New Testament in a Year
येशूबरोबरचे लोक
8 यानंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत व देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते. 2 ज्यांच्यामधून भुते काढली होती व ज्यांना आजारातून बरे केले होते अशा काही स्त्रियाही त्याच्याबरोबर होत्या: मरीया जिला मग्दालिया म्हणत, तिच्यातून सात भुते बाहेर पडली होती. 3 हेरोदाच्या घराचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना, सूसान्ना आणि इतर अनेक स्त्रिया होत्या, या स्त्रिया त्यांच्याकडे जे होते, म्हणजे त्यांच्या उत्पन्नातून येशू व त्याच्या शिष्यांना देत असत.
पेरणी करणाऱ्याची बोधकथा(A)
4 जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:
5 “एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले व ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. 6 काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले कारण त्यात ओलावा नव्हता. 7 काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्याबरोबर वाढली व त्याची वाढ खुंटविली. 8 काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला,
“ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”
9 त्याच्या शिष्यांनी या बोधकथेचा अर्थ काय असे विचारले.
10 म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे.
‘यासाठी की, जरी ते पाहत असले,
तरी त्यांना दिसू नये आणि
ऐकत असले तरी
त्यांना समजू नये.’ (B)
येशू बियाच्या बोधकथेचे स्पष्टीकरण करतो(C)
11 “बोधकथेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. बी हे देवाचा संदेश आहे. 12 आणि जे बी वाटेवर पडले ते जे ऐकतात त्याचे दर्शक आहेत. नंतर सैतान येतो आणि त्यांच्या हृदयातील बी घेऊन जातो, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांचे तारण होऊ नये. 13 जे बी खडकावर पडते ते असे आहे की, ते ऐकतात आणि आनंदाने संदेश ग्रहण करतात. पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळ विश्वास ठेवतात पण परीक्षेच्या वेळी देवापासून दूर जातात. 14 जे बी काटेरी झुडुपात पडलेले असते ते दर्शविते की, ते ऐकतात परंतु आपल्या मार्गाने जात असता काळजी, श्रीमंती, जीवनातील सुखे यांनी ते खुंटविले जाते, ते पक्व फळ देत नाही. 15 चांगल्या जमिनीतील बी दर्शविते की, ते चांगल्या व प्रामाणिक अंतःकरणाचे आहेत ते वचन ऐकतात, ग्रहण करतात व धीराने फळ देतात.
तुमच्या समजबुद्धीचा उपयोग करा(D)
16 “कोणीही दिवा लावून तो भांड्याने झाकून ठेवीत नाही, किंवा खाटेखाली ठेवीत नाहीत, तर तो दिवठणीवर ठेवतात, यासाठी की जे आत येतात त्यांना प्रकाश दिसावा. 17 लक्षात ठेवा, असे काहीही लपविलेले नाही, जे उघड होणार नाही. प्रत्येक रहस्य सर्वांना सांगितले जाईल आणि ते प्रकाशात येईल. 18 म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या कारण ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे असे वाटते तेदेखील काढून घेतले जाईल”.
येशूचे शिष्य हेच त्याचे खरे कुटुंब(E)
19 येशूची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. पण गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. 20 म्हणून त्याला असे सांगण्यात आले की, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर उभे आहेत, त्यांना तुला भेटायचे आहे.”
21 पण त्याने त्यांना उत्तर दिले, “जे देवाचे वचन ऐकतात व त्याप्रमाणे करतात तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”
शिष्य येशूचे सामर्थ्य पाहतात(F)
22 त्या दिवसात एकदा असे झाले की, येशू त्याच्या शिष्यांसह नावेत बसला. आणि तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडच्या बाजूला जाऊ या.” 23 आणि ते निघाले. ते जात असता येशू झोपी गेला. सरोवरावर तुफान वादळी वारे सुरु झाले व नावेत पाणी जाऊ लागले. ते अतिधोकादायक स्थितीत सापडले. 24 म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!”
मग तो उठला. त्याने वारा व लाटा यांना दटाविले. ते थांबले. व सर्वत्र शांतता पसरली. 25 येशू त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?”
पण ते भयचकित आणि विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण तो वारा आणि लाटा यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात?”
2006 by World Bible Translation Center