Old/New Testament
भोंदू संदेष्टे
13 “स्वप्नांचे अर्थ सांगणारा एखादा भोंदू संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. 2 कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हाला पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हाला अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. 3 पण त्याचे ऐकू नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल. हे लोक आपल्यावर मनापासून प्रेम करतात की नाही हे परमेश्वराला पाहायचे असेल. 4 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याच्याविषयी आदर बाळगा. त्याच्या आज्ञा पाळा. आणि त्याने सांगितलेले ऐका. त्याची सेवा करा. त्याचा त्याग करु नका. 5 तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तो तुम्हाला तुमच्या परमेश्वर देवापासून विचलीत करतो आहे. तुम्ही मिसर देशात गुलाम होतात तेव्हा आपल्या परमेश्वरानेच तुम्हाला तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा माणूस तुम्हाला दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही त्याचे निर्मूलन करा.
6 “तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हांला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, ‘चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु.’ (तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकिवातही नसलेले हे दैवत असेल 7 तुमच्या भोवताली जवळपास किंवा लांब राहणारे जे लोक आहेत त्यांचे हे दैवत होत.) 8 त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची कणव येऊ देऊ नका. त्याला मोकळा सोडू नका. तसेच त्याला संरक्षण देऊ नका. 9-10 त्याला ठार करा. त्याला दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरुवात करा. मग इतर जण त्याला दगडांनी मारतील. कारण मिसरमधून ज्याने तुम्हाला दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हाला बहकवायचा प्रयत्न करत आहे. 11 ही गोष्ट सर्व इस्राएलांच्या कानावर गेली की ते ही धास्ती घेतील, आणि अशी दुष्कृत्ये करायला धजावणार नाहीत.
12 “तुम्हाला राहाण्याकरता तुमचा देव परमेश्वर नगरे देईल. त्यापैकी एखाद्या नगरातून तुमच्या कानावर वाईट बातमी येईल. ती अशी की 13 तुमच्यापैकीच काही नीच माणसे आपल्यापैकी काही जणांना कुमार्गाला लावत आहेत. ‘आपण अन्य दैवतांची सेवा करु या’ असं म्हणून ते इतरांना बहकवत आहेत. (ही दैवते तुम्हाला अपारिचित असतील.) 14 असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याचा आधी पूर्ण शहानिशा करुन घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले 15 तर त्या नगरातील लोकांना त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा. 16 मग तेथील सर्व मौल्यवान वस्तू गोळा करुन शहराच्या मध्यभागी आणा. आणि त्याचबरोबर सर्व शहर बेचिराख करुन टाका. तो आपल्या परमेश्वराचा होमार्पण असेल. ते शहर पुन्हा कधी ही वसवता कामा नये. 17 ते नगर नाश करायला परमेश्वराच्या हवाली केले जावे,म्हणून त्यातील कोणतीही वस्तू स्वतःसाठी ठेवून घेऊ नका. ही आज्ञा ऐकलीत तर परमेश्वराचा तुमच्यावरचा क्रोध ओसरेल. त्याला तुमची दया येईल तुमच्याबद्दल प्रेम वाटेल तुमच्या पूर्वजांना त्याने कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकृपेने तुमच्या देशाची भरभराट होईल. 18 तुमचा देव परमेश्वर याचे ऐकलेत, त्याच्या आज्ञा पाळल्यात तरच हे घडेल. तेव्हा तुमचा देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य तेच तुम्ही करा.
देवाची पवित्र प्रजा: इस्राएल लोक
14 “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर शोक प्रदर्शित करायला अंगावर वार करुन घेणे, क्षौर करणे असे करु नका. 2 कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने जगभरातून तुमची निवड केली आहे.
काय खावे, काय खाऊ नये याचे संकेत
3 “परमेश्वराला ज्यांची घृणा वाटते असे काही खाऊ नका. 4-5 गाय-बैल, शेळ्या, मेंढ्या, सांबर, हरीण, भेकर, चितळ, रोही, गवा, रानमेंढा हे खाऊ शकता. 6 दुभंगलेल्या खुरांचा [a] आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे. 7 पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत. 8 डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहेत पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तोही अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मेलेल्या डुकराला स्पर्शही करु नका.
9 “जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा. 10 पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय.
11 “कोणताही शुद्ध पक्षी खा. 12 पण गरुड, लोळणारा गीध, मत्स्यमाऱ्या, 13 गीध, ससाणा, वेगवेगळ्या जातीच्या घारी, 14 कोणत्याही जातीचा कावळा, 15 शहामृग, गवळणा, कोकीळ, बहिरी ससाणा, 16 पिंगळा, मोठे घुबड व पांढरे घुबड, 17 पाणकोळी, गिधाड, करढोख, 18 बगळा, सर्व प्रकारचे करकोचे, टिटवी, वाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये.
19 “पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत. 20 पण कोणताही शुद्ध पक्षी खायला हरकत नाही.
21 “नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्याला तो खायला हरकत नाही. किंवा त्याला तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात.
“करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका.
