Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 30

हिज्कीया वल्हांडणाचा सण साजरा करतो

30 हिज्कीयाने इस्राएल आणि यहूदामधील सर्व लाकांना निरोप पाठवले: तसेच एफ्राइम आणि मनश्शेच्या लोकांना पत्रे लिहिली. इस्राएलचा परमेश्वर देव याच्याप्रीत्यर्थ वल्हांडणाचा सण साजरा करायला यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरात यावे असे त्याने त्या निरोप पत्रांद्वारे कळवले. यरुशलेममधील मंडळी आणि सर्व सरदार यांच्याशी विचार विनिमय करुन राजा हिज्कीयाने वल्हांडणाचा सण दुसऱ्या महिन्यात साजरा करायचे ठरवले. सणासाठी पुरेशा याजकांचे पवित्रीकरण झाले नव्हते तसेच यरुशलेममध्ये सगळे लोक जमले नव्हते म्हणून नेहमीच्या वेळेला हा सण साजरा करता येणे शक्य नव्हते. तेव्हा राजासकट सर्व मंडळींना ही गोष्ट पसंत पडली. बैर-शेबा पासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली. वल्हांडणासाठी यरुशलेमला यायला सर्व लोकांना आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता. त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्राएल आणि यहूदाभर फिरवला. त्याचा मसुदा असा होता:

“इस्राएल लोक हो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल (याकोब) यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा. म्हणजे अश्शूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरुप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील. आपले वडील किंवा भाऊबंद यांचे अनुकरण करु नका. परमेश्वर त्यांचा देव होता, पण त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. तेव्हा त्यांच्याविषयी परमेश्वराने इतरांच्या मनात घृणा निर्माण केली व त्यांना निंदेला प्रवृत्त केले. त्यामुळे झालेली दुर्दशा तुम्ही पाहिली आहेच. आपल्या पूर्वजांसारखे ताठर बनू नका. मनोभावे परमेश्वराला शरण जा मंदिराच्या पवित्र गाभाऱ्याकडे या. परमेश्वराने ते पवित्रस्थान कायमचे पवित्र केले आहे. परमेश्वर देवाची सेवा करा. तरच परमेश्वराचा तुमच्यावर भडकलेला कोप शांत होईल. तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करुन नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.”

10 एफ्राइम आणि मनश्शेच्या प्रदेशात निरोप्ये गावोगाव फिरले. ते पार जबुलून पर्यंत गेले. पण लोकांनी मात्र उपहासाने वागून त्यांची हेटाळणी केली. 11 आशेर, मनश्शे आणि जबुलून मधल्या काहींनी मात्र असे न करता विनम्रतेने यरुशलेमला प्रयाण केले. 12 पुढे परमेश्वराच्या कृपेनेच असे घडून आले की राजा हिज्कीया आणि त्याचे सरदार यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला यहूदाचे लोक तयार झाले. अशा रितीने त्यांनी देवाचा शब्द पाळला.

13 दुसऱ्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण साजरा करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने यरुशलेममध्ये जमले. तो एक विशाल समुदाय होता. 14 यरुशलेममधल्या खोट्या नाट्या दैवतांसाठी उभारलेल्या वेद्या तसेच धूप जाळायच्या वेद्या या लोकांनी उखडून टाकल्या आणि किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकून दिल्या. 15 दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी त्यांनी वल्हांडणाच्या यज्ञपशूचा बळी दिला. याजक आणि लेवी यांनी तेव्हा लज्जित होऊन स्वतःला पवित्र केले आणि होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले. 16 देवाचा माणूस मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ते आपापल्या जागी स्थानापन्न झाले. याजकांनी लेवींच्या हातून रक्त घेऊन ते वेदीवर शिंपडले. 17 येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वतःचे शुध्दीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुध्दीकरण केले.

