New Testament in a Year
येशू सांगतो त्याचे सर्व शिष्य त्याला सोडून जातील(A)
27 येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व विश्वास गमावून बसाल. कारण असे लिहिले आहे की,
‘मी मेंढपाळास मारीन
आणि मेंढरे विखुरली जातील.’ (B)
28 परंतु माझे पुनरूत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालीलात जाईन.”
29 पेत्र म्हणाला, “इतर सर्वांनी जरी त्यांचा विश्वास गमावला तरी मी गमावणार नाही.”
30 मग येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापुर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
31 तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणांबरोबर मरावे लागले तरी सुद्धा मी आपणांला नाकारणार नाही.” आणि इतर सर्व जण तसेच म्हणाले.
येशू एकाटाच प्रार्थना करतो(C)
32 नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” 33 येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दु:ख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. 34 तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरणाइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.”
35 त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” 36 तो म्हणाला, “ अब्बा, [a] बापा, तुला सर्व काही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर पण मला पाहिजे ते नको तर तुला पाहिजे ते कर. (माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.)”
37 नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? 38 जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही मोहात पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
39 पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली. 40 नंतर तो परत आला व त्याला ते झोपलेले आढळले. कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना.
41 तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांति घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे. 42 उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे इकडे येत आहे.”
येशूला अटक करण्यात येते(D)
43 आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक-यहूदा आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठविलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.
44 घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्याला धरा आणि बाजूला काढा.” 45 मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “गुरूजी!” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले. 46 नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्याला अटक केली. 47 तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि मुख्य याजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
48 नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लूटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकाडायला बाहेर पडलात काय? 49 मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हांबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.” 50 सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
51 एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागे चालत होता. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, 52 परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघाडाच पळून गेला.
यहूदी पुढाऱ्यांबरोबर येशू(E)
53 नंतर त्यांनी येशूला तेथून मुख्य याजकाकडे नेले. आणि सर्व मुख्य याजक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले.
2006 by World Bible Translation Center