण या अफाट मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही.
त्यांच्या पिकाबाबत ते खजिल होतील.
    परमेश्वराच्या कोपामुळे या गोष्टी घडतील.”

इस्राएलच्या शेजाऱ्यांना देवाचे वचन

14 देव काय म्हणतो ते पाहा: “इस्राएलच्या भोवती राहणाऱ्या लोकांसाठी मी काय करणार आहे, ते ती तुम्हाला सांगतो. ते लोक फार दुष्ट आहेत. मी इस्राएलच्या लोकांना दिलेल्या जमिनीचा त्या लोकांनी नाश केला. त्या पापी लोकांना, मी, खेचून काढीन व त्यांच्या देशाबाहेर त्यांना हाकलून देईन. त्यांच्याबरोबर यहूदाच्या लोकांनाही मी बाहेर खेचीन. 15 पण अशा रीतीने त्या लोकांना देशाबाहेर हाकलल्यावर मला त्यांची कणव येईल. मी प्रत्येक कुटुंब परत त्यांच्या देशात आणीन आणि त्यांची जमीन परत देईन. 16 ह्यातून त्या लोकांनी योग्य तो बोध घ्यावा असे मला वाटते. पूर्वी त्या लोकांनी, माझ्या माणसांना, बआलच्या नावाने वचन घ्यायला शिकविले होते. आता मी त्याच रीतीने त्यांना धडा शिकविणार. वचन घेताना माझे नाव घेण्यास त्यांनी शिकावे असे मला वाटते. ‘देव नक्कीच असेपर्यंत’ अशी सुरवात त्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी असे केले तर मी त्यांना यशस्वी करीन आणि माझ्या लोकांत राहू देईन. 17 पण जर एखाद्या राष्ट्राने माझा आदेश मानला नाही, तर त्या राष्ट्राचा मी समूळ नाश करीन. त्या राष्ट्राला मेलेल्या झाडाप्रमाणे उपटीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

घागऱ्याचा संकेत

13 परमेश्वर मला असे म्हणाला: “यिर्मया, जा आणि तागाचा घागरा विकत घे. नंतर तो नेस. तो ओला होऊ देऊ नकोस.”

परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मी एक तागाचा घागरा विकत आणला व नेसला. नंतर मला परमेश्वराकडून दुसऱ्यांदा संदेश आला. तो असा होता: “यिर्मया, तू विकत आणून नेसलेला घागरा घेऊन फरातला [b] जा. तिथे तो खडकाला पडलेल्या चिरेत लपवून ठेव.”

त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि अगदी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे घागरा लपवून ठेवला. पुष्कळ दिवसांनी देव मला म्हणाला, “यिर्मया, फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला घागरा परत घे.”

त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि घागरा उकरुन काढला. मी दगडाच्या चिरेत लपविलेला घागरा बाहेर काढला. पण आता तो इतका खराब झाला होता की मी तो नेसू शकत नव्हतो. तो अगदी निरुपयोगी झाला होता.

मग मला परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर मला म्हणाला, “ज्याप्रमाणे घागरा अगदी खराब आणि निरुपयोगी झाला, त्याचप्रमाणे यहूदातील आणि यरुशलेमधील अहंकारी लोकांचा नाश होईल. 10 मी यहुदाच्या उद्दाम आणि पापी लोकांचा नाश करीन. ते लोक माझा संदेश ऐकण्याचे नाकारतात. ते दुराग्रही असून आपल्याला पाहिजे त्याच गोष्टी करतात. ते दुसऱ्या देवांना अनुसरतात व त्यांची पूजा करतात. यहूदाच्या अशा लोकांची गत ह्या तागाच्या घागऱ्याप्रमाणे होईल. त्यांचा नाश होऊन ते निरुपयोगी ठरतील. 11 घागरा जसा माणसाच्या कमरेभोवती घट्ट लपेटला जातो, त्याप्रमाणे मी यहूदाची आणि इस्राएलची कुटुंबे माझ्या कमरेला लपेटली.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “त्या लोकांनी माझे व्हावे, मला कीर्ती, प्रशंसा आणि मान मिळवून द्यावा म्हणून मी असे केले. पण माझ्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही.”

