Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 29

यहूदाचा राजा हिज्कीया

29 हिज्कीया वयाच्या पंचविसाव्या वर्षी राजा झाला. त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबीया. ती जखऱ्याची मुलगी. हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.

हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करुन ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले. 4-5 सर्व याजक आणि लेवी यांना त्याने एकत्र बोलावले आणि मंदिराच्या पूर्वेकडील मोकळ्या चौकात त्यांची सभा घेतली. हिज्कीया त्यांना म्हणाला, “लेवी हो, ऐका, देवाच्या सेवेसाठी शुचिर्भूत व्हा. या पवित्र कार्यासाठी परमेश्वर देवाच्या मंदिराची सिध्दता करा. परमेश्वर हा आपल्या पूर्वजांनी मानलेला देव आहे. ज्या वस्तूं इथल्या नाहीत त्या इथून काढून टाका. त्या वस्तू म्हणजे घाण असून त्या हे पवित्र मंदिर भ्रष्ट करतात. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराची संगत सोडली आणि त्याच्या मंदिराकडे पाठ फिरवली. त्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार बंद केले आणि दिवे विझू दिले. इस्राएलच्या परमेश्वराच्या पवित्र गाभाऱ्यात परमेश्वरासाठी धूप जाळणे, होमार्पणे करणे बंद पडले. म्हणून यहूदा यरुशलेमच्या लोकांवर परमेश्वर कोपला. त्याने लोकांना शासन केले. परमेश्वराचा क्रोध पाहून इतर लोक विस्मयचकित झाले आणि घाबरले. यहूदी लोकांबद्दल त्यांना तिरस्कार आणि शरम वाटली. ही वस्तुस्थिती तुम्हांला माहीत आहे. तुम्ही ती पाहतच आहात. म्हणूनच युध्दात आपले पूर्वज मारले गेले. आपली बायका पोरे कैदी झाली. 10 म्हणून मी, हा हिज्कीया, इस्राएलच्या परमेश्वर देवाशी करार करणार आहे. म्हणजे आपल्यावर त्याचा राग राहणार नाही. 11 तेव्हा मुलांनो, आता, आळसात वेळ घालवू नका. परमेश्वराने त्याच्या सेवेसाठी तुमची निवड केली आहे. मंदिरात त्याची सेवाचाकरी करणे, धूप जाळणे यासाठी तुम्हाला त्याने निवडले आहे.”

12-14 तेव्हा जे लेवी कामाला लागले ते पुढीलप्रमाणे:

कहाथ घराण्यातले अमासयचा मुलगा महथ आणि अजऱ्याचा मुलगा योएल.

मरारी कुळातला अब्दीचा मुलगा कीश आणि यहल्लेलेलाचा मुलगा अजऱ्या.

गर्षोनी कुळातला जिम्माचा मुलगा यवाह आणि यवाहचा मुलगा एदेन,

अलीसाफानच्या घराण्यातील शिम्री आणि ईएल

आसाफच्या घराण्यातील जखऱ्या व मत्तन्या.

हेमानच्या कुळातील यहीएल आणि शिमी,

येदुथूनच्या कुळातील शमया आणि उज्जियेल.

15 मग या लेवींनी आपल्या भाऊबंदांसह एकत्र येऊन मंदिराच्या शुध्दतेसाठी सर्व तयारी केली. परमेश्वराने राजामार्फत केलेली आज्ञा त्यांनी पाळली. मंदिराच्या स्वच्छतेसाठी ते आत शिरले. 16 परमेश्वराच्या मंदिरात जेवढ्या अशुध्द आणि तिथल्या वातावरणाशी विसंगत वस्तू त्यांना सापडल्या त्या सगळ्या गोळा करुन त्यांनी मंदिराच्या अंगणात आणून ठेवल्या. तिथून त्या उचलून त्यांनी किद्रोन खोऱ्यात नेऊन टाकल्या. 17 पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेला लेवींनी पवित्रीकरणाच्या कामाला सुरुवात केली. आठव्या दिवशी ते परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आले. परमेश्वराच्या मंदिराची सर्व तऱ्हेची शुध्दता होऊन ते पवित्र व्हायला आणखी आठ दिवस लागले. पहिल्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी त्यांचे काम पूर्ण झाले.

