Old/New Testament
36 अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला:
2 “तू माझ्यासाठी आणखी थोडा धीर धर.
देवाने मला आणखी बोलायला सांगितले आहे.
3 मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो.
देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.
4 ईयोब, मी खरे बोलत आहे
आणि मी काय बोलतो आहे ते मला समजत आहे.
5 “देव अतिशय सामर्थ्यवान आहे,
पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही.
तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.
6 देव दुष्टांना जगू देणार नाही
आणि तो गरीबांना नेहमीच न्यायाने वागवितो.
7 जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो.
तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो.
तो चांगल्यांना सदैव मान देतो.
8 म्हणून जर कुणाला शिक्षा झाली व त्यांना साखळदंडानी वा दोरीनी बांधून ठेवण्यात आले
तर त्यांनी नक्कीच काही वाईट केले असणार.
9 आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल.
देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे.
देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
10 देव त्या लोकांना त्याची ताकीद आणि सुधारणेच्या सूचना ऐकायला भाग पाडेल.
तो त्यांना पाप न करण्याची आज्ञा देईल.
11 जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची आज्ञा मानली, तर देव त्यांना यशस्वी करेल.
आणि ते त्यांचे आयुष्य सुखाने जगतील.
12 परंतु जर त्यांनी देवाची आज्ञा पाळायचे नाकारले तर त्यांचा नाश होईल.
त्यांना ज्ञान न होता मरण येईल.
13 “जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात.
देवाने जरी त्यांना शिक्षा केली तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.
14 ते लोक पुरुष वेश्यासारखे
अगदी तरुणपणी मरतील.
15 परंतु देव दु:खी लोकांना त्यांच्या दु:खातून सोडवील.
देव त्या दु:खाचा उपयोग लोकांना जागवण्यासाठी आणि त्यांनी त्याचे ऐकावे यासाठी करतो.
16 “ईयोब, देवाला तुला मदत करायची इच्छा आहे.
तू तुझ्या दु:खातून बाहेर पडावेस असे देवाला वाटते.
तुझे आयुष्य साधे सरळ असावे अशी त्याची इच्छा आहे.
तुझ्या जेवणाच्या टेबलावर अन्नाची रेलचेल असावी असे त्याला वाटते.
17 परंतु ईयोबा, आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, म्हणून तुला दुष्टांप्रमाणे शिक्षा करण्यात आली.
18 ईयोबा, तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस.
पैशामुळे तू आपला विचार बदलू नकोस.
19 आता तुझा पैसा तुझ्या कामी येणार नाही.
आणि सामर्थ्यवान माणसे तुला मदत करणार नाहीत.
20 आता रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस.
लोक रात्री पसार व्हायचा प्रयत्न करतात.
आपण देवापासून लपून राहू शकू असे त्यांना वाटते.
21 ईयोबा, तू खूप त्रास भोगला आहेस पण म्हणून वाईटाची निवड करु नकोस.
चूक न करण्याची दक्षता घे.
22 “देवाजवळ खूप शक्ती आहे.
तो जागातला सगळ्यात मोठा गुरु आहे.
23 काय करावे ते देवाला कुणी सांगू शकत नाही
‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कुणी त्याला म्हणू शकत नाही.
24 देवाने जे काही केले त्याबद्दल नेहमी त्याची स्तुती करायची आठवण ठेव.
लोकांनी देवाच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.
25 देवाने काय केले ते प्रत्येकाला दिसते.
दूरदूरच्या देशांतील लोकांनाही देवाचे महान कार्य दिसतात.
26 होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही.
आणि देवाचे अस्तित्व कधीपासून आहे तेही आपल्याला माहीत नाही.
27 “देव पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके
आणि पाऊस यात रुपांतर करतो.
28 अशा रीतीने ढग पाऊस पाडतात
आणि तो खूप लोकांवर पडतो.
29 देव ढगांची पखरण कशी करतो
किंवा आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो ते कुणाला कळत नाही.
30 बघ, देव विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो
आणि समुद्राचा खोल भागही त्यात येतो.
31 देव त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो
आणि त्यांना भरपूर अन्न देतो.
32 देव आपल्या हातांनी विजेला पकडतो
आणि त्याला हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.
33 मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते.
जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.
37 “गडगडाट व वीजा ह्यांची मला भिती वाटते.
तेव्हा माझ्या ह्रदयाची धडधड वाढते.
2 प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो.
देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
3 देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो.
ती सर्व पृथ्वीभर चमकते.
4 वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो.
देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो.
वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
5 देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे.
देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
6 देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’
देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
7 देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांना तो काय करु शकतो
हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
8 पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात.
9 दक्षिणेकडून चक्रीवादळ येते.
उत्तरेकडून थंड वारे येतात.
10 देवाच्या नि:श्वासाने बर्फ होते
आणि समुद्र गोठतो.
11 देव ढगांना पाण्याने भरतो
आणि तो ते पसरवतो.
12 तो ढगांना सर्व पृथ्वीभर पसरण्याची आज्ञा करतो.
देव जी आज्ञा देतो ती ढग पाळतात.
13 देव लोकांना शिक्षा करण्यासाठी ढग आणतो,
पूर आणतो किंवा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी पाणी आणतो.
14 “ईयोबा, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे.
थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
15 ईयोब, देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का?
तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
16 ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का?
देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याचे ढग हे केवळ एक उदाहरण आहे.
आणि देवाला त्याबद्दल सारे माहीत आहे.
17 परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत.
तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो,
तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.
