Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 शमुवेल 15-16

शौल अमालेकांना नेस्तनाबूत करतो

15 एक दिवस शमुवेल शौलला म्हणाला, “इस्राएलचा राजा म्हणून तुला राज्याभिषेक करायला परमेश्वराने मला पाठवले. आता परमेश्वर काय म्हणतो ते ऐक. सर्व शक्तिमान परमेश्वराचे म्हणणे आहे: ‘इस्राएल लोक मिसर मधून बाहेर पडले तेव्हा अमालेकींनी त्यांना कनानच्या वाटेवर अडवले. अमालेक्यांचे हे कृत्य मी पाहिले आहे. तेव्हा आता त्यांच्याशी जाऊन लढ. त्यांचा आणि त्यांच्या मालमत्तेचा पूर्णपणे बीमोड कर. काहीही शिल्लक ठेवू नकोस. पुरुष, बायका, मुले, अगदी तान्ही बाळेसुध्दा मारुन टाक. त्याची गुरे, मेंढरे, उंट, गाढवे या सर्वाचा संहार कर.’”

तलाईम येथे शौलाने सर्व सैन्याची जमवाजमव केली. दोन लाखांचे पायदळ आणि यहूदातील दहा हजार माणसे त्यात होती. मग शौल अमालेक नगरापाशी जाऊन एका खोऱ्यात दबा धरुन बसला. केनी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही अमालेक्यांची संगत सोडून दूर निघून जा. म्हणजे मग आम्ही अमलेक्यांच्या बरोबर तुमचा नाश करणार नाही. कारण मिसरमधून इस्राएल बाहेर पडले तेव्हा तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागला होता.” तेव्हा केनी लोक अमालेक्यांना सोडून निघून गेले.

शौलने अमालेक्यांचा पराभव केला. हवीलापासून मिसरच्या हद्दीजवळच्या शूरपर्यंत त्याने अमालेक्यांचा पाठलाग केला. अगाग हा अमालेक्यांचा राजा होता. त्याला शौलने ताब्यात घेतले. त्याला जिवंत ठेवून बाकी अमालेकी लोकांना त्याने कापून आणले. सर्वच गोष्टींचा संहार करायचे शौलच्या आणि त्याच्या सैन्याच्या जिवावर आले. म्हणून त्यांनी अगागला जिवंत ठेवले. तसेच धष्टपुष्ट गुरे. उत्तम मेंढरे, कोकरे आणि काही चांगल्या ठेवण्यायोग्य गोष्टी त्यांनी ठेवल्या. जे टाकाऊ आणि कुचकामी त्याचा नाश केला.

शमुवेल शौलला त्याच्या पापांची जाणीव करुन देतो

10 यानंतर शमुवेलला परमेश्वरा कडून संदेश आला. 11 परमेश्वर त्याला म्हणाला, “शौला आता मला अनुसरत नाही. त्याला राजा केले याचे मला दु:ख होते. माझ्या सांगण्याप्रमाणे तो आता वागत नाही.” शमुवेलला हे ऐकून फार खेद वाटला. रात्रभर त्याने अश्रू ढाळत परमेश्वराची प्रार्थना केली.

12 दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून तो शौलला भेटायला गेला. पण तिथे गेल्यावर त्याला कळले की शौल यहूदातील कर्मेल येथे गेला आहे. तिथे स्वतःच्या सन्मानार्थ एक दगडी स्तंभ उभारुन अनेक गावे फिरुन तो गिलगाल येथे येणार आहे.

तेव्हा शौल होता त्या ठिकाणी शमुवेल गेला. तिथे अमालेक्याच्या लुटीतील पहिला भाग परमेश्वरासाठी शौलने नुकताच यज्ञात अर्पण केला होता. 13 शमुवेल शौलजवळ पोचला तेव्हा शौलने त्याला अभिवादन केले. तो म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो. मी परमेश्वराच्या आज्ञेत आहे.” 14 तेव्हा शमुवेल म्हणाला, “मग मला हा कसला आवाज ऐकायला येत आहे? शेरडामेंढरांचे केकारणे आणि गुरांचे हंबरणे याचा अर्थ काय?” 15 शौल म्हणाला, “सैनिकांनी ती गुरे अमालेक्यांकडून लुटीत आणली आहेत. प्रभु परमेश्वरासाठी यज्ञ अर्पण करायला म्हणून त्यांनी उत्तमोत्तम गुरेमेंढरे बाजूला ठेवली आहेत. बाकीच्या सगळ्याचा मात्र आम्ही संहार केला.” 16 यावर शमुवेल शौलला म्हणाला, “बस्स कर! काल रात्री परमेश्वर माझ्याशी काय बोलला ते सांगतो.”

