Old/New Testament
हिज्कीया देवाची मदत मागतो
37 हिज्कीयाने सेनापतीचा निरोप ऐकला. निरोप ऐकताच त्याने आपले कपडे फाडले. नंतर त्याने शोकप्रदर्शक कपडे घातले व तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
2 हिज्कीयाने कारभारी (एल्याकीम) चिटणीस (शेबना) आणि याजकातील वडिलधारी मंडळी (नेते) ह्यांना अमोजचा मुलगा यशया या प्रेषिताकडे पाठविले. त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले. 3 ते तिघे यशयाला म्हणाले, “आजचा दिवस विशेष शोकाचा व दु:खाचा समजावा असा हिज्कीया राजाने हुकूम दिला आहे. हा दिवस फार दु:खाचा असेल. कळा सुरू व्हाव्यात पण प्रसूती होऊ नये तसा हा दिवस असेल. 4 सेनापतीने सांगितलेल्या गोष्टी, परमेश्वर तुमचा देव कदचित् ऐकेल. अश्शूरच्या राजाने प्रत्यक्षातील देवाबद्दल वाईटसाईट बोलण्यास आपल्या सेनापतीला पाठविले आणि परमेश्वराने, तुमच्या देवाने. ती निंदा ऐकली. इस्राएलमध्ये राहिलेल्या थोड्या लोकांसाठी प्रार्थना करा.”
5-6 हिज्कीयाचे नोकर यशयाकडे गेले. यशया त्यांना म्हाणाला, “तुझ्या धन्याला पुढील गोष्टी सांग: परमेश्वर म्हणतो, ‘तुम्ही सेनापतीकडून जे ऐकले त्याने घाबरून जाऊ नका. माझ्याबद्दल अश्शूरची “मुले” जे वाईट बोलत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका. 7 पाहा! मी माझा आत्मा अश्शूरविरूध्द् पाठवीन. अश्शूरच्या राजाला, त्याच्या देशाला असलेल्या धोक्याच्या सुचनेचा वृत्तांत समजेल मग तो त्याच्या देशाला परत जाईल. त्या वेळी त्याच्याच देशात मी त्याला तलवारीने मारीन.’”
अश्शूरचे सैन्य यरुशलेम सोडते
8-9 अश्शूरच्या राजाला एक वृत्तांत कळला तो वृत्तांत असा होता: “कूशचा राजा तिऱ्हाका तुमच्यावर स्वारी करण्यास येत आहे.”
म्हणून अश्शूरच्या राजाने लाखीश सोडले व तो लिब्नाला गेला. सेनापतीने हे ऐकले व तो राजा लढत होता तेथे म्हणजे लिब्नाला गेला नंतर सेनापतीने हिज्कीयाकडे दूत पाठविले. सेनापती म्हणाला, 10 “तुम्ही पुढील गोष्टी यहुदाचा राजा हिज्कीया याला सांगाव्या:
‘तू ज्या देवावर विश्वास ठेवतोस त्याच्याकडून फसू नको. देव अश्शूरच्या राजाकडून “यरुशलेमचा पराभव होऊ देणार नाही.” असे म्हणू नको. 11 ऐक! तू अश्शूरच्या राजांबद्दल ऐकले आहेस. अश्शूरच्या सैन्याने प्रत्येक देशाचा पराभव केला आहे. अश्शूरचा राजा तुझा पराभव करून तुला ठार मारील. 12 त्या सर्व पराभूत झालेल्या लोकांना त्यांच्या देवांनी वाचविले का? नाही माझ्या पूर्वजांनी त्यांचा नाश केला. माझ्या सैन्याने गोजान, हारान, रेसफ व तलस्सारातील एदेनमध्ये राहणाऱ्या लोकांचा पराभव केला. 13 हमाथ आणि अर्पाद येथील राजे कोठे आहेत? सफखाईमचा राजा कोठे आहे? हेनाचा व इव्वाचा राजा कोठे आहे? ते सर्व संपले नाश पावले.’”