18 त्यानंतर ते राजा हिज्कीया याच्याकडे गेले. राजाला ते म्हणाले, “परमेश्वराचे मंदिर, होमार्पणाची वेदी आणि ती वरील सर्व भांडी आम्ही शुध्द केल्या आहेत. समर्पित भाकरीचे मेज आणि त्याची सर्व उपकरणेही शुध्द केली आहेत. 19 राजा आहाजने आपल्या कारकिर्दीत गैरवर्तनातून जी उपकरणे फेकून दिली होती त्यांचीही शुध्दी करुन आम्ही ती मांडली आहेत. ती आता देवाच्या वेदीसमोरच आहेत.”

20 दुसऱ्या दिवशी सकाळी, नगरातील सर्व सरदारांना बरोबर घेऊन राजा हिज्कीया परमेश्वराच्या मंदिरात गेला. 21 त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्र स्थान आणि यहूदीलोक यांच्या शुध्दीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली. 22 त्याप्रमाणे याजकांनी बैल कापले आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग मेंढे कापून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. मग त्यांनी कोकरे कापली आणि त्यांचे रक्त वेदीवर शिंपडले. 23-24 यानंतर याजकांनी राजा व समुदाय यांच्यापुढे बोकडांना आणले. हे बोकड पापार्पणासाठी होते. याजकांनी बोकडांवर हात ठेवून त्यांना मारले. बोकडांचे रक्त वेदीवर शिंपडून याजकांनी पापार्पण केले. परमेश्वराने इस्राएल लोकांना क्षमा करावी म्हणून हे विधी याजकांनी केले. समस्त इस्राएल लोकांसाठी होमार्पण आणि पापार्पण करावे अशी राजाची आज्ञा होती.

25 दावीद, राजाचा द्रष्टा गाद आणि संदेष्टा नाथान यांच्या आज्ञेबरहुकूम राजा हिज्कीयाने झांजा, सतारी व वीणा वाजवण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात लेवींची नेमणूक केली. परमेश्वराने संदेष्ट्यांमार्फत तशी आज्ञा केली होती. 26 त्या प्रमाणे दावीदाची वाद्ये घेऊन लेवी आणि कर्णे घेऊन याजक उभे राहिले 27 मग हिज्कीयाने वेदीवर होमार्पण करण्याची आज्ञाकेली. त्याला सुरुवात होताच परमेश्वराचे भजन स्तवनही सुरु झाले. कर्णे आणि इस्राएलचा राजा दावीद याची वाद्ये यांचा गजर सुरु झाला. 28 होमार्पण चालू असेपर्यंत समुदाय अभिवादन करत होता. गायक गात होते आणि कर्णे वाजवणे चालू होते.

29 होमार्पणाचे विधी झाल्यावर राजा हिज्कीयासकट सर्व लोकांनी मस्तके लववून परमेश्वराची आराधना केली. 30 हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यानी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदित झाले. सर्वांनी लवून नमस्कार करुन देवाची आराधना केली. 31 हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वतःला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी होमार्पणेही आणली. 32 मंदिरात एकंदर होमार्पणे आणली गेली त्याची मोजदाद पुढीलप्रमाणे: सत्तर बैल, शंभर मेंढे, दोनशे कोकरे. त्यांचे परमेश्वराला होमार्पण करण्यात आले. 33 सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वराला वाहिलेले पशू. 34 होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. या पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते. 35 होमबली पुष्कळ होते. शांतिअर्पणांच्या पशूंची चरबी आणि पेयार्पणेही विपुल होती. 36 परमेश्वराने आपल्या प्रजेसाठी हे जे सर्व घडवून आणले त्यामुळे हिज्कीया आणि सगळे लोक आनंदित झाले. हे सर्व इतक्या जलद घडून आले म्हणून त्यांना विशेषच आनंद झाला.

प्रकटीकरण 15

शेवटच्या पीडेसह देवदूत

15 मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडा आणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.

मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती. त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गाईले:

“प्रभु देवा, सर्वसमर्था तू महान
    आणि अदभुत गोष्टी करतोस.
राष्ट्रांच्या राजा,
    तुझे मार्ग योग्य व खरे आहेत
हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील
    सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील.
    फक्त तूच पवित्र आहेस
सर्व लोक येऊन तुझी उपासना करतील
    कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”

