M’Cheyne Bible Reading Plan
यहोआहाज, यहूदाचा राजा
36 यहूदाच्या लोकांनी यरुशलेमचा नवा राजा म्हणून यहोआहाजाची निवड केली. यहोआहाज हा योशीयाचा मुलगा. 2 तो यहूदाचा राजा झाला तेव्हा तेवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये तीन महिने राज्य केले. 3 त्यानंतर मिसरचा नखो याने यहोआहाजला कैद केले. नखोने यहूदाच्या लोकांवर 3 3/4 टन चांदी आणि 75 पौंड सोने एवढा दंड बसवला. 4 यहोआहाजचा भाऊ एल्याकीम याला नखोने यहूदा-यरुशलेमचा राजा केले. यानंतर नखोने त्याचे नामांतर करुन यहोयाकीम असे ठेवले आणि यहोआहाजाला मिसरला नेले.
यहूदाजा राजा यहोयाकीम
5 यहोयाकीम पंचविसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. यहोयाकीमने परमेश्वर देवाच्या दृष्टीने वाईट गोष्टी केल्या. त्याने परमेश्वर देवा विरुध्द पाप केले.
6 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने यहोयाकीमला कैद केले आणि त्याला पितळी बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्याला नबुखद्नेस्सरने बाबेलला नेले. 7 नबुखद्नेस्सरने परमेश्वराच्या मंदिरातील काही वस्तू हस्तगत करुन त्या बाबेलला नेल्या आणि स्वतःच्या घरात ठेवल्या. 8 यहोयाकीमच्या इतर गोष्टी, त्याची दुष्कृत्ये आणि त्याचे अपराध हे सर्व इस्राएल व यहूदी राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहेत. यहोयाकीमच्या जागी त्याचा मुलगा यहोयाखीन राज्य करु लागला.
यहूदाचा राजा यहोयाखीन
9 यहोयाखीन यहूदाचा राजा झाला तेव्हा अठरा वर्षांचा होता.यरुशलेममध्ये त्याची कारकिर्द तीन महिने आणि दहा दिवस होती.परमेश्वराला अमान्य असलेले वर्तन करुन त्याने पाप केले. 10 राजा नबखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनला परमेश्वराच्या मंदिरातील बहु मोल खजिन्यासह बाबेलला आणवले.यहोयाखीनच्या नातलगांपैकी सिद् कीया याला नबखद्नेस्सरने यहुदा व यरुशलेमचा राजा केले.
यहूदाचा राजा सिद्कीया
11 सिद्कीया यहूदाचा राजा झाला तेव्हा तो एकवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेम मध्ये अकरा वर्षे राज्य केले. 12 परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य असे त्याचे वर्तन असे. परमेश्वराचे आदेश संदेष्टा यिर्मया याच्याकडून येत असत.त्याच्यापुढेही सिदकीया विनम्र झाला नाही आणि यिर्मयाचे त्याने ऐकले नाही.
