Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Old/New Testament

Each day includes a passage from both the Old Testament and New Testament.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
निर्गम 29-30

याजक नेमण्याचा विधी

29 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन व त्याची मुले याजक या नात्याने विशेष प्रकारे माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: अहरोन व त्याची मुले यांनी माझ्या सेवेसाठी याजक या नात्याने त्यांचे समर्पण करण्यासाठी याप्रमाणे विधी करावा: एक गोज्या व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत; मग मैद्याच्या बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर चपात्या कराव्यात; त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याच प्रमाणे तो गोज्या व ते दोन मेंढे त्याचवेळी अहरोन व त्याची मुले यांच्याकडे द्यावीत;

“अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी; याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद व न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा; त्याच्या डोक्याला मंदिल किंवा फेटा बांधावा आणि फेट्यावर पवित्र मुकुट ठेवावा. नंतर अभिषेकाचे तेल घेऊन ते अहरोनाच्या डोक्यावर ओतावे व त्याला अभिषेक करावा; यावरून अहरोनाला याजकाच्या सेवेसाठी निवडले आहे असे दिसून येईल.

“मग त्याच्या मुलांना तेथे आणून त्यांना अंगरखे घालावेत; मग त्यांना कमरबंद बांधावेत व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांना याजकपद मिळेल व ते कायम राहील. ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले यांच्यावर संस्कार करुन तू त्यांना याजक बनवावेस.

10 “नंतर तो गोज्या दर्शन मंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत 11 मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा; परमेश्वर हे सर्व पाहील. 12 मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी तू वेदीच्या पायथ्याशी ओतावे. 13 मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरवी, काळजाभोंवतीची चरवी आणि दोन्ही गुरदे व त्यांच्या भोवतीची चरबी अशी त्या गोऱ्ह्याच्या शरीरातील सर्व चरबी काढून घ्यावी व गुरदे व तिचा वेदीवर होम करावा. 14 नंतर गोऱ्हाचे मांस, कातडे व बाकी राहिलेले शरीर छावणी बाहेर नेऊन आगीत जाळून टाकावे; हा याजकांच्या पाप निवारण्याचा यज्ञ होय.

15 “मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेढ्यांच्या डोक्यावर ठेवावेत; 16 आणि त्या मेंढ्याचा वध करावा; त्याच्या रक्तातून थोडेस रक्त घेऊन वेदीच्या चारही बाजूस शिंपडावे. 17 मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके ह्यांच्या बरोबर ठेवावेत; 18 मग मेंढ्याच्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे परमेश्वराकरिता विशेष होमार्पण होय; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; त्यामुळे परमेश्वराला संतोष होईल.

19 “नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत; 20 मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळया व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या आंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूस शिंपडावे. 21 नंतर वेदीवरील थोडे रक्त घेऊन ते अभिषेकाच्या तेलात मिसळावे, व त्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रावर तसेच मुलांवर व त्यांच्या वस्त्रावरही शिंपडावे; त्यामुळे तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्या बरोबर त्याची मुले व त्यांची वस्त्रे शुद्ध होतील, यावरुन अहरोन व त्याची मुले माझे याजक आहेत व ते विशेष वस्त्रे घालून माझी सेवा करतात हे दिसेल.

22 “तो मेंढा अहरोनाच्या समर्पण विधीसाठी असल्यामुळे त्याची चरबी, आणि त्याच्या शेपटावरील व आतड्यावरील चरबी ही घ्यावीत; 23 त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी 24 आणि ते सर्व अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवावे व ते अर्पण म्हणून परमेश्वरासमोर वर धरण्यास त्यांना सांगावे. 25 मग त्या सर्व वस्तू अहरोन व त्याच्या मुलांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर व वेदीवर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पिलेले सुवासिक हव्य होय.

26 “मग त्या मेंढ्याचे ऊर घेऊन परमेश्वरासमोर विशेष अर्पण म्हणून वर धरावे; मग ते तुझ्याकरिता तुझ्याजवळ ठेव. 27 नंतर अहरोन व त्याची मुले ह्यांच्या समर्पण विधीसाठी मारलेल्या मेढ्याचे अर्पिलेले ऊर व मांडी ही अहरोन व त्याच्या मुलांना द्यावी; हे अर्पण त्यांच्यासाठी पवित्र होईल. 28 इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे यांना अर्पणाचा हा हिस्सा नेहमी द्यावा; ते जेव्हा परमेश्वराला अर्पणे आणतील तेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाच्या हक्काचा म्हणून राहील; आणि इस्राएल लोक जेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाला देतील तेव्हा ते परमेश्वराला दिलेल्या समर्पणासारखे होईल.