हिज्कीया देवाची प्रार्थना करतो
14 हिज्कीयाने दूतांकडून संदेश घेऊन वाचला. नंतर हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला. हिज्कीयाने तो संदेश उघडून परमेश्वरापुढे ठेवला. 15 तो परमेश्वराची प्रार्थना करू लागला. तो म्हणाला: 16 सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, करूब देवदूतांचा राजा म्हणून तू सिंहासनी बसतोस. देवा, तुझी आणि तुझीच सत्ता पृथ्वीवरील सर्व राज्यांवर चालते. तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस. 17 परमेश्वरा माझे म्हणणे ऐक डोळे उघड आणि सन्हेरिबकडून आलेला संदेश पाहा. सन्हेरिबने मला हा संदेश पाठविला, त्यात जिवंत देवाची म्हणजेच तुझी निंदानालस्ती केली आहे. 18 परमेश्वरा, अश्शूरच्या राजाने खरोखरीच सर्व देश व त्यांची भूमी यांचा नाश केला आहे. 19 त्याने त्या देशांतील देव जाळले आहेत पण ते देव खरे नव्हते. माणसाने घडविलेले ते पुतळे होते. ते फक्त लाकूड व दगडच होते. म्हणून ते हरवले व नष्ट झाले. 20 पण तू परमेश्वर आमचा देव आहेस म्हणून अश्शूरच्या राजाच्या बळापासून आम्हाला वाचव. म्हणजे सर्व देशांना कळेल की परमेश्वरच फक्त खरा देव आहेस.
देवाचे हिज्कीयाला उत्तर
21 नंतर आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठविला. यशया म्हणाला, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो. ‘तू परमेश्वराची, इस्राएलच्या देवाची, प्रार्थना केलीस. सन्हेरिबकडून आलेल्या निरोपासाठी ती प्रार्थना होती. मी ती प्रार्थना ऐकली आहे.’
22 “सन्हेरिब बाबत परमेश्वराचा संदेश असा आहे:
‘अश्शूरच्या राजा, सियोनची वधू (यरुशलेम) तुला महत्व देत नाही.
ती तुला हसते.
यरूशलेमची कुमारी मुलगी,
तुझी टर उडविते.
23 अश्शूरच्या राजा, तू माझी निंदा केलीस.
तू माझी चेष्टा केलीस.
मी कोण आहे हे तुला माहीत आहे का?
पापण्या उंचावून स्वर्गाकडे पाहा.
मग तुला दिसेल की इस्राएलच्या पवित्र देवाची तू निंदा केली आहेस.
24 परमेश्वर, माझ्या प्रभुविरूध्द् बोलण्यासाठी तू तुझ्या नोकरांचा उपयोग केलास.
तू म्हणालास,
“मी फार सामर्थ्यवान आहे माझ्याजवळ पुष्कळ रथ आहेत माझ्या बळावर मी लबानोनला हरविले.
मी तेथील उंच डोंगरावर चढलो.
मी तेथील सर्व उंच झाडे (सैन्ये) तोडली,
मी तेथील उंच डोंगरावर
व घनदाट जंगलात जाऊन आलो.
25 मी विहिरी खणल्या व नवीन ठिकाणी पाणी प्यायलो.
मी मिसरच्या नद्या सुकवल्या
व त्या प्रदेशावरून चालत गेलो.”
26 ‘पण देव म्हणतो, अश्शूरच्या राजा,
मी, देवाने फार पूर्वीच हे केले आहे हे तू ऐकलेच असशील.
फार वर्षापूर्वी मी अश्शूरला निर्मिले, मीच तुला येथवर आणले.
मीच तुला त्या शहरांचा नाश करण्याची परवानगी दिली.
माझे काम करून घेण्यासाठी
आणि त्या शहरांना दगडधोड्यांच्या राशीत बदलण्यासाठी मी तुझा उपयोग केला.
27 त्या शहरात राहणारे लोक दुबळे होते.
ते घाबरलेले व खजील झालेले होते.
शेतात वाढणाऱ्या तणाप्रमाणे ते लोक होते.