यहूदाला इशारे

12 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना सांग की परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, ‘प्रत्येक चामड्याचा बुधला दारुने भरावा.’ ते लोक तुला हसतील आणि म्हणतील ‘प्रत्येक चामड्याचा बुधला दारुने भरावा हे आम्हाला माहीत आहे.’ 13 मग तू त्यांना सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे की या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी दारुड्याप्रमाणे असहाय करीन. मी हे दावीदच्या सिंहासनावर बसलेल्या राजांबद्दल, याजकांबद्दल, संदेष्ट्यांबद्दल आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या यच्चयावत लोकांबद्दल बोलत आहे. 14 यहूदाच्या लोकांना मी धडपडायला भाग पाडीन. ते धडपडून एकमेकांच्या अंगावर पडतील. पिता पुत्र एकमेकांवर पडतील.’ हा परमेश्वराचा संदेश आहे. ‘मला त्याबद्दल वाईटही वाटणार नाही. आणि त्यांची दयाही येणार नाही. अनुकंपा येऊन मी यहूदाच्या लोकांचे पारिपत्य थांबविणार नाही.’”

15 ऐका आणि लक्ष द्या.
    परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे.
    उन्मत्त बनू नका.
16 परमेश्वराचा, तुमच्या देवाचा मान राखा.
त्याचे स्तवन करा, नाहीतर तो अंधकार पसरवील.
    अंधकारमय टेकड्यांवर पडण्याआधीच त्याचे स्तुतिस्तोत्र गा.
तुम्ही यहूदाचे लोक प्रकाशाची वाट पाहता,
    पण परमेश्वर प्रकाशाचे गाढ अंधकारात रुपांतर करेल.
    तो प्रकाशाला दाट अंधारात बदलेल.
17 यहूदाच्या लोकांनो, तुम्ही जर परमेश्वराचे ऐकणार नसाल,
    तर मी एकांतात आक्रोश करीन.
तुमचा उन्मत्तपणा मला आक्रोश करायला भाग पाडेल.
    मी दारुण आकांत करीन.
माझे डोळे अश्रूंनी डबडबतील.
    का? कारण परमेश्वराच्या मेंढरांचा कळप (यहूदाचे लोक) पकडला जाईल.
18 राजा आणि राणीला या गोष्टी सांगा,
    “तुमचे सुंदर मुकुट तुमच्या डोक्यांवरुन खाली पडलेत.
    तुम्ही आता तुमच्या सिंहासनावरुन खाली उतरा.”
19 नेगेवच्या वाळवंटातील शहरे बंद केली गेली आहेत.
    कोणीही ती उघडू शकत नाही.
यहूदाच्या सर्व लोकांना कैद करुन
    परागंदा करण्यात आले आहे.

20 यरुशलेम, तो पाहा!
    उत्तरेकडून शत्रू चाल करुन येत आहे.
तुझा कळप कोठे आहे देवाने तुला या सुंदर कळपाचे दान दिले.
    त्याची तू काळजी घ्यावीस अशी अपेक्षा होती.
21 आता त्या कळपाबद्दल परमेश्वराने जाब विचारल्यास तू काय उत्तर देणार?
    तू लोकांना देवाबद्दल ज्ञान देशील अशी अपेक्षा होती.
तुझे नेते लोकांना मार्गदर्शन करतील असे वाटत होते.
    पण त्यांनी त्यांचे कर्तव्य केले नाही.
तेव्हा आता तुला प्रसुतिवेदनांप्रमाणे वेदना
    व त्रास भोगावा लागेल.
22 तू कदाचित् स्वतःला विचारशील,
    “माझ्यावरच असा वाईट प्रसंग का आला?”
तुझ्या अनेक पापांमुळे असे झाले.
    तुझ्या पापाबद्दल तुझा घागरा फाडला गेला
    आणि तुझी पादत्राणे काढून घेण्यात आली.
तुझी मानहानी करण्यासाठी हे करण्यात आले.
23 काळा माणूस आपल्या कातडीचा रंग बदलू शकत नाही.
    किंवा चित्ता आपल्या अंगावरील ठिपके बदलू शकत नाही.
त्याचप्रमाणे यरुशलेम, तू सुद्धा बदलणार नाहीस आणि चांगल्या गोष्टी करणार नाहीस
तू नेहमीच वाईट गोष्टी करशील.

24 “मी तुम्हाला तुमची घरे सोडून जाण्यास भाग पाडीन.
    तुम्ही दाही दिशांना सैरावैरा पळत सुटाल,
    वाळवंटातील वाऱ्याने दूर उडून जाणाऱ्या फोलकटाप्रमाणे तुमची गत होईल.
25 तुमच्याबाबत माझी योजना ही अशी आहे
    आणि त्याचप्रमाणे गोष्टी घडतील.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
“हे असे का घडेल?
    कारण तुम्हाला माझा विसर पडला.
    तुम्ही खोट्या देवावर विश्वास ठेवला.
26 यरुशलेम, मी तुझा घागरा डोक्याकडून खेचीन.
प्रत्येकजण तुला पाहील
    आणि तुझी बेअब्रू होईल.
27 मी तू केलेली भयानक कृत्ये पाहिली आहेत. [c]
    जारांशी हसताना आणि संभोग करताना मी तुला पाहिले आहे.
    वेश्या बनायचेच तुझ्या मनात दिसते आहे.
मी तुला डोंगरकपारीत आणि मैदानात पाहिले आहे.
यरुशलेम, हे तुझ्या दृष्टीने वाईट आहे.
    या घृणास्पद पापें तू किती काळ करणार याचे मला नवल वाटते.”

