M’Cheyne Bible Reading Plan
यहूदाचा राजा मनश्शे
33 मनश्शे यहूदाचा राजा झाला तेव्हा बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये पंचावन्न वर्षे राज्य केले. 2 त्यांचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते. वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्राएलपुढून हुसकून लावले त्यांच्या निंद्य प्रथांचेच मनश्शेने अनुकरण केले 3 हिज्कीयाने जी उंचस्थाने उद्ध्वस्त केली होती तीच मनश्शेने पुन्हा बांधली. त्याने बआल देवतांसाठी वेद्या केल्या आणि अशेराचे स्तंभ उभे केले. नक्षत्रांपुढे नतमस्तक होऊन तो त्या तारांगणांची पूजाही करत असे. 4 परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या भलत्यासलत्या देवतांसाठी वेद्या बांधल्या. “माझे नाव यरुशलेममध्ये चिरकाल राहील” असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते. 5 या मंदिराच्या दोन्ही अंगणांत मनश्शेने सर्व नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या. 6 बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या पोटच्या मुलांचा यज्ञात बळी दिला. रमल, जादूटोणा, चेटूक यातही तो पारंगत होता. चेटूक करणारे आणि मृतात्म्यांशी संबंध ठेवणारे यांच्याशी मनश्शेचे संबंध होते. परमेश्वराने निषिध्द मानलेली बरीच कृत्ये मनश्शेने केली. त्याच्या या गैरवर्तनामुळे परमेश्वराचा संताप झाला. 7 मनश्शेने एका कोरीव मूर्तीची स्थापनाही देवाच्या मंदिरात केली. या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन यांना देव असे म्हणाला होता, “या मंदिरात आणि यरुशलेममध्ये माझे नाव चिरंतन काल राहील. इस्राएलच्या सर्व कुळांमधून मी यरुशलेमला निवडले. 8 त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशातून मी आता इस्राएल लोकांना बाहेर पडू देणार नाही. पण त्यांना दिलेल्या आज्ञा मात्र त्यांनी कसोशीने पाळल्या पाहिजेत. मोशेमार्फत त्यांना दिलेल्या विधी, नियम व आज्ञा त्यांनी पाळायला हवेत.”
9 मनश्शेने मात्र यहूदा लोक आणि यरुशलेमचे लोक यांना दुराचरणाला प्रवृत केले. इस्राएल लोकांपूर्वी ज्या राष्ट्रांना परमेश्वराने हुसकावून लावले त्यांच्यापेक्षाही हे लोक दुराचरणी होते.
10 परमेश्वर मनश्शेशी व इतर लोकांशी बोलला पण कोणीही परमेश्वराचे ऐकले नाही. 11 तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रितीने मनश्शेला कैद करुन त्यांनी बाबेलला नेले.
12 मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला. 13 त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली. मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वराला त्याची दया आली. म्हणून त्याला पुन्हा यरुशलेमला आणून परमेश्वराने त्याला गादीवर बसवले. परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले.
14 या घटनेनंतर मनश्शेने दावीद नगराभोवती आणखी एक कोट बांधला. हा कोट गीहोनच्या पश्चिमेकडील खोऱ्यात मासळी दरवाजाजवळ ओफेल टेकडी सभोवती असून खूप उंच होता. यहूदामधील सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये त्याने अधिकारी नेमले. 15 परक्या देवतांच्या मूर्ती त्याने हटवल्या. परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ती काढून टाकली. मंदिराच्या टेकडीवर तसेच यरुशलेममध्ये बांधलेल्या वेद्यांही काढून यरुशलेम नगराबाहेर टाकून दिल्या. 16 नंतर त्याने परमेश्वराची वेदी स्थापन केली आणि त्यावर शांतिअर्पणे आणि उपकार स्मरणाची अर्पणे वाहिली. समस्त यहूदी लोकांना त्याने इस्राएलाचा परमेश्वर देव याची उपासना करायची आज्ञा केली. 17 लोक अजूनही उंचस्थानी यज्ञ करीतच होते पण आता ते फक्त त्यांच्या परमेश्वर देवा प्रीत्यर्थ करीत होते.
