Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यहोशवा 13-15

काबीज करायचा राहिलेला प्रदेश

13 यहोशवा आता वृध्द झाला होता तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे आता वय झाले आहे पण अजून बराच प्रदेश काबीज करायचा राहिला आहे. पलिष्टी आणि गशूरी यांचा प्रांत अजून घ्यायचा आहे. मिसरमधील शीहोर नदीपासून उत्तरेस एक्रोनच्या सीमेपर्यंतचा भागही अजून काबीज केलेला नाही. त्या भूमीवर अजूनही कनानी लोकांचा ताबा आहे. गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन या पलिष्टचांच्या पाच नेत्यांचा तुला पराभव करायचा आहे. कनानी भूमीच्या दक्षिणेकडील अव्वी लोकांनाही पराभूत करायचे आहे. गिबली लोकही अजून राहिले आहेत. पूर्वेकडील हेर्मोन डोंगराखालच्या बाल-गादापासून हमाथ येथे जायच्या ठिकाणापर्यंत सर्व लबानोन हा सुध्दा आहेच.

“लबानोनापासून मिस्रपोथ-माईमपर्यंत पसरलेल्या डोंगराळ भागात सीदोनी राहतात. पण इस्राएल लोकांसाठी मी या सर्वांना तेथून हुसकावून लावीन. इस्राएल लोकांमध्ये तू जमिनीची वाटणी करशील तेव्हा या भागाचेही लक्षात असू दे मी सांगितल्याप्रमाणे वाटे कर. आता, नऊ वंश आणि मनश्शाचा अर्धा वंश यांच्यात या देशाचे भाग कर.”

जमिनीची वाटणी

रऊबेनी, गादी आणि मनश्शाच्या उरलेल्या अर्ध्या वंशातील लोक यांना त्यांचा जमिनीतील वाटा पूर्वीच मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याने यार्देनच्या पूर्वेकडील भाग त्यांना दिला. आर्णीन खोऱ्या नजीकच्या अरोएर पासून त्यांचा प्रदेश सुरु होतो. तो खोऱ्याच्या मध्यावरील गावापर्यंत मेदबापासून दिबोनपर्यंतचे सलग पठार त्यात मोडते. 10 अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या आधिपत्याखाली असलेली सर्व गावे या प्रदेशात होती. हा राजा हेशबोनहून राज्य करत होता. अम्मोन्यांच्या हद्दीपर्यंतची सर्व नगरे 11 तसेच गिलादांचे नगर व गशूरी आणि माकाथी यांचा प्रदेश येथपर्यंत ही जमीन भिडलेली होती. हर्मोन पर्वत, सलकापर्यंतचा सर्व बाशान त्यांच्या हद्दीत होता. 12 बाशानमध्ये राज्य करीत असलेल्या ओगची राजधानीही त्यात येत होती. पूर्वी तो अष्टारोथ व एद्रई येथे राज्य करत असे ओग रेफाई लोकांपैकी होय. मोशेने पूर्वी या लोकांचा पराभव करून त्यांची भूमी काबीज केली होती. 13 तरी इस्राएल लोकांनी गशूरीआणि माकाथी यांना घालवून दिले नाही. ते लोक आजही इस्राएल लोकांमध्ये राहात आहेत.

14 फक्त लेवी वंशाला तेवढा जमिनीत वाटा मिळालेला नाही त्याऐवजी, इस्राएलांच्या परमेश्वर देवाला अग्नीतून केलेली अन्नार्पणे त्यांना मिळतात. परमेश्वरानेच त्यांना तसे कबूल केले आहे.

15 रऊबेनी वंशाला त्यांच्यातील कुळाप्रमाणे मोशेने जमीन दिली. त्यांना मिळालेली जमीन अशी. 16 आर्णोन खोऱ्यानजीकच्या अरोएर पासून मेदबा नगरापर्यंत, खोऱ्यामधले नगर व पठारी प्रदेश यात येतो. 17 तसेच हेशबोनपर्यंतची जमीन व पठारावरील सर्व नगरे या मुलखात मोडतात. ही नगरे म्हणजे दीबोन, बामोथ-बाल बेथ-बालमोन, 18 याहस, कदेमोथ, मेफाथ, 19 किर्या-थईम, सिन्मा व खोऱ्यातील पहाडावरील सरेथ शहर, 20 बेथ-पौर, पिसगाची उतरणी आणि बेथ-यशिमोथ. 21 म्हणजेच हेशबोन येथील अमोऱ्यांचा राजा सीहोन याच्या अखत्यारीतील सर्व मुलुख व पठारावरील सर्व शहरे या हद्दीत होती. मोशेने सीहोन राजाचा व मिद्यानचे मांडलीक अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा यांचा पराभव केला होता. (हे सर्व मांडलीक राजे सीहोनच्या बाजूने लढले होते.) ते तेथेच राहणारे होते. 22 बौराचा पुत्र बलाम यालाही इस्राएल लोकांनी पराभूत केले. (हा बलाम जादूटोणा करून भविष्य सांगत असे.) इस्राएल लोकांनी लढाईत पुष्कळ लोकांना ठार मारले. 23 रऊबेनींना दिलेल्या जमिनीची हद्द यार्देन नदीच्या किनाऱ्यापर्यंत होती. तेव्हा ही नगरे व त्यांचे प्रदेश हीच रऊबेनी कुळातील लोकांना दिलेली भूमी होय.

