M’Cheyne Bible Reading Plan
योशाया वल्हांडणाचा सण साजरा करतो
35 राजा योशीयाने यरुशलेमात परमेश्वराप्रीत्यर्थ वल्हांडणाचा उत्सव केला. पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू कापला गेला. 2 परमेश्वराच्या मंदिराची कामे पार पाडण्यासाठी योशीयाने याजक नेमले आणि त्यांच्या कार्यात त्यांना प्रोत्साहन दिले. 3 इस्राएल लोकांना शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी शुचिर्भूत होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करारकोश ठेवा. दावीद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा. 4 आपापल्या घराण्यांप्रमाणे तुमचा जो क्रम ठरला आहे त्यानुसार मंदिरातील सेवेसाठी सिध्द व्हा. राजा दावीद आणि त्याचा मुलगा राजा शलमोन यांनी आखून दिल्याप्रमाणे आपापली कर्तव्ये पार पाडा. 5 आपापल्या घराण्यांच्या वर्गवारीप्रमाणे, भाऊबंदांबरोबर पवित्र स्थानी उभे राहा. म्हणजे तुम्हाला आपापसात सहकार्य करता येईल. 6 वल्हांडणाचे यज्ञपशू कापा, परमेश्वरासाठी स्वतःचे पवित्रीकरण करा. इस्राएल बांधवांसाठी यज्ञपशू तयार ठेवा. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही यथासांग पार पाडा. या आज्ञा परमेश्वराने आपल्याला मोशेमार्फत दिल्या आहेत.”
7 वल्हांडणासाठी योशीयाने 30,000 शेरडे मेंढरे यज्ञपशू म्हणून इस्राएल लोकांना दिली. या खेरीज 3,000 बैल दिले. हे पशुधन त्याच्या खाजगी मालमत्तेतील होते. 8 या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांना, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुफ्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी 2,600 शेरडे मेंढरे आणि 300 बैल एवढे पशू वल्हांडणाचे बळी म्हणून याजकांना दिले. 9 कोनन्या आणि त्याचे भाऊ शमाया व नथनेल यांनी तसेच हशब्या, ईयेल व योजाबाद यांनी लेवींना 500 कोकरे मेंढरे व 500 बैल वल्हांडणाचे यज्ञपशू म्हणून दिले. कोनन्या इत्यादी मंडळी लेव्यांची प्रमुख होती.
10 वल्हांडणाच्या उपासनेची सर्व सिध्दता झाल्यावर याजक आणि लेवी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. तशी राजाज्ञाच होती. 11 वल्हांडणाचे कोकरे मारली गेली. लेवींनी त्या पशूंची कातडी काढून रक्त याजकांना दिले. याजकांनी हे रक्त वेदीवर शिंपडले. 12 त्यांनी मग हे पशू परमेश्वराला होमार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या घराण्याच्या लोकांकडे स्वाधीन केले. हा अर्पणाचा विधी मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचा होता. 13 लेवींनी वल्हांडणाच्या यज्ञपशूंचे मांस विधिवत भाजले. पातेल्यांत, हंड्यांत आणि कढ्यांमध्ये त्यांनी ही पवित्रार्पणे शिजवली आणि तत्परतेने लोकांना ती नेऊन दिली. 14 हे काम उरकल्यावर लेवींना स्वतःसाठी आणि अहरोनचे वंशज असलेल्या याजकांसाठी मांस मिळाले. कारण हे याजक होमबली आणि चरबी अर्पण करण्यात रात्र पडेपर्यंत गुंतले होते. 15 आसाफच्या घराण्यातील लेवी गायक राजा दावीदाने नेमून दिलेल्या आपापल्या जागांवर उभे होते. आसाफ, हेमान आणि राजाचा संदेष्टा यदुथून हे ते होत. प्रत्येक प्रवेशद्वारावरील द्वारपालांना आपल्या जागा सोडायची गरज नव्हती कारण त्यांच्या लेवी बांधवांनी वल्हांडणाच्या सणाची त्यांच्यासाठी करायची सगळी तयारी केली होती.