29 “अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर सांभाळून ठेवावीत; ती त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावीत, जेव्हा त्यांची याजक म्हणून निवड होईल तेव्हा त्यांनी ती घालावीत. 30 अहरोनाच्या जागी त्याचा जो मुलगा याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ती वस्त्रे सात दिवस घालावीत.

31 “महान याजक म्हणून अहरोनाच्या समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे; 32 अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी; 33 ही अर्पणे त्यांची पवित्र याजकासाठी निवड होण्याच्या वेळी, त्यांचे पाप नाहीसे व्हावे म्हणून वाहिलेली होती, म्हणून ती अर्पणे त्यांनीच खावीत. 34 समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यत उरले तर ते जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; ते फक्त पवित्र ठिकाणी व विशेष वेळी खाण्यासारखे आहे.

35 “अहरोन व त्याच्या मुलांनी समर्पण विधीच्या सात दिवसात मी तुला आज्ञा केलेल्या ह्या सर्व गोष्टी कराव्यात. 36 त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे 37 सातही दिवस वेदी शुद्ध व पवित्र करावी; ती ह्या दिवसात जास्तीत जास्त पवित्र होईल, इतकी पवित्र की तिला कशाचाही स्पर्श झाला तर तेही पवित्र होईल.

38 “दररोज वेदीवर एक एक वर्षाची दोन कोकरे ठार मारावीत व त्यांचा होम करावा. 39 एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा. 40 पहिल्या कोकराच्या अर्पणासोबत आठमापे सपीठपाव हीन: (द्रव पदार्थ मोजण्याचे माप)-द्राक्षारसात मळून अर्पण करावे. 41 आणि संध्याकाळी दुसऱ्या कोकराबरोबरही सकाळच्या अर्पणाप्रमाणे आठमापे सपीठ अर्पण करावे व पाव हीन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे; ह्या हव्याच्या मधुर सुवासाने परमेश्वराला संतोष होईल.

42 “ह्या सर्व गोष्टीचे अर्पण दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर करीत राहावे; ह्या अर्पणानंतर मी परमेश्वर त्या ठिकाणी भेट देईन व तुमच्याशी बोलेन. 43 त्याठिकाणी मी इस्राएल लोकांना भेटेन आणि माझ्या महानतेने मंडप पवित्र होईल.

44 “ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या मुलांना याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन. 45 मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन. 46 आणि लोकांना समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहाता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मीच परमेश्वर त्यांचा देव आहे.”

धूप जाळण्यासाठी वेदी

30 देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी. ती चौरस असावी; ती आठरा इंच [a] लांब व आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंच [b] उंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी. वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा. त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकींच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल. हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत. वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.

“अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर संगधी धूप जाळावा; पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळावा. तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा धूप जाळू नये किंवा हव्य अर्पण करू नये; तसेच अन्नार्पण किंवा पेयार्पण अर्पण करू नये.

10 “अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणातील रक्त घेऊन ते वेदीवर अर्पण करावे. ह्या दिवसाला ‘प्रायश्चित दिवस’ म्हणावे. हे परमेश्वरासाठी परम पवित्र आहे.”

मंदिरावरील खंडणी

11 परमेश्वर मोशेला म्हणाला, 12 “एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वतःच्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही. 13 शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएल व्यक्तिने पवित्र निवास मंडपातील अधिकृत मापाने अर्धा शेकेल खंडणी द्यावी. (एका शेकेलाचे वजन वीस ‘गेरा’ असते) हा अर्धा शेकेल म्हणजे परमेश्वराला दिलेले अर्पण होय. 14 वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएली माणसाने परमेश्वराला हे अर्पण करावे. 15 श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल. 16 हा पैसा इस्राएल लोकांकडून गोळा करावा आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा म्हणजे परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण राहण्याचा एक मार्ग होईल; लोक आपल्या जिवाबद्दल खंडणी देत राहतील.”

गंगाळ

17 परमेश्वर मोशेला म्हणाला, 18 “पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हात पाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे. 19 या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात पाय धुवावेत; 20 दर्शनमंडपात व वेदीजवळ जाताना प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात पाय धुवावेत; असे केल्यास ते मरणार नाहीत. 21 त्यांनी आपले हात पाय धुतलेच पाहिजेत नाहीतर ते मरतील; हा अहरोन व त्याच्या लोकांसाठी कायमचा नियम होय; अहरोनाच्या मागे त्याच्या पुत्रपौत्रांसाठी पिढ्यान्पिढ्या हा नियम लागू राहील.”

अभिषेकाचे तेल

22 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, 23 “उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच. 24 आणि बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतुनाचे तेल घे.

25 “व या सर्वाच्या मिश्रणाने अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर; 26 हे पवित्र तेल दर्शन मंडपावर व आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर; या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल. 27 तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी, 28 तसेच होमवेदी व तिचे सर्वसामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे. 29 त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.

