Old/New Testament
यहूद्यांचा विजय
9 बाराव्या (अदार) महिन्याच्या तेराव्या दिवशी लोकांना राजाच्या आज्ञेचे पालन करायचे होते. यहुद्यांच्या शत्रूंनी त्यादिवशी यहुद्यांचा पाडाव करण्याचे योजले होते. पण आता परिस्थिती बदलली होती. जे यहुद्यांचा द्वेष करत होते त्या शत्रूंपेक्षा यहुदी आता वरचढ झाले होते. 2 आपल्याला नेस्तनाबूत करु पाहणाऱ्या लोकांचा जोरदार प्रतिकार करता यावा म्हणून राजा अहश्वेरोशच्या राज्यातील सर्व ठिकाणचे यहुदी एकत्र आले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द जायची कोणामध्येच ताकद नव्हती. यहुद्यांना ते लोक घारबले. 3 शिवाय, सर्व प्रांतामधले अधिकारी, अधिपती, सरदार, आणि राजाचे कारभारी यांनी यहुद्यांना साहाय्य केले. कारण ते सगळे मर्दखयला घाबरत होते. 4 मर्दखय राजवाड्यातील अतिमहत्वाची व्यक्ती झाला होता. त्याचे नांव राज्यातील सर्वापर्यंत पोचले होते आणि ते सगळे त्याचे महत्व जाणून होते. मर्दखयचे सामर्थ्य उत्तरोत्तर वाढत गेले.
5 यहूद्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा पाडाव केला. तलवार चालवून त्यांनी शत्रूला ठार केले व शत्रूंचा विध्वंस केला. आपला तिरस्कार करणाऱ्या शत्रूचा त्यांनी मनःपूत समाचार घेतला. 6 शूशन या राजाधानीच्या शहरात यहूद्यांनी पाचशेजणांचा वध करून धुव्वा उडवला. 7 शिवाय त्यांनी पुढील लोकांना ठार केले. पर्शन्दाथा, दलफोन अस्पाथा, 8 पोराथा, अदल्या, अरीदाथा, 9 पर्मश्ता, अरीसई, अरीदय, वैजाथा, 10 हे हामानचे दहा पुत्र होते. हम्मदाथाचा मुलगा हामान यहुद्यांचा शत्रूं होता. यहुद्यांनी या सर्वाना ठार केले खरे पण त्यांची मालमत्ता लुटली नाही.
11 राजधानी शूशनमध्ये, त्या दिवशी किती जण मारले गेले ते राजाच्या कानावर आले. 12 तेव्हा राजा एस्तेर राणीला म्हणाला, “हामानच्या दहा मुलांसकट यहुद्यांनी शूशनमध्ये 500 लोकांना मारले. आता राज्याच्या इतर प्रांतांत काय व्हावे अशी तुझी इच्छा आहे? मला सांग म्हणजे मी तसे करवून घेईन. माग म्हणजे मी तसे करीन.”
13 एस्तेर म्हणाली, “राजाची मर्जी असेल तर शूशनमध्ये यहुद्यांना आजच्यासारखेच उद्या करु दे. हामानच्या दहा मुलांचे देहही स्तंभावर टांगा.”
14 तेव्हा राजाने तशी आज्ञा दिली. शूशनमध्ये तोच कायदा दुसऱ्या दिवशीही चालू राहिला. हामानच्या दहा मुलांना टांगले गेले. 15 अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहुदी एकत्र जमले. त्यांनी शूशनमधल्या 300 जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही.
16 त्याच वेळी प्रांतांमधले यहुदीदेखील एकत्र जमले. आपल्या संरक्षणासाठी आपले सामर्थ्य वाढावे म्हणून ते जमले. मग त्यांनी आपल्या शत्रूचा काटा काढला. शत्रुपक्षांपैकी 75,000 जणांना त्यांनी ठार केले पण त्यांच्या मालमत्तेमधले काही घेतले नाही. 17 अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी हे घडले चौदाव्या दिवशी यहुद्यांनी विश्रांती घेतली. तो दिवस त्यांनी आनंदोत्सवात घालवला.