शौल म्हणाला, “बरे तर, सांगा.”

17 शमुवेल सांगायला लागला, “पूर्वी तू स्वतःला मोठा समजत नव्हतास. पण तू सर्व इस्राएलांचा प्रमुख बनलास. परमेश्वराने तुला राजा म्हणून नेमले. 18 परमेश्वराने तुला विशेष कामगिरीवर पाठवले. तो म्हणाला, ‘सर्व अमालेक्यांच्या संहार कर. ते नीच असल्याने त्यांना शिल्लक ठेवू नको. त्यांची नावनिशाणीही उरु देऊ नको.’ 19 पण तू परमेश्वराचे ऐकले नाहीस. तुला या गोष्टी ठेवायच्या होत्या म्हणून परमेश्वराने जे करु नको म्हणून सांगितले ते तू केलेस.”

20 शौल म्हणाला, “पण मी तर परमेश्वराची आज्ञा पाळली आहे. त्याने पाठवले तिकडे मी गेलो. सर्व अमालेक्यांना नष्ट केले. राजा अगाग याला तेवढे मी परत आणले. 21 आणि सैनिकांनी जी निवडक गुरेमेंढरे घेतली ती गिलगाल येथे यज्ञात तुमचा देव परमेश्वर ह्याला अर्पण करण्यासाठी.”

22 पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वर जास्त प्रसन्न कशामुळे होईल? यज्ञ आणि होमार्पणे देऊन की त्याच्या आज्ञा पाळल्याने? त्याच्यासाठी यज्ञ करण्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळणे केव्हाही श्रेयस्कर. मेंढराची चरबी त्याला वाहण्यापेक्षा त्याचे ऐकणे चांगले. 23 परमेश्वराची अवज्ञा करणे हे जादूटोण्याचे पाप करण्या इतकेच वाईट. आडमुठेपणाने आपल्याला हवं ते करणे हे मूर्तीपूजेसारखंच पातक आहे. तू परमेश्वराचा आज्ञाभंग केलास. तेव्हा परमेश्वरालाही तू राजा असणे आता मान्य नाही.”

24 तेव्हा शौल शमुवेलला म्हणाला, “माझ्या हातून पाप झाले आहे. मी परमेश्वराचे वचन पाळले नाही. तुम्ही सांगितले तसे वागलो नाही. लोकांचा मला धाक वाटला आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी वागलो. 25 पण आता या पापाबद्दल मला क्षमा करा. मी तुम्हाला ही विनवणी करतो. माझ्या बरोबर चला. मी परमेश्वराची उपासना करीन.”

26 पण शमुवेल म्हणाला, “मी आता तुझ्याबरोबर परत येणार नाही. तू परमेश्वराचा शब्द मोडलास तेव्हा परमेश्वरही तुला इस्राएलच्या राजेपदावरुन झुगारुन देत आहे.”

27 एवढे बोलून शमुवेल जायला निघाला तेव्हा शौलने त्याच्या अंगरख्याचे टोक धरुन त्याला थोपवायचा प्रयत्न केला. यात अंगरखा फाटला. 28 शमुवेल म्हणाला, “तू हा अंगरखा फाडलास तसे इस्राएलचे राज्य तुझ्याकडून परमेश्वराने हिसकावून घेतले आहे. तुझ्याच एका मित्राकडे ते सोपवले आहे. तो तुझ्या पेक्षा भला आहे. 29 परमेश्वर इस्राएलचा देव असून तो सर्वकाळ आहे. परमेश्वर आपला शब्द फिरवत नाही की विचार बदलत नाही. माणसासारखा तो चंचल नव्हे.”

30 शौल म्हणाला, “ठीक आहे माझ्याहातून पाप झाले आहे. पण कृपाकरुन माझ्या बरोबर परत चल. इस्राएलचे लोक आणि अधिकारी मंडळी यांच्यासमोर माझा अवमान करु नको. तू बरोबर चल. मग मी प्रभु परमेश्वराची उपासना करतो.” 31 शमुवेल त्या प्रमाणे शौलबरोबर गेला. शौलने परमेश्वराची उपासना केली.