त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर (साक्षीचा मंडप) [a] पाहिले. मंदिर उघडे होते. आणि सात पीडा आणणारे सात देवदूत मंदिराबाहेर आले. त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते. त्यानी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पटृ्या बांधल्या होत्या. मग सात देवदूतांना चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने सात सोनेरी वाट्या दिल्या जो देव अनंतकाळपर्यंत राहतो त्याच्या रागाने त्या वाट्या भरल्या. आणि देवाच्या तेजामधून व पराक्रमामधून निघालेल्या धुराने मंदिर भरले. आणि कोणीही सात देवदूतांच्या सात पीडा पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश करु शकले नाही. देवाच्या रागाने वाट्या भरल्या

देवाच्या क्रोधाने भरलेल्या सात वाट्या

जखऱ्या 11

यहूदाच्या आसापासच्या राष्ट्रांना देव शिक्षा करील

11 लबानोन, तू आपली दारे उघड म्हणजे
    अग्नी आत शिरुन तुझे गंधसरु जाळून टाकील.
गंधसरु उन्मळून पडले म्हणून देवदार आक्रोश करतील.
    ते प्रचंड वृक्ष दुसरीकडे नेले जातील.
जंगलतोड पाहून बाशानचे
    अल्लोन वृक्ष आकांत करतील.
रडणाऱ्या मेंढपाळांचा आक्रोश ऐका.
    त्यांच्या बलवान पुढाऱ्यांना दूर नेले गेले.
तरुण सिंहाच्या गर्जना ऐका.
    यार्देन नदीकाठची दाट झुडुपे काढून नेली.

परमेश्वर, माझा देव, म्हणतो, “मारण्यासाठी वाढविलेल्या मेंढ्यांची काळजी घ्या. त्याचे पुढारी मालकांसारखे व व्यापाऱ्यांसारखे आहेत. मालकांनी मेंढ्या मारल्या. तरी त्यांना शिक्षा होत नाही. व्यापारी मेंढ्या विकतात आणि म्हणतात, ‘परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. मी श्रीमंत झालो.’ मेंढपाळांना मेंढ्यांबद्दल वाईट वाटत नाही. मला या देशात राहणाऱ्या लोकांबद्दल दु:ख होत नाही.” परमेश्वर असे म्हणाला, “पाहा! मी प्रत्येकाचा शेजाऱ्याकडून व राजाकडून छळ मांडीन आणि अशारीतीने त्यांच्या देशाचा नाश करवीन-मी त्यांना अडविणार नाही.”

म्हणून मी त्या बळी देण्यासाठी पोसलेल्या मेंढ्यांची काळजी घेतली. गरीब बिचाऱ्या मेंढ्या! मला दोन काठ्या मिळाल्या. एका काठीला मी नाव दिले कृपा व दुसरीला ऐक्य मग मी मेंढ्यांची निगा राखण्यास सुरवात केली. एका महिन्यात मी तीन मेंढपाळांना कामावरुन काढून टाकले. मला मेंढ्यांचा राग आला व त्या माझा तिरस्कार करु लागल्या. मग मी त्यांना म्हणालो, “मी जातो मी तुमचा सांभाळ करणार नाही. ज्यांना मरायचे आहे, त्यांना मी मरु देईन. ज्यांना नाश पावायचे आहे, त्यांचा नाश होऊ देईन यातून उरलेल्या एकमेकींचा नाश करतील.” 10 मग मी कृपा नावाची काठी उचलली आणि मोडली. लोकांचा देवाशी झालेला करार मोडल्याचे मी यावरुन सूचित केले. 11 म्हणून त्या दिवसापासून करार संपुष्टात आला आणि माझ्याकडे निरखून पाहणाऱ्या त्या गरीब मेंढ्यांची खात्री पटली की हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.

12 मग मी म्हणालो, “तुमची इच्छा असल्यास माझा पगार द्या. इच्छा नसल्यास देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी दिली. 13 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “त्यांच्यालेखी माझी किंमत एवढी आहे. एवढी मोठी रक्कम [a] तू मंदिराच्या खजिन्यात फेकून दे.” मग मी तीस चांदीची नाणी परमेश्वराच्या मंदिराच्या पैशाच्या पेटीत टाकली. 14 मग मी ऐक्य नावाच्या काठीचे दोन तुकडे केले. यहूदा आणि इस्राएल यांच्यामधील ऐक्य संपल्याचे दाखविण्यासाठी मी असे केले.

