Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 19-21

अम्मोन्याकडून दावीदाच्या लोकांचा अपमान

19 नाहाश हा अम्मोन्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला. तेव्हा दावीदाने विचार केला, “नाहाशचे माझ्याशी सलोख्याचे संबंध होते. म्हणून त्याचा मुलगा हानून याच्याशी मी प्रेमाचे संबंध ठेवीन.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनासाठी आपले दूत पाठवले. दावीदाचे हे सेवक अम्मोनला हानूनकडे घेऊन गेले.

तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनला म्हणाले, “या देखाव्याने फसू नकोस. तुझे सांत्वन करणे किंवा तुझ्या मृत वडीलांचा मान ठेवणे हा दावीदाचा हेतू नाही. दावीदाने या लोकांना तुझा प्रदेश पाहून ठेवायला आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्याला तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.” हे ऐकून हानून ने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. [a] त्यांची कमरेपर्यंतची वस्त्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.

दावीदाचे सेवक या गोष्टींमुळे इतके शरमिंदे झाले की त्यांच्याने घरी जाववेना. लोकांकडून दावीदाला ही बातमी समजली तेव्हा दावीदाने त्यांच्यासाठी पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीही येथे रहा मग इकडे या.”

पण दावीदाने वैर ओढवूत घेतले आहे हे अम्मोनी लोकांच्या लक्षात आले तेव्हा हानून आणि अम्मोनी लोक यांनी मेसोपटेम्या येथून रथ आणि सारथी आणवण्यासाठी 75,000 पौंड चांदी खर्च केली. माका व सोबा या अराममधील नगरांमधूनही त्यांनी रथ आणि स्वार यांची खरेदी केली. अम्मोन्यांनी 32,000 रथ विकत घेतले. माकाच्या राजालाही त्यांनी आपल्या सैन्यासह मदतीला बोलावले व त्याचे मोल देऊ केले. तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ ठोकला. खुद्द अम्मोनीही नगराबाहेर पडून वेशीजवळ लढायला आले.

अम्मोनी लढाईला सज्ज झाले आहेत हे ऐकून दावीदाने यवाबाला इस्राएलच्या सर्व सैन्यासकट युध्दावर पाठवले. अम्मोनी लढायच्या जय्यत तयारीनिशी वेशीजवळ आले. त्यांच्या मदतीला आलेले राजे मैदानात स्वतंत्रपणे उभे होते.

10 सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे हे यवाबने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएली फौजेतील निवडक लढवय्यांना अरामी सैन्यासमोर नियुक्त केले. 11 उरलेल्या इस्राएली फौजेला अबीशयच्या हाताखाली सोपवले. अबीशय हा यवाबचा भाऊ. हे सैन्य अम्मोन्याशी लढायला गेले. 12 यवाब अबीशयला म्हणाला, “अरामचे सैन्य जर मला भारी ठरले तर तू माझ्या मदतीला ये. आणि अम्मोनी तुझ्यापेक्षा प्रबळ ठरले तर मी तुला सहाय्य करीन. 13 आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण प्रयत्नांची शिकस्त करु, शौर्य गाजवू. मग परमेश्वराला जे योग्य वाटेल ते तो करो.”

14 यवाब आपल्या सैन्यासह अरामी फौजेवर चालून गेला. तेव्हा अरामच्या सैन्याने त्यांच्यापुढून पळ काढला. 15 अरामचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुशलेमला परत आला.

16 इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांना बोलवून घेतले. शोफख हा हदरेजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. त्याच्या नायकत्वाखाली ते आले.

17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन आराम्यांच्या समोर व्यूह रचला. सर्व तयारीनिशी त्यांनी आरम्यांवर हल्ला केला. 18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.

19 इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे हदरेजरच्या अधिकाऱ्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी दावीदाशी तह केला. ते दावीदाच्या अधिपत्याखाली आले. अराम्यांनी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत केली नाही.

यवाबकडून अम्मोन्यांचा संहार

20 राजे लढाईच्या मोहिमेवर बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाब इस्राएलाचे सैन्य घेऊन युध्दासाठी निघाला. पण दावीद यरुशलेममध्येच राहिला. इस्राएलचे सैन्य अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो मुलूख उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी नगराला वेढा घातला आणि लोकांची नाकेबंदी केली. राब्बा नगर पडेपर्यंत यवाबने इस्राएली सैन्यासह नगरावर हल्ला चालू ठेवला, व राब्बा उद्ध्वस्त केले.

दावीदाने, त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन पंचेचाळीस पौंड होते. तो दावीदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. राब्बा नगरातून आणखीही पुष्कळ लूट दावीदाला मिळाली. राब्बातील लोकांना बाहेर काढून दावीदाने त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, पहारी या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमला परतले.

धिप्पाड पलिष्ट्यांचा वध

पुढे गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. सिप्पय हा अत्यंत धिप्पाड व रेफाई वंशातला होता. तेव्हा हे पलिष्टि लोक इस्राएलींना शरण आले.

