Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

New Testament in a Year

Read the New Testament from start to finish, from Matthew to Revelation.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
लूक 23:26-56

येशूला वधस्तंभावर खिळून ठार मारले(A)

26 ते त्याला घेऊन जात असताना, कुरेने येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले. तो शेताकडून येत होता. त्यांनी वधस्तंभ त्याच्यावर ठेवला व त्यांनी त्याला तो वधस्तंभ येशूच्या मागे वाहावयास लावला.

27 लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला होता. त्यामध्ये त्याच्यासाठी शोक करणाऱ्या आणि रडणाऱ्या काही स्त्रियांचाही समावेश होता. 28 येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. 29 कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, ‘धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत, आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत, व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.’ 30 तेव्हा ते पर्वतास म्हणतील, ‘आम्हांवर पडा!’ आणि ते टेकड्यांस म्हणतील. ‘आम्हांला झाका!’ [a] 31 जर लोक असे करतात जेव्हा झाड हिरवे असते, तर झाड सुकल्यावर काय होईल?”

32 दोन दुसरी माणसे जी दोघेही गुन्हेगार होती, त्यांनाही मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नेत होते. 33 आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले व दुसऱ्याला डावीकडे ठेवले.

34 नंतर येशू म्हणाला, “हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”

त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. 35 लोक तेथे पाहात उभे होते. आणि पुढारी थट्टा करुन म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचविले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे!”

36 शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला आंब दिली. 37 आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!” 38 त्याच्यावर असे लिहिले होते: “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”

39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याचा अपमान केला. तो म्हणाला, “तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हालाही वाचव!”

40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41 पण आपली शिक्षा योग्य आहे. कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणांस मिळत आहे. पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही.” 42 नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.”

43 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”

येशूचा मृत्यू(B)

44 त्यावेळी जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. 45 आणि मंदिरातील पडदा फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. 46 येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे म्हटल्यानंतर तो मेला.

47 जेव्हा रोमी सेवाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”

48 हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. 49 परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालीलाहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.

योसेफ अरिमथाईकर(C)

50-51 तेथे एक योसेफ नावाचा मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद होता. तो चांगला आणि धार्मिक मनुष्य होता.तो सभेच्या निर्णयाशी व कृतीशी सहमत नव्हता. तो यहूदीयातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. 52 हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 53 ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणाला ही ठेवले नव्हते. 54 तो शुक्रवार (तयारीचा दिवस) होता, आणि शब्बाथ सुरु होणार होता.

55 गालीलाहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. 56 नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केले.

शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center