घराच्या छपरावर उगवणाऱ्या गवतासारखे ते होते.
ते उंच होण्यापूर्वीच वाळवंटातील
गरम झळांनी जळून जाते.
28 मी तुझ्या सैन्याबद्दल व तुझ्या लढायांबद्दल सर्व जाणतो.
तू कधी विश्रांती घेतलीस,
कधी युध्दावर गेलास व युध्दावरून घरी कधी परतलास
हे सर्व मला माहीत आहे.
तू माझ्यावर रागावला आहेस, हे ही मला ठाऊक आहे.
29 तू माझ्यावर रागावला आहेस व माझी निंदा केली आहेस.
तुझे बोलणे मी ऐकले.
म्हणून मी तुला शिक्षा करीन.
मी तुझ्या नाकात वेसण घालीन.
तुला लगाम घालीन आणि तू ज्या रस्त्याने माझ्या देशात आलास,
त्याच रस्त्याने मी तुला माझ्या देशातून हाकलून देईन.’”
हिज्कीयाला परमेश्वराचा संदेश
30 नंतर परमेश्वर हिज्कीयाला म्हणाला, “हिज्कीया, माझे हे बोलणे खरे आहे हे दाखविण्यासाठी मी तुला खूण देईन. ह्या वर्षी धान्य पेरले जाणार नाही. म्हणून या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षांच्या पिकातील जुनं धान्य खावे लागेल. पण तीन वर्षांत तुम्ही पेरलेले धान्य खाल. तुम्ही पिकाची कापणी कराल आणि तुमच्याजवळ खाणे मुबलक असेल तुम्ही द्राक्षांची लागवड कराल आणि द्राक्षे खाल.
31 “यहुदाच्या वंशातील काही लोक वाचले त्या थोड्या लोकांचे खूप मोठे राष्ट्र होईल. मुळे खोलवर रूजून भक्कम वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते लोक असतील मुळे खोल रूजलेल्या झाडांना खूप फळे लागतात. त्याचप्रमाणे ह्या लोकांना पुष्कळ संतती होईल. 32 जिवंत राहिलेले थोडे लोक यरूशलेममधून येतील सियोनच्या डोंगरावरून वाचलेले येतील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या तीव्र प्रेमामुळे हे होईल.
33 म्हणून अश्शूरच्या राजाला परमेश्वराचा संदेश असा आहे.
“तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही,
तो ह्या शहराच्या दिशेने एकसुध्दा् बाण मारणार नाही.
तो ढाली घेऊन ह्या शहराशी लढण्यास पुढे सरसावणार नाही.
तो वेशीच्या भिंतीला उतरंड बांधणार नाही.
34 तो आला त्याच रस्त्याने स्वतःच्या देशाला परत जाईल.
तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही,
हा परमेश्वराने दिलेला संदेश होता.
35 देव म्हणतो: मी ह्या शहराचे रक्षण करीन आणि त्याला वाचवीन.
मी हे माझ्यासाठी आणि माझा सेवक दाविदासाठी करीन.”
36 मग परमेश्वराच्या दूताने जाऊन अश्शूरच्या तळावरील 1,85,000 माणसांना ठार मारले. सकाळी उठून लोक पाहतात तो त्यांच्या सभोवती प्रेते पडलेली. 37 मग अश्शूरचा राजा, सन्हेरिब निनवेला परत गेला आणि तेथेच राहिला.
38 एके दिवशी, सन्हेरीब त्याच्या निस्त्रोख देवाच्या देवळात पूजा करीत असताना, त्याच्या दोन मुलांनी, अद्रम्मेलेक व शरेसर यांनी, त्यास तलवारीने ठार मारले. मग ते अराराटला पळून गेले. म्हणून सन्हेरीबचा मुलगा एसर-हद्दोन अश्शूरचा राजा झाला.