16 तेव्हा राजा योशीयाच्या आज्ञेनुसार परमेश्वराच्या उपासनेची सर्व तयारी त्या दिवशी पूर्ण झाली. वल्हांडणाचा उत्सव झाला आणि परमेश्वराच्या वेदीवर होमबली अर्पण करण्यात आले. 17 सर्व उपस्थित इस्राएल लोकांनी वल्हांडणाचा आणि बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. 18 शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलमधून आलेले लोक आणि यरुशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला. 19 योशीयाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी हा वल्हांडणाचा उत्सव झाला.
योशीयाचा मृत्यू
20 योशीयाने मंदिरासाठी सर्व चांगल्या गोष्टी केल्या. पुढे मिसरचा राजा नखो, फरात नदीजवळच्या कर्कमीश नगराविरुध्द लढण्यासाठी सैन्यासह चालून आला. योशीया त्याला लढाईसाठी सामोरा गेला. 21 पण नखोने आपल्या वकीलांमार्फत त्याला कळवले की,
“राजा योशीया, मला तुझ्याशी कर्तव्य नाही. मी तुझ्याशी लढायला आलेलो नाही. माझ्या शत्रूंवर चालून आलो आहे. देवानेच मला त्वरा करायला सांगितले. परमेश्वराची मला साथ आहे तेव्हा तू त्रास घेऊ नकोस. तू मला विरोध केलास तर देव तुझा नाश करील.”
22 पण योशीया मागे हटला नाही. त्याने नखोला तोंड द्यायचे ठरवले. आणि वेष पालटून तो लढाईत उतरला. आज्ञेविषयी नखोने जे सांगितले ते योशीयाने ऐकले नाही. तो मगिद्दोच्या खोऱ्यात युध्दासाठी सज्ज झाला. 23 या लढाईत योशीयावर बाणांचा वर्षाव झाला. तो आपल्या सेवकांना म्हणाला, “मी घायाळ झालो आहे, मला इथून घेऊन जा.”
24 तेव्हा सेवकांनी योशीयाला त्याच्या रथातून उतरवून त्याने तिथे आणलेल्या दुसऱ्या रथात बसवले आणि योशीयाला त्यांनी यरुशलेमला नेले. यरुशलेममध्ये योशीयाला मरण आले. त्याच्या पूर्वजांना पुरले तेथेच योशीयाला पुरण्यात आले. योशीयाच्या मृत्यूने यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांना फार दु:ख झाले. 25 यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते गाण्याचा पायंडाच पडला आहे. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.
26-27 आपल्या कारकिर्दीत योशीयाने ज्या इतर गोष्टी केल्या त्या इस्राएल आणि यहूदा राजांचा इतिहास या पुस्तकात अथपासून इतीपर्यंत नोंदवलेल्या आहेत. त्याची परमेश्वरावरची निष्ठा आणि त्याचे आज्ञापालन याविषयी त्यात लिहिले आहे.
नवीन यरुशलेम
21 मग मी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी [a] पाहिली. कारण पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी ही नाहीशी झाली होती. आणि कोणताही समुद्र राहिला नव्हता. 2 पवित्र नगर यरुशलेम देवापासून खाली उतरताना मी पाहिले. ते नगर यरुशलेम, वरासाठी सजविलेल्या वधूसारखे दिसत होते.
3 आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली. ती वाणी म्हणाली, “आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे. आणि तो त्यांच्या बरोबर राहील. आणि तो त्यांचा देव होईल. 4 तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील. आणि येथून पुढे मरण असणार नाही. शोक करणे, रडणे आणि अथवा दु:खसहन् करणे राहणार नाही. कारण सर्व जुन्या गोष्टी नाहीशा झालेल्या आहेत.”
5 जो सिंहासनावर बसलेला होता, तो म्हणाला, “पाहा मी सर्व काही नवीन करीत आहे!” मग तो पुढे म्हणाला, “लिही! कारण हे शब्द विश्वास ठेवण्याला योग्य आणि खरे आहेत.”
6 नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्याला मी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन. 7 जो विजय मिळवितो, त्याला या सर्व गोष्टी मिळतील, मी त्याचा देव होईन, व तो माझा पुत्र होईल. 8 परंतु भित्रे, विस्वास न ठेवणारे अंमगळ, खुनी, व्यभिचारी, (म्हणजे लैंगिक अनीतीने वागणारे लोक), चेटकी, मूर्तिपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्या तळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.”