अवर्षण आणि तोतये संदेष्टे

14 अवर्षणाबद्दल यिर्मयाला परमेश्वराने पुढील संदेश दिला.

“यहूदा हे राष्ट्र, मेलेल्या लोकांकरिता आक्रंदत आहे.
    यहूदाच्या शहरामधील लोक अधिकाधिक क्षीण होत चालले आहेत
    ते जमिनीवर पडून आहेत.
यरुशलेमधील लोक देवाकडे मदतीसाठी टाहो फोडत आहेत.
नेते मंडळी आपल्या नोकरांना पाणी आणण्यासाठी पाठवितात.
नोकर पाण्याच्या टाक्यांकडे जातात,
    पण त्यांना थोडेसुद्धा पाणी मिळत नाही.
त्यामुळे त्यांना रिकामी भांडी घेऊन परत यावे लागते.
    म्हणून ते लज्जित व खजील होऊन आपले चेहरे झाकून घेतात.
कोठेही पाऊस न पडल्यामुळे कोणीही पिकांसाठी
    जमिनीची मशागत करीत नाही. [d]
शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यामुळे
    त्यांनी आपले चेहरे झाकून घेतले आहेत.
कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसाला एकटेच सोडून देते.
उघड्या डोंगरावर उभी राहून,
    जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे हवा हुंगतात.
पण त्यांना कोठेही काहीही खाण्यालायक दिसत नाही.
    कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही.

देवाकडून मदत मिळावी म्हणून प्रार्थना

“या गोष्टींना आम्हीच जबाबदार आहोत, हे आम्हाला माहीत आहे.
    आम्ही आमच्याच पापाचे भोग भोगत आहोत.
    परमेश्वरा, तुझे नाव राखण्यासाठी आम्हाला मदत कर.
कारण आम्ही तुझ्याशी खूप वेळा प्रतारणा केली, हे आम्हाला कबूल आहे.
    आम्ही तुझ्याशी पापाचरण केले,
देवा, तू इस्राएलचे आशास्थान आहेस.
    संकटकाळी तू इस्राएलला वाचवितोस.
पण, आता, तू, फक्त रात्री मुक्काम करुन पुढे
    जाणाऱ्या प्रवाशासारखा वाटतोस.
अचानकपणे हल्ला झाल्यावर चकित झालेल्या माणसाप्रमाणे तू वाटतोस.
    कोणालाही वाचविण्यास असमर्थ असलेल्या हतबल सैनिकासारखा तू दिसतोस.
पण परमेश्वरा, तू आमच्याबरोबर आहेस.
    आम्ही तुझ्या नावाने ओळखले जातो तेव्हा आम्हाला मदत न करता जाऊ नकोस.”

यहुदासाठी देवाचा संदेश

10 यहूदाच्या लोकांबद्दल देवाचे म्हणणे असे आहे: “यहूदाच्या लोकांना माझा त्याग करणे आवडते. माझा त्याग करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. तेव्हा आता परमेश्वर त्यांचा स्वीकार करणार नाही. तो त्यांची दुष्कृत्ये लक्षात ठेवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना शिक्षा करील.”

11 नंतर परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, यहूदाच्या लोकांच्या भल्यासाठी तू विनवणी करु नकोस. 12 यहूदाचे लोक कदाचित् उपवास करुन माझी प्रार्थना करतील. पण ती त्यांची प्रार्थना ऐकणार नाही. जरी त्यांनी मला होमार्पण व धान्यार्पणचा नैवेद्य दाखविला, तरी मी त्या लोकांचा स्वीकार करणार नाही. मी युद्धात यहूदाच्या लोकांचा नाश करीन. अन्न तोडून मी त्यांची उपासमार करीन. भयंकर रोगराई पसरवून मी त्यांना नष्ट करीन.”

13 पण मी परमेश्वराला म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, संदेष्टे तर लोकांना काही वेगळेच सांगत होते. ते लोकांना सांगत होते, ‘शत्रू कधीच तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुमची कधीही उपासमार होणार नाही. परमेश्वर तुमच्या देशात शांती राखेल.’”

