Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

New Testament in a Year

Read the New Testament from start to finish, from Matthew to Revelation.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
मत्तय 13:1-30

बी पेरणाऱ्याची बोधकथा(A)

13 त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला. पुष्कळ लोक त्याच्याभोवती जमले, म्हणून येशू नावेत जाऊन बसला व सर्व लोकसमुदाय किनाऱ्यावर उभा राहिला. तेव्हा त्याने त्यांना गोष्टीरूपाने बोध केला. तो म्हणाला,

“एक शेतकरी बी पेरायला निघाला. तो पेरीत असता काही बी रस्त्यावर पडले, पक्षी आले व त्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले. तेथे पुरेशी माती नव्हती. तेथे बी फार झपाट्याने वाढले. पण जमीन खोलवर नव्हती, म्हणून जेव्हा सूर्य उगवाला तेव्हा रोपटे वाळून गेले. कारण त्याला खोलवर मुळे नव्हती. काही बी काटेरी झुडपावर पडले. काटेरी झुडूप वाढले आणि त्याने रोपाची वाढ खुंटविली. काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते रोप वाढले व त्याला धान्य आले. आणि कोठे शंभरपट, कोठे साठपट. कोठे तीसपट असे त्याने पीक दिले. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”

येशूने बोधकथांचा वापर का केला(B)

10 मग शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले, “तुम्ही त्यांना गोष्टीरूपाने बोध का करता?”

11 तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही. 12 कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व ते त्याला पुष्कळ होईल, परंतु ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याकडून काढून घेतले जाईल. 13 म्हणून मी त्यांना गोष्टीरूपाने बोध करतो, कारण ते पाहत असताना ही त्यांना दिसत नाही आणि ऐकत असतांनाही त्यांना समजत नाही. 14 तेव्हा हे लोक दाखवून देत आहेत की, त्यांच्यासंबंधी यशयाने पूर्वी जे लिहून ठेवले ते खरे आहे. ते असे,

‘तुम्ही लक्ष द्याल,
    ऐकाल पण तुम्हांला समजणार नाही,
तुम्ही पाहाल आणि निरीक्षण कराल
    पण तुम्हांला काहीच दिसणार नाही.
15 कारण या लोकांचे अंतःकरण कठीण झाले आहे
    त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही.
त्यांनी आपले डोळे मिटले आहेत.
    यासाठी की, या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये,
    आपल्या कानांनी ऐकू नये
आपल्या अंतःकरणाने समजू
    नये व मागे फिरू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ (C)

16 पण तुमचे डोळे धन्य आहेत कारण ते पाहतात, तुमचे कान धन्य आहेत कारण ते ऐकातात. 17 मी तुम्हांला खरे सांगतो, तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहा त्या पाहण्यासाठी अनेक संदेष्टे व नीतिमान लोक आतुरतेने वाट पाहत होते. तरी त्यांना त्या पाहता आल्या नाहीत, आणि तुम्ही ज्या गोष्टी ऐकत आहात त्या ऐकण्याची त्यांची खूप इच्छा होती तरी त्यांनी त्या ऐकल्या नाहीत.

येशू बीयांविषयी स्पष्टीकरण करतो(D)

18 “पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,

19 “कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.

20 “खडकाळ जागेवर पेरलेला तो असा आहे की, तो वचन ऐकतो व लगेच आनंदाने स्वीकारतो. 21 तरी त्याच्यामध्ये मूळ नसल्याने तो थोडा काळच टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा कोणी छळ केला, व त्रास झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.

22 “आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो पण जगिक गोष्टीविषयीचा ओढा, संपत्तीचा मोह ही वचनाला वाढू देत नाहीत आणि तो निष्फळ होतो.

23 “चांगल्या जमिनीवर पेरलेला असा आहे की, तो वचन ऐकतो, ते समजतो व तो निश्चितपणे पीक देतो. कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट असे पीक देतो.”

गहू आणि निदण यांची बोधकथा

24 नंतर येशूने त्यांना दुसरी बोधकथा सांगितली. तो म्हणाला, “स्वर्गाचे राज्य हे एखाद्या मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरण्यासारखे आहे. 25 पण लोक झोपेत असता त्या मनुष्याचा शत्रू आला व गव्हामध्ये निदण पेरून गेला. 26 पण जेव्हा रोपे वाढली व दाणे आले तेव्हा निदणही दिसू लागले. 27 मग त्या माणसाचे नोकर त्याच्याकडे आले व म्हणाले, मालक आपण आपल्या शेतात चांगले बी पेरले ना? मग त्यात निदण कोठून आले?

28 “तो त्यांना म्हणाला, ‘कोणीतरी शत्रूने हे केले आहे.’

“त्याच्या नोकरांनी विचारले, ‘आम्ही जाऊन ते उपटून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?’

29 “पण तो मनुष्य म्हणाला, ‘नको तुम्ही निदण जमा करीत असताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. 30 कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा. पण गहू माझ्या गोदामात साठवा.’”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center