हिज्कीयाचा आजार
38 ह्या वेळेस, हिज्कीया फार आजारी पडला. जवळ जवळ तो मेलाच होता. अमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याला भेटायला गेला. यशया राजाला म्हणाला, “परमेश्वराने मला तुला सांगायला सांगितले आहे ‘तू लवकरच मरशील, म्हणून तू गेल्यावर तुझ्या घरातील लोकांनी काय करावे हे तू त्यांना सांगावेस. तू ह्या आजारातून उठणार नाहीस.’”
2 हिज्कीया मंदिराच्या दिशेला वळला आणि त्याने प्रार्थना करण्यास सुरवात केली. तो म्हणाला, 3 “परमेश्वरा, मी नेहमीच शुध्द मनाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच जगलो, हे कृपया लक्षात असू दे. मी तू सांगितलेल्या चांगल्या गोष्टीच नेहमी केल्या.” मग हिज्कीया कळवळून रडू लागला.
4 यशयाला परमेश्वराकडून संदेश मिळाला, 5 “हिज्कीयाकडे जाऊन त्याला सांग परमेश्वर, तुझ्या पूर्वजाचा, दाविदाचा, देव म्हणतो, ‘मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे दु:खाश्रू पाहिले, मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षे वाढवीन. 6 मी अश्शूराच्या राजापासून तुझा व ह्या शहराचा बचाव करीन.”
7-8 परमेश्वर जे म्हणतो ते करतो हे दाखविण्याची ही खूण असेल. “सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.”
9 आजारातून उठल्यावर हिज्कीयाने लिहिलेले हे पत्र:
10 मी म्हातारा होईपर्यंत जगावे असे मीच स्वतःशी म्हटले होते.
पण अधोलोकाच्या दारातून जाण्याची माझी वेळ आली, आता मला सर्व काळ तेथेच काढावा लागेल असे मला वाटते.
11 म्हणून मी म्हणालो, “मी याह परमेश्वराला जिवंतांच्या भूमीवर यापुढे कधी पाहणार नाही.
मी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना पाहणार नाही.
12 माझे घर, माझा मेंढपाळाचा तंबू जमीनदोस्त केला जात आहे आणि माझ्यापासून हिसकावून घेतला गेला.
जसे मागावरचे कापड कापून त्याची गुंडाळी केली जाते, तसा मी संपलो आहे.
तू माझे आयुष्य अल्प काळातच संपविलेस.
13 सबंध रात्रभर मी सिंहगर्जनेप्रमाणे मोठमोठयाने रडलो.
सिंहाने हाडेसुध्दा खाऊन नष्ट करावीत तशा माझ्या आशा नष्ट झाल्या.
तू माझे आयुष्य फार लवकर संपविलेस.
14 मी कबुतराप्रमाणे घुमलो,
पक्ष्याप्रमाणे कलकललो,
माझे डोळे थकले,
तरीही मी स्वर्गाकडे बघत राहिलो.
माझ्या प्रभू, मी खूप निराश झालो आहे.
मला मदत करशील असे वचन दे.”
15 मी काय बोलू?
माझ्या प्रभूने काय घडणार ते मला सांगितले.
आणि माझा प्रभूच ते घडवून आणील
माझ्या मनाला खूप क्लेश झाले म्हणून आता
माझ्या सगळ्या आयुष्यात मी नम्र होईन.
16 माझ्या प्रभू, या कठीण काळाचा उपयोग
माझ्यात परत आत्मा आणण्यासाठी कर.
मला शुध्द् व निरोगी व्हायला मदत कर.
मला परत जिवंत कर.
17 पाहा! माझ्या अडचणी संपल्या.
मला आता शांतता मिळाली आहे.
तू माझ्यावर खूप प्रेम करतोस.
तू मला थडग्यात सडू दिले नाहीस
तू माझे अपराध पोटात घातलेस.
(मला क्षमा केलीस) माझी पापे दूर फेकलीस.
18 मृत तुझी स्तुतिस्तोत्रे गात नाहीत.
अधोलोकातील लोक तुझे स्तवन करीत नाहीत.
मृत तुझ्या मदतीची आशा करीत नाहीत.