9 मग ज्या देवदूतांच्या हातात सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या होत्या. त्यांच्यापैकी एक देवदूत आला, आणि तो मला म्हणाला, “इकडे ये! जी कोकऱ्याची वधु आहे, ती मी तुला दाखवितो.” 10 मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मला एका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.
11 ते नगर देवाच्या गौरवाने झळकत होते. त्याचे तेज एखाद्या मोलवान रत्नासारखे होते; स्फटिकासारख्या चमकत असणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते. 12 त्या नगराच्या सभोवती मोठमोठ्या उंच भिंती होत्या. आणि त्याला बारा वेशी होत्या. त्या बारा वेशींजवळ बारा देवदूत उभे होते. आणि त्या वेशींवर इस्राएलाच्या बारा वंशांची नावे लिहिलेली होती. 13 त्या नगरला पूर्व दिशेला तीन, उत्तर दिशेला तीन, दक्षिण दिशेला तीन आणि पश्चिम दिशेला तीन वेशी होत्या. 14 नगराच्या भिंतीना बारा पाये होते. त्या पायांवर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे लिहिलेली होती.
15 नगराची, वेशीची आणि भिंतीची लांबी-रुंदी मोजता यावी म्हणून जो देवदूत माझ्याशी बोलला, त्याच्याजवळ सोन्याची एक मोजपट्टी होती. 16 नगर चौरस आकाराचे होते. त्याची लांबी व रुंदी सारखीच होती. देवदूताने सोन्याच्या मोजपट्टीने नगराचे माप मोजून पाहिले. ते पंधरा हजार मैल [b] भरले. नगराची लांबी, रुंदी व उंची समसमान होत्या. 17 नंतर देवदूताने नगराच्या भिंतीचे माप घेतले. ते मनुष्याच्या हाताने 72 मीटर (216 फूट) [c] भरले. देवदूताच्या हाताने देखील माप तेवढेच भरले. 18 नगराच्या भिंती यास्फे रत्नाच्या होत्या. आणि नगर शुद्ध सोन्याचे, चमकाणाऱ्या काचेसारखे होते.
19 नगराचे पाये प्रत्येक प्रकारच्या मोलवान अशा रत्नांनी सजविले होते. पाहिला पाया यास्फे रत्नाचा होता. दुसरा नीळ, तिसरा शिवधातु, चौथा पाचू (पाच), 20 पाचवा गोमेद, सहावा सार्दी, सातवा लसणा, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकिंथ, बारावा पदमाराग रत्नाचा होता. 21 बारा वेशी बारा मोत्यांनी बनविल्या होत्या. आणि प्रत्येक वेस एकाएका रत्नाची होती. नगरातील रस्ता शुद्ध सोन्याचा, काचेसारखा स्पष्ट होता.
22 त्य नगरात मला कोठेही मंदीर दिसले नाही; 23 प्रभु देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवीत होते, आणि कोकरा हा त्याचा दिवा आहे. 24 राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील. आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडे आणतील. 25 त्या नगराच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत आणि तेथे कधीही रात्र असणार नाही. 26 राष्टांचे वैभव आणि संपत्ती त्या नगरात आणण्यात येतील. 27 जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही. अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्या लोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.
3 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी माझा दूत पाठवीत आहे. तो माझ्यासाठी मार्ग तयार करील. अनपेक्षितपणे तुम्ही ज्याचा शोध करत आहात तो प्रभु त्याच्या मंदिरात येईल तुम्हांला हव्या असलेल्या नव्या कराराचा तो दूत आहे तो खरोखरीच येत आहे.”