18 मनश्शेची बाकीची कृत्ये तसेच त्याने केलेली देवाची प्रार्थना तसेच परमेश्वर देवाच्यावतीने द्रष्टे त्याच्याशी जे बोलले ती वचने हे सगळे इस्राएलच्या राजांच्या बखरीत लिहिलेले आहे. 19 मनश्शेची प्रार्थना आणि परमेश्वराला त्याचे गाऱ्हणे ऐकून करुणा वाटणे हे द्रष्टयांच्या बखरीत आहे. मनश्शेला उपरती होण्यापूर्वीची त्याची पापे व दुर्वर्तने, उंच स्थाने व अशेरा स्तंभ जिथे उभारले ती स्थाने याचेही तपशील याच बखरीत आहेत. 20 पुढे मनश्शे वारला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्याला पुरले. त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
यहूदाचा राजा आमोन
21 आमोन विसाव्या वर्षी यहूदाचा राजा झाला. तो यरुशलेममध्ये दोन वर्षे गादीवर होता. 22 परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये त्याने केली. आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला. वडीलांनी करुन घेतलेल्या कोरीव मूर्तीपुढे यज्ञ करुन त्याने त्यांची पूजा केली. 23 पुढे त्याचे वडील मनश्शे जसे परमेश्वराला नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट त्याची दुष्कृत्ये वाढतच चालली. 24 आमोनच्या सेवकांनी कट रचून त्याची त्याच्या महालातच हत्या केली. 25 पण राजा आमोन विरुध्द कारस्थान करणाऱ्यांचा यहूदी लोकांनी काटा काढला. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
स्वर्गात लोक देवाची स्तुति करतात
19 यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते:
“हालेलुया!
तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत
2 कारण त्याचे न्यायनिवाडे खरे
आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने
आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,
तिला देवाने शिक्षा केली आहे.
त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”
3 ते पुन्हा म्हणाले,
“हालेलुया!
तिच्यापासून निघालेला धूर अनंतकाळ वर जातो.”
4 मग चोवीस वडीलजन आणि चार जिवंत प्राणी जो देव सिंहासनावर बसला आहे त्याच्या पाया पडले व त्यांनी त्याची उपासना केली. ते म्हणाले:
“आमेन, हालेलुया!”
5 मग सिंहासनावरुन एक वाणी झाली, ती म्हणाली,
“देवाच्या सर्व सेवकांनो,
त्याची स्तुति करा,
जे तुम्ही त्याचे भय धरता ते तुम्ही सर्व लहानथोर
देवाची स्तुति करा!”
6 नंतर मोठ्या लोकसमुदायाच्या गर्जनेसारखा आवाज मी ऐकला, तो आवाज महापूराच्या आणि मेघांच्या मोठया गडगडाटासारखा होता. तो लोकसमुदास असे मोठ्याने म्हणत होता की:
“हालेलुया!
कारण आमच्या सर्वसमर्थ देवाने
सत्ता गाजविण्यास सुरुवात केली आहे.
7 आपण उल्हास करु व आनंदात राहू!
आणि त्याचे गौरव करु
कारण कोकऱ्याचे लग्न जवळ आले आहे.
आणि त्याच्या वधूने स्वतःला नटवून तयार केले आहे
8 तिला स्वच्छ, चमकणारे तागाचे कपडे
नेसायला दिले आहेत.”
(देवाच्या पवित्र लोकांनी केलेली नीतीमत्त्वाची कामे म्हणजेच तलम तागाचे कपडे आहेत.)
9 नंतर तो देवदूत मला म्हणाला, “हे लिही, ज्यांना कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले आहे, ते धन्य!” तो मला म्हणाला, “हे देवाचे खरेखुरे शब्द आहेत.”
10 यावर मी देवदूताच्या पायावर डोके ठेवून त्याची उपासना करु लागलो; परंतु देवदूत म्हणाला, “असे करु नको, मी तर तुझ्याबरोबरीचा आणि येशूच्या सत्याबाबत साक्ष देण्याची जबाबदारी तुझ्या ज्या भावांवर आहे, त्यांच्या बरोबरीचा एक सेवक मात्र आहे. देवाची उपासना कर! येशूच्या सत्याचे शिक्षण देणे हाच देवाच्या संदेशाचा आत्मा आहे.”
पांढऱ्या घोड्यावरचा स्वार
11 नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे “नाव विश्वासू आणि खरा” असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. 12 त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत. आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुगुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिले आहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. 13 त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला झगा घातला होता. त्या स्वाराचे नाव “देवाचा शब्द” असे आहे. 14 स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते. 15 त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील, आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील. 16 त्याच्या झग्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे:
राजांचा राजा आणि प्रभुंचा प्रभु
17 नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणत होता, “या! देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा! 18 म्हणजे राजे, सरदार आणि प्रसिद्ध माणासांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल. घोड्यांचे आणि त्यांच्यावर स्वार झालेल्यांचे, तसेच स्वतंत्र व गुलाम, लहान व थोर अशा सर्व लोकांचे मांस तुम्हांला खावयाला मिळेल.”