24 गाद वंशालाही त्याच्या कुळांप्रमाणे मोशेने जमिनीत वाटा दिला तो असा:

25 याजेर आणि गिलादातील सर्व शहरे राब्बा जवळच्या अरोएरापर्यंतचा अम्मोनी लोकांचा अर्धा प्रदेशही मोशेने त्याना दिला. 26 हेशबोनपासून रामाथ मिस्पापर्यंत व बतोनीम आणि महनाईमापासून दबीर पर्यंत. 27 बेथहाराम, बेथ-निम्रा, सुक्कोथ, साफोन, हेशबोनाचा राजा सीहोन याच्या राज्याचा बाकीचा भाग. एवढा यार्देनच्या पूर्वेकडील खोऱ्याचा भाग त्यांचा होता. गालील सरोवराच्या टोकापर्यंत या जमिनीची हद्द होती. 28 गाद वंशातील सर्व कुळांना मोशेने वर वर्णन केलेली नगरे व गावे यांच्यासकटचा प्रदेश दिला.

29 मनश्शेच्या अर्ध्या वंशाला मोशेने दिलेली जमीन अशी;

30 महनाईमापासून बाशानचा राजा ओग याच्या अधिपत्याखालील सर्व भूभाग, याईराची बाशानमधील सर्व नगरे (सगळी मिळून ती साठ होती.) 31 अर्धा गिलाद, अष्टारोथ व एद्रई (ओग राजाने या तिन्ही शहरात वास्तव्य केले होते.) मनश्शेचा मुलगा माखीर याच्या कुळाला ही जमीन मिळाली. म्हणजेच त्या अर्ध्या वंशाला ही जमीन मिळाली.

32 यार्देनच्या पलीकडे. यरीहोच्या पूर्वेला मवाबाच्या पठारावर या सर्वांचा तळ असताना मोशेने त्यांना हा प्रदेश दिला. 33 लेवींना मोशेने जमिनीत वाटा दिला नाही. खुद्द इस्राएलाचा देव परमेश्वर हेच त्यांचे इनाम, हा परमेश्वराचा शब्द होता.

14 एलाजार याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि इस्राएलमधील सर्व वंशांचे प्रमुख यांनी जमिनीच्या वाटण्या कशा करायच्या ते ठरविले. परमेश्वराने मोशेला याविषयी पूर्वीच आज्ञा दिली होती. तिला अनुसरुनच साडेनऊ वंशांच्या लोकांनी चिठ्ठ्या टाकून वाटे केले. अडीच वंशातील लोकांना मोशेने आधीच यार्देन नदीच्या पूर्वेकडील जमीन दिली होती. पण लेवींना इतरांप्रमाणे जमिनीत वाटा नव्हता. अशाप्रकारे बारा वंशातील लोकांना आपापल्या हिश्श्याची जमीन मिळाली. योसेफच्या वंशाची विभागणी मनश्शे व एफ्राईम अशा दोन वंशात झाली होती. त्यांनाही प्रत्येकी काही जमीन मिळाली. परंतु लेवीच्या वंशातील लोकांना जमिनीत हिस्सा मिळाला नाही. त्यांना राहण्याकरता काही गावे दिली गेली. प्रत्येक वंशाच्या वाठ्याच्या जमिनीत वस्तीसाठी गावे आणि गुराढोरांसाठी गायराने असा हिस्सा त्यांना मिळाला. परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा दिली तसेच याबाबतीत इस्राएल लोकांनी केले.