2 “त्यावेळेची तयारी कोणीही करु शकत नाही. तो येताच, कोणीही त्याच्यासमोर उभा राहू शकणार नाही. तो धगधगत्या अग्नीसारखा असेल. वस्तू अगदी स्वच्छ व्हाव्या म्हणून वापरण्यात येणाऱ्या तीव्र साबणासारखा असेल. 3 तो लेवीच्या लोकांना स्वच्छ करील. विस्तवात चांदी ज्याप्रमाणे शुध्द केली जाते. तसा तो त्यांना शुध्द करील. तो त्यांना चांदी सोन्याप्रमाणे शुध्द करील. मग ते परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी आणतील आणि सर्व गोष्टी योग्यरीतीने करतील. 4 मग यरुशलेम व यहुदा यांच्याकडून परमेश्वर भेटी स्वीकारील. हे सर्व अगदी पूर्वीसारखे असेल प्राचीन काळासारखेच हे असेल. 5 मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. लोकांनी केलेल्या वाईट गोष्टी न्यायाधीशाला सांगणाऱ्या माणसाप्रमाणे मी असेन काही लोक दुष्टपणे जादूटोणा करतात. काही व्यभिचाराचे पाप करतात. काही खोटी वचने देतात. काही आपल्या मजुरांना फसवितात. ते मजुरांना कबूल केल्याप्रमाणे मजुरी देत नाहीत. लोक विधवांना व अनाथांना मदत करीत नाहीत. परक्याला कोणी मदत करीत नाही. माझा लोक मान राखत नाहीत.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
देवाकडे चोरी
6 “मी परमेश्वर आहे मी कधीही बदलत नाही. तुम्ही याकोबची मुले आहात आणि तुमचा पूर्णपणे नाश झाला नाही. 7 पण तुम्ही माझे नियम कधीच पाळले नाहीत. तुमच्या पूर्वजांनीसुध्दा मला अनुसरण्याचे सोडून दिले. तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुमच्याकडे परत येईन.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
“तुम्ही विचारता ‘आम्ही कसे परत येऊ शकतो?’
8 “देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या. देवाकडे चोरी करु नये. पण तुम्ही माझ्या वस्तू चोरल्या.”
“तुम्ही मला विचारता, ‘आम्ही तुझे काय चोरले?’
“तुम्ही मला तुमच्या वस्तूंचा एक दशांश भाग द्यायला हवा. खास भेटी द्यायला हव्यात. पण तुम्ही हे मला देत नाही. 9 अशाप्रकारे तुमच्या संपूर्ण राष्ट्राने माझ्या गोष्टी चोरल्या आहेत म्हणूनच तुमच्याबाबतीत वाईट गोष्टी घडत आहेत.” प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
10 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “ही परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या वाट्यातील दहावा भाग माझ्याकडे आणा. तो भाग खजिन्यात ठेवा. माझ्या घरी अन्न आणा. माझी परीक्षा घ्या. तुम्ही असे केलेत, तर मी तुम्हाला खरेच आशीर्वाद देईन. आकाशातून पडणाऱ्या वृष्टीप्रमाणे तुमच्यावर चांगल्या गोष्टींचा वर्षाव होईल. प्रत्येक गोष्ट तुम्हांला जरुरीपेक्षा जास्त मिळेल. 11 तुमच्या पिकांचा मी, किडीमुळे नाश होऊ देणार नाही. सर्व द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
12 “इतर राष्ट्रांतील लोक तुमच्यांशी चांगले वागतील तुमचा देश खरोखरच विळक्षण आनंददायक होईल.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
न्यायनिवाड्याची विशेष वेळ
13 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझी निंदा केलीत.”
पण तुम्हीच विचारता “आम्ही तुझ्याबद्दल काय बोललो?”
14 तुम्ही म्हणालात “परमेश्वराची उपासना करणे व्यर्थ आहे. आम्ही परमेश्वराने सांगितल्याप्रामाणे केले. पण आमचा काहीच फायदा झाला नाही. लोक प्रेतक्रियेच्या वेळी जसे रडतात, तसे आम्ही पाप केले म्हणून शोक केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 15 गर्विष्ठ लोक सुखी आहेत, असे आम्हाला वाटते. दुष्टांना यश मिळते. वाईट कृत्ये करुन ते देवाचा अंत पाहतात पण देव त्यांना शिक्षा करीत नाही.”
16 देवाचे अनुयायी एकमेकांशी बोलले व परमेश्वराने ते ऐकले. त्याच्या समोर पुस्तक आहे. त्यामध्ये देवाच्या अनुयायांची नावे आहेत. हेच लोक देवाच्या नावाला मान देतात.
17 परमेश्वर म्हणतो, “ते माझे आहेत मी त्यांच्यावर दया करीन. आज्ञाधारक मुलावर जशी माणूस माया करतो, तशी मी माझ्या अनुयायांवर दया करीन. 18 तुम्ही माझ्याकडे परत याल. मग दुष्ट माणूस आणि चांगला माणूस यातील फरक तुम्हाला कळेल. देवाला अनुसरणारा व न अनुसणारा यातील भेट तुम्हाला समजेल.