पुरीमचा उत्सव
18 शूशनमधील यहूदी अदार महिन्याच्या तेराव्या आणि चौदाव्या दिवशी एकत्र आले होते. मग पंधराव्या दिवशी त्यांनी आराम केला. पंधरावा दिवस हा त्यांचा आनंदोत्सवाचा होता. 19 म्हणून गावोगावी आणि खेडोपाडी राहणारे यहुदी अदारच्या चतुर्दशीला पुरीम साजरा करतात. त्यांचा सण चतुर्दशीला असतो. त्या दिवशी ते मेजवान्या देतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात.
20 मर्दखयने जे जे झाले ते सगळे लिहून काढले. मग त्याने राजा अहश्वेरोशच्या प्रांतातील जवळदूरच्या सर्व प्रांतातील यहुद्यांना पत्रे पाठवली. 21 दरवर्षी अदार महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी यहुद्यांना पुरीम साजरा करायला सांगायला त्याने ती पत्रे लिहिली. 22 या दिवशी यहुद्यांनी आपल्या शत्रूचा काटा काढला म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या शोकाचे रुपांतर आनंदात झाले. म्हणून हा महिनाही उत्सवासारखा साजरा करावा. या महिन्यात त्यांच्या आक्रोशाचे रुपांतर आनंदोत्सवाच्या दिवसात झाले. मर्दखयाने सर्व यहुद्यांना पत्रे लिहिली. सणासुदीचे दिवस म्हणून त्याने हे दिवस त्यांना साजरे करायला सांगितले. या दिवशी त्यांनी मेजवान्या द्याव्यात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करावी आणि गरिबांना भेटवस्तू द्याव्यात.
23 मर्दखयने त्यांना लिहिल्याप्रमाणे करायला यहूदी तयार झाले. हा उत्सव पुढेही चालू ठेवायला त्यांनी मान्य केले.
24 हम्मदाथाचा मुलगा अगागी हामान सर्व यहुद्यांचा शत्रू होता. त्याने यहुद्यांचा नायनाट करण्याचे कपटी कारस्थान रचले होते. यहुद्यांच्या संहारासाठी त्यांने चिठ्ठी टाकून दिवस ठरवला होता. 25 हामानने असे केले पण एस्तेर राजाशी बोलायला गेली. त्यामुळे त्याने नवीन आज्ञा दिल्या त्या आज्ञांमुळे हामानचे कारस्थान फसले एवढेच नव्हे तर हामान आणि त्याचे कुटुंब यांच्यावर त्यामुळे अरिष्ट कोसळले. त्यामुळे हामान आणि त्याचे पुत्र यांना फाशीच्या स्तंभांवर टांगण्यात आले.
26-27 त्याकाळी चिठ्ठयांना “पुरीम” म्हणत, म्हणून या दिवसाला “पुरीम” नाव पडले. मर्दखयने पत्र लिहून यहुद्यांना हा दिवस साजरा करायला सांगितले. त्यामुळे यहुद्यांनी दरवर्षी हे दोन दिवस सणासारखे साजरे करायची प्रथा सुरु केली. आपल्यावर काय ओढवले होते त्याची आठवण राहावी म्हणून त्यांनी तसे ठरवले. यहुदी आणि त्यांच्याबरोबरचे लोक दरवर्षी हे दोन दिवस न चुकता साजरे करतात. 28 प्रत्येक पिढी आणि प्रत्येक कुटुंब या दिवसांची आठवण ठेवते. सर्व प्रांतांमध्ये आणि सर्व खेड्यापाड्यांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. पुरीमचे हे दिवस साजरे करण्याची प्रथा यहूदी कधीही सोडणार नाहीत. यहूद्यांचे वंशजही हा सण नेहमी लक्षात ठेवतील.
