New Testament in a Year
तुमच्या शत्रूवर प्रेम करा(A)
27 “माझे ऐकणाऱ्यांना मी सांगतो. तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. जे तुमचा द्धेष करतात, त्यांचे चांगले करा. 28 जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हांला वाईट वागवितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. 29 जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसरा पण गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्याला तुमचा सदराही घेऊ द्या. 30 जे तुम्हांला मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमचे घेतो ते परत मागू नका. 31 लोकांनी तुमच्याशी जसे वागावे असे तुम्हांला वाटते तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
32 “तुमच्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रेम केले, तर तुम्ही काय विशेष केले? पापी लोकसुद्धा, जे त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. 33 तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात. 34 ज्यांच्याकडून तुम्हांला परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हांला काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
35 “पण तुमच्या शत्रूवर प्रेम करा आणि त्यांचे चांगले करा. व कोणतीही अपेक्षा न ठेवता उसने द्या, मग तुमचे बक्षीस मोठे असेल व तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण देव हा कृतघ्न व दुष्ट लोकांवर दया करतो. 36 जसा तुमचा पिता कनवाळू आहे तसे तुम्हीही कनवाळू व्हा.
स्वतःकडे पाहा(B)
37 “दुसऱ्यांचा न्याय करु नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला दोषी ठरविले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. 38 दुसऱ्यांना द्या म्हणजे तुम्हांलाही दिले जाईल. तुमच्या पदरात हलवून, दाबून, ओसंडून वाहणारे उत्तम माप ओतले जाईल. जे माप तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता त्याच मापाने तुम्हांला दिले जाईल.”
39 त्याने त्यांना एक गोष्ट सांगितली: “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत काय? 40 कोणताही शिष्य त्याच्या गुरुच्या पातळीला जाऊ शकत नाही. पण प्रत्येक मनुष्य जेव्हा तो पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच असतो.
41 “तू आपल्या भावाच्या डोळ्यतील कुसळ का पाहतोस? स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही काय? 42 तू तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस, ‘बंधु, तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे.’ तुझ्या स्वतःच्या डोळ्यातील मुसळ तुला दिसत नाही? ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.
दोन प्रकारची फळे(C)
43 “कोणतेही चांगले झाड असे नाही की जे वाईट फळ देते, किंवा कोणतेही वाईट झाड असे नाही की जे चांगले फळ देते. 44 कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजिरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत. 45 चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो. कारण मनुष्याच्या अंतःकरणात जे असते तेच तो मुखाद्वारे बोलतो.
दोन प्रकारचे लोक(D)
46 “तुम्ही मला प्रभु, प्रभु, का म्हणता, आणि मी जे सांगतो ते तुम्ही का करीत नाही? 47 प्रत्येक जण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकतो व त्या आज्ञा पाळतो-तो कसा आहे हे मी तुम्हांला दाखवितो: 48 तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला, तेव्हा नदीचे पाणी घरावर आदळले. पण पाण्याने ते हलले नाही. कारण ते चांगले बांधले होते.
49 “पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, तो, ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, नदीच्या पुराचे पाणी घरावर आदळते व ते घर लगेच कोसळते आणि घर पूर्णपणे नष्ट होते.”
2006 by World Bible Translation Center