14 मग परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना आज्ञा केली नाही वा त्यांच्याशी बोललोही नाही. ते लोकांपुढे खोटे दृष्टान्त सांगतात, त्यांना मोहजालात फसवितात व स्वतःचे स्वप्नरंजन करतात. 15 माझ्या नावावर प्रवचने देणाऱ्या संदेष्ट्यांबद्दल बोलायचे झालेच तर, मी त्यांना पाठविले नाही. ते म्हणतात ‘या देशावर कोणीही हल्ला करणार नाही.’ ह्या देशाची कधीही उपासमार होणार नाही. पण ते संदेष्टेच उपासमारीने मरतील. शत्रू त्यांना ठार करील. 16 आणि ज्या लोकांशी ते संदेष्टे बोलले, ते लोक रस्त्यावर उघडे पडतील. उपासमार व शत्रू यांचे ते बळी ठरतील. त्यांचे वा त्यांच्या बायकामुलांचे दफन करण्यास कोणीही असणार नाही. मी त्यांना शिक्षा करीन. [e]

17 “यिर्मया, यहूदाच्या लोकांना
    माझा संदेश सांग:
‘माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून आलेत.
माझ्या कुमारी मुलीसाठी मी रात्रंदिवस अव्याहतपणे आक्रोश करीन.
माझ्या लोकांसाठी मी न थांबता आक्रोश करीन. का?
    कारण कोणीतरी त्यांच्यावर वार करुन त्यांना चिरडले आहे.
    ते लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
18 मी जर त्या देशात गेलो,
    तर मला तलवारीने मारले गेलेले लोक दिसतील.
मी जर शहरात गेलो,
    तर मला सर्वत्र दौर्बल्य आढळेल.
कारण लोकांच्याजवळ अन्न नाही.
    याजकांना आणि संदेष्ट्यांना परदेशात नेले आहे.’”

19 “परमेश्वरा, तू यहूदाला पूर्णपणे त्याज्य ठरविले आहेस का?
    सियोनचा तुला तिरस्कार वाटतो का?
आमची स्थिती परत न सुधारण्याइतके तू आमचे नुकसान केले आहेस.
    तू असे का केलेस?
आम्हाला शांती पाहिजे होती.
    पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही.
जखमा भरुन येण्याची आम्ही आशा केली,
    पण आमच्या वाट्याला फक्त भीती आली.
20 परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हाला जाणीव आहे.
    आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली.
    आम्ही तुझे अपराध केले.
21 परमेश्वरा, तुझ्या नावाचा लौकिक राखण्याकरिता,
    आम्हाला दूर लोटू नकोस तुझ्या वैभवशाली सिंहासनाचा मान राख.
आमच्याशी केलेला करार आठव.
    त्या कराराचा भंग करु नकोस.
22 परदेशातील मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य नाही.
    पावसाच्या सरी पाडण्याची ताकद आकाशात नाही.
तूच एक आमचे आशास्थान आहेस.
    या सर्व गोष्टी करणारा तूच एकमेव आहेस.”

2 तीमथ्थाला 1

येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने पाठविलेला ख्रिस्त प्रेषित पौल याजकडून,

प्रिय मुलगा तीमथ्य याला,

देवपिता आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा दया व शांति असो.

आभारप्रदर्शन आणि उत्तेजन

माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने भक्ती करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. माझ्यासाठी तू ढाळलेल्या अश्रूंची आठवण करताना तुला भेटण्याची आतुरतेने वाट पाहतो. यासाठी की मी आनंदाने भरूने जावे. तुझ्यातील प्रामाणिक विश्वासाचे मला स्मरण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे. या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, जेव्हा मी माझे हात तुझ्यावर ठेवले तेव्हा देवाच्या दानाची जी ज्योत तुला मीळाली ती तेवत ठेव. कारण देवाने आम्हांला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. तर तो सावधानतेचा व सामर्थ्याची स्फूर्ति देणारा आत्मा दिला आहे.

म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर माझ्याबरोबर सुवार्तेसाठी दु:ख सोस. देव तुला जे सामर्थ्य देतो त्याच्या साहाय्याने दु:ख सोस.

त्याने आम्हांला तारले आणि त्याने आम्हांला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हांस दिली होती. 10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले.

11 मला त्या सुवार्तेचा उपदेशक, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते. 12 आणि या कारणांमुळे मीसुद्धा दु:ख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपविले आहे त्याचे तो रक्षण करील.

13 माझ्याकडून ऐकून घेतलेल्या सत्य शिक्षणाचा गाभा दृढ धर. आणि ख्रिस्त येशूमध्ये सापडणाऱ्या विश्वासाने व प्रीतीने ते कर. 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.

15 आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत. 16 अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही. 17 उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला. 18 प्रभु करो आणि त्याला त्या दिवशी प्रभुकडून दया मिळो कारण माझ्या इफिसातील वास्तव्य काळात त्याने अनेक प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center