New Testament in a Year
धनावर विश्वास ठेवू नका
32 “लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हांला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समधानाचे वाटते. 33 तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना पैसे द्या. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा. जेथे चोर जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करु शकणार नाही. 34 कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.
सदैव तयार असा(A)
35 “तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. 36 लग्नाच्या मेजवानीवरुन त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा. यासाठी की जेव्हा तो येतो व दार ठोठावतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील. 37 धन्य ते नोकर जे त्यांचा मालक परत आल्यावर त्याला जागे व तयारीत असलेले आढळतील. मी तुम्हांला खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. 38 तो मध्यरात्री येवो अगर त्यांनतर येवो. जर ते त्याला असे तयारीत आढळतील तर ते धन्य.
39 “परंतु याविषयी खात्री बाळगा; जर घराच्या मालकाला चोर केव्हा येणार हे माहीत असते तर त्याचे घर त्याने फोडू दिले नसते. 40 तुम्हीही तयार असा कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा कोणत्याही क्षणी मनुष्याचा पुत्र येईल.”
विश्वासू नोकर कोण आहे(B)
41 मग पेत्र म्हणाला, “प्रभु, तुम्ही ही बोधकथा आम्हांलाच सांगत आहात की सर्वांना?”
42 तेव्ह प्रभु म्हणाला, “असा कोण शहाणा व विश्वासू कारभारी आहे की, ज्याला प्रभु त्याच्या नोकरांना त्याचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी त्याची नेमणूक करील? 43 त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर आढळेल तो धन्य. 44 मी तुम्हांला खरे सांगतो, मालक त्या नोकराला त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील.
45 “पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार विलंब लावतो.’ व तो त्याच्या स्त्री व पुरुष नोकरांना मारहाण करतो व खाण्यापिण्यास सुरुवात करतो. 46 ज्या दिवसाची तो वाट पाहत नाही त्या दिवशी त्या नोकराचा मालक येईल व अशा वेळी येईल की ती वेळ त्याला माहीत असणार नाही. आणि तो त्याचे वाभाडे वाभाडे काढील व तो त्याला अविश्वासू लोकांबरोबर ठेवील.
47 “ज्या नोकराला आपल्या मालकाची इच्छा माहीत असते व जो तयार राहत नाही, किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल. 48 परंतु कसलाही वाईट हेतू न बाळगता मालकाला न आवडणारे जर त्याने केले असेल तर त्याला कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.
लोक येशूविषयी सहमत होणार नाहीत(C)
49 “मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे. मला असे वाटते की ती अगोदरच पेटली असती तर किती बरे झाले असते. 50 माझ्याकडे बाप्तिस्मा आहे व तो मला घ्यावयाचा आहे. आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे! 51 तुम्हांला असे वाटते का की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे? नाही, मी तुम्हांला सांगतो मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे. 52 मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकाविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल.
53 त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा
व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल,
आईविरुद्ध मुलगी
व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल,
सासूविरुद्ध सून
व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.”
समय ओळखणे(D)
54 तो लोकसमुदायाला म्हणाला, “तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, ‘पाऊस पडेल’ आणि तेच घडते. 55 जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता ‘उकाडा होईल’ आणि तसे घडते. 56 अहो ढोंग्यांने! तुम्ही पृथ्वीवरील व आकाशातील स्थित्यंतरे पाहून अनुमान काढता, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हांला का काढता येत नाही?
तुमच्या समस्या सोडवा(E)
57 “आणि काय योग्य आहे हे तुमचे तुम्ही स्वतःच का ठरवीत नाही? 58 तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हांला न्यायाधीशासमोर नेईल, आणि न्यायाधीश तुम्हांला दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील. आणि अधिकारी तुम्हांला तुरुंगात टाकील. 59 मी तुम्हांला सांगतो, तुम्ही पै न पै देईपर्यंत तेथून बाहेर पडू शाकणार नाही.”
2006 by World Bible Translation Center