15 मग परमेश्वर मला म्हणाला, “आता, मेंढ्या वळविण्यासाठी मूर्ख मेंढपाळ कदाचित वापरतील अशा वस्तू शोधून काढ. 16 ह्याचा अर्थ मी ह्या देशासाठी नवीन मेंढपाळ निवडीन असा होईल. पण ह्या तरुण माणसाला हरवलेल्या मेंढ्यांची काळजी घेणे जमणार नाही. त्याला जखमी मेंढ्यांचा औषघोपचार करुन त्यांच्या जखमा भरुन काढणे जमणार नाही. ज्या मेंढ्या वाचल्यात त्यांचा चारापाणी तो करु शकणार नाही. सशक्त मेंढ्या संपूर्ण खाल्ल्या जातील. फक्त त्यांचे खूर शिल्लक राहतील.”

17 हे माझ्या कुचकामी मेंढपाळा,
    तू माझ्या मेंढ्यांना टाकून गेलास!
त्याला शिक्षा करा!
    त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवारीने वार करा.
    म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होईल
    आणि तो उजव्या डोळ्याने अंधळा होईल.

योहान 14

येशू शिष्यांचे समाधान करतो

14 “तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हांला सांगितले असते. कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन, आणि तुम्हांला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हांला ठाऊक आहे.”

थोमा येशूला म्हणाला, “प्रभु, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हांला ठाऊक नाही. मग आम्हांला मार्ग कसा ठाऊक असणार?”

येशूने उत्तर दिले, “मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते, आणि आतापासून तुम्ही त्याला ओळखता व त्याला पाहिले आहे.”

फिलिप्प येशूला म्हणाला, “प्रभु, आम्हांला पिता दाखवा, एकढेच आमचे मागणे आहे.”

येशूने त्याला म्हटले, “फिलिप्पा, मी इतका वेळ तुमच्याजवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहे, तर मग ‘आम्हांला पिता दाखव’ असे तू कसे म्हणतोस? 10 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. 11 मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे असा विश्वास धरा. नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा.

12 “मी तुम्हांला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील. कारण मी पित्याकडे जातो. 13 आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने माझ्याजवळ मागाल ते मी करीन यासाठी की, पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे. 14 जर तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन.

पवित्र आत्म्याचे अभिवचन

15 “जर तुम्ही माझ्यावर प्रीति करित असाल, तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल. 16 आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हांला दुसरा साहाय्यकर्ता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्वकाळ राहावे. 17 साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. जग त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही. पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो, तो तुमच्यामध्ये वास करील.

18 “मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. 19 आणखी काही वेळाने जग मला पाहणार नाही. परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. 20 त्या दिवशी तुम्हांला जाणीव होईल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात मी तुमच्यामध्ये आहे. 21 ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो, तो असा आहे की जो माझ्यावर प्रीति करतो, त्याच्यावर पिता प्रीति करील. मीसुद्धा त्याच्यावर प्रीति करीन आणि स्वतःला त्याच्यासाठी प्रगट करीन.”

22 मग यहूदा (यहूदा इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “पण प्रभु, तू आम्हांसमोर स्वतःला का प्रगट करणार आहेस आणि जगासमोर का नाही?”

23 येशूने उत्तर दिले, “जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू. 24 जो माझ्यावर प्रीति करीत नाही, तो माझी शिकवण पाळणार नाही. हे शब्द जे तुम्ही ऐकता ते माझे नाहीत. ज्या पित्याने मला पाठविले त्याचे हे शब्द आहेत.”

25 “मी तुम्हांजवळ राहत असतानाच तुम्हांस या गोष्टी सांगितल्या आहेत. 26 तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो साहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांस सर्व शिकवील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हांस सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.

27 “शांति मी तुमच्याजवळ ठेवतो, माझी शांति मी तुम्हांला देतो. जसे जग देते तशी शांति मी तुम्हांला देत नाही. तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. आणि भिऊ नका. 28 ‘मी जातो आणि तुम्हांकडे येणार आहे’ असे मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले आहे, जर तुमची माझ्यावर प्रीति असती तर मी पित्याकडे जातो याबद्दल तुम्ही आनंद केला असता. कारण माझा पिता माझ्यापेक्षा महान आहे. 29 मी तुम्हांला हे घडण्यापूर्वी सांगितले आहे. यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा.

30 “मी जास्त काळ तुमच्याशी बोलणार नाही. कारण या जगाचा अधिपती येत आहे, तरी त्याचा माझ्यावर अधिकार नाही. 31 परंतु जगाने हे शिकले पाहिजे की, मी पित्यावर प्रीति करतो आणि माझ्या पित्याने जी आज्ञा मला केलेली आहे, नेमके तसेच मी करतो.

“चला आता, आपण निघू या.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center