ते जमिनीतील खड्ड्यात जातात आणि परत कधीही बोलत नाहीत.
19 माझ्याप्रमाणे जिवंत असणारी माणसे तुझी स्तुती करतात.
म्हणून वडिलांनी मुलांना तुझ्यावर विश्वास
ठेवायला हरकत नाही असे सांगावे.
20 मी म्हणतो, “परमेश्वराने माझे रक्षण केले.
म्हणून आम्ही आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात गाऊ व वाद्य वाजवू.”
21 मग यशया हिज्कीयाला म्हणाला, “अंजिरे वाटून तू तुझ्या दुखऱ्या भागावर लाव. मग तू बरा होशील.”
22 पण हिज्कीयाने यशयाला विचारले, “मी बरा होईन ह्याची खात्री पटण्यासाठी परमेश्वराचा संकेत काय असेल? मी परमेश्वराच्या मंदिरात जाण्यायोग्य होईन हे कसे ओळखायचे?”
ख्रिस्तातील तुमचे नवे जीवन
3 म्हणून जसे तुम्हांला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर, स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. 2 ज्या वरील (स्वर्गातील) गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करु नका. 3 कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे. 4 जेव्हा ख्रिस्त. जो आमचे जीवन आहे. त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस प्रगट होईल. तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.
5 म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीतलावरील जे काही आहे ते सर्व जिवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, अधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तिपूजा आहे. 6 कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे. [a] 7 तुम्हीसुद्धा असेच जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करीत होता.
8 पण आता, तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेतः राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी तुम्ही दूर केल्याच पाहिजेत. 9 एकमेकाशी लबाडी करु नका. कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे. 10 आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रुप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे. 11 परिणाम म्हणून यहूदी व विदेशी असा कोणताही फरक नाही. एखाद्याची सुंता झालेला किंवा एखाद्याची सुंता न झालेला, बेताल, व असंस्कृत, गुलाम आणि स्वतंत्र मनुष्य असा कोणताही फरक नाही, पण ख्रिस्त हाच सर्व काही आहे आणि तो सर्व विश्वासणाऱ्यात आहे.
12 म्हणून, जसे देवाचे निवडलेले लोक जे पवित्र आहेत, तसे करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता, आणि धीर हे परिधान करावे. 13 एकमेकांचे सहन करा. जशी प्रभुने तुम्हांला क्षमा केली तशी एखाद्याविरुद्ध तक्रार असेल तर एकमेकांना क्षमा करा. 14 या सर्वांवर प्रीतिचे वस्त्र परिधान करा. जे त्या सर्वांना एकत्र ठेवते आणि त्यांना परिपूर्ण करते. 15 आणि ख्रिस्ताची शांति जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हांला बोलाविले होते ती तुमच्या अंतःकरणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा.
16 ख्रिस्ताचा संदेश तुमच्यामध्ये त्याच्या सर्व वैभवाने राहावा. एकमेकांना महान असा शहाणपणाने शिकवा व बोध करा. स्तोत्रे, व गीते गा, आणि आध्यात्मिक गीते गाऊन उपकारस्तुतीसह आपल्या अंतःकरणात देवाला गीते गा. 17 आणि प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलता किंवा करता ते प्रभु येशूच्या नावात करावे. यामुळे तुम्ही देवपित्याचे त्याच्याद्धारे आभार मानता.
लोकांबरोबर तुमचे जीवन
18 पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा.
19 पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठीणतेने वागू नका.
20 मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा. कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे.
21 वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत.
22 गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोषविणाऱ्या, डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिऊन आज्ञा पाळा. कारण तुम्ही प्रभूचा आदर करता. 23 तुमच्या अंतःकरणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा. 24 लक्षात ठेवा, प्रभू तुम्हांला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी त्याची सेवा करीत राहा. 25 कारणे जो कोणी वाईट करतो, त्याचेसुद्धा तसेच होईल. देव असेच वागवील कारण त्याच्याकडे पक्षपात नाही.
2006 by World Bible Translation Center