32 शमुवेल म्हणाला, “आता अमालेक्यांचा राजा अगाग याला माझ्या समोर आणा.”

अगाग आला. त्याला साखळदंडांनी बांधले होते. त्याला वाटले, “हा काही आपला जीव घेणार नाही.”

33 पण शमुवेल अगागला म्हणाला, “तुझ्या तलवारीने तू मुलांना आई वेगळे केलेस. आता तुझ्या आईची गतीही तशीच होईल.” आणि त्याने गिलगाल येथे परमेश्वरासमोर अगागचे तुकडे तुकडे केले.

34 मग शमुवेल तिथून निघाला. तो रामा येथे गेला. शौल आपल्या गिबा येथील घरी परतला. 35 पुढे आयूष्यभर शमुवेलाला शौलाचे दर्शन झाले नाही. शौलाबद्दल त्याला फार वाईट वाटले. शौलाला इस्राएलचा राजा केल्याबद्दल परमेश्वरालाही खेद झाला.

शमुवेल बेथलहेमला जातो

16 परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “शौलसाठी तू किती दिवस शोक करत बसणार आहेस? राजा म्हणून मी त्याला झिडकारले तरी तू त्याच्याबद्दल वाईट वाटून घेत आहेस? आपल्या शिंगात तेल भरुन घे आणि बेथलहेमला जायला नीघ. तुला मी इशाय नावाच्या माणसाकडे पाठवतो. इशाय बेथलहेमला राहतो. त्याच्या एका मुलाची मी राजा म्हणून निवड केली आहे.”

तेव्हा शमुवेल म्हणाला, “मी कसा जाऊ? ही गोष्ट शौलाने ऐकली तर तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न करील.”

परमेश्वर त्यावर त्याला म्हणाला, “तू बेथलहेमला जायला नीघ, बरोबर एक वासरु घे. ‘मी परमेश्वराला यज्ञ करायला चाललो आहे’ असे म्हण. इशायला यज्ञासाठी बोलाव. मग मी काय करायचे ते सांगीन. मी सांगेन त्या व्यक्तीला अभिषेक कर.”

शमुवेलने मग परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे केले. तो बेथलहेम येथे आला. तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांना धास्ती वाटली. ते शमुवेलला भेटले. “आपली ही सलोख्याचीच भेट आहे ना”, असे त्यांनी शमुवेलला विचारले.

शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. तयारीला लागा आणि माझ्याबरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला व त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करुन त्यात भाग घ्यायला सांगितले.

इशाय आणि त्याची मुले आली तेव्हा शमुवेलने अलियाबला पाहिले. शमुवेलला वाटले, “हाच तो परमेश्वराने निवडलेला माणूस!”

तेव्हा परमेश्वर शमुवेलला म्हणाला, “अलियाब उंचापुरा आणि देखणा आहे. पण रुपावर जाऊ नको. परमेश्वराची नजर माणसांसारखी नसते. तुम्ही बाह्यरुपाला भाळता पण परमेश्वर अंतरंग पाहतो. अलियाब ही योग्य व्यक्ती नव्हे.”

मग इशायने आपला दुसरा मुलगा अबीनादाब याला बोलावले. तो शमुवेल समोरुन गेला. शमुवेल म्हणाला, “हीही परमेश्वराची निवड नव्हे.”

मग इशायने शम्माला शमुवेलच्या समोर यायला सांगितले. तेव्हाही शमुवेल म्हणाला, “हाही तो नव्हे.”

10 इशायने आपल्या सातही मुलांना शमुवेल पुढे हजर केले. पण शमुवेल म्हणाला, “यापैकी कोणालाही परमेश्वराने निवडलेले नाही.”

11 त्याने पुढे इशायला विचारले, “इथे तुझी सगळी मुलं हजर आहेत ना?”

इशाय म्हणाला, “नाही आणखी एक आहे सगळ्यात धाकटा तो रानात मेंढरे राखायला गेला आहे.”

शमुवेल म्हणाला, “त्याला बोलावणे पाठवून इथे आण. तो येईपर्यंत आपण जेवायला सुरुवात करयाची नाही.”

12 इशायने मग कोणालातरी पाठवून आपल्या धाकट्या मुलाला यायला सांगितले. तो अतिशय देखणा, तांबूस वर्णाचा तरुण होता.

परमेश्वर आता शमुवेलला म्हणाला, “ऊठ आणि याला अभिषेक कर. हाच तो.”