18 ईयोब, तू देवाला आकाश पसरवण्यात
आणि ते आरशाप्रमाणे करण्यात मदत करु शकशील का?
19 “ईयोब, देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग.
काय बोलावे ते आम्हाला कळत नाही कारण आम्हाला जास्त माहिती नाही.
20 मला देवाशी बोलायचे आहे असे मी म्हणणार नाही.
तसे म्हणणे म्हणजे स्वतःचा नाश करुन घेणे आहे.
21 माणूस सूर्याकडे बघू शकत नाही.
वाऱ्याने ढग पळवून लावले की तो फार तेजस्वी आणि चकचकीत दिसतो.
22 आणि देवसुध्दा तसाच आहे.
देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुन [a] चमकते.
देवाच्या भोवती तेजोवलय असते.
23 तो सर्वशक्तिमान देव महान आहे.
आपण त्याला समजू शकत नाही.
तो सामर्थ्यवान आहे परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो.
देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते.
24 म्हणूनच लोक देवाला मान देतात.
परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांना मान देत नाही.”
यहूदीतर विश्वासणाऱ्यांना पत्र
22 प्रेषितांना, वडीलजनांना व सगळ्या मंडळीला वाटत होते की, पौल व बर्णबा यांच्याबरोबर आणखी काही माणसे अंत्युखियाला पाठवावीत, मंडळीने त्यांचे स्वतःजे काही लोक निवडलले. 23 त्यांनी यहूदा (बर्सब्बा) आणि सीला यांना निवडले. यरुशलेमधील बंधुवर्गामध्ये या माणसांचा आदर केला जात असे. मंडळीने या लोकांबरोबर हे पत्र पाठविले. पत्रात असे लिहिले होते की,
प्रेषित, वडीलजन आणि तुमचे बंधुजन
यांजकडून अंत्युखिया शहरातील तसेच सीरीया व किलकिया देशातील सर्व यहूदी नसलेल्या बांधवांस:
प्रिय बंधूनो,
24 आम्ही असे ऐकले की, आमच्यातील काही लोक तुमच्याकडे आले. ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्यामुळे तुम्हांला त्रास झाला व तुम्ही हताश झालात. परंतु आम्ही त्यांना हे करण्यास सांगितले नाही! 25 आम्ही सर्वांनी या गोष्टीला सहमती दर्शविली की, काही लेकांची निवड करुन त्यांना तुमच्याकडे पाठवावे. आमचे प्रिय मित्र पौल व बर्णबा यांच्यासह ते असतील. 26 बर्णबा व पौल यांनी आपल्या प्रभु येशू रिव्रस्ताच्या सेवेसाठी आपले जीवन दिले आहे. 27 म्हणून आम्ही यहूदा व सीला यांना त्यांच्याबरोबर पाठवत आहोत. ते सुद्धा तुम्हांला त्याच गोष्टी सांगतील. 28 पवित्र आत्म्याला असे वाटते की, तुमच्यावर आता आधिक ओझे असू नये. आणि आम्हांला ते मान्य आहे. तुम्ही फक्त पुढील गोष्टी कराव्यातः
29 कोणतेही अन्न जे मूर्तीला वाहिले आहे ते खाऊ नका
रक्त चाखू नका गुदमरुन मारलेले प्राणी खाऊ नका.
कोणत्याही प्रकारचे अनैतिक पाप करु नका.
जर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहाल, तर तुम्ही चांगले कराल
आता आम्ही तुमचा निरोप घेतो कळावे.
30 मग पौल, बर्णबा, यहूदा व सीला यांनी यरुशलेम सोडले. ते अंत्युखियास गेले. अंत्युखियात त्यांनी विश्वासणाऱ्यांना एकत्र केले. आणि त्यांना ते पत्र दिले. 31 जेव्हा त्यांनी ते पत्र वाचले. ते आनंदित झाले. पत्राने त्यांचे समाधात झाले. 32 यहूदा व सीला हेसुद्धा संदेष्टे होते. त्यांनी विश्वासणाऱ्या बंधूंना विश्वासात भक्कम करण्यासाठी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. 33 यहूदा व सीला काही काळ तेथे राहिल्यानंतर ते निघून गेले. बंधूंकडून त्यांना शांतीचा आशीर्वाद मिळाला, ज्या यरुशलेममधील बंधूनी यहूदा व सीला यांना पाठवले होते, त्यांच्याकडे ते परत गेले. 34 [a]
35 पण पौल व बर्णबा अंत्युखियातच राहिले. त्यांनी व इतर पुष्कळ लोकांनी सुवार्ता सांगितली आणि प्रभूचा संदेश लोकांना शिकविला.
पौल व बर्णबा वेगळे होतात
36 काही दिवसांनंतर पौलाने बर्णबाला सांगितले, “आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला. आपण पुन्हा या गावांमध्ये तेथील बंधुभगिनींना भेट देण्यासाठी आणि त्यांचे कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.”
37 बर्णबाला त्याच्यासोबत योहान (मार्क) यालाही घ्यायचे होते. 38 पण ज्याने पंफुलिया येथे त्याची साथ सोडली व आपले काम पूर्ण केले नाही, त्याला आपल्यासोबत घेऊ नये असे पौलाचे म्हणणे होते 39 पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.
40 पौलाने सीलाला आपल्यासोबत नेण्यासाठी निवडले. अंत्युखियातील बांधवांनी, पौलाला देवाच्या कृपेवर सोपवले आणि मग त्यांना रवाना केले. 41 पौल, सीरीया व किलकीया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला.
2006 by World Bible Translation Center