19 मग मी ते श्र्वापद आणि पृथ्वीवरील राजे आपापले सैन्य घेऊन जमा झालेले पाहिले. घोडेस्वारबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यासाठी ते जमा झाले होते. 20 त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणि त्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणि खोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले. 21 शिल्लक राहीलेले सैन्य, घोडेस्वाराच्या तोंडामधून निघालेल्या तरवारीने ठार मारण्यात आले. आणि साऱ्या पक्ष्यांनी त्या सैनिकांचे मांस पोटभर खाल्ले.
1 देवाचा संदेश. परमेश्वराकडून आलेला संदेश. हा संदेश देण्यासाठी देवाने मलाखीचा उपयोग केला.
देवाचे इस्राएलवर प्रेम आहे
2 परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.”
पण तुम्ही म्हणालात, “कशावरुन तू आमच्यावर प्रेम करतोस?”
परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर? पण मी याकोबला निवडले. [a] 3 आणि मी एसावचा स्वीकार केला नाही. [b] मी त्याच्या डोंगरीदेशांचा नाश केला. एसावच्या देशाचा नाश झाला. आता तिथे फक्त रानटी कुत्री [c] राहतात.”
4 अदोमचे लोक कदाचित् असे म्हणतील, “आमचा नाश झाला. पण आम्ही परत जाऊन आमची गावे वसवू.”
पण सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “जर त्यांनी त्यांची गावे पुन्हा वसाविली, तर मी पुन्हा त्यांचा नाश करीन.” लोक अदोमला दुष्टांना देश म्हणतात. लोक म्हणतात, की परमेश्वर कायम त्या देशाचा तिरस्कार करील.
5 तुम्ही हे पाहिले, म्हणूनच तुम्ही म्हणालात “देव महान आहे. अगदी इस्राएलच्या बाहेरसुध्दा तो महान आहे.”
लोक देवाला मान देत नाहीत
6 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मुले वडिलांना मान देतात. सेवक मालकांना मान देतात. मी तुमचा पिता आहे, मग तुम्ही माझा आदर का करीत नाही? मी तुमचा प्रभू आहे, मग मला तुम्ही मान का देत नाही? याजकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही.”
उलट तुम्ही म्हणता “आम्ही तुझ्या नावाचा मान राखत नाही, असे तुला वाटावे असे आम्ही काय केले आहे?”
7 परमेश्वर म्हणाला, “तुम्ही अशुध्द भाकरी माझ्या वेदीजवळ आणता.”
पण तुम्ही विचारता “ती कशामुळे ती भाकरी अशुध्द झाली?”
परमेश्वर म्हणाला, “माझ्या मेजाचा (वेदीचा) तुम्ही आदर करीत नाही. 8 यज्ञ करण्यासाठी तुम्ही अंधळी जनावरे आणता. हे चूक आहे. यज्ञबली म्हणून तुम्ही आजारी व पंगू जनावरे आणता हे बरोबर नाही. अशी आजारी जनावरे राज्यपालाला द्यायचा प्रयत्न करा. तो भेट म्हणून अशा रोगी जनावरांचा स्वीकार करील का? नाही तो त्यांचा स्वीकार करणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
9 “याजकांनो, देवाने आमच्यावर कृपा करावी, म्हणून तुम्ही देवाची आळवणी करावी. पण तो तुमचे ऐकणार नाही. आणि तो तुमचाच दोष असेल.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला.