29 मग अबीहईलची मुलगी राणी एस्तेर आणि यहुदी मर्दखय यांनी पुरीमविषयी एक फर्मान लिहिले. हे दुसरे पत्र ही पूर्णपणे सत्य आहे हे सिध्द करण्यासाठी त्यांनी ते फर्मान राजाच्या पूर्ण अधिकारानिशी काढले. 30 राजा अहश्वेरोशच्या राज्यातील 127 प्रांतांमधील समस्त यहुद्यांना मर्दखयने पत्रे लिहिली. या सणाने शांतता निर्माण व्हावी आणि लोकांमध्ये परस्पर विश्वास असावा हा सणाचा उद्देश असल्याचे मर्दखयने लोकांना सांगितले. 31 पुरीम साजरा करायला लोकांना सांगण्यासाठी मर्दखयने ही पत्रे लिहिली. आणि हा नवीन सण केव्हा साजरा करायचा हे ही त्याने सांगितले. यहुदी मर्दखय आणि राणी एस्तेर यांनी यहुद्यांसाठी आदेश पाठवले होते. यहुद्यांमध्ये आणि त्यांच्या वंशजामध्ये हा दोन दिवसांचा सण पक्का रुजावा म्हणून त्या दोघांनी ही कृती केली. इतर सणांच्या दिवशी जसे ते उपवास करून आणि शोक करून तो सण आठवणीने पाळतात तसा हा सण त्यांनी इथून पुढे पाळावा. 32 पुरीमचे नियम एस्तेरच्या पत्राने मुक्रर झाले. आणि या गोष्टींची लेखी नोंद पुस्तकात झाली.
मर्दखयचा सन्मान
10 राजा अहश्वेरोशने लोकांवर कर बसवले. राज्यातील तसेच समुद्रकिनाऱ्याकडच्या दुरवरच्या नगरातील लोकांनाही कर भरावे लागले. 2 आणि अहश्वेरोशने जे पराक्रम केले ते पारस आणि मेदय राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहेत. मर्दखयने केलेल्या इतर गोष्टीही या इतिहासग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत. राजाने मर्दखयला महत्पदावर नेले. 3 राजा अहश्वेरोशच्या खालोखाल यहुदी मर्दखयचे स्थान होते. त्याचे यहुदी बांधव त्याला फार मान देत. कारण लोकांच्या भल्यासाठी तो खूप मेहनत घेई. मर्दखयमुळे सर्व यहुद्यांना शांतता लाभली.
स्तेफनाचे भाषण
7 प्रमुख याजक स्तेफनाला म्हणाला, “हे सर्व खरे आहे काय?” 2 स्तेफनाने उत्तर दिले, “माझ्या यहूदी वडीलजनांनो आणि बंधूंनो, माझे ऐका. आपला पिता (पूर्वज) अब्राहाम मेसोपोटेमिया येथे असताना आपल्या गौरवी देवाने त्याला दर्शन दिले. हे तो हारान येथे राहण्यापूर्वी घडले होते. 3 देव अब्राहामाला म्हणाला, ‘तुझा देश व तुझे नातेवाईक सोड. आणि मी दाखवीन त्या देशात जा!’ [a]
4 “म्हणून अब्राहामाने आपले वतन खास्द्यांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहू लागला. अब्राहामाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर देवाने त्याला या ठिकाणी पाठविले, जेथे आता तुम्ही राहत आहात. 5 परंतु देवाने अब्राहामाला या जमिनीतील काही दिले नाही. देवाने यातील एक पाऊल ठेवण्या इतकी सुध्दा जमीन त्याला दिली नाही. परंतु देवाने त्याला अभिवचन दिले की भविष्यात तो त्याला ही जमीन देईल. व त्याच्या मुलांनाही देईल. अब्राहामाला संतान होण्यापूर्वी हे घडले.