13 शमुवेलने आपले तेलाने भरलेले शिंग उचलले आणि इशायच्या या धाकट्या मुलावर सर्व भावंडांसमोर त्या खास तेलाने अभिषेक केला. तेथून पुढे दावीदवर परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊ लागला. एवढे झाल्यावर शमुवेल रामा येथे परतला.

शौलाला दुष्ट आत्म्याचा त्रास

14 इकडे परमेश्वराच्या आत्म्याने शौलाची साथ सोडली. परमेश्वराने पाठवलेला एक दुरात्मा त्याला त्रस्त करु लागला. 15 शौलचे नोकर त्याला म्हणाले “हा परमेश्वराकडचा दुरात्मा तुम्हाला त्रास देत आहे. 16 आम्हाला आज्ञा द्या आम्ही कोणी चांगला वीणा वाजवणारा शोधतो. तुम्ही त्या दुरात्म्याने त्रस्त व्हाल तेव्हा हा वादक वीणा वाजवेल. म्हणजे तो दुष्ट आत्मा तुम्हाला सोडून जाईल आणि तुम्हाला बरे वाटेल.”

17 तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “शोधा तर असा कुणीतरी आणि त्याला माझ्याकडे आणा.”

18 यावर एक चाकर म्हणाला, “इशाय नावाचा एक माणूस बेथलहेम येथे राहतो. त्याचा मुलगा मला माहीत आहे. त्याला वीणा वाजवता येते. तो चांगला लढवय्या सुध्दा आहे. तो तरतरीत, देखणा असून परमेश्वराची त्याला साथ आहे.”

19 तेव्हा शौलाने इशायकडे संदेश पाठवला. निरोप्यांनी इशायला सांगितले, “तुला दावीद म्हणून मुलगा आहे. तुझी मेंढरे तो राखतो. त्याला माझ्याकडे पाठव.”

20 तेव्हा इशायने शौलासाठी काही भेटवस्तू घेतल्या. एक गाढव. थोडी भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला आणि एक करडू या वस्तू दावीदजवळ देऊन त्याला शौलकडे पाठवले. 21 दावीद शौलकडे गेला आणि त्याच्या समोर उभा राहिला. शौलला तो फारच आवडला. दावीद त्याचा शस्त्रवाहक बनला.

22 शौलने इशायला निरोप पाठवला, “दावीदला माझा सेवक म्हणून इथेच राहू दे. त्याच्यावर माझा फार लोभ आहे.”

23 मग जेव्हा जेव्हा शौल दुरात्म्या मुळे हैराण होई तेव्हा तेव्हा दावीद वीणावादन करी. त्यामुळे दुरात्मा पळून जाऊन शौलला दिलासा मिळे.

लूक 10:25-42

चांगला शोमरोनी

25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

26 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू त्यांत काय वाचतोस?”

27 तो म्हणाला, “‘तू तुझा देव प्रभु याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीति कर.’ [a] व ‘स्वतःवर जशी प्रीति करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीति कर.’” [b]

28 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू चिरकाल राहशील.”

29 पण आपण योग्य प्रश्न विचारला आहे हे इतरांना दाखवून देण्यासाठी त्याने येशूला विचारले, “मग माझा शेजारी कोण?”

30 येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमाहून यरीहोस निघाला होता. आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेतले. त्यांनी त्याला मारले, आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.

31 “तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्याला पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. 32 त्याच मार्गाने एक लेवी त्या ठिकाणी आला. लेव्याने त्याला पाहिले. व तो सुध्दा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.

33 “नंतर एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत तेथे आला. जेव्हा त्याने त्या मनुष्याला पाहिले, तेव्हा त्याला त्याच्याविषयी कळवळा आला 34 तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्या बांधल्या. नंतर त्या शोमरोन्याने त्याला आपल्या गाढवावर बसविले व त्याला उतारशाळेत आणले, व त्याची देखभाल केली. 35 दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार। [c] (सुमारे वीस रुपये) काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’”

36 लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, “त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते?”

37 तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्या गरजू जखमी प्रवाशावर दया मनापासून केली तो.”

तेव्हा येशू त्याला म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”

मरीया आणि मार्था

38 मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता, तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करुन आदरातिथ्य केले. 39 तिला मरीया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. 40 पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, “प्रभु, माझ्या बहिणीने सर्व काम माइयावर टाकले याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग.”

41 प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. 42 पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो कारण मरीयेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center