यरूशलेमचा विनाश
13 सिद्कीयाने नबुखद्नेस्सर विरुध्द उठाव केला. नबुखद्नेस्सरने पूर्वी सिद्कीया कडून स्वतःशी एकनिष्ठतेची शपथ वाहवली होती. सिद्कीयाने तेव्हा देवाची शपथ घेऊन तसे वचन दिले होते. पण तरीही सिद्कीयाने आडमुठेपणा केला आणि आपला आयुष्यक्रम बदलून इस्राएलच्या परमेश्वर देवाचे आज्ञापालन करायचे नाकारले. 14 शिवाय याजकांचे प्रमुख, आणि यहूदातील वडीलधारी मंडळी यांचे दुराचरण वाढत चालले आणि त्यांनी अधिकाधिक पातके केली. ते परमेश्वराच्या बाबतीत अप्रामाणिक झाले. इतर देशांची अमंगळ कृत्यांची उदाहरणे त्यांनी समोर ठेवली. या प्रमुखांनी यरुशलेममधल्या परमेश्वराने पवित्र केलेल्या मंदिराची धूळदाण केली. 15 त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांना सावध करण्यासाठी पुन्हापुन्हा संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वराला वाटत होते. 16 पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले. 17 तेव्हा बाबेलच्या राजाला देवाने यहूदा व यरुशलेमवर स्वारी करायला लावले. बाबेलच्या राजाने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरुशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांना जिवे मारताना तरुण-वृध्द, स्त्री-पुरुष, रोगी-निरोगी असा भेदाभेद बाळगला नाही. देवानेच नबुखदनेस्सरला यहूदा व यरुशलेमच्या लोकांना शासन करायची मुभा दिली होती. 18 देवाच्या मंदिरातील सर्व चीजवस्तू त्याने बाबेलला नेली. इतकेच नव्हे तर राजाच्या व सरदारांच्या किंमती वस्तूही नेल्या. 19 नबुखद्नेस्सरने व त्याच्या सैन्याने मंदिराला आग लावली, यरुशलेमची तटबंदी उद्ध्वस्त केली, राजा आणि सरदार यांच्या मालकीची घरे जाळली. यरुशलेममधील प्रत्येक मौल्यवान वस्तू लुटून नेली किंवा नष्ट केली. 20 अजूनही हयात असलेल्या लोकांना नबुखदनेस्सरने बाबेलला नेऊन गुलाम केले. पुढे पारसाचे राज्य येऊन त्यांनी बाबेलचा पराभव करेपर्यंत हे गुलाम तेथेच राहिले. 21 अशाप्रकारे, यिर्मयाकडून इस्राएल बद्दल परमेश्वराने जे वदवले ते प्रत्यक्षात आले. परमेश्वर यिर्मयाद्वारे म्हणाला होता: “हे ठिकाण सत्तर वर्षे निर्मनुष्य आणि उजाड राहील. लोकांनी न पाळलेल्या शब्बाथच्या भरपाईसाठी असे होईल.”
22 कोरेश पारसाचा राजा असताना पहिल्याच वर्षी परमेश्वराने त्याला एक फर्मान काढायला प्रेरणा दिली. यिर्मयाच्या तोंडून वदवलेली भविष्यवाणी प्रत्यक्षात येण्यासाठी परमेश्वराने त्याला ही स्फूर्ती दिली. कोरेशने आपल्या दूतांकरवी राज्यभर असा संदेश पाठवला की,
23 पारसचा राजा कोरेश म्हणतो:
स्वर्गातील परमेश्वर देव याने मला या पृथ्वीचा सम्राट केले आहे. त्याच्यासाठी यरुशलेममध्ये मंदिर बांधकामाची जबाबदारीही माझ्यावर सोपवली आहे. आता तुमच्यापैकी देवाला मानणारे सर्वजण निर्धास्तपणे यरुशलेमला जाऊ शकता. परमेश्वर देव तुमच्या बरोबर असो.
22 नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती. 2 आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती. त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांना आरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती.
3 त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही. देवाचे सेवक त्याची उपसना करतील. 4 आणि ते त्याचे मुख पाहतील. व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल. 5 त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांना प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरंज पडणार नाही; कारण प्रभु देव आपला प्रकाश त्यांना पुरवील. आणि ते लोक अनंतकाळ राज्य करतील.
6 नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. जो प्रभु संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा प्रभु आहे, त्याने आपला दूत पाठविला. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या सेवकांना दाखवून देण्यासाठी त्याने आपला दूत पाठविला आहे.” 7 “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य!”
8 ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पाया पडून मी त्याची उपासना करु लागलो. 9 परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करु नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे ह्या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक सेवक आहे. देवाची उपासना कर!”
10 नंतर देवदूत मला म्हणाला, “भावी काऴाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे. 11 जो मनुष्य अयोग्य वागतो, तो आणखी चुकीचे वर्तन करीत राहू दे! जो मलिन आहे, त्याला आणखी मलिन राहू दे! जो मनुष्य पवित्र आहे, त्याला आणखी पवित्रपणाने चालू दे.”