इस्राएलींची पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईरचा मुलगा एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. लहमीचा भाला चांगला लांबलचक आणि जाडजूड होता. हातमागाच्या तुरीसारखा तो मोठा होता.

गथ येथे पलिष्ट्यांशी इस्राएल लोकांची आणखी एकदा लढाई झाली. या गावात तेव्हा एक प्रचंड आकारमानाचा माणूस होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तो राक्षसपुत्रच होता. अशा माणसाने इस्राएल लोकांचा उपहास केल्यावर योनाथानने त्याला ठार केले. योनाथान हा शिमीचा मुलगा. शिमी दावीदाचा भाऊ.

पलिष्टे ही गथ नगरातील बलाढ्य लोकांची संतती. दावीद व त्याचे सेवक यांनी त्यांचे पारिपत्य केले.

इस्राएलच्या जनगणनेचे पातक

21 सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले. दावीद यवाबला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, “इस्राएलमधील सर्व लोकांच्या मोजणीला लागा. बैरशेब्यापासून दानपर्यंत सर्व प्रदेश पालथा घाला. कोणीही वगळले जाता कामा नये. मग मला एकंदर संख्या किती आहे ते येऊन सांगा.”

यावर यवाब म्हणाला, “परमेश्वर आपले राष्ट्र आहे त्यापेक्षा शंभर पटीने वाढवो. इस्राएलमधील सर्व लोक आपले दास आहेत, तेव्हा माझे स्वामीराज, आपण ही गोष्ट कशासाठी करता? त्याने इस्राएलचे लोक दोषी आणि पातकी ठरतील.”

पण राजा दावीद काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. तेव्हा यवाबला राजाज्ञेप्रमाणे वागणे भाग पडले. यवाब निघाला आणि लोकांची मोजणी करत त्याने सर्व प्रदेश तुडवायला सुरुवात केली. मग यरुशलेमला परत येऊन दावीदाला त्याने एकंदर लोकसंख्या सांगितली. इस्राएलमध्ये 11,00,000 तलवार धारी पुरुष होते आणि यहूदात 4,70,000. यवाबाने लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती कारण राजा दावीदाचा हुकूम त्याला मान्य नव्हता. देवाच्या दृष्टीने दावीदाची ही चूक होती म्हणून देवाने इस्राएलला शासन केले.

इस्राएलला शासन

मग दावीद देवाला म्हणाला, “माझ्या हातून हा मूर्खपणा झाला आहे. इस्राएलमधील लोकांची मोजणी करुन मी पाप केले आहे. या अपराधाबद्दल या तुझ्या सेवकाला तू या पापाची क्षमा करावीस अशी मी विनवणी करतो.”

9-10 गाद हा दावीदाचा संदेष्टा होता. त्याला परमेश्वर म्हणाला, “जा, जाऊन दावीदाला सांग: ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे: तीन गोष्टीमधून निवड करायची संधी मी तुला देतो. तू त्यांतील एक निवड. तू निवडशील ती शिक्षा मी तुला करीन.’”

11-12 मग गाद दावीदाकडे गेला. दावीदाला तो म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘दावीद तुझ्या शिक्षेची निवड तूच कर: अन्नधान्याच्या टंचाईची तीन वर्षे, किंवा शत्रू तलवारीने तुझा पाठलाग करत आहे आणि तुला पळता भुई थोडी झाली आहे असे तीन महिने किंवा परमेश्वराच्या शिक्षेचे तीन दिवस. या काळात देशभर भयंकर रोगराई पसरेल आणि परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांचा संहार करील.’ दावीद मला देवाने पाठवले आहे. आता मी त्याला काय उत्तर देऊ ते तू ठरव आणि मला सांग.”

13 दावीद गादला म्हणाला, “मी भलत्याच संकटात सापडलो आहे. माझ्या शिक्षेच्या बाबतीत माणूस काय ठरवणार? परमेश्वर दयाघन आहे. मला शासन कसे करायचे ते त्यालाच ठरवू दे.”

14 तेव्हा परमेश्वराने इस्राएलभर रोगराई पसरवली. त्यात 70,000 लोक मृत्युमुखी पडले. 15 यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेश्वराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होता.

16 दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखवट्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते. 17 दावीद देवाला म्हणाला, “पाप माझ्या हातून घडले आहे लोकांच्या मोजणीचा हूकूम मी दिला. माझे चुकले. इस्राएल लोक निरपराध आहेत. परमेश्वरा, देवा शासन करायचे ते मला आणि माझ्या कुटुंबियांना कर. पण तुझ्या लोकांचा जीव घेणारी ही रोगाची साथ थांबव.”

18 मग परमेश्वराचा दूत गादला म्हणाला, “परमेश्वराच्या उपासनेसाठी दावीदाला एक वेदी बांधायला सांग. अर्णान यबूसीच्या खळ्या जवळ त्याने ती बांधावी.” 19 गादने हे दावीदाला सांगितले. दावीद अर्णानच्या खळ्याकडे गेला.