18-19 एफ्राइम, मनश्शे, इस्साकार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वतःचे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांना मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुध्दीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्र स्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी शुचिर्भूत झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.” 20 राजा हिज्कीयाने केलेली प्रार्थना परमेश्वराने ऐकली आणि लोकांना क्षमा केली. 21 इस्राएलच्या प्रजेने यरुशलेममध्ये बेखमीर भाकरीचा उत्सव सात दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मनःपूर्वक परमेश्वराची स्तुतिस्त्रोत्रे गाईली. 22 परमेश्वराची सेवा कशी करावी याचे उत्तम ज्ञान असलेल्या लेवींना राजा हिज्कीया उत्तेजन देत होता. सणाचे सात दिवस आनंदात घालवत लोकांनी शांतिअर्पणे वाहिली आणि आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाला धन्यवाद दिले.

23 वल्हांडणाचा सण आणखी सात साजरा करावा असे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे आणखी सात दिवस त्यांनी या सणाप्रीत्यर्थ आनंदात घालवले. 24 हिज्कियाने 1,000 बैल आणि 7,000 मेंढरे व पुढाऱ्यांनी 1,000 बैल व 10,000 मेंढरे मारुन खाण्यासाठी या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना शुचिर्भूत व्हावे लागले. 25 यहूदातील सर्व लोक, याजकवर्ग, लेवी, इस्राएलमधील समुदाय तसेच इस्राएलमधून यहूदात आलेले विदेशी प्रवासी हे सर्वजण अतिशय खुशीत होते. 26 यरुशलेममध्ये आनंदीआनंद पसरला होता. इस्राएलचा राजा दावीद याचा मुलगा शलमोन याच्या कारकिर्दीनंतर आजतागायत असा आनंदाचा प्रसंग कधी घडलाच नव्हता. 27 याजक व लेवी यांनी उठून लोकांना आशीर्वाद देण्याची परमेश्वराला प्रार्थना केली. परमेश्वराने त्यांचे ऐकले. त्यांची प्रार्थना स्वर्गातील आपल्या पवित्र स्थानी परमेश्वराला ऐकू गेली.

प्रकटीकरण 16

16 मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्या ओता.”

पहिला देवदूत गेला आणि त्याने जमिनीवर त्याची वाटी ओतली. तेव्हा सर्व लोकांना ज्यांच्यावर श्र्वापदाचे चिन्ह होते आणि जे त्याच्या मूर्तीची पूजा करीत होते त्यांना अतिशय कुरुप आणि वेदना देणारे फोड आले.

दुसऱ्या देवदूताने त्याची वाटी समुद्रावर ओतली. मग समुद्र रक्तासारखा, मेलेल्या माणसाच्या रक्तासारखा झाला. समुद्रातील प्रत्येक जीवधारी प्राणी मेले,

तिसऱ्या देवदूताने त्याची वाटी नद्या व झऱ्यांवर ओतली. तेव्हा नद्या व झरे रक्तमय झाले. मग मी पाण्याच्या देवदूताला हे बोलताना ऐकले:

“केवळ तूच एक आहेस,
    जो तू आहेस आणि जो तू होतास.
    तू पवित्र आहेस. जे न्याय तू दिलेस ते योग्य दिलेस.
लोकांनी तुझ्या पवित्र लोकांचे रक्त सांडले.
    तुझ्या संदेष्ट्यांचे रक्त सांडले आता
तू त्या लोकांना रक्त प्यावयास दिले आहेस.
    कारण ते याच पात्रतेचे आहेत.”

त्यानंतर मी वेदीला असे बोलताना ऐकले की,

“होय, प्रभु देवा सर्वसमर्था,
    तुझा न्याय खरा आणि योग्य आहे.”

चौथ्या देवदूताने त्याची वाटी सूर्यावर ओतली. सूर्याला लोकांना अग्नीने जाळून टाकण्याची शक्ती दिली होती. भयंकर अशा उष्णतेमुळे लोक जळाले. त्या लोकांनी देवाच्या नावाला शिव्याशाप दिले की ज्याला या संकटांवर ताबा आहे. पण लोकांनी पश्चात्ताप करण्याचे नाकारले व देवाचे गौरव करण्याचे नाकारले.

10 पाचव्या देवदूताने त्याची वाटी श्र्वापदाच्या सिंहासनावर ओतली. आणि प्राण्याच्या राज्यावर अंधार पसरला. दु:खामुळे लोक त्यांच्या जिभा चावत होते. 11 लोकांनी स्वर्गाच्या देवाला शाप दिले. कारण त्यांना वेदना होत होत्या व फोड आले होते. पण लोकांनी आपल्या पापकृत्यांपासून पश्चात्ताप करण्याचे नाकारले.