30 “अहरोन व त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; 31 इस्राएल लोकांना तू सांग की अभिषेकाचे तेल पवित्र आहे, पिढ्यान्पिढ्या ते केवळ माझ्यासाठीच वापरावे. 32 ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे. 33 ह्या पवित्र तेलासारखे सुवासिक तेल जर कोणी तयार करील किंवा ते कोणा परकीयाला देईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”

धूप

34 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधा बिरूजा व शुद्ध धूप आणावेस. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात; 35 आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध व पवित्र होईल. 36 त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे. 37 या धूपद्रव्याचा फक्त परमेश्वरासाठीच उपयोग करावा; त्याच्या सारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही करु नये. 38 सुवासाचा आनंद घ्यावा म्हणून कोणी आपल्या स्वतःसाठी असे धूप द्रव्य तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”

मत्तय 21:23-46

यहूदी पुढारी येशूच्या अधिकाराविषयी शंका घेतात(A)

23 येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”

24 येशू म्हणाला, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मी तुम्हाला सांगेन. 25 तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे. तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला- देवाकडून की मनुष्यांकडून?”

येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ 26 पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीति आहे. कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्व जण मानतात.”

27 म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, “योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हांला माहीत नाही.”

तेव्हा येशू म्हणाला, “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो, हे मीही तुम्हांला सांगणार नाही.

येशू दोन पुत्रांचा दाखला सांगतो

28 “याविषयी तुम्हांला काय वाटते ते मला सांगा. एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मनुष्य आपल्या पहिल्या मुलाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मुला, आज तू माझ्या द्राक्षाच्या मळ्यात जा आणि काम कर.’

29 “मुलाने उत्तर दिले, ‘मी जाणार नाही.’ परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.

30 “नंतर वडील आपल्या दुसऱ्या मुलाकडे गेले आणि म्हणाले, ‘माझ्या मुला, आज तू जाऊन माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम कर.’ त्या मुलाने उत्तर दिले, ‘होय बाबा, मी जातो.’ पण तो गेला नाही.

31 “त्या दोघांपैकी कोणत्या मुलाने वडीलांची आज्ञा पाळली?”

ते म्हणाले, “पहिल्या मुलाने.”

येशू त्यांना म्हणाला, “मी खरे सांगतो, जकातदार व वेश्या हे वाईट लोक आहेत असे तुम्हांला वाटते, पण ते तुमच्या अगोदर स्वर्गाच्या राज्यात जातील. 32 जीवनाचा खरा रस्ता कोणता हे तुम्हांला दाखवावे म्हणून योहान आला आणि तुम्ही योहानाला मानले नाही. जकातदार व वेश्या यांनी योहानावर विश्वास ठेवला हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि योहानावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.

देव आपला पुत्र पाठवितो(B)

33 “ही बोधकथा ऐका: एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. शेताच्या भोवती त्याने एक भिंत बांधली आणि द्राक्षे कुस्करून रस गाळण्याकरिता खड्डा करून एक घाणा तयार केला. आणि टेहळाणी करण्यासाठी एक मनोरा (माळा) बांधला. मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना करायला खंडाने दिला. मग तो परत गेला. 34 जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही नोकर खंडकरी शेतकऱ्याकडे पाठविले.

35 “परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. 36 मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा नोकर पाठविले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त नोकर पाठविले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. 37 नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठविले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’

38 “पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्याला ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ 39 त्यांनी त्याला धरले व मळ्याच्या बाहेर फेकले व त्याला ठार मारले.

40 “मग द्राक्षमळ्याचा मालक परत येईल तेव्हा या शेतकऱ्यांचे काय करील?” 41 यहूदी मुख्य याजक आणि पुढारी म्हणाले, “तो त्या लोकांना खात्रीने मरणदंड देईल. कारण ते दुष्ट होते. नंतर तो आपला मळा दुसऱ्यास खंडाने देईल. हंगामाच्या दिवसात जे त्याच्या पिकाची वाटणी देतील, अशांना तो ते देईल.”

42 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही पवित्र शास्त्रात वाचले असलेच की.

‘बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला
    दगड कोनशिला झाला आहे हे
प्रभूने केले आणि
    आमच्यासाठी हे अदभुत आहे.’ (C)

43 “म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल. देवाला आपल्या राज्यात पाहिजेत अशा गोष्टी जे लोक करतील, त्यांना ते देण्यात येईल. 44 जो कोणी या दगडावर पडेल, त्याचे तुकडे तुकडे होतील आणि जर हा दगड एखाद्या मनुष्यावर पडेल तर त्या मनुष्याचा चक्काचूर होईल.”

45 येशूने सांगितलेल्या या बोधकथा मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकल्या. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. 46 त्यांना येशूला अटक करायचे होते. पण त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण लोक येशूला संदेष्टा मानीत होते.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center