Old/New Testament
अश्शूर मिसर व कूश पराभव करील
20 सर्गोन अश्शूरचा राजा होता. त्याने तर्तानला अश्दोदवर स्वारी करायला पाठविले. तर्तानने चढाई करून ते शहर जिंकून घेतले. 2 त्या वेळेला आमोजचा मुलगा यशया याला परमेश्वर म्हणाला, “जा तुझ्या अंगावरील शोकप्रदर्शक कपडे व जोडे काढ.” यशयाने परमेश्वराच्या आज्ञेच पालन केले आणि तो उघडा व अनवाणी चालला.
3 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “यशया तीन वर्षे उघडा व अनवाणी फिरला. हा मिसर व कूशयाला संकेत आहे. 4 अश्शूरचा राजा त्यांना कैद करील व त्यांच्या देशापासून त्यांना दूर घेऊन जाईल. आबालवृध्दांना वस्त्रे व जोडे काढून नेले जाईल व त्यांना संपूर्ण नग्न केले जाईल. मिसरचें लोक लज्जित होतील. 5 जे कुशकडे मदतीची अपेक्षा करीत होते. त्यांचा अपेक्षाभंग होईल. मिसरच्या वैभवाने लोक आश्चर्यचकीत झाले होते परंतु ते लज्जित होतील.”
6 समुद्रकाठी राहणारे लोक म्हणतील, “त्या देशांवर आम्ही मदतीसाठी विश्वास टाकला, अश्शूरच्या राजापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे धाव घेतली पण त्यांचाच पराभव झाला, मग आता आमचा निभाव कसा लागणार?”
देवाचा बाबेलोनला संदेश
21 बाबेलोनबद्दल (“समुद्राजवळचे वाळवंट”) देवाचा शोक संदेश.
वाळवंटातून काहीतरी येत आहे.
नेगेबच्या वाळवंटातून येणाऱ्या वादळाप्रमाणे ते आहे.
भयंकर देशातून ते येत आहे.
2 काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे.
विश्वासघातकी तुझ्याविरूध्द् जाताना मला दिसत आहे.
लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय.
एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर.
मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर.
त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.
3 भयंकर गोष्टी पाहून मी घाबरलो आहे.
भीतीने माझ्या पोटात गोळा उठतो त्या भीतीच्या वेदना प्रसूतिवेदनेप्रमाणे आहेत.
जे मी ऐकतो त्याने भयभीत होतो,
जे पाहतो त्यामुळे भीतीने माझा थरकाप होतो.
4 मी चिंताग्रस्त आहे आणि भीतीने थरथर कापत आहे.
माझी प्रसन्न संध्याकाळ काळरात्र बनली आहे.
5 लोकांना वाटते सारे काही ठीक चालले आहे.
“लोक म्हणत आहेत
जेवणाची तयारी करा.
खा. प्या.
त्याच वेळी तिकडे सैनिक म्हणत आहेत
टेहळणीदार ठेवा.
सेनाधिकाऱ्यांनो, उठा व ढाली सज्ज करा.”
6 माझा प्रभू मला म्हणाला, “जा आणि ह्या शहराचे रक्षण करण्यासाठी पहारेकऱ्याची नेमणूक कर. तो जे जे पाहील त्याची त्याने वर्दी द्यावयास हवी. 7 जर त्या रखवालदाराने घोडेस्वारांच्या रांगा, गाढवे किंवा उंट पाहिले तर त्याने अतिशय काळजीपूर्वक चाहूल घेतली पाहिजे.”
8 मग एके दिवशी रखवालदाराने इशारा दिला. सिहंनाद करून रखवालदार म्हणाला,
“हे प्रभु! रोज मी टेहळणी बुरूजावरून टेहळणी करीत असतो.
रोज रात्री माझा खडा पहारा असतो.
9 पण पाहा! ते येत आहेत! लोकांच्या
व घोडेस्वारांच्या रांगा मला दिसत आहेत!”
नंतर दूत म्हणाला,
“बाबेलोनचा पराभव झाला.
ते जमीनदोस्त झाले,
बाबेलोनच्या खोट्या देवांच्या सर्व मूर्तींची मोडतोड होऊन
त्या धुळीला मिळाल्या आहेत.”
10 यशया म्हणाला, “माझ्या लोकांनो, सर्वशक्तिमान परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने जे मला ऐकवले, ते मी तुम्हाला सांगितले. खळ्यातील धान्याप्रमाणे तुम्ही झोडपले जाल.”
देवाचा एदोमला संदेश
11 दुमाविषयीचा शोक संदेश.
सेईराहून (एदोमहून) मला एकजण भेटायला आला.
तो म्हणाला, “रखवालदारा, रात्र किती राहिली?
अंधार सरायला अजून किती वेळ आहे?”
12 रखवालदार उत्तरला,
“सकाळ होत आहे पण परत रात्र होईल.
तुम्हाला काही विचारायचे
असल्यास परत या [a] व मग विचारा.”
देवाचा अरेबियाला संदेश
13 अरेबियाविषयी शोक संदेश
ददार्नीच्या काफल्याने अरेबियाच्या वाळवंटातील
काही झाडांखाली रात्र काढली.