12 “पाहा! मी लवकर येत आहे, आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळ देईन. 13 मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.
14 “जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा हक्क राहील. 15 परंतु ‘कुत्रे’ चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे, आणि निरनिराळ्या रीतीने लबाडी करणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.
16 “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
17 आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये!” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये!” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
18 या पुस्तकात भविष्याकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्याला मी गंभीरपणे सावधान करतो: जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणिल. 19 आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील, त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
20 जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”
आमेन, ये प्रभु येशू, ये!
21 प्रभु येशूची कृपा देवाच्या सर्व लोकांबरोबर असो.
4 “ती न्यायनिवाड्याची वेळ येत आहे. ती तापलेल्या भट्टीसारखी असेल. सर्व गर्विष्ठांना आणि प्रत्येक दुष्ट माणसाला शिक्षा होईल. सर्व पापी गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. त्या वेळी, ते जळणाऱ्या झुडुपाप्रमाणे असतील एकही फांदी वा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
2 “पण माझ्या अनुयायांवर चांगुलपणा उगवत्या सूर्याप्रमाणे चमकेल. सूर्याच्या किरणांप्रमाणे, त्यातून बरे होण्याची शक्ती मिळेल. गोठ्यातून [a] सुटलेल्या वासरांप्रमाणे, तुम्ही मुक्त व आनंदी व्हाल. 3 मग तुम्ही त्या दुष्टांना तुडवाल तुमच्या पायाखाली ते राखेप्रमाणे होतील. न्यायदानाच्या वेळेला मी ह्या गोष्टी घडवून आणीन.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
4 “मोशेचे नियमशास्त्र लक्षात ठेवा आणि पाळा. मोशे माझा सेवक होता. होरेब (सिनाय) पर्वतावर मी त्याला विधिनियम सांगितले. ते सर्व इस्राएली लोकांसाठी होते.”
5 परमेश्वर म्हणाला, “हे पाहा, मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीत आहे. देवाच्या न्यायदानाच्या भयंकर मोठ्या वेळेपूर्वी तो येईल. 6 एलीया पालकांना त्यांच्या मुलांजवळ व मुलांना त्यांच्या पालकांजवळ येण्यास मदत करील. हे घडलेच पाहिजे नाहीतर मी (देव) येईन आणि तुमच्या देशाचा संपूर्ण नाश करीन.”
येशू सात शिष्यांना दिसतो
21 नंतर येशू त्याच्या शिष्यांना पुन्हा दिसला. तो तिबीर्या सरोवराजवळ (जे गालीलात होते) त्या ठिकाणी दिसला. हे अशा प्रकारे घडले: 2 काही शिष्य एकत्र होते. ते म्हणजे शिमोन पेत्र, थोमा (दिदुम म्हणत तो), गालीलातील काना येथील नथनीएल, जब्दीचे मुलगे, व त्याच्या शिष्यांतील दुसरे दोघे दोघे असे ते होते. 3 शिमोन पेत्राने त्यांना म्हटले, “मी मासे धरायला जातो.”
ते त्याला म्हणाले, “आम्हीही तुझ्याबरोबर येतो.” नंतर ते बाहेर गेले व नावेत बसले, पण त्या रात्री त्यांना काहीही मिळाले नाही.
4 दुसऱ्या दिवशी पहाटे येशू किनाऱ्यावर उभा राहिला. पण शिष्यांना समजले नाही की तो येशू आहे. 5 तो त्यांना म्हणाला, “मित्रांनो, तुम्ही काही मासे पकडले का?”
त्यांनी उत्तर दिले, “नाही.”
6 तो म्हणाला, “तुमचे जाळे नावेच्या उजव्या बाजूला टाका व मग तुम्हांला काही मासे मिळतील.” जेव्हा त्यांनी तसे केले, तेव्हा त्यांना पुष्कळ मासे मिळाल्यामुळे जाळे ओढता येईना.