10 “तुमच्यातील काही याजकांनी मंदिराची प्रवेशद्वारे बंद करुन योग्यरीतीने अग्नी प्रज्वलित करु शकतात पण मी त्यांच्यावर प्रसन्न नाही. मी त्यांच्या भेटी स्वीकारणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला,
11 “सर्वजगातील लोक माझ्या नावाचा मान राखतात. सर्व जगातील लोक मला उत्तम भेटी आणतात. भेट म्हणून उत्तम धूप माझ्यापुढे जाळतात. का? कारण त्या सर्व लोकांना माझ्या नावाचे महत्व वाटते.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
12 “पण तुम्ही लोक माझ्या नावाचा मान राखीत नाही असे दिसते. ‘परमेश्वराचा मेज (वेदी) अशुध्द आहे’ असे तुम्ही म्हणता. 13 आणि त्या वेदीवरचे अन्न तुम्हाला आवडत नाही तुम्ही त्याचा वास घेता आणि खाण्यास नकार देता. तुमच्या मते ते वाईट आहे. पण हे खरे नाही. मग तुम्ही आजारी, लंगडी अथवा (जबरदस्तीने) चोरुन आणलेली जनावरे माझ्यासाठी आणता. रोगी जनावरांना मला यज्ञबली म्हणून अर्पण करण्याचा प्रयत्न करता. पण मी त्यांचा स्वीकार करणार नाही. 14 काहीजणांजवळ चांगले नर जातीचे पशू आहेत. ते, ते पशू मला यज्ञबली म्हणून अर्पण करु शकतील पण ते तसे करीत नाहीत. काही लोक चांगली जनावरे आणतात. ती मला अर्पण करण्याचे वचनही देतात पण गुपचूप आजारी जनावरांबरोबर त्यांची आदलाबदल करतात, आणि मला रोगी जनावरे अर्पण करतात. अशा लोकांचे वाईट होईल. मी महान राजा आहे. तुम्ही मला मान द्यावा. सर्व जगातील लोक मला मानतात.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
येशूला अटक(A)
18 या गोष्टी बोलल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती, त्या बागेत तो व त्याचे शिष्य गेले.
2 आणि त्याला धरून शत्रूच्या हाती देणार यहूदा यालाही ही जागा ठाऊक होती. कारण येशू आपल्या शिष्यांबरोबर नेहमी तेथे येत असे. 3 तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी, परुशी यांना वाट दाखवीत यहूदा तेथे बागेत आला. ते मशाल, कंदील आणि हत्यारे घेऊन आले होते.
4 मग येशू आपल्या बाबतीत जे काही होणार हे सर्व जाणून पुढे जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्हांला कोण पाहिजे?”
5 “नासरेथचा येशू.” ते म्हणाले.
येशूने उत्तर दिल, “तो मी आहे” (आणि विश्वासघात करणारा यहूदा तेथे त्यांच्यामध्ये उभा होता) 6 जेव्हा येशू म्हणाला, “तो मी आहे,” ते मागे सरले आणि जमिनीवर पडले.
7 पुन्हा त्याने त्यांना विचारले, “तुम्हांला कोण पाहिजे?”
आणि ते म्हणाले, “नासरेथचा येशू.”
8 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगितले की तो मी आहे. जर तुम्ही मला शोधत असाल तर या लोकांना जाऊ द्या.” 9 हे यासाठी घडले की, जे शब्द बोलण्यात आले होते. ते सर्व पूर्ण व्हावेत, “जे तू मला दिलेस त्यांतील एकही मी गमावला नाही.”
10 मग शिमोन पेत्र, ज्याच्याकडे तलवार होती, त्याने ती बाहेर काढली व मुख्य याजकाच्या सेवकाचा कान कापला (सेवकाचे नाव मल्ख होते) 11 येशूने पेत्राला आज्ञा केली, “तुझी तलवार तिच्या जागेवर ठेव! पित्याने दिलेला प्याला मी पिऊ नये काय?”
येशूला हन्नाकडे आणतात(B)
12 मग शिपायांची तुकडी व त्यांचा सरदार आणि यहूदी रक्षक यांनी येशूला अटक केली. त्याला त्यांनी बांधले आणि 13 त्याला प्रथम हन्नाकडे आणले. तो कयफा या प्रमुख याजकाचा सासरा होता. कयफा त्या वर्षीचा प्रमुख याजक होता. 14 आणि कयफा हाच असे म्हणणारा होता की सर्व माणसांसाठी एका माणसाने मरणे बरे.
येशूला ओळखण्याविषयी पेत्र खोटे बोलतो(C)
15 शिमोन पेत्र व दुसरा शिष्य येशूच्या मागून चालले. कारण हा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता, म्हणून तो येशूच्या बरोबर प्रमुख याजकाच्या वाड्यात आत गेला. 16 परंतु पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला. म्हणून जो दुसरा शिष्य प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन तेथे कामावर असणाऱ्या मुलीला सांगून पेत्राला आत आणले. 17 ती मुलगी पेत्राला म्हणाली, “तुही त्या मनुष्याच्या शिष्यांपैकी आहेस काय?”