14 त्यांनी तहानेलेल्या प्रवाशांना पाणी दिले
तेमा देशातील लोकांनी प्रवाशांना अन्न दिले.
15 ते प्रवासी, त्यांना ठार मारायला
उठलेल्या तलवारीपासून
व युध्द करायला सज्ज
असलेल्या धनुष्यांपासून दूर पळत होते.
ते घनघोर युध्दापासून दूर पळत होते.
16 ह्या गोष्टी घडून येतील असे माझ्या प्रभु परमेश्वराने मला सांगितले. परमेश्वर म्हणाला, “एक वर्षात (सालदाराच्या मोजणीप्रमाणे) केदारचे वैभव लयाला जाईल. 17 त्या वेळी अगदी थोडे धनुर्धारी, केदारचे महान योध्दे, मागे उरतील.” इस्राएलच्या परमेश्वर देवाने सांगितले आहे.
देवाचा यरूशलेमला संदेश
22 दृष्टान्ताच्या दरीविषयी शोक संदेश.
लोकहो, तुमचे काय बिघडले आहे?
तुम्ही घराच्या छपरावर का लपला आहात?
2 पूर्वी हे शहर फार गजबजलेले होते.
येथे गलबलाट होता आणि शहर सुखी होते.
पण आता परिस्थिती बदलली आहे.
तुझे लोक मारले गेले
पण तलवारीच्या वाराने नव्हे.
तुझे लोक मेले हे खरे,
पण लढताना नव्हे.
3 तुझे नेते एकत्र होऊन खूप लांब जरी पळून गेले,
तरी ते पकडले गेले.
ते पकडले गेले ते धनुष्याचा उपयोग न करता.
ते सर्व नेते एकत्रितपणे पळून गेले पण पकडले गेलेच.
4 म्हणून मी म्हणतो, “माझ्याकडे बघू नका,
मला रडू द्या.
माझ्या लोकांच्या नाशाबद्दल
माझे सांत्वन करू नका.”
5 परमेश्वराने एक विशेष दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी तेथे दंगली व गोंधळ होईल. दृष्टांन्ताच्या दरीत लोकांची तुडवातुडवी होईल. शहराची तटबंदी पाडली जाईल. दरीतील लोक डोंगर माथ्यावर असलेल्या शहरातील लोकांकडे बघून आरडाओरडा करतील. 6 एलामचे घोडदळ भाते अडकवून लढाईसाठी दौड करील. कीरवासीयांच्या ढालींचा खणखणाट होईल. 7 तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल. 8 तेव्हा यहुदी लोक रानातील राजवाड्यात ठेवलेल्या शस्त्रांचा उपयोग करू पाहतील. शत्रू यहुदाचे तट पाडतील.
9-11 दावीदाच्या शहरांच्या भितींना भगदाडे पडायला सुरवात होईल. आणि तुम्हाला ती स्पष्टपणे दिसतील. मग तुम्ही घरांची मोजदाद कराल आणि तुम्ही घरांचे दगड तटाची भगदाडे बुजवायला वापराल. पाणी साठविण्यासाठी दोन भिंतीत जागा करून तुम्ही जुन्या झऱ्याचे पाणी सोडाल.
तुमच्या बचावासाठी तुम्ही हे सर्व कराल पण ज्याने हे सर्व केले त्या देवावर तुम्ही श्रध्दा ठेवणार नाही. ज्याने फार पूर्वीच या गोष्टी करून ठेवल्या त्या देवाकडे तुमचे लक्षच जाणार नाही. 12 म्हणून माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या मृत मित्रांसाठी शोक करण्यास व रडण्यास सांगेल. लोक मुंडन करून शोकप्रदर्शक वस्त्रे घालतील. 13 पण पाहा! आता लोक आनंदात आहेत. ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. ते म्हणत आहेत,
“गुरे, मेंढ्या मारा.
आपण उत्सव साजरा करू.
आपण जेवण करू,
मद्यपान करू कारण उद्या आपल्याला मरायचे आहे.”
14 सर्वशक्तिमान परमेश्वराने सांगितलेल्या ह्या गोष्टी मी स्वतः माझ्या कानाने ऐकल्या. “तुमच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्ही अपराधी आहात. या अपराधांबद्दल क्षमा करण्यापूर्वीच तुम्ही मराल याची मला खात्री आहे.” माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले.
देवाचा शेबनाला संदेश
15 माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला सांगितले, राजप्रासादातील कारभारी शेबना याच्याकडे जा. तो राजवाड्याचा कारभार पाहतो. 16 राजप्रासादातील त्या नोकराला जाब विचार, “येथे काय करीत आहेस? तुझ्या कुटुंबातील कोणाचे येथे दफन केले आहे का? तू येथे थडगे का खणीत आहेस?” यशया म्हणाला, “हा माणूस पाहा, हा स्वतःचे थडगे महत्वाच्या जागी खणत आहे. खडक फोडून तो स्वतःचे थडगे खणत आहे.”