7 तेव्हा येशूची ज्याच्यावर प्रीति होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभु आहे!” असे म्हणता क्षणीच पेत्राने कपडे गुंडाळले. (कारण त्याने कपडे काढले होते) व पाण्यात उडी मारली. 8 दुसरे शिष्य माशांचे जाळे ओढीत होडीतून आले कारण ते काठापासून दूर नव्हते, फक्त शंभर यार्ड होते. 9 जेव्हा ते किनाऱ्याला आले, त्यांनी कोळशांनी पेटविलेला विस्तव पाहिला व मासे आणि भाकर त्यावर ठेवलेली पाहिली. 10 येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या माशांतून काही मासे आणा.”
11 शिमोन पेत्राने नावेत जाऊन एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे काठास आणले. इतके मासे असतानाही जाळे फाटले नाही. 12 येशू त्यांना म्हणाला, “या, जेवा.” तेव्हा तो प्रभु आहे असे त्यांना समजले. म्हणून शिष्यांपैकी कोणी त्याला, तू कोण आहेस, हे विचारायला धजला नाही. 13 मग येशूने येऊन भाकर घेतली व त्यांना दिली. तसेच मासळीही दिली.
14 येशू मेलेल्यांतून उठल्यावर तो आपल्या शिष्यांस प्रगट होण्याची ही तिसरी वेळ.
येशू पेत्राबरोबर बोलतो
15 मग जेव्हा त्यांनी खाणे संपविले, येशू पेत्राला म्हणाला, “योहानाच्या मुला, शिमोना, तू माझ्यावर या सर्वापेक्षा अधिक प्रीति करतोस काय?”
तो म्हणाला, “होय प्रभु, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”
येशू म्हणाला, “माझ्या कोकरांना चार.”
16 पुन्हा येशू म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू खरोखर माझ्यावर प्रीति करतोस का?”
पेत्राने उत्तर दिले, “होय प्रभु तुम्हांला माहीत आहे की मी तुमच्यावर प्रीति करतो.”
येशू म्हणाला, “माझ्या मेढरांची काळजी घे.”
17 तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?”
पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, “तू माझ्यावर प्रीति करतोस का?”
तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”
येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार. 18 मी खरे सांगतो, तू तरुण होतास, तेव्हा तू स्वतः पोशाख करून तुला जेथे पाहिजे तेथे जात होतास. पण जेव्हा तू म्हातारा होशील तेव्हा तू आपला हात लांब करशील, आणि दुसरा कोणीतरी तुला पोशाख घालील. आणि जेथे तुझी इच्छा नाही तेथे नेईल.” 19 तो कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार व देवाचे गौरव करणार हे सुचविण्यासाठी येशू हे बोलला. हे बोलल्यानंतर तो म्हणाला, “माइयामागे ये.”
20 मग पेत्राने वळून ज्या शिष्यावर येशू प्रीति करीत असे, तो त्यांच्यामागे येत होता. (हा तोच होता, जो भोजनाच्या वेळी येशूजवळ बिलगून बसला होता. आणि म्हणाला होता. “प्रभु, तुझा विश्वासघात कोण करणार आहे?)” त्याला पाहिले. 21 जेव्हा पेत्राने त्याला पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “प्रभु, याचे काय?”
22 येशूने उत्तर दिले, “मी परत येईपर्येत त्याने जगावे अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय? तू मला अनुसर.”
23 या कारणामुळे अशी अफवा बंधुवर्गात पसरली की, हा शिष्य मरणार नाही, पण येशू असे म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, तो फक्त म्हणाला, “मी येईपर्यंत त्याने जिवंत राहावे, अशी माझी इच्छा असेल, तर तुला त्याचे काय?”
24 जो शिष्य या गोष्टीविषयी साक्ष देतो व ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे. आणि त्याची साक्ष खरी आहे, हे आम्हांला माहीत आहे.
25 आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत, ती एकेक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही, असे मला वाटते.
2006 by World Bible Translation Center