काही अनुयायांना येशूची कबर रिकामी दिसते(A)
20 मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले. 2 म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभुला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहीत नाही.”
3 मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले. 4 तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला. 5 आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.
6 मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला. 7 तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला. 8 शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्धा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला. 9 येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते.
येशू मरीया मग्दालियाला दिसतो(B)
10 मग शिष्य त्यांच्या घरी गेले. 11 पण मरीया थडग्यासमोर रडत उभी राहिली, ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली 12 आणि तिने दोन देवदूतांना पांढऱ्या पोशाखात जेथे येशूचे शरीर होते तेथे बसलेले पाहिले. एकजण डोके होते, तेथे बसला होता व एकजण पायाजवळ बसला होता.
13 त्यांनी तिला विचारले, “बाई तू का रडत आहेस?”
ती म्हणाली, “ते माझ्या प्रभूला घेऊन गेले आहेत आणि मला माहीत नाही, त्यांनी त्याला कोठे ठेवले आहे.” 14 यावेळी ती पाठमोरी वळाली. तिने तेथे येशूला उभे असलेले पाहिले. पण तिला हे समजले नाही की तो येशू आहे.
15 तो म्हणाला, “बाई, तू का रडत आहेस? तू कोणाला शोधत आहेस?”
तिला वाटले तो माळी आहे, ती म्हणाली, “दादा, जर तू त्याला कोठे नेले असशील, तर मला सांग तू त्याला कोठे ठेवले आहेस, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.”
16 येशू तिला म्हणाला, “मरीये.”
ती त्याच्याडे वळाली आणि अरेमी भाषेत मोठ्याने ओरडली, “रब्बुनी!” (याचा अर्थ गुरुजी)
17 येशू तिला म्हणाला, “माझ्याजवळ येऊ नकोस, कारण मी अजून पित्याकडे गेलो नाही, तर माझ्या भावांकडे जा आणि त्यांना सांग: मी माझ्या पित्याकडे व तुमच्या पित्याकडे व माझ्या देवाकडे व तुमच्या देवाकडे जात आहे.”
18 मरीया मग्दालिया ही बातमी घेऊन शिष्यांकडे गेली. “मी प्रभुला पाहिले आहे!” आणि तिने त्यांना सांगितले की, त्याने या गोष्टी सांगितल्या आहेत.
येशू त्याच्या शिष्यांना दिसतो(C)
19 आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.” 20 असे बोलल्यावर त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली, तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला.
21 पुन्हा येशू म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो! जसे पित्याने मला पाठवले आहे, तसे मी तुम्हांला पाठवितो.” 22 आणि असे म्हणून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि म्हणाला, “पवित्र आत्मा स्वीकारा. 23 जर तुम्ही कोणाच्या पापांची क्षमा केली, तर त्याला पापक्षमा मिळेल. जर तुम्ही क्षमा केली नाही तर त्यांची क्षमा होणार नाही.”
येशू थोमाला दिसतो
24 आता थोमा (याला दिदुम म्हणत) बारा शिष्यांपैकी एक होता. येशू आला तेव्हा तो शिष्यांबरोबर नव्हता. 25 तेव्हा इतर शिष्यांनी त्याला सांगितले की, “आम्ही प्रभूला पाहिले आहे!” पण तो त्यांना म्हणाला, “त्याच्या हातांमधील खिळ्यांचे व्रण पाहिल्याशिवाय व खिळ्यांच्या व्रणांत माझे बोट घातल्याशिवाय व त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणार नाही.”
26 एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.” 27 मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट इकडे कर व माझे हात पाहा आणि तुझा हात इकडे कर व माझ्या कुशीत घाल. संशय सोड आणि विश्वास ठेव.”
28 थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”
29 मग येशू त्याला म्हणाला, “तू मला पाहिले आहेस म्हणून तू विश्वास ठेवला आहेस, पण ज्यांनी मला पाहिले नाही तरीही त्यांनी विश्वास धरला ते धन्य आहेत.”
योहानाने हे पुस्तक का लिहिले?
30 आणखी या पुस्तकात लिहिली नाहीत अशी पुष्कळ अदभुत चिन्हे येशूने त्याच्या शिष्यांच्या समवेत केली. ती या पुस्तकात लिहिली नाहीत. 31 पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.
2006 by World Bible Translation Center