कालेबला त्याची जमीन मिळते

एकदा यहूदा वंशातील काही लोक गिलगाल येथे यहोशवाकडे आले. कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब हाही त्यांच्यात होता. तो यहोशवाला म्हणाला, “कादेश-बर्ण्या येथे परमेश्वर काय म्हणाला ते तुला आठवते ना? तो आपला सेवक मोशे याच्याशी बोलत होता. आपल्या दोघांविषयी ते बोलणे होते. परमेश्वराचा सेवक मोशे याने देशाची टेहेळणी करायला मला पाठवले होते. मी तेव्हा चाळीस वर्षांचा होतो. मला त्या देशाविषयी काय वाटते ते मी परत आल्यावर मोशेला सांगितले. माझ्याबरोबर आलेल्यांनी लोकांना असे काही सांगितले की लोक घाबरुन गेले. पण परमेश्वर आपल्याला हा देश देणार आहे यावर माझा पूर्ण विश्वास होता. तेव्हा मोशेने मला त्यादिवशी वचन दिले. मोशे म्हणाला, ‘तू जेथे पाऊल ठेवलेस ती भूमी तुला मिळेल. तुझी मुलेबाळे तेथे कायमची राहतील. तू परमेश्वरावर निष्ठा ठेवलीस म्हणून तो प्रदेश मी तुला देईन.’

10 “आता परमेश्वराने शब्द दिल्याप्रमाणे मलाही पंचेचाळीस वर्षें जिवंत ठेवले आहे. एवढ्या कालावधीत आपण वाळवंटात भटकलो. आज मी पंच्याऐंशी वर्षांचा आहे. 11 पण मोशेने मला पूर्वी कामगिरीवर पाठवले तेव्हा इतकाच आजही मी धडधाकट आहे. लढण्याची माझ्यात ताकद आहे. 12 तेव्हा परमेश्वराने त्यावेळी कबूल केलेला डोंगराळ प्रदेश आता मला दे. मजबूत बांध्याचे अनाकी लोक तेथे राहतात, त्याची शहरे खूप मोठी असून चांगली सुरक्षित आहेत हे तू ऐकले आहेसच. पण परमेश्वराची साथ मला असेल तर त्याने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना आजही हुसकावून लावू शकेन.”

13 यहोशवाने यफुन्नेचा मुलगा कालेब याला आशीर्वाद दिला. तसेच हेब्रोन हे शहर त्याला दिले. 14 आजही ते शहर कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब याच्या वंशजांचेच आहे. कारण त्याने इस्राएलच्या परमेश्वर देवाची आज्ञा पाळली व त्याच्यावर विश्वास ठेवला. 15 पूर्वी या शहराचे नाव किर्याथ-आर्बा असे होते. आर्बा हा अनाकी लोकांमधीक सर्वात थोर पुरुष. त्याच्यावरून हे नाव पडले होते.

नंतर या देशात शांतता नांदू लागली.

यहूदाचा प्रदेश

15 यहूदाला मिळालेल्या प्रदेशाच्या, त्या वंशातील कुळांप्रमाणे वाटण्या झाल्या. हा प्रदेश अदोमाच्या सीमेपर्यंत आणि तेमानलगतच्या सीन वाळवंटापर्यंत पार दक्षिणेपर्यंत पसरला होता. दक्षिणेची सीमा क्षारसमुद्राच्या दक्षिणे कडील टोकाशी सुरु होत होती. ती तशीच पुढे अक्राब्बीमच्या चढणीकडून सीन वाळवंटावरुन कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस जाऊन मग हेस्रोन वरुन अद्दार पर्यंत जाते. तिथे एक वळण घेऊन कर्काकडे जाते. तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या ओढ्यापर्यंत निघते. तिचा शेवट भूमध्यसमुद्रापाशी होती. ही झाली दक्षिण सीमा.

यार्देन नदी समुद्राला मिळते तेथून क्षारसमुद्राच्या संपूर्ण(पश्चिम) किनाऱ्यापर्यंत पूर्वेकडील हद्द.

