Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

New Testament in a Year

Read the New Testament from start to finish, from Matthew to Revelation.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
प्रकटीकरण 14

मुक्त केलेल्यांचे गीत

14 मग मी पाहिले, आणि तेथे माइयासमोर कोकरा होता. तो सियोन पर्वतावर [a] उभा होता. त्याच्याबरोबर 1,44,000 लोक होते. त्यांच्या कपाळांवर त्याचे आणि त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते.

आणि आकाशातून पुराच्या लाटांचा लोंढा आल्यासारखा आवाज, ढगांचा मोठा गडगडाटाचा आवाज ऐकला. जो आवाज मी ऐकला तो जणू काय अनेक लोक आपल्या वीणा वाजवीत आहेत तसा आवाज होता. ते लोक सिंहासनासमोर आणि चार जिवंत प्राण्यांसमोर आणि वडिलांसमोर नवे गीत गात होते. जे लोक पृथ्वीपासून मुक्त करण्यात आलेले, असे 1,44,000 तेच हे गाणे शिकू शकले. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही ते गीत शिकू शकले नाही.

हे लोक असे होते की त्यांनी स्त्रियांशी वाईट कर्म करुन स्वतःला भ्रष्ट केले नाही. त्यांनी स्वतःला शुद्ध राखले. कोकरा जेथे गेला तेथे ते गेले. हे पृथ्वीवरील लोकांमधून खंडणी भरुन मुक्त केलेले होते. देवाला आणि कोकऱ्याला अर्पिलेले ते पाहिले आहेत. त्यांच्या मुखात असत्य कधी आढलेले नाही, खोटे बोलण्याबद्दल ते निर्दोष होते.

तीन देवदूत

मग मी आणखी एक देवदूत हवेत उंच उडताना पाहिला. पृथ्वीवरील लोकांना सांगण्यासाठी म्हणजे प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या आणि जमातीच्या लोकांना सांगण्यासाठी त्या देवदूताकडे अनंतकाळचे शुभवर्तमान होते. देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र, व पाण्याचे झरे निर्माण केले, त्या देवाचे भय धरा आणि त्याची स्तुति करा. देवाने न्याय करावा अशी वेळ आली आहे. देवाची उपासना करा.”

मग पहिल्या देवदूताच्या मागे दुसरा देवदूत गेला आणि म्हणाला, “तिचा नाश झालेला आहे! बाबेल हे मोठे शहर नष्ट झाले आहे. त्या नगरीने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा द्राक्षारस व देवाचा राग प्यायला लावला.”

तिसरा देवदूत पहिल्या दोन देवदूतांच्या मागे गेला. तिसरा देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला: “जो माणूस प्राण्याची आणि प्राण्याच्या मूर्तीची उपासना करतो, त्याला त्याच्या कपाळावर किंवा हातावर प्राण्याची खूण करु देतो, 10 तो मनुष्य देवाच्या रागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पिईल. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतांसमोर व कोकऱ्यासमोर जळत्या गंधकाने पीडले जाईल. 11 आणि त्यांच्या जळत्या वेदनांतून अनंतकाळासाठी धूर निघेल, जे लोक प्राण्याची उपासना करतात आणि त्याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे. त्यांना रात्र असो किंवा दिवस असो, विश्रांति मिळणार नाही.” 12 याचा अर्थ असा की, देवाच्या पवित्र लोकांनी धीर धरला पाहिजे. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आणि येशूमधील त्यांचा विश्वास टिकवला पाहिजे.

13 मग मी स्वर्गातून एक आवाज ऐकला, तो आवाज म्हणाला, “हे लिही: येथून पुढे, जे प्रभूमध्ये मेलेले आहेत, ते त्यांच्या श्रमापासून विश्रांति घेतील.”

आत्मा म्हणतो, “होय, हे खरे आहे. ते लोक आपल्या कठीण कामापासून विश्रांति पावतील. त्यांनी केलेल्या गोष्टी त्यांच्याबरोबर राहतील.”

पूथ्वीची कापणी

14 मी पाहिले आणि तेथे माझ्यासमोर पांढरा ढग होता. त्या ढगावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा दिसत होता. त्याच्या डोक्यावर सोनेरी मुगुट आणि त्याच्या हातात धारदार विळा होता. 15 मग आणखी एक देवदूत मंदिरामधून बाहेर आला व ढगावर बसलेल्यास मोठ्याने म्हणाला, “तुझा विळा घे व (पृथ्वीवरुन) पीक गोळा कर, कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे फळ पिकले आहे.” 16 मग जो ढगावर बसला होता त्याने त्याचा विळा पृथ्वीवर चालविला. आणि पृथ्वीची कापणी केली.

17 मग दुसरा देवदूत स्वर्गातील मंदिरातून बाहेर आला. या देवदूताकडेसुद्धा धारदार विळा होता. 18 मग आणखी एक देवदूत वेदीकडून आला. या देवदूताचा अग्नीवर अधिकार होता. या देवदूताने धारदार विळा असलेल्या देवदूताला बोलाविले. तो म्हणाला, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षाचे घड काढ. पृथ्वीची द्राक्षे पिकली आहेत.” 19 देवदूताने त्याचा विळा पृथ्वीवर चालवला. देवदूताने पृथ्वीची द्राक्षे गोळा केली आणि देवाच्या क्रोधाच्या घाण्यात टाकली. 20 ती द्राक्षे द्राक्षाच्या कुंडात शहराबाहेर तुडवीली गेली. त्यांतून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या डोक्यापर्यंत पोहोंचेल इतका असून तो 200 मैलांपर्यंत वाहत गेला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center