New Testament in a Year
भुते अंगात असलेला माणूस(A)
26 नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले. 27 जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.
28-29 जेव्हा त्याने येशूला पाहिले, तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्यापुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “येशू, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंति करतो की, मला त्रास देऊ नको.”तो असे म्हणाला कारण येशूने भुताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते. पायात बेड्या होत्या व त्याला पहाऱ्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भुते त्याला एकांतात घेऊन जात असत.
30 येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”
तो म्हणाला, “सैन्य,” कारण त्याच्यात अनेक भुते शिरली होती. 31 भुतांनी येशूला विनवणी केली की, आम्हांला अनंतकाळच्या अंधारात [a] जाण्याची आज्ञा करु नको. 32 डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी त्याला विनंति केली, “आम्हांला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे.” आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. 33 मग भुते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला.
34 जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले, तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले. 35 काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भुते निघाली होती, त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले. त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता. या घटनेचे त्यांना भय वाटले. 36 ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. 37 तेव्हा गरसेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले. कारण ते सर्व फार घाबरले होते.
मग येशू नावेत बसून परत गेला. 38 ज्याच्या अंगातून भुते तिघाली होती तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी विनवणी करु लागला. पण येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला, 39 “घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग.”
तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगारातील सर्व लोकांना त्याने सांगितले.
येशू मेलेल्या मुलीला जिवंत करतो व आजारी स्त्रीला बरे करतो(B)
40 नंतर जेव्हा येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. 41 त्याचवेळी याईर नावाचा एक मनुष्य आला. तेथील सभास्थानाचा तो अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंति केली. 42 कारण त्याला बारा वर्षांची एक मुलगी होती आणि ती मरावयास टेकली होती.
येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती व तो चेंगरला जात होता. 43 आणि एक स्त्री तेथे होती. तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता. तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करु शकले नाही. 44 ती त्याच्या मागोमाग आली. व तिने त्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि ताबडतोब तिचा रक्तस्राव थांबला. 45 मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?”
ते सर्व जण नाकारीत असताना पेत्र म्हणाला, “सर्व जण आपल्याभोवती गर्दी करीत आहेत आणि तुम्हांला चेंगरीत आहेत.”
46 परंतु येशू म्हणाला, “कोणी तरी मला स्पर्श केला आहे. कारण मला माहीत आहे की, माझ्यातून शक्ति निघाली आहे.” 47 आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कांपत आली आणि त्याच्या पाया पडली. तेथे तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कसे बरे झालो ते सांगितले. 48 तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.”
49 तो हे बोलत असतानाच कोणी तरी सभास्थानाच्या अधिकार्याच्या घरुन आले आणि म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”
50 येशूने हे ऐकले व तो सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास ठेव आणि ती मरणातून वाचविली जाईल.”
51 जेव्हा येशू त्या घरी आला, त्याने आपणाबरोबर पेत्र, योहान, याकोब आणि मुलीचे आईवडील यांच्याशिवाय कोणालाही आत येऊ दिले नाही. 52 सर्व लोक तिच्यासाठी रडत होते. येशू म्हणाला, “रडणे थांबवा, ती मेलेली नाही, ती झोपेत आहे.”
53 पण ते त्याला हसले. कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे. 54 परंतु त्याने तिचा हात धरला आणि मोठ्याने म्हणाला, “मुली, ऊठ!” 55 मग, तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली. 56 तेव्हा तिचे आईवडील आश्चर्याने थक्क झाले, परंतु जे घडले त्याबद्दल कोणालाही सांगू नका अशी त्याने त्यांना आज्ञा केली.
2006 by World Bible Translation Center