New Testament in a Year
29 “छळानंतर लगेच, असे घडेल:
‘सूर्य अंधकारमय होईल
व चंद्र प्रकाश देणार नाही.
आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील.
आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.’ (A)
30 “त्यावेळेला मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व लोक शोक करतील. मनुष्याच्या पुत्राला सर्व जण मेघावर बसून येताना पाहतील. तो महासामर्थ्य आणि वैभव यांच्यासह येईल. 31 मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
32 “अंजिराच्या झाडापासून शिका: अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हांला कळते. 33 मी तुम्हांला ज्याविषयी सांगितले त्याबाबतीतही असेच होईल जेव्हा या सर्व गोष्टी तुम्ही पाहाल तेव्हा वेळ जवळ येत आहे हे तुम्ही ओळखाल. 34 मी तुम्हांला खरे सांगतो: या गोष्टी होत असताना आजची ही पिढी नाहीशी होणार नाही. 35 सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
ती वेळं कोनती अशेल ते फक्त देवालाच ठाउक(B)
36 “पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटके विषयी कोणालाही माहीत नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, किंवा खुद्द पुत्रालाही नाही. फक्त पिताच हे जाणतो.
37 “नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. 38 महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा जहाजात जाईपर्यत लोक या गोष्टी करीत होते. 39 त्यांना माहीत नव्हते की काही तरी घडणार आहे. परंतु नंतर पूर आला आणि सर्व लोक मरून गेले.
“मनुष्याचा पुत्र आल्यावर असेच होईल. 40 दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एक जण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. 41 दोन स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.
42 “म्हणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हांला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येत आहे, 43 हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. 44 या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हांला अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
चांगला व वईट सेवक(C)
45 “शहाणा आणि विश्वासू सेवक कोण बरे? दुसऱ्या सेवकांना वेळेवर जेवण देण्याचे काम मालक एका सेवकावर सोपवितो. हे काम करण्यासाठी मालक कोणाला विश्वासाने सांगेल? 46 मालक आल्यावर आपले दिलेले काम करीत असलेला सेवक खरोखर धन्य! 47 मी तुम्हांला सांगतो: मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या सेवकाची नेमणूक करील.
48 “पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल? 49 तो सेवक इतर सेवकांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. 50 आणि तो सेवक तयारीत नसेल अशा वेळी मालक येईल. 51 मग मालक त्या सेवकाचे तुकडे करील. त्या सेवकाला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील. आणि त्या ठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.
2006 by World Bible Translation Center