यार्देन क्षार समुद्राला मिळते तेथे या प्रदेशाची उत्तरेकडील हद्द सुरु होते. बेथ-हाग्लाच्या चढणीवरुन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत ती जाते. तेथून ती सीमा आखोर खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेला गिलगालकडे वळते. हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढणीसमोर नदीच्या दक्षिणेला आहे. एन-शेमेश नावाच्या झऱ्याजवळून गेल्यावर या सीमेचा शेवट एन रोगेल येथे होतो. तेथून ती सीमा हिन्नोम पुत्राच्या खोऱ्यातून यबूसी म्हणजेच यरुशलेमच्या दक्षिणेकडून पश्चिमेकडे हिन्नोमाच्या खोऱ्यासमोर आणि रेफाईम खोऱ्याच्या उत्तर टोकाला असलेल्या, पहाडाच्या माथ्यावर गेली आहे. तेथून ती सीमा नफ्तोहाच्या झऱ्यापर्यंत जाते आणि एफ्रोन डोंगरातील नगरांवरुन निघून बाला म्हणजेच किर्याथ-यारीम येथपर्यंत पोचते. 10 मग बालापासून ही सीमा पश्चिमेला सेईर डोंगराकडे वळून यारीम डोंगर (म्हणजेच कसालोन) याच्या उत्तरेकडल्या भागाजवळून जाते आणि बेथ-शेमेशकडे उत्तरून तिम्नाकडे जाते. 11 मग एक्रोनच्या उत्तरेकडे असलेल्या टेकडीकडे आणि तेथून शिक्रोनापर्यंत पुढे जाऊन बाला डोंगराजवळून यबनेलास पर्यंत जाऊन भूमध्यसमुद्रापाशी तिचा शेवट होतो. 12 भूमध्यसमुद्र ही यहूदाच्या भूमीची पश्चिमेकडील हद्द. तेव्हा या चतु:सीमेच्या आतील प्रदेशात यहूदाचे यहूदाचे वंशज राहिले.

13 यफुन्नेचा मुलगा कालेब याला यहूदाच्या प्रदेशातील काही भूमी द्यायची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली होती. त्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने कालेबला किर्याथ-आर्बा (हेब्रोन) हे नगर दिले. (आर्बा हा अनाकचा पिता) 14 शेशय, अहीमान आणि तलमय या हेब्रोन मध्ये राहणाऱ्या तीन अनाकी कुटुंबांना कालेबने तेथून घालवून दिले. 15 मग दबीरा येथे राहणाऱ्यांवर कालेब चढाई करुन गेला. (दबीरला पूर्वी किर्याथ-सेफर असेही म्हणत.) 16 कालेब म्हणाला, “किर्याथ-सेफरचा मला पाडाव करायचा आहे. जो कोणी या शहरावर चढाई करुन त्याचा पराभव करील त्याला मी माझी मुलगी अखसा देईन. त्यांचे लग्न लावून देईन.”

17 कनाज याचा मुलगा अथनिएल याने हे शहर घेतले. तेव्हा कालेबने त्याचा अखसाशी विवाह करुन दिला. 18 अखसा अथनिएलकडे आली. तेव्हा अथनिएलने अखसाला आपल्या वडीलांजवळ आणखी जमीन मागायला सांगितले. अखसा वडीलांकडे निघाली. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबने तिला विचारले “तुला काय हवे?”

19 अखसा म्हणाली, “मला एक भेट द्या. तुम्ही मला नेगेव मधील रखरखीत वाळवंटी जमीन दिलीत. आता पाणी असलेली जमीन द्या” तेव्हा कालेबने तिच्या मनाप्रमाणे केले. त्याने तिला त्या प्रदेशातील वरच्या व खालच्या बाजूचे झरे दिले.

20 यहूदाच्या वंशातील लोकांना परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे भूमी मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुळाला वतन मिळाले.

21 नेगेवच्या दक्षीणभागातील, अदोमच्या सीमेजवळची सर्व नगरे त्यांना मिळाली. त्यांची यादी खालीलप्रमाणे;

कबसेल, एदेर, यागूर, 22 कीना, दीमोना, अदादा, 23 केदेश, हासोर, इथनान, 24 जीफ, टेलेम, बालोथ, 25 हासोर-हदत्ता, करीयोथ-हस्रोन म्हणजेच हासोर. 26 अमाम, शमा, मोलादा, 27 हसर-गादा, हेष्मोन व बेथ-पेलेट, 28 हसर-शुवाल, बैर-शेबा, बिजोथा, 29 बाला, ईयीम, असेम, 30 एल्तोलाद, कसील व हर्मा, 31 सिकलाग, मद्मान्ना सन्सन्ना, 32 लवावोथ, शिलहीम, अईन, रिम्मोन. सर्व मिळून ही एकोणतीस नगरे व त्या भोवतालची शेतजमीन.

33 पश्चिमेकडील डोंगरपायथ्यावरची नगरेही यहूदाच्या कुळातील लोकांना मिळाली. ती नगरे अशी.

एष्टावोल, सरा, अषणा. 34 जानोह, एन-गन्नीम, तप्पूहा, एनाम, 35 यर्मूथ अदुल्लाम, सोखो, अजेका, 36 शारईम, अदीथईम, गदेरा किवा गदेरोथईम ही चौदा गावे व भोवतालची शेतजमीन.

