Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 81-83

प्रमुख गायकासाठी गित्तीथ चालीवर बसवलेले आसाफये स्तोत्र.

81 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा,
    इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
संगीताची सुरुवात करा.
    डफ वाजवा.
    सतार आणि वीणा वाजवा.
अमावस्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
    पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
    याचवेळी आपला सण सुरु होतो.
हा इस्राएल देशाचा नियम आहे.
    देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले
    तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला.
मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले.
    तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
तुम्ही लोक संकटात होता.
    तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली.
मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले.
    मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”

“लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन
    इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात
    त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे
    मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले.
इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”

11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही.
    इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले.
    इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले,
    जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन.
    जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील.
    त्यांना कायमची शिक्षा होईल.
16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल.
    देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”

आसाफाचे स्तोत्र

82 देव देवांच्या सभेत उभा राहातो.
    तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस?
    दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”

“गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे.
    त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर.
    त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”

“काय घडते आहे ते त्यांना [a] कळत नाही.
    त्यांना काही समजत नाही.
ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही.
    त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात
    तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल,
    इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.

देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो.
    देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.

आसाफाचे स्तोत्र

83 देवा, गप्प राहू नकोस.
    तुझे कान बंद करु नकोस.
    देवा, कृपा करुन काही तरी बोल.
देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत.
    ते लवकरच हल्ला करतील.
ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत.
    ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
    यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
देवा, ते सगळे लोक तुझ्याविरुध्द आणि
    तू आमच्याशी केलेल्या करारा विरुध्द लढण्यासाठी एकत्र आले.
6-7 ते शत्रू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले,
    अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गाबाल,
    अम्मोन अमालेकचे लोक, पलेशेथ आणि सोरचे लोक.
ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले.
अश्शूरही त्यांना मिळाले.
    त्यांनी लोटाच्या वंशजांना खूप बलशाली बनवले.

देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा
    किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
10 तू त्यांचा एन-दोर येथे पराभव केलास
    आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले.
11 देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर.
    तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.
12 देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरुन जायला सांगत होते
    म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल.
13 देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने
    वाळलेलं गवत इतरत्र पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
14 अग्नी जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो
    तसा तू शत्रूचा नाश कर.
15 देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव.
    त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
16 देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे.
    नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.
17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर.
    त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल.
    तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल.
तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस
    हे ही त्यांना कळेल.

रोमकरांस 11:19-36

19 आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.” 20 त्या त्यांच्या अविश्वासामुळे तोडून टाकण्यात आल्या हे खरे आहे परंतु तुम्ही तुमच्या विश्वासामुळे स्थिर आहात. यास्तव अभिमान बाळगू नका. तर भीति बाळगा. 21 कारण देवाने जर मूळ फांद्याही राखल्या नाहीत तर तो तुम्हांलाही राखणार नाही.

22 अशा प्रकारे तुम्ही देवाचा दयाळूपणा आणि कठोरताही पाहा. जे पतन पावले आहेत त्यांच्याविषयी कठोरता परंतु देवाचा तुमच्याविषयीचा दयाळूपणा, जर तुम्ही त्याच्या दयेत राहिला नाहीत तर तुम्हांला झाडापासून छाटून टाकले जाईल. 23 आणि इस्राएल त्याच्या अविश्वासात राहीले नाही तर तेही कलम पुन्हा लावण्यात येईल. कारण देव त्यांना कलम म्हणून लावण्यास समर्थ आहे. 24 म्हणून तुम्ही जे निसर्गत; रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील!

25 परंतु बंधूनो, तुम्ही आपल्या शहाणपणावर अवलंबून या रहस्याविषयी अजाण असावे असे मला वाटत नाही. इस्राएली लोकांत अंशतः कठीणपणा आला आहे आणि तो देवाच्या कुटुंबात विदेशी लोकांचा भरणा पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. 26 आणि नंतर इस्राएलाचे राष्ट्र म्हणून तारण होईल, असे लिहीले आहे,

“मुक्त करणारा सीयोनातून येईल,
    तो याकोबाच्या घराण्यातून त्यांची सर्व अभक्ती दूर करील.
27 जेव्हा मी त्यांच्या पातकांची क्षमा करीन.
    तेव्हा त्यांच्याशी मी हा करार करीन.” (A)

28 जेथ पर्यंत सुवार्तेचा संबंध आहे ते तुमच्यामुळे शत्रू आहेत परंतु देवाच्या निवडीमुळे त्याने पूर्वजांना दिलेल्या वचनाप्रमाणे देव त्यांच्यावर प्रेम करतो. 29 कारण देवाने ज्यांना बोलाविले आहे आणि तो जे देतो त्याच्याविषयी कधीही आपले मत बदलत नाही. 30 कारण जसे तुम्ही पूर्वी देवाची आज्ञा पाळत नव्हता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगामुळे देवाची दया मिळाली आहे. 31 त्याचप्रमाणे तेही आता आज्ञा मोडणारे झाले आहेत, यासाठी की त्यांना आता देवाची कृपा मिळावी. 32 कारण देवाने सर्व लोकांना आज्ञाभंगाच्या तरुंगात कोंडले आहे, यासाठी की, त्याने त्यांच्यावर दया करावी.

देवाचे गौरव

33 देवाच्या बूद्धीची आणि ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे. त्याच्या निर्णय आणि त्याच्या मार्गाचा माग काढणे कठीण आहे. 34 पवित्र शास्त्र सांगते.

“प्रभूचे मन कोणाला माहीत आहे
    किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” (B)

35 “प्रथम कोणी काही त्याला दिले
    का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?” (C)

36 कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या आणि त्याच्या द्वारे अस्तित्वात आहेत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center