20 अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता. तो मागे वळून पाहतो तर त्याला देवदूत दिसला. अर्णानचे चारही मुलगे त्याला पाहून लपून बसले. 21 दावीद अर्णान कडे गेला. अर्णान खळ्यातून राजाजवळ गेला आणि त्याने राजाला डोके जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.

22 राजा त्याला म्हणाला, “तुझे हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. तेथे मला परमेश्वराच्या उपासने करिता वेदी बांधायची आहे. म्हणजे ही जीवघेणी मरी थांबेल.”

23 अर्णान दावीद राजाला म्हणाला, “हे खळे मी तुम्हाला दिले. तुम्ही आमचे स्वामी आणि पोशिंदे आहात. तुम्ही त्याचे हवे ते करा. यज्ञात अर्पण करण्यासाठी मी बैलही देईन. तसेच वेदीवरील होमात घालण्यासाठी लाकडी फळ्या, आणि धान्यार्पणासाठी गहू हे ही सर्व मी तुम्हाला देईन.”

24 तेव्हा राजा दावीद अर्णानला म्हणाला, “मी तुला त्याची पूर्ण किंमत देईन. तुझ्याकडून काढून घेऊन मी ते परस्पर परमेश्वराला वाहणार नाही. फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”

25 आणि दावीदाने खळ्याचे मूल्य म्हणून अर्णानला 25 पौंड सोने दिले. 26 दावीदाने त्या जागी परमेश्वराच्या उपासनेकरिता वेदी बांधली. तेथे त्याने होम आणि शांती-अर्पणे केली. दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याला उत्तर म्हणून परमेश्वराने स्वर्गातून अग्नी पाठवला. तो दिव्य अग्नी नेमका होमार्पणाच्या वेदीवर पडला. 27 मग परमेश्वराने देवदूताला आपली तलवार म्यान करायला सांगितले.

28 अर्णानच्या खळ्यावर परमेश्वराने आपल्याला उत्तर दिलेले पाहून दावीदाने परमेश्वरासाठी यज्ञ केले. 29 (पवित्र निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनमध्ये उच्च स्थानावर होती. इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो पवित्र निवासमंडप बांधला होता. 30 परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या धाकाने दावीद देवापुढे पवित्र निवासमंडपाकडे जाण्यास घाबरत होता.)

योहान 8:1-27

येशू जैतुनाच्या डोंगरावर [a] निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.

नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहूदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले. ते येशूला म्हणाले, “गुरूजी, जो हिचा नवरा नाही, अशा माणसाशी व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले. मोशेच्या नियमशस्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की, असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करुन जिवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?”

येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. यहूदी पुढारी येशूला प्रश्न विचारीतच राहिले, म्हणून येशू मान वर करुन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, “ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.” मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.

येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले, ते एक एक करुन निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती. 10 येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?”

11 त्या स्त्रीने उत्तर दिले. “महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.”

मग येशू म्हणाला, “मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.”

(वचने 7:53 ते 8:11 अति जुन्या व उत्तम ग्रीक प्रतीमध्ये ही वचने नाहीत)

येशू जगाचा प्रकाश आहे

12 नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.”

13 परंतु परुशी लोक येशूला म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता, तेव्हा ह्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारु शकत नाही.”

14 येशूने उत्तर दिले, “होय, मी स्वतःच माझ्याविषयी या गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हांला माहीत नाही. 15 तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही. 16 पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले, तो माझ्याबरोबर असतो. 17 तुमचे स्वतःचेच नियमशास्त्र असे म्हणते की, दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात, ते तुम्हांला स्वीकारावेच लागते. 18 स्वतःविषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे. आणि ज्या पित्याने मला पाठविले, तो दुसरा साक्षीदार आहे.”

19 लोकांनी येशूला विचारले, “तुमचा पिता कोठे आहे?”

येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” 20 येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली (पकडले) नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.

यहूदी लोकांना येशूविषयी समजत नाही

21 येशू पुन्हा लोकांना म्हणाला, “मी लवकरच तुम्हांला सोडून जाईन. तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही आपल्या पापात मराल. मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”

22 म्हणून यहूदी लोक एकमेकांस विचारु लागले. “येशू स्वतःला ठार करणार नाही ना? यासाठी तो असे म्हणाला का, ‘की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही’?”

23 पण येशू म्हणाला, “तुम्ही लोक येथील खालचे आहात, पण मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहा; परंतु मी या जगाचा नाही. 24 तुम्ही आपल्या पापात मराल असे मी म्हणालो, होय. ‘मी आहे’ [b] यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर तुम्ही पापात मराल.”

25 यहूदी लोकांनी विचारले. “मग तुम्ही कोण आहात?”

येशूने उत्तर दिले, “मी सुरुवातीपासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे. 26 तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. मी तुमचा न्याय करु शकतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो. आणि तो सत्य सांगतो.”

27 येशू कोणाविषयी बोलत आहे, हे लोकांना समजेना. येशू त्यांना पित्याविषयी सांगत होता.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center