37 शिवाय ही गावे

सनान, हदाशा, मिग्दल गाद, 38 दिलान, मिस्पा, यकथेल, 39 लाखीश, बसकाथ, एग्लोन, 40 कब्बोन, लहमाम, किथलीश, 41 गदेरोथ, बेथ-दागोन, नामा व मक्केदा ही सोळा नगरे व भोवतालचे वावर.

42 लिब्ना, एथेर, आशान 43 इफताह, आष्णा, नसीब, 44 कईला, अकजीब आणि मारेशा ही नऊ नगरे व आसपासची जमीन ही मिळाली. 45-46 एक्रोन, त्या भोवतालची खेडी व जमीन तसेच एक्रोनच्या पश्चिमेकडील भाग आणि आश्दोद जवळची सर्व गावे व जमीन यहूदाच्या वंशजांना मिळाली. 47 आश्दोदच्या भोवतालचा प्रदेश व गावे याबरोबरच त्यांना गज्जा भोवतालचा प्रदेश व त्याच्या जवळची गावे ही मिळाली. मिसरची नदी व भूमध्य समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश येथपर्यंत त्यांचा भूभाग पसरला होता.

48 आणि डोंगराळ प्रदेशातील

शामीर, यत्तीर, सोखो, 49 दन्ना, किर्याथ-सन्ना (म्हणजेच दबीर) 50 अनाब, एष्टमो, अनीम, 51 गोशेन, होलोन व गिलो ही अकरा नगरे व आसपासची गावे त्यांना मिळाली.

52 अराब, दूमा, एशान, 53 यानीम, बेथ-तप्पूहा, अफेका, 54 हुमटा, किर्याथ-अर्बा (म्हणजेच हेब्रोन) व सियोर ही नऊ नगरे व त्या भोवतालची खेडी त्यांना मिळाली. 55 मावोन कर्मेल जीफ, यूटा, 56 इज्रेल, यकदाम, जानोह, 57 काइन, गिबा तिम्ना ही दहा नगरे व आसपासची गावे,

58 हल्हूल, बेथ-सूर, गदोर, 59 माराथ, बेथ-अनोथ, एलतकोन ही सहा नगरे व त्या जवळची गावे ही सुध्दा मिळाली.

60 राब्बा व किर्याथ-बाल (म्हणजेच किर्याथ-यारीम) ही दोन शहरेही त्यांना मिळाली.

61 त्याचप्रमाणे वाळवंटातील काही गावेही. त्यांची यादी:

बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा, 62 निबशान, क्षारनगर व एन-गेदी ही सहानगरे व त्यांच्या भोवतालची खेडी.

63 तथापि, यरुशलेममधील यबूसी लोकांना यहूदाचे सैन्य बाहेर काढू शकले नाही. म्हणून यरुशलेम मध्ये आजही यहूदांबरोबर यबूसी लोक राहतात.

लूक 1:57-80

योहानाचा जन्म

57 अलीशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली, तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला. 58 तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले की, देवाने तिच्यावर मोठी कृपा केली आहे, ते तिच्या आनंदात सहभागी झाले.

59 मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले, ते, त्याच्या बापाचे जे नाव होते तेच म्हणजे जखऱ्या नाव ठेवणार होते. 60 पण त्याची आई म्हणाली, “नाही, त्याला योहान असे म्हणावे.”

61 ते तिला म्हणाले, “तुझ्या कोणत्याच नातेवाईकाचे नाव ते नाही.” 62 नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना खुणेने विचारले, “त्याला कोणते नाव ठेवायचे आहे?”

63 त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि लिहिले, “त्याचे नाव योहान आहे.” त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले. 64 लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली, आणि तो बोलू लागला व देवाची स्तुति करु लागला. 65 सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीयाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलत होते. 66 ज्या कोणी हे ऐकले त्या प्रत्येकाने याविषयी नवल केले, ते म्हणाले, “हे मूल पुढे कोण होणार आहे?” कारण देवाचा वरदहस्त त्यांच्यावर होता.

जखऱ्या देवाची स्तुति करतो

67 मग त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला गेला, त्याने भविष्यवाणी केली; तो म्हणाला,

68 “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो,
    कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास,
    व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
69 त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून
    आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 देव म्हणाला की, मी असे करीन
    त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात
    त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे.
    व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
73 हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
74     ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की,
आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
75     त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.

76 “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील.
    प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
77 कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल
    हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.

78 “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे
    स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 आणि शांतीच्या मार्गावर आमच्या
    पावलांना मार्गदर्शन करील.”

80 अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center