पेत्राने उत्तर दिले, “मी नाही.”
18 थंडी असल्याने नोकरांनी व रक्षकांनी स्वतःला गरम राखण्यासाठी शेकोटी पेटविली होती व ते शेकत उभे राहिले होते. पेत्रही त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला होता.
मुख्य याजकाकडून येशूची चौकशी(D)
19 तेव्हा प्रमुख याजकाने येशूला त्याच्या शिष्यांविषयी व त्याच्या शिकवणुकीविषयी विचारले, 20 येशूने त्याला उत्तर दिले की, “मी उघडपणे जगाशी बोललो, सभास्थानात व मंदिरात जेथे सर्व यहूदी एकत्र जमतात तेथे मी नेहमी शिकविले आणि मी गुप्त असे काहीच बोललो नाही. 21 मला तू का विचारतोस? ज्यांनी माझी शिकवण ऐकली, त्यांना विचार, मी काय बोललो ते त्यांना माहीत आहे.”
22 येशूने असे म्हटले तेव्हा तेथे उभे असलेल्या रक्षकाने येशूला चपराक मारली. रक्षक म्हणाला, “तू प्रमुख याजकाला असे उत्तर देतोस काय?”
23 येशूने त्याला उत्तर दिले, “जर मी वाईट बोललो असेन तर तसे सांग की मी चुकीचे बोललो पण जर चांगले बोललो असलो तर तू मला का मारतोस?”
24 हन्नाने त्याला बांधलेलेच मुख्य याजक कयफाकडे पाठविले.
पेत्र पुन्हा खोटे बोलतो(E)
25 शिमोन पेत्र शेकत असता, त्याला विचारले गेले, “तू त्याच्या शिष्यांपैकी एक नाहीस ना?”
त्याने ते नाकारले, “मी नाही.”
26 मुख्य याजकाच्या नोकरांपैकी एकजण ज्याचा कान पेत्राने कापला होता त्याचा नातेवाईक होता. तो म्हणाला, “मी तुला त्याच्याबरोब बागेत पाहिले नाही काय?”
27 पेत्राने पुन्हा ते नाकारले, आणि त्या क्षणी कोंबडा आरवला.
येशूला पिलातासमोर आणतात(F)
28 नंतर यहूदी येशूला कयफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले. तेव्हा पहाट झाली होती. आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाहीत. 29 म्हणून पिलात त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही या माणसावर कोणता आरोप करीत आहात?”
30 तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देऊन म्हटले, “हा जर दुष्कर्मी नसता तर आम्ही याला तुमच्या स्वाधीन केले नसते.”
31 मग पिलाताने त्यांना म्हटले, “तुम्ही याला घेऊन आपल्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.”
यहूदी म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” 32 आपल्याला कसले मरण येणार हे सुचवून येशू जे वचन बोलला होता ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
33 मग पिलात पुन्हा राजवाड्यात गेला. येशूला बोलावले आणि विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
34 येशूने विचारले, “तू हे स्वतःहून विचारतोस की, दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले.”
35 पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझे लोक आणि तुझ्या मुख्य याजकांनी तुला माझ्या हाती दिले, तू काय केले आहेस?”
36 येशू म्हणाला, “माझे राज्य या जगाचे नाही, जर ते असते तर यहूद्यांपासून माझी सुटका करण्यासाठी माझे सेवक लढले नसते का? पण माझे राज्य दुसऱ्या ठिकाणचे आहे.”
37 पिलात म्हणाला, “तर तू एक राजा आहेस!”
येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे तू म्हणतोस तेव्हा बरोबर म्हणतोस. खरे पाहता, या कारणासाठी मी जन्मलो आणि सत्याविषयी साक्ष देण्यासाठी मी या जगात आलो. जे सर्व सत्याच्या बाजूचे आहेत ते माझे ऐकतात.”
38 पिलताने विचारले, “सत्य काय आहे?” असे म्हणून तो पुन्हा यहूद्यांकडे गेला. आणि म्हणाला, “मला याच्यात काहीच अपराध सापडत नाही. 39 पण वल्हांडण सणात मी तुम्हांसाठी एकाला सोडावे अशी तुमच्यामध्ये रीत आहे. म्हणून मी तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
40 ते ओरडले, “नको, त्याला नको! आम्हांला बरब्बाला सोडा!” बरब्बा एक दरोडेखोर होता.
2006 by World Bible Translation Center