6 “देव त्याला म्हणाला, ‘तुझी संतती उपरी होईल. ते दुसऱ्या देशात राहतील. तेथील लोक तुइयावंशजांना गुलाम बनवितील आणि त्यांना चारशे वर्षे वाईट रीतीने वागवतील. 7 परंतु जो देश त्यांना गुलाम बनवील त्यांना मी शिक्षा देईन.’ [b] देव असे सुद्धा म्हणाला, ‘त्या गोष्टी घडल्यानंतर, तुझे लोक त्या देशातून बाहेर येतील. मग तुझे लोक या ठिकाणी माझी उपासना करतील.’ [c]
8 “देवाने अब्राहामाशी करार केला, या कराराचे चिन्ह होते सुंता. आणि म्हणून जेव्हा अब्राहामाला मुलगा झाला, तेव्हा अब्राहामाने आपल्या मुलाची, तो आठ दिवसांचा असताना, सुंता केली. त्याच्या मुलाचे नाव इसहाक होते. इसहाकानेसुद्धा आपला मुलगा याकोब याची सुंता केली. व याकोबाने आपल्या मुलांची सुंता केली, हे पुत्र नंतर बारा (पूर्वज) वडील झाले.
9 “या वडिलांना (पूर्वजांना) योसेफाचा मत्सर वाटला. त्यांनी योसेफाला इजिप्तमध्ये एक गुलाम म्हणून विकले, परंतु योसेफाबरोबर देव होता. 10 योसेफावर तेथे खूप संकटे आली पण देवाने त्याला सर्व संकटांतून सोडविले, देवाने योसेफाला ज्ञान व शहाणपण दिले. त्यामुळे इजिप्तचा राजा, फारो, याची मर्जी योसेफाला संपादन करता आली. फारोने योसेफाला इजिप्त देशावर व त्याच्या घरावर अधिपती म्हणून नेमले. 11 मग सर्व इजिप्त व कनान देशावर दुष्काळ पडला. आणि लोकांच्या दु:खाला अंत राहिला नाही. आमच्या पूर्वजांना अन्नधान्य मिळेनासे झाले.
12 “जेव्हा याकोबाने ऐकले की, इजिप्त देशामध्ये धान्य आहे, त्याने आपल्या पूर्वजांना तिथे पाठविले, ही पहिली वेळ होती. 13 ते दुसऱ्या वेळी आले तेव्हा योसेफाने आपली ओळख त्यांना करुन दिली. आणि फारो राजाला योसेफाच्या कुटुंबाची माहिती झाली. 14 मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे बोलावण्यासाठी पाठविले. 15 मग याकोब इजिप्त देशात गेला आणि तो व आपले पूर्वज तेथेच मरण पावले. 16 नंतर त्यांचे मृतदेह शेखेमला नेण्यात आले व तेथेच त्यांना पुरण्यात आले. अब्राहामाने शेखेम येथे हामोराच्या पुत्रांना पुरेपूर मोबदला देऊन विकत घेतलेल्या कबरीत त्यांना पुरण्यात आले.
17 “देवाने अब्राहामाला दिलेले वचन पुरे होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी इजिप्त देशातील आपल्या लोकांची संख्या वाढू लागली. 18 शेवटी, ज्या राजाला योसेफाची माहिती नव्हती, असा राजा इजिप्तवर राज्य करु लागला. 19 त्या (नवीन) राजाने फार हुशारीने आपल्या लोकांचा फायदा घेतला. तो आपल्या लोकांशी फार निर्दयतेने वागू लागला, तो त्यांच्या बालकांना घराबाहेर टाकून देण्यास भाग पाडू लागला. ती बालके जिवंत राहू नयेत हा त्याचा हेतु होता.
20 “त्या काळात मोशेचा जन्म झाला. आणि तो (देवाच्या नजरेत) फार सुंदर बालक होता. तीन महिन्यांपर्यंत त्याच्या वडिलांच्या घरात वाढला. 21 आणि जेव्हा त्याला घराबाहेर ठेवण्यात आले तेव्हा फारोच्या कन्येने त्याला घेतले. तिने त्याला आपल्या मुलासारख वाढवल.
2006 by World Bible Translation Center