12 सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठी रस्ता तयार झाला. 13 तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेर आले. श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले. 14 हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मे आहेत. ते चमत्कार करतात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशी लढाईसाठी एकत्र जमवतात.

15 “पाहा, जसा चोर येतो तसा मी येईन. तेव्हा लोकांसमोर आपली लज्जा दिसू नये म्हणून जो जागा राहील, आणि आपले कपडे तयार ठेवतो तो धन्य.”

16 मग दुष्ट आत्म्यांनी हर्मगिदोन [a] नावाच्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.

17 मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला, “हे पूर्ण झाले आहे.” 18 मग विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट व फार प्रचंड भूकंप झाला. लोक पृथ्वीवर असल्यापासून असला प्रचंड भूकंप कधी झालाच नव्हता. 19 महान शहर तीन विभागात विभागले गेले. राष्ट्रांतील शहरे नष्ट झाली. आणि देव महान बाबेलला विसरला नव्हता. त्याने त्यांच्या भयंकर रागाच्या द्राक्षारसाचा पेला बाबेलला दिला. 20 प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले. 21 लोकांवर आकाशातून गारांचा वर्षाव झाला. या प्रत्येक गारा 100 पौंड [b] वजनाच्या होत्या, या गारांच्या संकटामुळे लोकांनी पश्चात्ताप करण्याऐवजी देवाला शाप दिले कारण ही पीडा खरोखरच महाभयंकर होती.

जखऱ्या 12:1-13

यहूदाच्या सभोवतालच्या राष्ट्रांविषयी दृष्टांन्त

12 इस्राएलबद्दल परमेश्वराचा शोकसंदेश. परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. माणसात आत्मा घातला. त्याने पुढील गोष्टी सांगितल्या: “पाहा! मी यरुशलेमला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांचा विषाचा प्याला बनवीन. ती राष्ट्रे त्या नगरीवर चढाई करुन येतील. आणि सर्वच्या सर्व यहूदाला वेढा पडेल. पण मी यरुशलेमला प्रचडं खडकाप्रमाणे करीन-जो तिचा कब्जा घ्यायचा प्रयत्न करील, तो स्वतःच जखमी होईल. त्या लोकांना जखमा होतील आणि ओरखडे उठतील. पण जगातील सर्व राष्ट्रे यरुशलेमच्या विरुध्द लढण्यासाठी एकत्र येतील. पण, त्यावेळी, मी घोड्याला विथरवीन. त्यामुळे घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी शत्रूच्या घोड्यांना अंधळे करीन. माझे डोळे मात्र उघडे असतील. आणि माझी नजर यहूद्यांच्या लोकांवर असेल. यहूदाचे नेते लोकांना प्रोत्साहन देतील. ते म्हणतील, ‘सर्व शक्तिमान परमेश्वर तुमचा देव आहे. तो आपल्याला बळ देतो.’ त्यावेळी मी यहूद्यांच्या नेत्यांना वणव्याप्रमाणे बनवीन. वणव्यात गवताची काडी जशी भस्मसात होते, तसे ते त्यांच्या शत्रूंचा नाश करतील. त्यांच्या सभोवतीच्या सर्व शत्रूंचा ते नाश करतील. यरुशलेमवासी काळजीमुक्त होतील व आराम करतील.”

परमेश्वर, प्रथम, यहूदाच्या लोकांना वाचवील म्हणजे युरशलेममधील लोकांना फारशा बढाया मारता येणार नाहीत. यहूदातील इतर लोकांपेक्षा आम्ही फार बरे अशा बढाया दावीदच्या घराण्यातील लोकांना आणि यरुशलेममधील अन्य लोकांना मारता येणार नाहीत. पण परमेश्वर यरुशलेमच्या लोकांना वाचवील. सर्वात जास्त दुर्बल माणूससुध्दा दावीदासारखा वीर बनेल. आणि दावीदाच्या घराण्यातील पुरुष देवतांप्रमाणे होतील. परमेश्वराच्या स्वतःच्या दूताप्रमाणे ते लोकांचे नेतृत्व करतील.

परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, यरुशलेमशी युध्द करण्यास आलेल्या राष्ट्रांना नाश करण्याचा मी प्रयत्न करीन. 10 मी दावीदाच्या घराण्यात आणि यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांत करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ला टोचले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल. 11 त्यावेळी यरुशलेममध्ये भंयकर शोककळा पसरेल आणि आक्रोश होईल. तो आक्रोश, मगिद्दोनच्या दरीत हदाद्रिम्मोनाच्या मृत्यूसमची झालेल्या आक्रोशासारखा असेल. 12 प्रत्येक कुटुंब आपापले दु:ख व्यक्त करील. दावीदाच्या कुळातील पुरुष, बायका दु:ख करतील. नाथानाचे घराणेही दु:ख करील. त्यांच्या बायकाही दु:ख करतील. 13 लेवी घराण्यातील पुरुष व बायका आपापसात शोक करतील. शिमी घराण्यातील पुरुष व बायका आपापसात शोक करतील. 14 आणि इतर कुळांतही असेच घडेल. पुरुष व स्त्रिया स्वतंत्रपणे शोक करतील.”

13 त्यावेळी दावीदाच्या वंशासाठी आणि यरुशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पाण्याचा नवा झरा फुटेल. त्याचा उपयोग लोकांची पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी होईल.

योहान 15

येशू द्राक्षवेल आहे

15 मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. जे वचन मी तुम्हांला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यावचून त्याच्याने फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांला फळ देता येणार नाही.

“मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे ते तुम्ही मागा म्हणजे ते तुम्हांस मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते, आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.

“जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. 10 ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतित राहतो तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. 11 माझा आनंद तुम्हांमध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा, म्हणून मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. 12 जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीति करा. ही माझी आज्ञा आहे. 13 आपल्या मित्रासाठी मरावे, यापेक्षा कोणाचीही प्रीति मोठी नाही. 14 मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात. 15 आता मी तुम्हांला सेवक म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे सेवकाला माहीत नसते, पण मी तुम्हांला मित्र म्हणतो कारण ज्या गोष्टी मी आपल्या पित्याकडून ऐकल्या त्या सर्व तुम्हांला कळविल्या आहेत.

16 “तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले आणि नेमले आहे. यासाठी की, तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि तुमचे फळ टिकावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांस द्यावे 17 तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हांस आज्ञा देऊन सांगतो.

येशू त्याच्या अनुयायांना सूचना देतो

18 “जर जग तुमचा द्वेष करते, तर लक्षात ठेवा की, पहिल्यांदा जगाने माझासुध्दा द्वेष केलेला आहे. 19 तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर, जशी ते स्वतःवर करतात तशी प्रीति केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने, आणि तुमची जगातून निवड केल्याने, जग तुमचा द्वेष करते.

20 “जे शब्द तुम्हांला सांगितले ते लक्षात ठेवा. कोणताही नोकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. त्यांनी जर माझी छळणूक केली तर ते तुमचीही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमचीसुद्या पाळतील. 21 माझ्या नावामुळे ते तुमच्याशी अशाप्रकारे वागतील, कारण ज्याने मला पाठविले, त्याला ते ओळखत नाहीत. 22 जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापाबद्धल दोषी ठरले नसते. आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही.

23 “जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24 मी त्या लोकांमध्ये अशा गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या कोणीही केल्या नाहीत. मी जर त्या गोष्टी केल्या नसत्या, तर पापाबद्धल ते दोषी ठरले नसते, पण आता त्यांनी ते चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही त्यांनी माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला. 25 परंतु नियमशास्त्रात लिहिलेले पूर्ण व्हावे म्हणून हे घडले: ‘कारण नसताना त्यांनी माझा द्वेष केला.’ [a]

26 “पित्यापासून मी साहाय्यकर्ता पाठवीन, साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तो पित्यापासून येतो. जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो. 27 आणि तुम्हीसुद्या माझ्याविषयी लोकांना सांगाल. कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center