Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

New Testament in a Year

Read the New Testament from start to finish, from Matthew to Revelation.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
मत्तय 17

येशू मोशे व एलीयाबरोबर दिसतो(A)

17 सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्याबरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले. त्याचे शिष्य पाहत असतानाच येशूचे रुप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली. तेव्हा मोशे व एलीया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले.

पेत्र येशूला म्हणाला, “प्रभु, येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”

पेत्र बोलत आहे, इतक्यात, एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या ढगातून वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”

येशुबरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार भ्याले होते. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, “उठा! घाबरू नका.” मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही.

येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, डोंगरावर त्यांनी जे पाहिले ते कोणालाही सांगू नये. मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत वाट पाहा.

10 मग त्याच्या शिष्यांनी म्हटले, “नियमशास्त्राचे शिक्षक असे का म्हणतात की, एलिया अगोदर आला पाहिजे?”

11 तेव्हा त्याने उत्तर दिले, “एलिया येऊन सर्व काही पूर्ववत करील हे खरे, 12 पण मी तुम्हांला सांगतो की, एलीया आलाच आहे आणि त्यांनी त्याला ओळखले नाही पण त्यांना वाटले तसे त्यांनी त्याला केले. मनुष्याचा पुत्रही त्यांच्याकडून असेच सहन करणार आहे.” 13 तेव्हा त्यांना समजले की त्याने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगितले आहे.

येशू एका फेफरेकरी मुलाला बरे करतो(B)

14 नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, 15 “प्रभु, माझ्या मुलावर दया करा. त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. 16 मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना.”

17 येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा.” 18 येशूने त्या मुलामध्ये असलेल्या भुताला कडक रीतीने धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.

19 नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला (त्याच्यातील भूत) का काढता आले नाही?”

20 तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता, येथून निघून तेथे जा, तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.” 21 [a]

येशू स्वतःच्या मरणाविषयी बोलतो(C)

22 जेव्हा ते एकत्र गालीलात आले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती विश्वासघाताने धरून दिला जाणार आहे. 23 ते त्याला जिवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठविला जाईल.” तेव्हा शिष्य फार दु:खी झाले.

येशू कर देण्याविषयी शिकवितो

24 येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूमास आले तेव्हा मंदिराचा कर वसूल करणारे आले, ते पेत्राकडे येऊन म्हणाले, “तुमचा गुरू कराचा रूपया देत नाही काय?”

25 त्याने म्हटले, “होय देतो.”

मग तो घरात आल्याबरोबर तो बोलण्याअगोदर येशू म्हणाला, “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा कर कोणाकडून घेतात, आपल्या मुलांकडून की परक्याकडून?”

26 जेव्हा तो म्हणाला, “परक्याकडून.”

तेव्हा येशूने त्याला म्हटले, “तर मग मुले मोकळी आहेत. 27 तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून पाण्यात जाऊन गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला दोन रूपयांचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल दे.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center