17-18 “हे माणसा, परमेश्वर तुला चिरडून टाकील. परमेश्वर तुझा लहानसा चेंडू करून तुला दुसऱ्या मोठ्या देशात भिरकावून देईल. तेथेच तू मरशील.”
परमेश्वर म्हणाला, “तुला तुझ्या रथांचा फार गर्व आहे पण त्या दूरदेशातील तुझ्या नवीन राजाचे रथ तुझ्यापेक्षा चांगले असतील. त्याच्या राजवाड्यात तुझे रथ शोभणार नाहीत. 19 येथल्या महत्वाच्या पदावरून तुला कमी करायला मी भाग पाडीन. तुझा नवा राजा तुला महत्वाच्या पदावरून दूर करील. 20 त्या वेळी मी माझा सेवक आणि हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम ह्याला बोलावीन. 21 मी तुझी वस्त्रे व राजदंड काढून एल्याकीमला देईन. तुझे महत्वाचे पद त्याला देईन. तो सेवक यरूशलेमच्या लोकांना व यहुद्याच्या कुटुंबीयांना पित्याप्रमाणे असेल.
22 “दावीदाच्या घराची किल्ली मी एल्याकीमच्या ताब्यात देईन. त्याने उघडलेले दार उघडेच राहील. कोणीही ते बंद करू शकणार नाही. त्याने बंद केलेले दार बंदच राहील. ते कोणीही उघडू शकणार नाही. त्याच्या वडिलांच्या घरात त्याला महत्वाचे स्थान प्राप्त होईल. 23 अतिशय कठीण पृष्ठ भागावर ठोकून बसवलेल्या खिळ्याप्रमाणे मी त्याला मजबूत करीन. 24 त्याच्या वडिलांच्या घरातील महत्वाच्या व पूज्य वस्तू त्याच्या ताब्यात जातील. आबालवृद्ध् त्याच्यावर अवलंबून असतील. हे अवलंबून राहणेभक्कम खिळ्याला अडकविलेल्या छोट्या ताटल्या व मोठ्या पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे असेल.
25 “आता, कठीण पृष्ठभागावर ठोकून बसविलेला खिळा (शेबना) त्या वेळी कमकुवत होऊन तुटून पडेल. तो खिळा जमिनीवर तुटून पडल्याने त्याला अडकविलेल्या वस्तूंचा नाश होईल. नंतर मी दृष्टांन्तात सांगितल्याप्रमाणे सर्व होईल.” (परमेश्वराने सांगितले असल्यामुळे ह्या गोष्टी घडतील)
मुले आणि आईवडील
6 मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे. 2 “तुझ्या वडिलाचा व आईचा मान राख.” [a] 3 अभिवचनाबरोबरची ही पहिली आज्ञा असल्याने, “तुझ्यासाठी सर्व काही चांगले असावे आणि पृथ्वीवर तुला दीर्घ आयुष्य लाभावे.” [b]
4 आणि वडिलांनो, आपल्या मुलांना राग येईल असे करु नका. उलट, देवापासून जी माहिती व शिक्षण येते त्यान त्यांना वाढवा.
गुलाम आणि मालक
5 गुलामांनो, तुमच्या पृथ्वीवरील मालकांची आज्ञा आदराने, थरथर कांपत, आणि तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने पाळा. ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पाळा. 6 जेव्हा माणसे तुमच्याकडे पाहत असतील तेव्हाच फक्त काम करु नका. मनुष्याला पसंत पडावे यासाठी प्रयत्न करु नका. उलट ख्रिस्ताच्या गुलामासारखे काम करा, कारण (ख्रिस्ताचे गुलाम) देवाची इच्छा आपल्या अंतःकारणापासून पूर्ण करतात. 7 गुलाम म्हणून उत्साहाने जणू काय माणसांची नव्हे, तर प्रभुची सेवा करीत आहात, असे काम करा. 8 लक्षात ठेवा की, तुम्हांतील प्रत्येकजण जर काही चांगले करतो तर तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, ते त्याला प्रभूकडून परत मिळेल.
9 आणि मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकाविण्याचे सोडून द्या. लक्षात ठेवा की तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे. आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा
10 शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा. 11 देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. 12 कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे. 13 म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
14 म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा. 15 आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला. 16 या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल. 17 आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या. 18 प्रत्येक प्रंसांगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंति करुन आत्म्यात प्रार्थना करा. चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा. कारण जेव्हा मी तोंड उघडेन तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा. यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे. 20 त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.
शेवटच्या शुभेच्छा
21 यासाठी तुम्हाला हे कळावे की मी कसा आहे आणि काय करीत आहे, म्हणून तुखिक तुम्हांला सर्व काही सांगेल. तो आमचा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये विश्वासू सेवक आहे. 22 मी त्याला केवळ या कारणासाठीच तुमच्याकडे पाठवीत आहे की माझ्याविषयीचे वर्तमान तुम्हांला कळावे आणि तुमच्या अंतःकरणाचे समाधान व्हावे.
23 देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्तापासून आता बंधु बहिणींना विश्वासासह प्रीति आणि शांति लाभो. 24 जे सर्व जण आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीति करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
2006 by World Bible Translation Center