दहावा हिस्सा देण्याविषयी नियम
22 “दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा. 23 मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवी, द्राक्षारस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल तुमच्या मनात सतत आदर राहिल. 24 पण एखादेवेळी हे ठिकाण फार दूर असेल तर हे सर्व तेथपर्यंत वाहून नेणे तुम्हाला शक्य होणार नाही. असे झाले तर, 25 तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून परमेश्वराने निवडलेल्या जागी जा. 26 त्या पैशाने तुम्ही गायीगुरे, शेळ्या मेंढ्या, द्राक्षारस, मद्य किंवा कोणताही खाद्यपदार्थ विकत घ्या. आणि सहकुटुंब सहपरिवार त्याचा आनंदाने उपभोग घ्या. 27 हे करताना तुमच्या नगरातील लेवींना वगळू नका. त्यांनाही यात सामील करुन घ्या. कारण तुमच्याप्रमाणे त्यांना जमिनीत वाटा मिळालेला नाही.
28 “दर तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा. 29 लेवींना तुमच्यासारखे वतन नाही म्हणून त्यांनी तसेच इतर गरजूंनीही यातून धान्य घ्यावे. नगरात आलेले परकीय, विधवा, अनाथ मुले यांच्यासाठीही ते आहे. असे वागलात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला सर्व कार्यात आशीर्वाद देईल.
कर्जमाफीचे ठराविक वर्ष
15 “दर सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करुन टाकावे. 2 त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करुन टाकावे. त्याला परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे. 3 परक्याकडून वसुली करावी, पण इस्राएलाला कर्जमाफी द्यावी. 4 तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हाला परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हाला भरभरुन आशीर्वाद देणार आहे 5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा. 6 मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रांवर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.
7 “तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देणार असलेल्या या देशात एखादा माणूस गरीब असेल, त्याला मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका. 8 त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.
9 “कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा मतलबी विचाराने कुणाला मदत नाकारु नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुद्ध परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हांला पाप लागेल.
10 “तेव्हा तुम्हांला शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंतःकरणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हांला परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हांला यश मिळेल. 11 गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.
दासांची सुटका
12 “एखादी इब्री बाई किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्याला मुक्त करा. 13 पण त्याला रिक्त हस्ताने जाऊ देऊ नका. 14 त्याला आपल्यातील काही गुरं, धान्यधुन्य, द्राक्षारस द्या. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हाला भरभरुन मिळाले आहे. तेव्हा तुमच्या दासालाही सढळ हाताने द्या. 15 आपणही मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हाला आज ही आज्ञा देत आहे.
16 “तुमच्या कुटुंबाचा लळा लागल्यामुळे आणि आनंदात असल्यामुळे तुमचा एखादा दास तुम्हाला सोडून जायला तयार होणार नाही. 17 तेव्हा दरवाजा जवळ धरुन आरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.
18 “दासांना मुक्त करुन जाऊ देताना तुम्हाला जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हाला द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षांत ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यात देव तुम्हाला आशीर्वाद देईल.
पहिला गोऱ्हा याबद्दलचे नियम
19 “तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वराला अर्पण करा. पहिल्या गोऱ्हा याला कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरु नका. 20 दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियां समवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.
21 “पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बळी देऊ नका. 22 वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे. 23 फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून टाकावे.
सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती?(A)
28 त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घालताना ऐकले. येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले. तेव्हा त्याने विचारले, “सर्व आज्ञांत महत्त्वाची पाहिली आज्ञा कोणती?”
29 येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्त्राएला, ऐक, आपला प्रभु देव अनन्य आहे. 30 तू आपला देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’ [a] 31 दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’ [b] यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”
32 तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी, आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात. 33 त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण समजुतीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”
34 येशूने पाहिले की, त्या मनुष्याने शहाणपणाने उत्तर दिले आहे. तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” त्यांनतर त्याला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?(B)
35 येशू मंदिरात शिकवीत असता, तो म्हणाला, “रिव्रस्त दाविदाचा पुत्र आहे असे नियमशास्त्राचे शिक्षक म्हणतात ते कसे शक्य आहे? 36 दावीद स्वतः पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला,
‘प्रभु देव, माझ्या प्रभुला म्हणाला,
मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपर्यंत
तू माझ्या उजवीकडे बैस.’ (C)
37 दावीद स्वतः ख्रिस्ताला ‘प्रभु’ म्हणतो तर मग ख्रिस्त दाविदाचा पुत्र कसा?” आणि मोठा लोकासमुदाय त्याचे आनंदाने ऐकत होता.
येशू नियमशास्त्राच्या बोधकांचा टीका करतो(D)
38 शिक्षण देताना तो म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा. त्यांना लांब झगे घालून मिरवायला आणि बाजारात नमस्कार घ्यायला आवडते. 39 आणि सभास्थानातील व मेजवानीतील सर्वात महत्त्वाच्या जागांची त्यांना आवड असते. 40 ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि धार्मिकता दाखविण्यासाठी ते लांब लांब प्रार्थना करतात. या लोकांना फार कडक शिक्षा होईल.”
विधवा दान देण्याचा अर्थ दाखविते(E)
41 येशू दानपेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता. आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. 42 नंतर एक गरीब विधवा आली. तिने तांब्याची दोन लहान नाणी टाकली, ज्याची किंमत शंभरातील एका पैशाएवढी होती.
43 येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. 44 मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”
2006 by World Bible Translation Center